उंटांचं शहाणपण (ऋता बावडेकर)

ऋता बावडेकर saptrang.saptrang@gmail.com
रविवार, 4 डिसेंबर 2016

एकदा महाराज आजारी पडले. त्यांना शिकारीसाठी बाहेर जाता येईना, तेव्हा परत एकदा उंटांना मारण्याचा पर्याय सेवकांनी महाराजांपुढं ठेवला; पण ते तयार झाले नाहीत. ‘ते उंटच जर म्हणाले, आम्हाला मारा; मग तर त्यांना आपण मारू शकतो ना?’ सेवकांनी विचारलं. मात्र, ‘कोण असं स्वतःलाच मारा म्हणेल,’ असा विचार करून सिंहमहाराज त्यांना ‘हो’ म्हणाले.

जंगलचा राजा सिंह... त्याच्या दरबारी अनेकविध प्राणी-पक्षी होते. त्यातही बिबट्या, लांडगा, कोल्हा, कावळा हे जरा त्याच्या जास्तच जवळ असल्याचं दाखवत. एखादं सावज दिसलं, की येऊन महाराजांना बातमी द्यायची आणि त्यांनी केलेल्या शिकारीवर स्वतःचंही पोट भरायचं, असं या प्राण्यांचं काम होतं किंवा त्यांनी तसं ठरवून घेतलं होतं. महाराजांनाही मदत होई, त्यामुळं ते त्यांना फारसं बोलत नसत. 

एके दिवशी सिंहमहाराज आणि त्यांचे हे सेवक नदीकाठी फेरफटका मारायला निघाले होते. वाटेत त्यांना दोन वेगळेच प्राणी दिसले. महाराजांनी चौकशी केली. ‘मी माहिती घेतो...’ असं म्हणून कावळा भुर्रकन उडूनही गेला. काही वेळानं सर्व माहितीनिशी कावळा हजर झाला. म्हणाला ः ‘‘महाराज, या दोन प्राण्यांना उंट म्हणून ओळखलं जातं. ते दूर राजस्थानच्या वाळवंटात राहतात. काही माणसांनी बऱ्याच उंटांना पळवलं, त्यात हे दोन उंट होते. माणसं त्यांना शहरात नेत होती, त्यांचा हेतू ओळखून या दोन उंटांनी संधी मिळताच तिथून पळ काढला...आणि ते आपल्या जंगलात येऊन दाखल झाले.. पण महाराज, एक विचित्र गोष्ट त्यांच्याकडं दिसली. त्यांच्याकडं एक छोटी, आयताकृती वस्तू आहे. त्यात मध्येच लाइट लागत होता, मध्येच अस्पष्ट आवाज येत होते.. काय आहे विचारलं, तर म्हणाले ः ‘हा मोबाईल आहे.’ मग त्यांनी मलाच प्रश्‍न विचारला ः ‘इथं तुमच्या जंगलात नेटला रेंज मिळत नाही. ‘वाय-फाय’ही नाही का? त्यामुळं आम्हाला घरीही संपर्क साधता येत नाही.’ मला काहीच कळलं नाही, महाराज. ‘मोबाईल’, ‘नेट’, ‘रेंज’, ‘वायफाय’ हे शब्दही मला माहीत नाहीत, मी आपला इथंपर्यंत पाठ करत आलो...’’ 

महाराजांनाही कळेना, की हे नेट, वाय-फाय प्रकरण काय आहे! तेवढ्यात त्यांची तंद्री भंग करून इतर सेवक म्हणाले ः ‘‘महाराज, आयती शिकार चालून आलीय. मस्त ताव मारू.’’ पण महाराजांना ते पटलं नाही. ते म्हणाले ः ‘‘ते आपल्याकडं पाहुणे आहेत. त्यांच्या घरी संपर्क होईपर्यंत ते इथं राहतील. त्यांना कुणीही दगाफटका करायचा नाही.’’ उंटांना भेटून सिंहमहाराजांनी त्यांनाही आश्‍वस्त केलं. सेवक चरफडत राहिले. 

