चला, 'इन्फोटेक'च्या रंजक सफरीवर (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com
रविवार, 6 जानेवारी 2019

तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक मार्केट आणि इतर अनेक गोष्टी या इन्फोटेकवर स्वार होऊन त्यांनी माणसाच्या जगण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. आणखीही अशी अनेक क्षेत्रं आहेत, ज्यांच्यात डिजिटल क्रांती घडून आली आहे. याच "इन्फोटेक'ची सोप्यात सोपी माहिती करून देणारं हे साप्ताहिक सदर.

तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक मार्केट आणि इतर अनेक गोष्टी या इन्फोटेकवर स्वार होऊन त्यांनी माणसाच्या जगण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. आणखीही अशी अनेक क्षेत्रं आहेत, ज्यांच्यात डिजिटल क्रांती घडून आली आहे. याच "इन्फोटेक'ची सोप्यात सोपी माहिती करून देणारं हे साप्ताहिक सदर.

आज तंत्रज्ञानामुळं सगळं जग प्रचंड वेगानं बदलतंय आणि जवळही आलंय. आज आपण फोनवरून अमेरिकेतल्या माणसाशी त्याला बघून त्याच्याशी संवाद साधू शकतो. जगाच्या कानाकोपऱ्यातली बातमी काही सेकंदांत आपल्याला मिळू शकते. हे वाचून आपल्याला आश्‍चर्य वाटेल; पण अब्राहम लिंकनचा जेव्हा अमेरिकेत 14 एप्रिल 1865 रोजी खून झाला तेव्हा ती बातमी इंग्लंडला पोचायला तब्बल दीड महिना लागला होता! याचं कारण, त्या वेळी बोटीनं प्रत्यक्ष बातमी घेऊन लोकांना यावं लागे. मात्र, टेलिग्राफ, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन यांनी गेल्या काही शतकांत आणि इंटरनेट व मोबाईल यांनी गेल्या काही दशकांमध्येच मानवी संवादप्रक्रियेत मोठी क्रांती केली आहे.

तसं पाहिलं तर विश्व साधारणपणे 1400 कोटी वर्षांपूर्वी आणि पृथ्वी 450 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली. 375 कोटी वर्षांपूर्वी पहिला जीव निर्माण झाला आणि उत्क्रांतीनंतर साधारणपणे एक लाख वर्षांपूर्वी माणूस या पृथ्वीतलावर अवतरला. ऑल्व्हिन टॉफ्लर हा विचारवंत माणसाच्या इतिहासाचे तीन टप्पे मानतो. शेती, उद्योग आणि सेवा. शेतीचा टप्पा कित्येक दशसहस्त्रकं टिकला; पण या काळात तंत्रज्ञानात फारशी प्रगती झालीच नाही. त्यामुळे माणसाच्या जीवनशैलीत फारसा फरक पडला नाही.

यानंतर काही शतकांपूर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि तंत्रज्ञानातही प्रगती व्हायला लागली. रेल्वे निघाल्या. कापडउद्योग आणि इतर उद्योग वाढीस लागले आणि अनेक नवनवी उत्पादनं तयार व्हायला लागली. मोटारगाड्या आणि विमानं याच टप्प्यातली. उद्योगाच्या या फक्त काही शतकांच्या टप्प्यात माणसानं तंत्रज्ञानात जी प्रगती केली ती पूर्वीच्या शेतीच्या टप्प्यातल्या कित्येक दशसहस्त्रकांमधल्या प्रगतीपेक्षाही अनेक पटींनी जास्त होती. त्याच काळात शहरं वसली आणि माणसांची आयुष्य जास्त गतिमान बनली. त्यामुळे माणसांची जीवनशैलीच बदलली.
यानंतर आधुनिक सेवेचा काळ सुरू झाला. तो मात्र साधारणपणे सन 1960 च्या दशकानंतर. याच काळात कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स (या दोहोंना मिळूनच आपण "इन्फोटेक' हा शब्द वापरू या). यांचा नुसता उदयच झाला नाही तर त्यांनी या जगात नुसता धुमाकूळ घातला आणि हे जग ओळखूच येईनासं झालं. याच इन्फोटेकभोवती बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक मार्केट आणि इतर अनेक गोष्टी फिरायला लागल्या आणि याच इन्फोटेकवर स्वार होऊन त्यांनीही आपला चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. या सेवेच्या काही दशकांमधल्या तंत्रज्ञानातली प्रगती उद्योगपर्वातल्या यापूर्वीच्या शतकांमधल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अनेक पट होती आणि ती शेतीतल्या दशसहस्त्रकांमधल्या प्रगतीच्या तर खूपच जास्त पटींनी अधिक होती.

