ऑग्मेंटेड रिऍलिटी (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com
रविवार, 13 जानेवारी 2019

खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही!

खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही!

ऑग्मेंटेड रिऍलिटी, व्हर्च्युअल रिऍलिटी आणि मिक्‍स्ड रिऍलिटी हे शब्द आज वारंवार वापरले जातात; पण या तिन्हींमध्ये फरक असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' थोडक्‍यात वाढवलेली (ऑग्मेंटेड) वास्तविकता; आणि याउलट आपल्याला पूर्णपणे आभासी (व्हर्च्युअल) जगात नेणं म्हणजे "व्हर्च्युअल रिऍलिटी.'

"पोकेमॉन गो' हा मोबाईल गेम या दोन्ही रिऍलिटीजचं एक उत्तम उदाहरण आहे. सन 2016 मध्ये या गेमनं जगाला वेड लावलं होतं. "पोकेमॉन' नावाच्या एका आभासी प्राण्याला पकडायला सगळं जग धावत होतं. रस्ते, इमारती, हॉटेल्स आणि घरं अशा अगदी सगळीकडे हा खेळ खेळणारे अनेक लोक मोबाईलच्या पडद्यावर बघत, त्या प्राण्याला शोधत फिरत होते; आणि हे खेळताना तब्बल साडेचार कोटी लोकांसाठी भासी आणि आभासी यातला फरक अंधूक झाला होता. आपण जिथं जिथं जाऊ तिथला परिसर (अगदी आपल्याला त्या क्षणी वास्तवात दिसतो तसाच) आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतो आणि त्या परिसरात कुठंतरी लपलेला हा डिजिटली तयार केलेला आभासी प्राणी आपण पकडायचा असा तो गेम आहे; पण यात आपला परिसर खरा म्हणजेच रिअल असला, तरी त्यात दिसणाऱ्या त्या प्राण्याची प्रतिमा मात्र डिजिटली तयार करून आपल्या परिसरात दाखवलेली असते. मात्र, ते इतकं हुबेहूब केलेलं असतं, की तो प्राणी खरा आहे आणि आपण त्याला पकडतोय असं अगदी खरंच वाटावं असंच चित्रच आपल्यासमोर उभं राहतं. यालाच "ऑग्मेंटेड रिऍलिटी' असं म्हणतात.

याच गेममध्ये अजून एक प्रकार होता. त्या प्रकारात आपला खरा किंवा वास्तवातला परिसर न दिसता फक्त डिजिटली तयार केलेला संपूर्ण आभासी परिसर आणि त्यात त्या प्राण्याची डिजिटल आभासी प्रतिमा असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणजेच तो परिसर आणि तो प्राणी हे सगळंच आभासी! यात खरं असं काहीच नसतं. म्हणूनच याला "व्हर्च्युअल रिऍलिटी' असं म्हणतात. याबद्दल आपण नंतर बोलूच.
सन 1974 मध्ये एक प्रयोग झाला होता. त्यात प्रोजेक्‍टर, व्हिडिओ कॅमेरा आणि काही खास प्रकारचं हार्डवेअर यांच्या मदतीनं यूजर्ससाठी संवादात्मक (इंटरऍक्‍टिव्ह) प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात मायरॉन क्रुगर या संशोधकाला यश मिळालं. आपापल्या खोल्यांबाहेर न पडताही या मंडळींनी इतर खोल्यांमधल्या आपल्या सहकाऱ्यांशी चक्क एकमेकांसमोर उभं राहून संवाद साधला! या प्रयोगशाळेत अनेक खोल्या होत्या. तिथं प्रत्येक खोलीत लावलेला व्हिडिओ कॅमेरा त्यातल्या मंडळींच्या हालचाली टिपायचा आणि त्या हालचाली दुसऱ्या खोलीत लावलेल्या प्रोजेक्‍टरवर दिसायच्या. ग्राफिक्‍स या क्षेत्रात तोपर्यंत फारशी काही प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या हालचाली प्रोजेक्‍टरवर फक्त रंगीत आकृत्यांसारख्या दिसत होत्या; पण प्रत्यक्ष माणूस नीटपणे दिसत नसला, तरीही एकमेकांसमोर उभं राहून हा संवाद होतोय असा भास मात्र सगळ्यांना झाला होता! ऑग्मेंटेड रिऍलिटीची ही सुरवात होती.
त्याच वर्षी विमाननिर्मितीच्या वेळी त्यातल्या वायरिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न चालू होता. त्यावर विचार करताना बोइंग संशोधक टॉम काऊडेल आणि त्याचा सहकारी डेव्हिड मिझील यांना एक अफलातून कल्पना सुचली; आणि हे करता करता त्यांनी ऑग्मेंटेड रिऍलिटीचा पर्यायच शोधला. कालांतरानं ऑग्मेंटेड रिऍलिटी हे विमान कंपनयांचा एक भागच बनलं. या तंत्रज्ञानाचं "ऑग्मेंटेड रिऍलिटी' हे बारसंही त्यानंच केलं. त्यानंतर 1993 मध्ये "कर्मा' म्हणजे "नॉलेज बेसड्‌ ऑग्मेंटेड रिऍलिटी फॉर मेंटेनन्स अँड असिस्टन्स' या नावाची प्रशिक्षण पद्धती शिकाऊ वैमानिकांसाठी वापरली जायला लागली आणि आजही ती वापरली जातेय.

