अवगुंठन अवगुंठन (प्रवीण तरडे)

Pravin Tarde
Pravin Tarde

‘अवगुंठन’ एकांकिका लिहिताना जितका भांबावलो होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त कसरत मला ही एकांकिका दिग्दर्शित करताना करावी लागली. कॉलेजमध्ये त्यावेळी दोन ग्रुप पडले होते आणि दोन वेगळ्या एकांकिका सादर केल्या जाणार होत्या. त्यामुळे संपूर्ण नव्या टीमबरोबर मला काम करावं लागणार होतं. कारण आधीची जुनी टीम त्यांची वेगळी एकांकिका करणार होती. कॅन्टीनमधे बसलेलो असताना ग्रुपमध्ये भांडणं झाली आणि मी रागाच्या भरात बोलून गेलो ः ‘‘मला तुमच्या कोणाचीही गरज नाही. आत्ता कॅन्टीनच्या गेटमधून जी कोणी पंधरा मुलं-मुली आत येतील त्यांना घेऊन यंदाचा पुरुषोत्तम करंडक जिंकून दाखवीन.’’

‘अवगुंठन’ हा खरंतर हा शब्द लेखाच्या सुरवातीलाच लिहावा की नाही या विचारात मी होतो. कारण अवगुंठन म्हणजे काय हे माहीत असणारे किती लोक असतील असा प्रश्‍न मला २००१ मध्ये होता आणि आजही आहेच. शब्दकोशात तुम्हाला दोन व्याख्या सापडतात. संपूर्ण कपड्यात नखशिखांत भिजलेली स्त्री... ती अवगुंठून उभी असते किंवा लाजाळूच्या झाडाला तुम्ही स्पर्श केला, तर ते झाड स्वतःला अवगुंठून घेतं, असा हा ‘अवगुंठन’ शब्द. सन २००१मध्ये ‘अवगुंठन’ नावाची एकांकिका लिहिण्याची हिंमत मी दाखवली. ज्यावेळी मला हा विषय सुचला त्यावेळी मी आनंदून गेलो होतो आणि ज्यावेळी मी हा विषय लिहायला घेतला, त्यावेळी संपूर्णपणे भांबावूनही गेलो होतो. कारण कित्येकदा कल्पना सुचताना खूप छान असतात; पण त्या  नाटकरूपात प्रत्यक्षात उतरतात, तेव्हा त्या त्याचं आक्राळविक्राळ रूप धारण करून तांडव करतात. अवगुंठन या विषयानं माझ्यासमोर असाच तांडव घातला. सन २००१ मध्ये आयएलएस विधी महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम करंडकासाठीच हा विषय मी लिहिला होता. माझ्या त्या लिखाणाचं त्यावेळी तोंडभरून कौतुकही झालं. ‘न भूतो न भविष्यती’ इतकी पारितोषिकं मला त्या वर्षी मिळाली. मात्र, ज्या वयात मी हा विषय लिहिला होता, त्या वयात मी त्या विषयाला तेवढा न्याय दिला होता का, असा प्रश्‍न मला आजही पडतो. मला पडलेल्या त्या प्रश्‍नाच्या मुळाशी न जाता ‘अवगुंठन’ लिहून झाल्यावर त्याचा पहिला प्रयोग होईपर्यंत काय गमतीजमती झाल्या हे सांगताना मला आणि ते वाचताना तुम्हाला जास्त मजा येईल. 

