गुगल स्ट्रीट व्ह्यू (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे!

जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं करायला जमतंही; पण अनेकांना ते शक्‍य होत नाही. मात्र, आता "गुगल स्ट्रीट व्ह्यू' आणि "गुगल अर्थ' या अफलातून सॉफ्टवेअर्समुळे हे आता अगदी घरबसल्या शक्‍य होतंय! नुसतं जगभ्रमणच नव्हे तर अवकाशातून आणि समुद्राच्या आतूनही आपण सहज फिरून येऊ शकतो. या लेखात आपण "गुगल स्ट्रीट व्ह्यू'विषयी, तर पुढच्या लेखात "गुगल अर्थ'विषयी बोलू या.

आपण एखादा फोटो काढतो तेव्हा आपण एखाद्या चौकटीत जितकं दिसतं तितकंच टिपण्याचा प्रयत्न करतो."फोटोग्राफीची कला म्हणजे योग्य त्या चौकटीत योग्य त्या क्षणी फोटो शूट करणं' असं कुणीतरी म्हटलंय; पण आपण जेव्हा काहीही बघतो तेव्हा आपले डोळे फक्त एका चौकटीतलं टिपत नाहीत, तर ते त्याच्या आजूबाजूचंही, म्हणजे अनेक चौकटीतलं, बघत असतात. आता कल्पना करा की आपल्याकडं असा एक कॅमेरा आहे की ज्यामध्ये आपल्याला दृष्टिक्षेपात जितकं काही आहे ते सगळं, म्हणजे त्या दृष्टिक्षेपातल्या अनेक चौकटी, एकाच वेळी टिपता येतात. अशा कॅमेऱ्यातून आपण फोटो काढल्यावर ज्या सगळ्या चौकटी मिळतील त्यातून आपल्याला पाहिजे ती चौकट नंतर आपण निवडू शकू. आता अशी कल्पना करा की आपल्याकडं फुटबॉलसारखा एक घनगोल आहे आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशांनी असे अनेक कॅमेरे बसवलेले आहेत. आता या सगळ्या कॅमेऱ्यांनी जर एकाच वेळी फोटोज्‌ शूट केले तर आपल्याला चार दिशा, चार उपदिशा, वर आणि खाली अशा सर्वच बाजूंचं त्या क्षणाचं चित्र टिपता येईल आणि त्या फुटबॉलवर जितके कॅमेरे लावलेले आहेत तितके स्वतंत्र फोटो आपल्याला मिळतील. आपल्याला हवी असणारी चौकट जर यातल्या दोन किंवा तीन फोटोंमध्ये बसत असेल तर मात्र आपल्याला नंतर ती चौकट आहे तशी मिळणार नाही. मात्र, जर आपल्याला हे सगळे फोटो एकत्र सलग "शिवता' आले तर? तर आपल्याला जवळपास घनगोलाकार असा एकच फोटो मिळेल आणि मग आपण त्यातली हवी ती चौकट पाहू शकू! हे"शिवण्यासाठी' आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधल्या कॉम्प्युटर व्हिजनसारखे अल्गोरिदम्स वापरावे लागतात. जर दोन फोटोंमध्ये ओव्हरलॅप होणारा म्हणजे सारखा असणारा काही भाग असेल तर तो हुशारीनं ओळखून त्यातला डुप्लिकेट काढण्यासाठी त्यातला एक वगळून ते तुकडे एकमेकांना चिकटवणं अशा तऱ्हेची कामं यात करावी लागतात.

असाच काहीतरी प्रयत्न कॅनडामधल्या "इमर्सिव्ह मीडिया' नावाच्या कंपनीनं चालवला होता. सन 2004 मध्ये या कंपनीनं खास प्रकारचा एक कॅमेरा बनवला. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा काहीसा घनगोलाकार होता. भूमितीच्या भाषेत सांगायचं झालं तर तो त्रिमितीय डॉडेकाहेड्रॉन आकाराचा होता. डॉडेकाहेड्रॉनला 12 पृष्ठभाग असतात. यात 11 वेगवेगळ्या दिशांनी फोटो काढण्यासाठी 11 वेगवेगळे कॅमेरे होते आणि त्यातून डिजिटल फोटो काढता येत होते. हे फोटो एकत्र "शिवण्या'साठी सॉफ्टवेअरही होतं!

या कल्पकतेनं बनवलेल्या कॅमेऱ्याच्या साह्यानं मग त्या कंपनीनं सन 2006 मध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचं नाव होतं "जिओइमर्सिव्ह सिटी कलेक्‍ट प्रोजेक्‍ट'. या प्रकल्पात फोक्‍सवॅगनच्या "बीटल' या कारच्या टपावर सर्व दिशांनी फोटो घेणारा हा कॅमेरा ठेवला जाणार होता आणि ही कार व्हिडिओ शूटिंग करत कॅनडा आणि अमेरिका इथल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमधून फिरणार होती! ही कंपनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना त्या त्या ठिकाणांच्या नेमक्‍या स्थानांची नोंदही ठेवणार होती.