या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. उदाहरणार्थ, आपण फर्निचरच्या दुकानात गेलो, तर एखादं फर्निचर आपल्या घरात कसं दिसेल आणि ते योग्य तऱ्हेनं त्या खोलीत बसेल, की नाही अशा अनेक शंका आपल्या मनात अनेकदा येतात आणि काही वेळा तर ते फर्निचर विकत घेतल्यानंतर आपल्याला पश्‍चातापही होतो; पण आता मात्र विकत घेण्याआधीच ते फर्निचर आपल्या घरात कसं दिसेल हे ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपल्याला बघता येतं. फक्त आपल्याला आपल्या घरातल्या खोल्यांचे फोटो आणि त्यांची मापं, तसंच त्या फर्निचरचे फोटो आणि त्यांची मापं अशी माहिती ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या सॉफ्टवेअरला द्यावी लागते. त्यासाठी हे ऍप असलेला स्मार्टफोनही पुरेसा असतो. मग हे सॉफ्टवेअर ते फर्निचर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर ठेवतं. त्यातला एक पर्याय मग आपण निवडू शकतो. त्यामुळे आपला वेळ, पैसा आणि मनस्ताप हे सगळंच वाचू शकतं. आकिया ही फर्निचर बनवणारी एक कंपनी आपल्या ग्राहकांना अशा प्रकारची सेवा पुरवते.

ड्युलेक्‍ससारख्या रंगाच्या कंपन्याही रंगांसाठी अशा प्रकारच्या सेवा पुरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या भिंतींवर वेगवेगळे रंग कसे दिसतील हे प्रत्यक्ष रंग न देताच आपण बघू शकतो. आर्किटेक्‍टस्‌ किंवा इंटिरिअर डिझायनर्स यांना तर ऑग्मेंटेड रिऍलिटी म्हणजे एक वरदानच आहे. क्‍लाएंटचं घर बघून आपण तयार केलेली इंटिरिअर डिझाइन्स त्याच्या घरात कशी दिसतील, त्यापैकी कुठलं डिझाइन जास्त चांगलं दिसेल अशा सगळ्याचाच अंदाज ऑग्मेंटेड रिऍलिटी वापरून या मंडळींना घेता येऊ शकतो आणि क्‍लाएंट ती डिझाइन्स बघून त्यातलं डिझाइन निवडू शकतात. इथं आपलं घर आणि त्यातल्या खोल्या हे वास्तव आणि फर्निचर, इंटिरिअर डिझाइन किंवा रंग हे डिजिटल तंत्रानं तयार केलेलं आभासी वास्तव यांचं एकत्रीकरण झाल्यामुळंच याला "ऑग्मेंटेड रिऍलिटी' म्हणतात.

या तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग लेन्सकार्ट नावाची चष्मे आणि गॉगल्स विकणारी कंपनीसुद्धा करते. त्यांचं ऍप डाऊनलोड करून आपण आपल्या चेहऱ्याचे फोटो तिथं अपलोड करायचे आणि मग आपल्याला चष्म्याची किंवा गॉगलची कोणती फ्रेम कशी दिसेल ते त्यांच्या ऍपमध्ये दिसतं. म्हणजे प्रत्यक्ष त्या दुकानात जाऊन प्रत्येक चष्मा घालून पहायची गरजच पडत नाही. जी फ्रेम आवडेल ती लगेच ऑनलाईन ऑर्डर करता येते.