एकदा महाराज आजारी पडले. त्यांना शिकारीसाठी बाहेर जाता येईना, तेव्हा परत एकदा उंटांना मारण्याचा पर्याय सेवकांनी महाराजांपुढं ठेवला; पण ते तयार झाले नाहीत. ‘ते उंटच जर म्हणाले, आम्हाला मारा; मग तर त्यांना आपण मारू शकतो ना?’ सेवकांनी विचारलं. मात्र, ‘कोण असं स्वतःलाच मारा म्हणेल,’ असा विचार करून सिंहमहाराज त्यांना ‘हो’ म्हणाले. सेवकांचा उत्साह वाढला. ते पळत पळतच उंटांपर्यंत पोचले. दोघंही त्या ‘मोबाईल’नामक डब्यात बघत होते. चेहरे थोडे चिंताक्रांत होते. सेवकांनी त्यांना कारण विचारलं. ते दोघंही ‘काही नाही... काही नाही’ म्हणाले. मग त्यात वेळ न घालवता, सेवकांनी आपल्या येण्याचं कारण त्यांना सांगितलं, ‘‘महाराज खूपच आजारी आहेत. त्यांना हलताही येत नाही. आम्ही भेटून आलो. तुम्हीही त्यांना एकदा भेटा. परत कधी भेट होईल न होईल...’’ उंटांनी एकमेकांकडं बघितलं आणि मनाशी काही निश्‍चित असं ठरवून महाराजांना भेटायला ते निघाले. 

सिंहमहाराज खरोखरच खूप बारीक झाले होते. उंटांनी त्यांची विचारपूस केली...तेवढ्यात सेवक एका मागोमाग एक बोलू लागले ः ‘‘महाराज, किती दिवसांचे उपाशी आहात. आम्हाला तुम्ही खाऊन टाका, नाहीतरी आमचा उपयोग काय?’’ पण प्रत्येकाला महाराज ‘नाही’ म्हणत होते. उंट तसेच गप्प उभे होते. सेवक म्हणाले ः ‘‘तुम्हाला महाराजांनी इतकी मदत केली. तुम्ही नाही का महाराजांचं अन्न होणार?’’ धीर करून एक उंट म्हणाला ः ‘‘महाराज, अभय असावं...’’ दुसरा उंट म्हणाला ः ‘‘आत्ताच आमच्या कुटुंबांशी आमचा संपर्क झाला. आम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या दातृत्वाबद्दल त्यांना सांगितलं, तेव्हा आमच्या आजोबांनी आम्हाला अशीच एक कथा सांगितली. खूप वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र असाच हरवला होता. तुमच्यासारख्या महाराजांनी त्याला आश्रय दिला, तेव्हाही असंच घडलं होतं, तेव्हाचे सेवकही ‘मला मारा, मला मारा’ म्हणत होते. आमच्या आजोबांच्या मित्राला वाटलं, महाराज सगळ्यांना अभय देत आहेत-आपल्यालाही देतील; पण तसं घडलं नाही...आणि तो उंट मारला गेला. आम्हाला ती चूक करायची नाही आणि तुम्ही आम्हाला अभयही दिलं आहे. आमचे कुटुंबीय आम्हाला सापडले, मोबाईलला रेंजही मिळाली. आता नेव्हिगेशन सिस्टिममुळं आम्ही रस्ता शोधत शोधत घरी जाऊ शकतो. आपण परवानगी द्यावी...’’ 

सेवक आशेनं महाराजांकडं पाहू लागले; पण महाराज मंद हसत होते. म्हणाले ः ‘‘एका अटीवर तुम्हाला जाऊ देईन. मलाही हे मोबाईल, रेंज.. वगैरे प्रकरण शिकवा म्हणजे या स्वार्थी सेवकांवर अवलंबून राहायला नको. माझी अनेक कामं मला याच्या मदतीनं करता येतील... मुख्य म्हणजे शिकारही शोधता येईल...’’ यावर सगळेच हसले. सेवक खाली मान घालून निघून गेले आणि उंट मोबाईलसंबंधी महाराजांना माहिती देऊ लागले...

Web Title: adhunik bodh katha

टॅग्स