प्रकल्पाचं काम सुरू झाल्यावर "इमर्सिव्ह मीडिया' कंपनीकडं महत्त्वाची माहिती जमा व्हायला लागली. ही माहिती खूप मोलाची आहे आणि ती गुगलला खूप उपयोगी पडेल असं वाटल्यामुळं त्यांनी गुगल कंपनीला गाठलं. गुगलसमोर त्यांनी एक भन्नाट संकल्पना मांडली. अमेरिकेतल्या आणि कॅनडामधल्या रस्त्यांवर केलेलं हे सगळं व्हिडिओ शूटिंग गुगल मॅप्समध्ये वापरता आलं तर धमालच होणार होती! "इमर्सिव्ह मीडिया' या कंपनीनं नेमका हाच प्रस्ताव गुगलसमोर ठेवला. गुगलनं या संकल्पनेत असणारी प्रचंड क्षमता लगेचच ओळखली आणि "इमर्सिव्ह'कडून ही सगळी रेकॉर्डिंग्ज विकत घेतली आणि गुगलनं मॅप्समध्ये "स्ट्रीट व्ह्यू' नावानं रस्त्यांवरचं चित्रण टाकलं. याला लोकांचा किती प्रतिसाद मिळावा? पहिल्या चार दिवसांतच तब्बल साडेसात कोटी लोकांनी "स्ट्रीट व्ह्यू'मधून वेगवेगळे रस्ते पाहिले! पण गुगलनं लवकरच "इमर्सिव्ह मीडिया'बरोबरचा आपला करार रद्द केला. कारण, गुगलला या महत्त्वाच्या माहितीसाठी आता कुणावर विसंबून राहायचं नव्हतं. या क्षेत्रात स्वत:च गुंतवणूक करून कॅमेरे बसवून रस्त्यांची चित्रणं करण्याचा निर्णय गुगलनं घेतला. मे 2007 मध्ये "इमर्सिव्ह मीडिया'चं तंत्रज्ञान वापरून "गुगल स्ट्रीट व्ह्यू'ची सेवा गुगलनं 76 देशांत उपलब्ध करून दिली. "गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला!
आता लोकांना जगातलं कुठलंही शहर, त्यातला कुठलाही रस्ता, त्यावरच्या शाळा, हॉटेल्स, मॉल्स, घरं यांचे प्रत्यक्ष फोटोज्‌ बघायला मिळत होते; पण कालांतरानं त्यात काही बदल होत असल्यामुळे दर काही वर्षांनी पुन्हा शूटिंग करून ही चित्रणं अपडेट करावी लागतात.

या सगळ्या चित्रणात एक अडचण होती. या "स्ट्रीट व्ह्यू'मुळे लोकांची "प्रायव्हसी' धोक्‍यात येत होती. माणसांना आपण ज्या ठिकाणी (किंवा ज्या वस्तीत) दिसायला नको त्या ठिकाणी आपण असल्याचं स्पष्ट चित्र गुगलच्या "स्ट्रीट व्ह्यू'मुळे सगळ्या जगाला स्पष्ट दिसत होतं! रस्त्यापासून जवळच असणारे तोकड्या कपड्यांमध्ये "सनबाथ' घेणारे लोक जगाला थेटच दिसत होते! रस्त्यांवर शूटिंग करताना त्यामध्ये रस्त्यांवरच्या लोकांचे चेहरे येत होते. जगभरच्या लोकांना हे चेहरे स्पष्टपणे दिसत होते. ही गोष्ट अडचणीची ठरत होती. यावर उपाय म्हणून या सगळ्या चित्रणातले लोकांचे चेहरे धूसर किंवा पुसट (ब्लर) करावे लागणार होते; पण प्रत्येक रस्त्यावरच्या चित्रणातल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा धूसर करत बसणं हे काम सोपं नव्हतं. मग गुगलनं त्यासाठी काही खास कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स लिहिले. हे प्रोग्रॅम्स गुगलकडची चित्रणं तपासून त्यातले मानवी चेहरे "ओळखून' ते चेहरे मानवी हस्तक्षेपाशिवायच धूसर करायला लागले. याशिवाय रस्त्यावरच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्‌सदेखील धूसर करण्यात आल्या.