तर झालं असं, एक अत्यंत अवघड असा बुद्धिवादी विषय मी एकांकिकास्वरूपात घेऊन पूर्ण केला होता. त्याची गोष्ट एका वाक्‍यात सांगायची झाली, तर अशी होती, की प्रभू श्रीकृष्ण सांगून गेले, की ‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।’ म्हणजे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी जन्म घेईन. या वाक्‍याची आठवण होऊन कृष्णाला असं वाटतं, की आता पुन्हा अवतार घ्यायची वेळ झालीये. मात्र त्याच वेळी श्रीकृष्ण हेसुद्धा सांगून गेला होता, की ‘न धरी शस्त्र करी सांगेन गोष्टी चार युक्तीच्या’ म्हणजे धर्माला आलेली ग्लानी पाहून श्रीकृष्णाला संहार करायचा होता; पण ‘न धरी शस्त्र करी’ असं सांगितल्यामुळे त्याच्या सांगण्यानुसार शस्त्र चालवणारा कुणीतरी अर्जुन त्याला हवा होता. कारण अर्जुनाच्या मदतीशिवाय दुर्जनांचा संहार शक्‍य नव्हता. कृष्ण शोधतशोधत ज्या अर्जुनाकडे येतो, त्याचा हातात शस्त्र घेण्यास नकार होता... आणि इथंच सुरू झालं द्वंद्व. कारण आत्ताच्या काळातल्या अर्जुनाचं म्हणणं होतं, की ‘माणसं मारून जगातला कुठलाच प्रश्‍न सुटू शकत नाही. त्या वेळीही सुटला नव्हता आणि पुढंही कधी सुटणार नाही.’ श्रीकृष्ण बुचकळ्यात पडतो. कारण त्या वेळच्या अर्जुनानं कुठलाही प्रश्‍न न विचारता अख्खी गीता ऐकून घेतली होती. मात्र, यावेळी त्याला खूप प्रश्‍न पडले होते. त्याची उत्तरं निर्गुण निराकार परमेश्‍वराकडंसुद्धा नव्हती. ‘माणसं का मारायची,’ या अर्जुनाच्या प्रश्‍नाला निरुत्तर होऊन श्रीकृष्ण नवा अर्जुन शोधायला निघून जातो आणि समाधानकारक उत्तर न मिळालेला अर्जुन तसाच गोंधळून जातो. जसे तुम्ही आम्ही सारेच गोंधळून आजही स्वतःला रोजच्या व्यापात अवगुंठून घेतलंय. अशी ही ‘अवगुंठन’ एकांकिका. 

लिहिताना जितका भांबावलो होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त कसरत मला ही एकांकिका दिग्दर्शित करताना करावी लागली. कॉलेजमध्ये त्यावेळी दोन ग्रुप पडले होते आणि दोन वेगळ्या एकांकिका सादर केल्या जाणार होत्या. त्यामुळे संपूर्ण नव्या टीमबरोबर मला काम करावं लागणार होतं. कारण आधीची जुनी टीम त्यांची वेगळी एकांकिका करणार होती. कॅन्टीनमधे बसलेलो असताना ग्रुपमध्ये भांडणं झाली आणि मी रागाच्या भरात बोलून गेलो ः ‘‘मला तुमच्या कोणाचीही गरज नाही. आत्ता कॅन्टीनच्या गेटमधून जी कोणी पंधरा मुलं-मुली आत येतील त्यांना घेऊन यंदाचा पुरुषोत्तम करंडक जिंकून दाखवीन.’’ आणि आता कोण पहिले पंधरा येणार याची वाट पाहत बसलो. पहिलाच मुलगा आला तो सुशील काणे. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, दाताला क्‍लिप आणि हातात लेडीज सायकल. वय वर्ष अठरा. ज्यानं अजून पहिलं मतदानही केलं नव्हतं, तो माझ्या एकांकिकेत अर्जुनाचं पात्र साकारणार होता. मी पहिल्यांदा त्याच्याशी बोललो, तेव्हा मी रॅगिंग करतोय असंच त्याला वाटलं. त्याला विश्‍वासात घेऊन बाजूला बसवलं आणि वाट पाहू लागलो, की गेटमधून आता कोण येणार? समोरून आला सध्याचा सेलिब्रिटी केसेससाठी प्रसिद्ध असलेला ॲड. सुकृत खुडे. मोठे डोळे आणि प्रचंड हसरा चेहरा. त्याचा हसरा चेहरा पाहूनच ठरवलं, की हा आपल्या ‘अवगुंठन’चा श्रीकृष्ण. नंतर आला ॲड. रणजित सांगळे. सध्या तो पंतप्रधान कार्यालयाच्या लीगल डिपार्टमेंटशी संलग्न आहे. एकेक करत मी धरून सोळा जणांचा संघ पूर्ण झाला. त्यात कॅन्टीच्या गेटमधून आत आलेले, नाटकाशी काहीही घेणंदेणं नसलेले नवेकोरे करकरीत अकरा जण होते आणि माझे आधीचे चार सहकारी. तिथून सरळ उठलो आणि नाटकाच्या प्रॅक्‍टिसला सुरवात केली. 

