मेटा व्हर्स : अजब प्रति-विश्व

परीकथांवर आता पुन्हा विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत फक्त लेखक आणि कवीच कोणतेही काल्पनिक विश्व निर्माण करू शकायचे.
metaverse
metaversesakal
Summary

परीकथांवर आता पुन्हा विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत फक्त लेखक आणि कवीच कोणतेही काल्पनिक विश्व निर्माण करू शकायचे.

- अजय पारगे saptrang@esakal.com

परीकथांवर आता पुन्हा विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत फक्त लेखक आणि कवीच कोणतेही काल्पनिक विश्व निर्माण करू शकायचे. पण आता हीच किमया माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी शक्य करून दाखवली आहे.

कल्पना करा की ऑफिसमध्ये काम संपवून बसलेले असताना तुम्हाला घराची आठवण आली. दुसऱ्या क्षणी तुम्ही डोळ्यावर केवळ एक चष्मा चढवला आणि तत्काळ तुमच्या घरात पोहोचलात. या घरात तुमचाच एक अवतार उभा आहे. तुम्ही कराल त्या सर्व हालचाली तो करू शकतो. तो घरात कुठेही वावरू शकतो, तुमच्या मनात येईल ते करू शकतो – पुस्तक वाचू शकतो, सिनेमा पाहू शकतो, अगदी चित्रही काढू शकतो !

एका खुर्चीत बसल्या बसल्या मित्रांची आठवण आली तर तुम्ही तोच चष्मा चढवून त्यांना भेटू शकता. त्यांच्याबरोबर मनमुराद गप्पा मारू शकता आणि खेळूही शकता... हे सगळं कोणत्या जगाबद्दल चाललाय? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे...तर, हे जग म्हणजे ‘मेटा व्हर्स’ – अत्याधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण केलेलं एक ‘प्रति-विश्व’ !

मेटा व्हर्स मधला तुमचा अवतार तुमच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले भाव, तुमच्या आवाजातली खासियत इतरांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचवेल. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना तुमचे व्यक्तिमत्त्व ठाशीवपणे जाणवेल. इथे फक्त तुम्ही तुमच्या पाहुण्यांना कॉफी पाजू शकणार नाही आणि त्यांनी दिलेल्या पुष्पगुच्छाचा तुम्ही वास घेऊ शकणार नाही ! एवढं सोडलं तर तुमची भेट आभासी न वाटता खरीच वाटेल. ‘आभासी’ हा शब्द जरा खटकतो म्हणून या भेटीला ‘अवतारी भेट’ म्हणणं योग्य ठरेल.

मेटा व्हर्स मध्ये तुमचं घर अगदी हवं तसं सजवू शकता. खिडकीबाहेर हवे ते निसर्गरम्य वातावरण रचू शकता. तुम्ही घराबाहेर पडून बागेत, मॉलमध्ये किंवा एखाद्या संग्रहालयातही जाऊ शकता. हीच गोष्ट ऑफिसबद्दल. तुम्ही तुमच्या ऑफिसचं वातावरण हवं तसं निर्माण करू शकता.

मेटा व्हर्सचा अनुभव घेण्यासाठी सध्या एक हेल्मेट-वजा गॉगलसारखे यंत्र डोळ्यांवर घालावे लागते. याला हेड माऊंटेड डिव्हाइस (6 DOF VR HMD) असे म्हणतात. जगभरातल्या बऱ्याच कंपन्या हे यंत्र विकसित करण्यात जुंपल्या आहेत. सध्या मेटा कंपनीचे ऑक्यूलस क्वेस्ट- २ हे मॉडेल सर्वोत्तम मानले जाते.

मेटा व्हर्सचे अनेक फायदे आहेत. असंख्य लोकांना कुठेही रहात असताना कामं करता येतील. स्काईप आल्यापासून घर-बसल्या दूरच्या व्यक्तींशी संपर्क साधणं नवीन नाही. झूम, गूगल मीटवरून आपण वर्क फ्रॉम होम करतो. मेटा व्हर्स हे त्याच्या पुढचं अवाक करणारं पाऊल आहे.

आजपर्यंतच्या माध्यमांचा वापर करताना हे आपण विसरू शकत नाही की आपल्या समोर एक फ्लॅट-स्क्रीन आहे. मेटा व्हर्समध्ये मात्र एका वेगळ्या वातावरणात ‘जवळ-जवळ सदेह’ प्रवेश केल्याची जाणीव होते. घरून काम करत असलात तरी घरगुती बाबींनी तुमचं चित्त विचलित होत नाही. ऑफिसमध्ये एकाच वेळी बरीच कामं लक्ष वेधत असल्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी गत होते. मेटा व्हर्समध्ये असं होत नाही. सर्वांचं ठरविलेल्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित होतं. विनाकारण चार तास लांबणारी ऑनलाइन मीटिंग एका तासातही आटोपू शकते.

आज पर्यंतच्या डिजिटल माध्यमातून खऱ्या भेटीचा अनुभव मिळत नाही हे सत्य आहे. लॉकडाऊन उठल्या-उठल्या कंपन्या आपल्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या भेटींकरता परदेशी पाठवू लागल्या. अति प्रवासामुळे कर्मचाऱ्यांना शारीरिक शीण येतो. सतत बदलणाऱ्या टाइम-झोनशी जुळवून घेताना त्यांना मानसिक ताणही होतो...परंतु, मेटा व्हर्समध्ये मीटिंग घडवून हे टाळता येईल. यामुळे कंपनीचा वाचलेला वेळ आणि पैसा विविध पद्धतीने सत्कारणी लावता येईल.

कोणत्याही माणसाला आता घर बसल्या जगाची सफर करता येईल – प्रशस्त वास्तु, अचंबित करणाऱ्या कलाकृती पाहता येतील, कुठल्याही पेंटिंग एक्झिबिशनमध्ये वावरता येईल. जिज्ञासू व्यक्तींना जगातील मोठमोठ्या लोकांकडून मार्गदर्शन घेता येईल, ते ही त्यांना आपल्या घरात बोलावून!

मेटा व्हर्स मध्ये वास्तव आणि डिजिटल जगाचा एक अद्‍भुत मिलाफ होतो. तंत्रज्ञानामुळे आजवर दुरावलेली माणसं पुन्हा तंत्रज्ञानामुळेच नव्याने जोडली जातील. परदेशात राहणाऱ्या मुलाला त्याची आई डोळे भरून पाहू शकेल – फ्लॅट स्क्रीनवर नाही, शेजारी बसवून. शाळेत जाता येत नाही म्हणून अस्वस्थ झालेली मुलं त्यांच्या मित्रांना इथे भेटून जरातरी सुखावतील. एकंदर काय, तर मेटा व्हर्स द्वारे आपल्या अनुभवांचा खजिना कित्येक पटीने समृद्ध होऊ घातला आहे.

आपली सगळ्यात मोठी मिळकत म्हणजे यामुळे वाचलेला वेळ. हा वेळ आता आपण अशाच ठिकाणी वापरायचा जिथे अजून तरी मेटा व्हर्स आपल्याला नेऊ शकत नाही. करा विचार असं कुठलं क्षेत्र आहे !

(लेखक व्हर्चुअल रिॲलिटीचे तज्ज्ञ आहेत.)

(शब्दांकन: चेतन जोशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com