अल्पायुषी भव..!

अभिजीत पानसे
शनिवार, 8 एप्रिल 2017

दीर्घायू होऊन शरीररूपी यंत्रच जर कुचकामी, कमकुवत, बिघडलेले असेल, तर 'आयुष्यमान' होणे हा तर शापच ठरणार आणि आज तीच परिस्थिती होत आहे. 'आमचे पणजोबा, आजोबा, वडील, आजी यांना कधी चष्मा लागला नाही, शेवटपर्यंत त्यांचे दात चांगले होते, ते वरचेवर आजारी पडत नसत' असे अनेकजण म्हणतात. पण आज तसे दृष्य दिसत नाही.

'आयुष्यमान भवं'.. ज्येष्ठांना नमस्कार केला, की त्यांच्याकडून हा आशीर्वाद उस्फूर्तपणे दिला जातो. 'दीर्घायू होणे' हे जणू आशीर्वाद, एक सकारात्मक गोष्ट आहे हे आपल्या अंतर्मनात पक्कं बसलं आहे. पण हाच आशीर्वाद 'शाप' ठरू पाहत असेल तर? किंवा आधीच हा आशीर्वाद न राहता शाप झाला असेल, तर..? 

दीर्घायू असणे वेगळे आणि 'स्वस्थ' असणे वेगळे! दीर्घायू होऊन शरीररूपी यंत्रच जर कुचकामी, कमकुवत, बिघडलेले असेल, तर 'आयुष्यमान' होणे हा तर शापच ठरणार आणि आज तीच परिस्थिती होत आहे. 'आमचे पणजोबा, आजोबा, वडील, आजी यांना कधी चष्मा लागला नाही, शेवटपर्यंत त्यांचे दात चांगले होते, ते वरचेवर आजारी पडत नसत' असे अनेकजण म्हणतात. पण आज तसे दृष्य दिसत नाही. कारण पूर्वी लोकांना स्वच्छ प्राणवायू मिळायचा.. त्यांची शारीरिक हालचालही जास्त असे. भाजीपाला रसायनयुक्त नसत, दुधात भेसळ नसायची.. ती पिढी इंटरनेट, गॅझेट्‌स, सोशल साईट्‌सच्या आहारी गेलेली नव्हती. त्यामुळे मन आणि डोळे दोन्ही तंदुरुस्त असत. त्यामुळे चष्मा लागायचा नाही. 

आता मात्र वयाच्या तिशीतच गुडघेदुखी सुरू होत आहे. भाजीपाल्यासोबत कीटकनाशकेही आपण तोंडी लावतोय.. अगदी नियमितपणे.. डॉक्‍टर फळे खायला सांगत असतील किंवा उपवासाला फळे खात असतील, तर फळे तरी आता कुठे शुद्ध राहिली आहेत? कार्बोईडयुक्त फळे पोटात ढकलली जातात. केळ्यांची चवही पूर्वीसारखी राहिलेली नाही. पण तरीही रसायनाद्वारे पिकविलेली फळे आपण खातो. 

फेसबुक, व्हॉट्‌सऍप, मोबाईल गॅझेट्‌समुळे प्रत्येकाची दिनचर्या पूर्णपणे, ऍबनॉर्मली, नकारात्मकरित्या बदलली आहे. रात्री झोपी जाण्याची वेळ दोन ते तीन तासांनी बदलली आहे. नीट आत्मपरीक्षण केल्यास कळेल.. आता आपल्याला रात्रीची झोपही गाढ लागत नाही. रात्री-बेरात्री जाग येते आणि मग पुन्हा शेजारीच असलेला मोबाईल पाहिला जातो. परिणामी.. हळूहळू शुगर, रक्तदाब, निद्रानाशाचा त्रास कमी वयातच सुरू होतोय.. चिडचिडेपणा, मानसिक अस्वास्थ्य, नैराश्‍य वाढत आहे. पण यापासून सुटका नाही. कारण, एकदा सोशल साईट्‌स आणि इंटरनेटची सवय लागली, की या चक्रातून सुटका नसते. 

भेसळयुक्त अन्न, धान्य, भाजीपाला, फळे, गॅझेट्‌सचा अतिवापर यामुळे मृत्यू येत नाही; पण शरीररूपी यंत्र आतल्या आत खंगत जाते. टेक्‍नॉलॉजी आपला टोल आपल्या प्रकृतीवर हळूहळू घेऊ लागली आहे. 

मागच्या वर्षी ब्रेडमध्ये घातक घटक आढळले होते. तूप अशुद्ध मिळत होतंच.. ब्रेड-बटर दोन्ही आज भेसळयुक्त झालं आहे. त्याआधी आबालवृद्धांच्या आवडत्या 'मॅगी'मध्ये शिसाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले होते. म्हणजे, मुळातच शरीराला घातक असलेले शिसे आम्ही जिभेच्या चोचल्यांसाठी खातो, हे स्वीकारले होतेच; पण त्याचेही प्रमाण जास्त वाढल्याने 'मॅगी'वर बंदी आली होती. 

आज अशा लवकर कमकुवत होत असलेल्या, 'वेअर अँड टिअर' होत असलेल्या शरीराने 'दीर्घायू' होणे ही तर खरी शिक्षाच म्हणावी लागेल. 'आयुष्यमान भव' हा आता शाप होणार आहे. 

त्यामुळे वेळीच सावरले नाही, कटाक्षाने आपली दिनचर्या सकारात्मकरित्या सुधारली नाही, तर आज विडंबन वाटत असलेले 'अल्पायुषी भव' हे वाक्‍य खरंच उद्या ज्येष्ठ नागरिक आपल्या प्रियजनांना आशीर्वाद म्हणून देतील. कारण, येत्या काळात आपल्या बिघडलेल्या दिनचर्येनुसार बिघडत्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्यामुळे 'आयुष्यमान भव' हा शाप ठरू शकतो.. तेव्हा, आपण प्रत्येकाने वेळीच सुधारायला हवं..

Web Title: Abhijit Panse writes about health hazards