व्यवसायकर: कोणासाठी, कशासाठी? (ऍड. सुकृत देव)

ऍड. सुकृत देव sukrut_deo29@yahoo.co.in
रविवार, 1 जुलै 2018

व्यवसाय, नोकरीद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्यांना व्यवसायकर भरावा लागतो. हा व्यवसायकर नेमका कुणाला भरावा लागतो, त्याचे नियम काय असतात, कशा प्रकारे भरावा लागतो आदी गोष्टींबाबत माहिती.

वेगवेगळ्या करांद्वारे जमा झालेली रक्कम पायाभूत सुविधा उभारणं किंवा सामाजिक कल्याणाची कामं करणं अशा गोष्टींसाठी वापरली जाते. असे कर भरण्यानंच देशाची प्रगती होते, त्यामुळं कुठलाही कर वेळेत भरणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. असाच एक प्रत्यक्ष कर जो सरकारजमा करावा लागतो तो म्हणजे व्यवसायकर. व्यवसाय, उद्योग किंवा नोकरी ही उत्पन्न कमवायची साधनं. या कमाईवर भरावा लागणारा हा कर.

व्यवसाय, नोकरीद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्यांना व्यवसायकर भरावा लागतो. हा व्यवसायकर नेमका कुणाला भरावा लागतो, त्याचे नियम काय असतात, कशा प्रकारे भरावा लागतो आदी गोष्टींबाबत माहिती.

वेगवेगळ्या करांद्वारे जमा झालेली रक्कम पायाभूत सुविधा उभारणं किंवा सामाजिक कल्याणाची कामं करणं अशा गोष्टींसाठी वापरली जाते. असे कर भरण्यानंच देशाची प्रगती होते, त्यामुळं कुठलाही कर वेळेत भरणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. असाच एक प्रत्यक्ष कर जो सरकारजमा करावा लागतो तो म्हणजे व्यवसायकर. व्यवसाय, उद्योग किंवा नोकरी ही उत्पन्न कमवायची साधनं. या कमाईवर भरावा लागणारा हा कर.

व्यवसायकर हा प्रत्येक व्यक्ती किंवा मालक जो कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी करत असेल त्यांनी भरणं गरजेचं आहे. "व्यक्ती" या व्याख्येमध्ये हिंदू अविभाजित कुटुंब, भागीदारी संस्था, मर्यादित भागीदारी संस्था (1 एप्रिल 2018 पासून), कंपनी, सोसायटी, क्‍लब, संस्था इत्यादींचा पण समावेश होतो. जी व्यक्ती, मालक, संस्था, किंवा कंपनी आपल्याकडे नोकरी करत असलेल्या व्यक्तीचा व्यवसायकर कापत असते, त्यांनी या व्यक्तीचा व्यवसायकर व त्याचं ऑनलाइन विवरणपत्र भरणं गरजेचं असतं. (PTRC Return - IIIB). भारतीय संविधान कलम 276 नुसार व्यवसायकर लावण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीस वार्षिक 2500 रुपयांपर्यंत व्यवसायकर भरायला लागतो. त्याहून अधिक नाही. व्यवसायकर कायद्यानुसार, प्रत्येक व्यक्ती, संस्था किंवा कंपनी यांनी स्वतःचा व्यक्तिगत व्यवसायकर, नोंदणी करून भरायला हवा, व्यवसायकर ऑनलाईन नोंदणी www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करायला लागते.

पुरुषांचं मासिक वेतन साडेसात हजार रुपयांपर्यंत असेल, तर कोणताही व्यवसायकर भरावा लागत नाही. महिलांचं मासिक वेतन दहा हजार रुपयांच्या आत असेल, तर त्यांना व्यवसायकर भरावा लागत नाही. पुरुषांचं मासिक वेतन साडेसात ते दहा हजार रुपये असेल, तर व्यवसायकर प्रति महिना 175 भरायचा असतो. पुरुष आणि महिला या दोघांचंही मासिक वेतन दहा हजार रुपयांहून अधिक असेल, तर दोनशे रुपये प्रति महिना व्यवसायकर भरावा लागतो. फेब्रुवारी महिन्यात मात्र हा कर दोनशेऐवजी तीनशे रुपये इतका असतो.

नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींचा व्यवसायकर सरकारकडे भरण्याची जवाबदारी ही त्या संस्थेची, कंपनीची असते. वार्षिक कापलेला/ भरलेला व्यवसायकर पन्नास हजार रुपयांहून कमी असेल, त्यांनी वार्षिक विवरणपत्र 31 मार्चच्या आत भरावं लागतं. वार्षिक कापलेला/ भरलेला व्यवसायकर पन्नास हजार रुपयांहून अधिक असेल, त्यांनी प्रत्येक महिन्याला (महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या आत) विवरणपत्र भरणं आवश्‍यक असतं. म्हणजे एकूण बारा व्यवसायकर विवरणपत्रं त्यांना भरावी लागतील. व्यवसायकर ऑनलाईन विवरणपत्र वार्षिक किंवा मासिक वेळेत न भरल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागतो.

आयआरडीए कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांच्या एजंटनाही त्यांना मिळणाऱ्या कमिशनपोटी हा व्यवसायकर भरावा लागतो. अशा कंपन्यांनी त्या इन्शुरन्स एजंटच्या कमिशनमधून वार्षिक अडीच हजार रुपये व्यवसायकर कापून त्यांना तो सरकारजमा करावा लागतो. ज्या महिन्याला व्यवसायकर कापला असेल, त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या आत तो भरावा लागतो. त्याचबरोबर व्यवसायकर विवरणपत्र, असेसमेंट, पुनर्प्राप्ती अपील इत्यादींची पूर्तताही करावी लागतेच. मात्र, इन्शुरन्स एजंटनी आधीच व्यवसायकर क्रमांक (वैयक्तिक) घेतला असेल आणि व्यवसायकर भरलाही (अडीच हजार रुपये) असेल, तर कंपन्यांनी परत भरण्याची गरज नाही. मात्र, या एजंटना आता वैयक्तिक व्यवसायकर क्रमांक रद्द करावा लागणार आहे आणि हा क्रमांक 1 एप्रिल 2017 पासून रद्द करण्यात येईल. संबंधित एजंट जर एकाहून अधिक कंपन्याचा इन्शुरन्स एजंट असेल, तर त्यापैकी कोणत्या कंपनीनं त्याचा व्यवसायकर कापायचा हे त्यानं ठरवायचं असतं.
नवीन तरतुदीनुसार, ज्यांनी वैयक्तिक व्यवसायकर क्रमांक 1 एप्रिल 2017 नंतर घेतले असतील/ घेतील; पण प्रत्यक्षात नोंदणी त्यांनी आधीच करणं अपेक्षित होतं, अशा व्यक्तींना आता फक्त चार वर्षं आधीचा व्यवसायाकर भरावा लागणार आहे. हा व्यवसायकर क्रमांक 1 एप्रिल 2017 आधी घेतला असेल किंवा तारीख (विथ इफेक्‍ट फ्रॉम) आधीची असेल, तर त्यांना आठ वर्ष आधीपासून व्यवसायकर लागू होतो. मात्र, त्यासाठी त्यांनी उद्योगाची / व्यवसायाची/ प्रॅक्‍टिस आपल्या नोंदणीची तारीख बघावी आणि त्या तारखेपासून कर भरावा. या योजनेचा लाभ डॉक्‍टर्स, वकील यांनी जरूर घ्यावा. व्यवसायकर व्याजदर सव्वा ते दीड टक्का असा लागू होईल, हेही लक्षात घ्यायला पाहिजे.

आताचं जग हे "ई'चं जग आहे. त्यामध्ये ई-असेसमेंट, ई-रिटर्न्स, ई-पेमेंट आदी गोष्टींची सर्वांना माहिती असणं आणि येणं आवश्‍यक आहे. व्यवसायकराचं "ई-पेमेंट' करण्यासाठीची तरतूद www.mahagst.gov.in या नवीन वेबसाइटवर उपलबध आहे. व्यापारी ज्या गोष्टींचं ई-पेमेंट करू शकतो त्या म्हणजे ः
- आगाऊ ई-पेमेंट (लॉगिन न करता)
- विवरण थकबाकीचं पेमेंट/ भरणा
- ऑर्डरप्रमाणं थकबाकीचं पेमेंट/ भरणा
आता बॅंकांच्या वेबसाइटवरून किंवा सरकार पावती लेखा प्रणालीवरून (ग्रास) थेट पेमेंट/ भरणा बंद करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांना वर नमूद केलेल्या वेबसाइटवरूनच पेमेंट करावं लागेल. व्यवसायकर आणि व्यवसायकर विवरणपत्राचा कालावधी लक्षात घेऊन जागरूक राहण्याची गरज आहे आणि व्यवसायकर वेळेत भरणं आवश्‍यक आहे.

Web Title: advocate sukrut deo write article in saptarang