या इन्फोटेकच्या काळाचेही पाच मुख्य टप्पे पडतात. सन 1960 चं दशक मेनफ्रेम कॉम्प्युटर्सचं होतं. हा पहिला टप्पा. सन 1970 चं दशक हे मिनी कॉम्प्युटर्सचं होतं. हा दुसरा टप्पा. तिसऱ्या सन 1980 च्या टप्प्यात मायक्रोप्रोसेसर्स, डेस्कटॉप्स आणि पर्सनल कॉम्प्युटर्स (पीसीज्‌) निघाले. सन 1990 च्या दशकाचा चौथा इंटरनेटचा टप्पा होता आणि आज आपण सन 2000 नंतरच्या पाचव्या टप्प्यात आहोत. त्यात मोबाईल कॉम्प्युटिंग वाढलं.

सन 1960 च्या दशकातले मेनफ्रेम्स हे खूप मोठे असायचे. ते वापरायला खूपच कठीण आणि महाग असायचे. त्यांच्यात ग्राफिकल यूजर इंटरफेस (जीयूआय) नव्हता. दुसरं म्हणजे कॉम्प्युटरमध्ये रंग भरलेले नव्हते. शिवाय, त्यात मल्टिमीडिया आणि त्यात आपण टीव्हीही बघू शकतो किंवा आपल्या टीव्हीवर इंटरनेट बघू शकतो. या सगळ्या काळात कॉम्प्युटरचे आकार आणि किमती कमी होत गेल्या आणि त्यांची शक्ती मात्र वाढत गेली. या सगळ्यांमुळे त्यांच्यावर चालणारी ऍप्लिकेशन्स, त्यांच्यावरचे गेम्स आणि इतरही अनेक गोष्टींचा अक्षरशः स्फोट झाला. यातच फेसबुक आणि व्हॉट्‌सअप, ट्‌विटर यांनी तर आपण आपल्यालाच ओळखू येईनासे झालो!
सर्वसामान्य माणसाचं आयुष्य अतिशय वेगानं बदलत असताना त्याच्या कानावर क्‍लाऊड कम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा वेअरहाउसिंग, डेटा मायनिंग, ऑग्मेंटेड रिऍलिटी, व्हर्च्युअल रिऍलिटी, थ्रीडी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मल्टिमीडिया, वायफाय, 1 जी, 2 जी, 3 जी, 4 जी, 5 जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, न्यूरल नेटवर्क्‍स, डीप लर्निंग, एक्‍स्पर्ट सिस्टिम्स, जीपीएस असे अनेक अनेक शब्द आणि जार्गन पडायला लागले. या जार्गनची एक गमतीशीर गोष्ट असते. जर कुणी ते पारिभाषिक शब्द वारंवार आणि वारेमाप पद्धतीनं वापरायला लागलं की ऐकणाऱ्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. मग तो दूर करण्यासाठी माणसं दोन मार्ग निवडतात. एक म्हणजे त्या शब्दाचा किंवा संकल्पनेचा पूर्ण अर्थ कळला नसला तरीही कुठल्या संदर्भात तो शब्द वापरला आहे ते बघून तोच शब्द इतरांसमोरही साधारणपणे योग्य संदर्भ बघून सरळ ठोकून द्यायचा! मग ऐकणारेही बहुतेक वेळा खूप इम्प्रेस होतात. ही युक्ती बऱ्याच वेळा यशस्वी ठरते. मग ते ऐकणारेही तोच शब्द - त्याचा अर्थ कळो न कळो - आणखी इतरांसमोर ठोकायला लागतात आणि ही साखळी सुरूच राहते. मात्र, दुसरा मार्ग म्हणजे त्या शब्दाच्या किंवा जार्गनच्या खोलात जाणं आणि त्याचा अर्थ शिकून घेणं. हा दुसरा मार्ग जास्त वेळखाऊ आणि जास्त कष्टमय असला तरी तो आंतरिक समाधान देणारा आहे, असा माझा अनुभव आहे.

मला विद्यार्थी होऊन शिकायला आणि शिकवायला आवडत असल्यामुळे मी या फंदात पडलो आणि मग विचार आला की याविषयी सोप्या आणि रंजक भाषेत लिहायला काय हरकत आहे? यामुळेच हा उपद्‌व्याप. खरं तर "यू ऑलवेज वॉंटेड टू नो. बट, वेअर आफ्रेड टू आस्क' असंच या सदराचं शीर्षक ठेवायला हवं होतं; पण ते खूप लांबलचक झालं असतं म्हणून "इन्फोटेक' हे सुटसुटीत नाव ठेवावं, असं ठरलं. बीपीआर, कोअर कॉम्पिटन्सी, टीक्‍यूएम, सिक्‍स सिग्मा यांसारख्या काही मॅनेजमेंटच्या संबंधित संकल्पनाही या सदरात घेण्याचा विचार आहे. यात अनेक शब्द आणि त्यांमागच्या कल्पना जितक्‍या सोप्या करून सांगता येतील, तितक्‍या सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे; पण अर्थात काही वेळा त्यात थोडी गुंतागुंतही येण्याची शक्‍यता आहे. एवढं असलं तरी आपण याचं मनापासून स्वागत कराल अशी मला आशा आहे.

Web Title: achyut godbole write infotech article in saptarang