"गुगल स्ट्रीट व्ह्यू'नं जवळपास सगळं जग असं "चक्राक्रान्त' करून सगळीकडचे फोटोज्‌ आणि व्हिडिओज्‌ घेतले आहेत; मग ती गजबजलेली शहरं असोत किंवा जिथं फक्त जवळपास मेंढ्याच असतात अशी आयलंड्‌स असोत... या सगळ्यांचं गेली 10-12 वर्षं सतत चित्रीकरण चाललंय. याशिवाय कित्येक माणसं स्वत:सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे चालताना, पळताना, गाडीतून जाताना, आपला कॅमेरा वापरून फोटोज्‌ आणि व्हिडिओज्‌ काढून गुगलला पाठवतात. गुगल मग त्यातलेही योग्य वाटतील ते "गुगल स्ट्रीट व्ह्यू'मध्ये समाविष्ट करून घेतं.

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये बहुतेक सगळ्या रस्त्यांचं चित्रण "गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू'मध्ये करण्यात आलेलं आहे; पण त्यातही अनेक अडचणी आल्या होत्या. जपानमध्ये तर गुगलला एका गमतीशीर अडचणीला सामोरं जावं लागलं होतं. "गुगल स्ट्रीट व्ह्यू'ची कार ठराविक उंचीवर कॅमेरा ठेवून रेकॉर्डिंग करायची. जपानसारख्या देशात घराबाहेरच्या कुंपणाची उंची कमी असल्यानं कॅमेऱ्यामध्ये कुंपणाच्या आतलंही रेकॉर्डिंग होत होतं. याला अर्थातच तिथं विरोध झाला. गुगलला मग तिथं कमी उंचीवर कॅमेरा ठेवून रेकॉर्डिंग करावं लागलं!
भारतातली सगळी शहरं, त्यातले रस्ते आणि पर्यटनांची स्थळं या "गुगल स्ट्रीट व्ह्यू'द्वारे दाखवता यावीत यासाठी गुगलनं भारत सरकारकडं अनेकदा परवानगी मागितली. प्रायोगिक तत्त्वावर भारतानं ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार, नालंदा विद्यापीठ, म्हैसूर पॅलेस अशा काही निवडक पर्यटनस्थळांचं "गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी चित्रण करायला आणि वापरायला परवानगी दिली होती; पण अशी परवानगी सरसकट इतरही सगळ्या गोष्टींचं शूटिंग करण्यासाठी दिली तर भारताची सुरक्षाव्यवस्था धोक्‍यात येईल या भीतीनं भारताच्या गृहखात्यानं ती परवानगी आतापर्यंत दिली नाहीये आणि तसं करण्यामागं कारणंही तशी सबळच होती. सन 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर (26/11) हल्ला झाला, तेव्हा डेव्हिड कोलमन हेडली या त्या हल्ल्याच्या पाकिस्तानी-अमेरिकी सूत्रधारानं मुंबईतले रस्ते, ताज आणि ओबेरॉय हॉटेल्स या सगळ्यांचे फोटोग्राफ्स वापरूनच या हल्ल्याचं नियोजन केलं होतं. जर त्याला "गुगल स्ट्रीट व्ह्यू' उपलब्ध असतं तर हे काम हल्लेखोरांसाठी जास्तच सुलभ झालं असतं, असं भारतीय गृहखात्याला वाटतं. सन 2016 मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्यासाठी हल्लेखोरांनी गुगल मॅप्सच वापरले होते, हे लक्षात आलं आहे. त्यामुळेच त्या एअरबेसच्या रचनेविषयी हल्लेखोरांना अगोदरपासूनच सखोल माहिती होती.
सन 2015 मध्ये "गुगल स्ट्रीट व्ह्यू'नं "ऍक्‍लिमा' या पर्यावरणासंबंधीच्या कंपनीबरोबर पार्टनरशिप केली आणि नेहमीचं शूटिंग करता करता वातावरणातले नायट्रोजन ऑक्‍साईड, ओझोन आणि प्रदूषणाचे हवेतले कण (पार्टिकल्स) यांची मोजमापं घेण्यासाठी कारवर सेन्सर्सही बसवायला सुरवात केली.

एकदा तर गंमतच झाली. एडिंबरोमधल्या एका गॅरेज मेकॅनिकनं "गुगल स्ट्रीट व्ह्यू'चं चित्रीकरण करणारी मोटारगाडी येत असल्याचं पाहून एक खून केला असल्याचं नाटक मुद्दामहून केलं. अर्थातच तो प्रकार कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आणि त्यामुळे स्कॉटलंडच्या पोलिसांनी तपास सुरू केला. प्रत्यक्ष खून झाला नसल्यामुळे त्या तपासातून निष्पन्न काहीच झालं नाही. शेवटी, आपण पोलिसांचा वेळ उगाच दवडला असल्याचा खेद होऊन तो खेद व्यक्त करणारं पत्र सन 2014 मध्ये त्या गॅरेज मेकॅनिकनं पोलिसांना पाठवलं तेव्हा या सगळ्याचा उलगडा झाला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com