दागिन्यांच्या बाबतीतही असंच. ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं वेगवेगळे दागिने आपल्यावर कसे दिसतील हे क्‍लाएंट चक्क घरबसल्या बघू शकतो; आणि मग आपल्याला कुठलाही दागिना आवडला, की तो एक तर आपण ऑनलाईन मागवू शकतो किंवा प्रत्यक्ष दुकानातून घेऊन येऊ शकतो. "ट्राय ऑन ऑग्मेंटेड रिऍलिटी' ही सेवा आज जगभरातल्या अनेक कंपन्या देताहेत. त्यात दिल्लीचे पीसीजी ज्वेलर्स; तसंच मुंबई-पुण्याचे पीएनजी या नावाजलेल्या ज्वेलर्सचाही समावेश होतो.
सौंदर्य-प्रसाधनांच्या उद्योगाच्या बाबतीत ऑग्मेंटेड रिऍलिटी हे एक वरदानच ठरलं आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या 75 टक्के सौंदर्य-प्रसाधनांच्या क्षेत्रातल्या कंपन्या ऑग्मेंटेड रिऍलिटीचा वापर करतात. एखादा मेक-अपचा प्रकार, लिपस्टिक किंवा पापण्यांचा रंग (आय लायनर) या गोष्टी आपल्याला कशा दिसतील हे आपण त्यातलं काहीच प्रत्यक्ष चेहऱ्यावर किंवा त्वचेवर न लावता बघू शकतो; आणि मग त्यापैकी आपल्याला काय खरेदी करायचं आहे याची निवड करू शकतो. अशाच तऱ्हेनं कपडे विक्रेते, ब्युटिशिअन्स, फॅशन्स डिझायनर्स, हेअर एक्‍स्पर्टस्‌ अशांनाही रिऍलिटी अतिशय उपयुक्त आहे. एखाद्या अभिनेत्रीला अमुक अमुक कार्यक्रमाला जाताना कोणता मेक-अप चांगला दिसेल, कोणते कपडे चांगले दिसतील, अमुक अमुक माणसाला कोणती हेअर-स्टाईल चांगली दिसेल असं सगळं त्या व्यक्तीवर प्रत्यक्ष प्रयोग करत बसण्यापेक्षा ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातनं बघून तो निर्णय घेता येतो.

आरोग्यसेवा, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं; तसंच प्रशिक्षण केंद्रं यांनाही ऑग्मेंटेड रिऍलिटी अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये शरीरशास्त्र शिकवताना प्रत्यक्ष मृतदेहापेक्षा ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातून मुलांना डिजिटली तयार केलेलं शरीर आणि त्यातले अवयव दिसतात आणि शिक्षकांना त्याबद्दल माहितीही सांगता येते. आज अनेक शिक्षणसंस्थांमध्ये याचा वापर केला जातोय.

यातलंच दुसरं मजेशीर तंत्रज्ञान म्हणजे "होलोलेन्स' किंवा "होलोग्राफिक्‍स!' आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अनेक ऍप्स असतात. समजा ही नेहमी लागणारी ऍप्लिकेशन्स एका काल्पनिक स्क्रीनवर आपल्या समोरच दिसतील तर? म्हणजे गाणी ऐकायची असतील, तर आहोत तिथूनच नुसता बोटानं इशारा केला, की गाणी चालू होतील, आपण कुठं जाणार असलो आणि आपल्याला तिथल्या हवामानाचा अंदाज घ्यायचा असेल, तर त्या काल्पनिक स्क्रीनवर दुसऱ्या बोटानं वेगळ्या ठिकाणी खूण केली, की तो हवामानाचा अंदाज लगेच आपल्याला दिसेल; किंवा आपण एखादी रेसिपी स्क्रीनवर बघतोय आणि ती रेसिपी आपल्याला ताबडतोब बघता बघता बनवायची असेल आणि त्यासाठी आपण तो स्क्रीनच आपल्या स्वयंपाकघरात आपल्यामागे नेऊ शकलो तर? असं सगळं पूर्वी शक्‍यच नव्हतं. पण आता होलोग्राफ्समुळे हे चक्क शक्‍य होतंय. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं एमएमडीसारखाच एक चष्मा तयार केला आहे आणि त्यात या सॉफ्टवेअरची सोय आपल्याला दिली आहे. आपण हा चष्मा (हेडसेट) घातला, की आपल्याला हवं ते ऍप्लिकेशन आपण चक्क कुठंही ठेऊ शकतो. ती होलोग्राम्स फ्रेम्ससारखी भिंतीवर लावता येतील किंवा टेबलावर ठेवता येतील; आपल्याला हवं तिथं आपण आपला कर्सर जसा फिरवतो तशी ती फ्रेम फिरवता येईल आणि त्याचा आकार कमी-जास्तही करता येईल. गंमत म्हणजे आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर यांच्यामध्ये जितक्‍या सहजतेनं काही ऍड करतो किंवा त्यातून काही काढून टाकतो तितक्‍या सहजतेनं ते यातही करता येतं.

यापुढे ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही!

Web Title: achyut godbole write augmented reality article in saptarang