मी ‘अवगुंठन’चं वाचन सगळ्यांसमोर केलं, त्या वेळचे सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, की आत्ता मी जे काही वाचलं, त्यातलं कोणालाच काही कळलं नव्हतं. मात्र, ठरल्याप्रमाणं याच पंधरा जणांना घेऊन मला करंडक जिंकायचा होता. सध्या ॲड. सुशील काणे खूप नावाजलेला वकील आहे; पण त्यावेळी त्याचं वय अठरा होतं आणि माझ्या एकांकिकेतल्या अर्जुनाला जेवढे प्रश्‍न पडले होते, त्याच्या दुप्पट प्रश्‍न अर्जुनाची भूमिका करणाऱ्या सुशीलला पडले होते. स्वतःच्या प्रश्‍नाचं मनासारखं मिळेपर्यंत हा अर्जुन मला ‘दुर्योधन’ समजून छळायचा. मात्र, त्याच सुशीलच्या प्रश्‍नांमुळं ‘अवगुंठन’ जास्तीत जास्त समृद्ध होत गेली. नाटकातल्या अर्जुनाला कसंबसं शांत केलं, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाचे प्रश्‍न सुरू झाले. बरं, पहिल्यांदाच काम करत असले, तरी सगळे वकीलच! त्यामुळे माझी निम्मी ताकद कलाकारांना नाटक समजावून सांगण्यातच चालली होती. मात्र, सगळ्यांच्या अशा प्रश्‍नांमुळेच माझी एकांकिका खूप बहरत गेली आणि पाहतापाहता महिन्याभरात एकांकिका तयारसुद्धा झाली. मला अजूनही तो पहिला प्रयोग आठवतोय- कारण या नव्या मुलांनी माझं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्या वर्षी मी प्रथम पारितोषिक नाही जिंकलं. द्वितीय पारितोषिक जिंकलं. छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे एकांकिका दुसरी आली. सुशील काणे त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिकसुद्धा मिळालं. माझा आत्मविश्‍वास इतका वाढला, की त्यानंतर आजतागायत माझ्या प्रत्येक सिरीयलला, सिनेमाला आणि नाटकाला मी नवा कोरा करकरीत हिरो हिरोईनच घेतो. कॅन्टीनमधून दुसऱ्यांदा आलेला सृकृत खुडे आजतागायत माझा सर्वांत जवळचा मित्र आहे. त्याच्याच मदतीमुळे एका कायदेशीर अडचणीत असलेला माझा ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट प्रदर्शित होऊ शकला. पुढे याच एकांकिकेनं आणि याच टीमनं महाराष्ट्रातल्या सर्व एकांकिका स्पर्धांमधून प्रथम पारितोषिक पटकावलं. अनाहूतपणे माझ्या आयुष्यात आलेल्या त्या पंधरा जणांचे चेहरे आजही मला माझ्या आप्तस्वकियांसारखे भासतात. लाजाळूच्या झाडाला स्पर्श झाल्यावर ते अवगुंठून घेतं; पण या पंधरा जणांचा स्पर्श झाल्यावर मी जास्तीत जास्त खुललो. माझ्या वकील मित्रांनो खूप खूप धन्यवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com