... अन् बहिणीकडे भावाची फक्त आठवण राहिली !

... अन् बहिणीकडे भावाची फक्त आठवण राहिली !

मोठ्या बहिणीच्या लग्नाला ७-८ वर्षे झालेली. तिचा सुखाचा संसार चाललेला. लग्नानंतर आई-वडिलांचं एका अपघातात निधन झाल्यामुळे भावाचं लग्न लावून दिलंं. बायकोशी त्याचं पटायचं नाही. लग्नापूर्वीच्या प्रियकराशी ती अजूनही बोलत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. घरामध्ये सतत किरकिर. त्यांना एक मुलगा झाला; पण सततच्या भांडणामुळे मुलीची आई त्या लहान बाळाला त्यांच्या घरी घेऊन जायची.

बाळापाठोपाठ बायकोदेखील माहेरी गेली. दोन-तीन महिने झाले तरी ती परत येईना. तो तिच्या घरी गेला तेव्हा बायकोच्या भावाने पुन्हा इकडे यायचं नाही म्हणून दम भरला. घरी आल्यानंतर बहिणीला फोन केला. घडलेला प्रकार सांगितला. बहीण गावातील चार सुज्ञ माणसं सोबत घेऊन त्याच्या बायकोच्या घरी गेली. समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. समजावून पाहिलं, पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. बहीण दोन दिवस भावासोबत राहिली. त्याची समजूत काढली. नंतर ती सासरी निघून आली आणि भाऊ एकटा पडला.

त्याला एकट्याला घर खायला उठायचं. तो डिप्रेशनमध्ये गेला. बायकोकडून घटस्फोटाचा अर्ज करण्यात आलेला. समुपदेशकांनी दोघांना समजावून पाहिलं. बाळासाठी एकत्र या म्हणून सांगितलं, पण तिला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं. तीदेखील कमवत असल्यामुळे तिने बाळाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. तिच्या बाजूने तिच्या घरचेदेखील उभे राहिले. हा पूर्णपणे एकटा पडला. आयुष्यात सगळं काही संपलं, सगळी स्वप्नं उद्‍ध्वस्त झाली म्हणून त्याचं मन त्याला खात होतं. एकटं वाटू लागल्यामुळे तो बहिणीला सतत फोन करायचा. ती त्याच्यासाठी एकमेव आधार होती. शेवटी बहिणीलादेखील संसार होता. तिच्या सासरचे, मुलांच्या शाळा. कामाच्या गडबडीमुळे तिने दोन-तीनदा त्याचा फोन उचलला नाही. त्याला वाटलं, की बहीणदेखील आपल्याला टाळू लागली. तो प्रचंड मानसिक तणावामध्ये होता आणि त्यातून बाहेर निघण्याऐवजी अजूनच अडकत चाललेला. घराच्या बाहेर पडणं बंद केलेलं, जेवणाचे हाल. 

त्यादिवशी बहिणीचा फोन वाजला. तिने उचलला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. भावाच्या शेजारच्यांनी फोन केलेला. ती नवऱ्याला घेऊन तडक घरी आली. ४-५ दिवस झाले तो घरातून बाहेर न पडल्याने शेजरच्यांनी दार तोडून आत प्रवेश केला, त्याची बॉडी जमिनीवर पडलेली. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोस्टमार्टम झाले. सुरवातीला वाटलं, त्याने आत्महत्या केली; पण डॉक्टरांनी हार्टॲटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. 

घरी आल्यानंतर  तिची लहानपणीची खेळणी, आई-वडिलांचे फोटो हॉलमध्ये पसरलेले... तिच्या लग्नाची कॅसेट सीडी प्लेयरमध्ये लावलेली... त्याचा बहिणीवर खूप जीव! मोठ्या बहिणीसोबतच तो सगळं शेअर करायचा. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तीच त्याच्यासाठी आधार होती. हॉलमधील ते दृश्य पाहिल्यानंतर बहिणीला काही सुधारेना. आपण फोन उचलले नाहीत, याची गिल्ट तिला आली. भावाचं आपल्यावरील प्रेम बघून तिला रडू आवरेना. ती प्रचंड अस्वस्थ झाली. त्याच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार मानू लागली. नवऱ्याने समुपदेशकांच्या मदतीने हळूहळू तिला या धक्क्यातून बाहेर काढलं. दिवस मागे पडत होते. त्याला जाऊन चार वर्षे झाली, पण आजही रक्षाबंधन आणि भाऊबिजेला बहिणीचे डोळे पाणावतात, त्याची प्रकर्षाने जाणीव होते आणि त्याच्या आठवणीत ती आपल्या मुलाला भावाच्या नावाची राखी बांधते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com