अक्षय मूल्यांचा ठेवा!

अर्चना म. दळवी
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण होय. यालाच 'आखिती' असेही म्हणतात. रखरखत्या वैशाखात, क्षय न होणाऱ्या सद्‌गुणांचा अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा संगम या सणात आहे. उष्ण कोरड्या हवेचा आणि रसाळ आम्रफळाचा आस्वाद देणारा अक्षय तृतीयेचा दिवस.

अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाम्याचा घट म्हणजेच जलकुंभ. आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती अक्षय तृतीयेलाच.
आज विज्ञान तंत्रज्ञान युगात माणसाचे सारे जीवनमानही यंत्रवतच झाले आहे. मोबाईलच्या गजराने प्रारंभ होणारा दिवस, जमल्यास 'जिम'च्या व्यायामाने घामाघूम होत, कृत्रिम प्रोटीन्स घेत 10-12 तास उद्योग व्यवसायात पळत राहातो. थकल्या शरीर मनाने तंत्रवतच उदरभरण करत निद्रादेवीच्या अधिन होतो. चरितार्थासाठी त्याचे पळणेही अनिवार्य आहे. जन्मल्यापासून रांगेत जाणारे आयुष्य डोनेशनच्या उच्च शिक्षणामागे पळत माणूस जीवनातील आनंद, रस वेळेअभावी घालवत, जीव नसलेले जीवन केवळ ढकलतो. कला, कौशल्य मूल्य यांचा आधार न घेता क्षय होणाऱ्या जीवन स्पर्धेत प्रवास नव्हे, तर केवळ फरफटतच आहे.

असे हे यांत्रिक विचार मनात डोकावत असतानाच एकदम डोळ्यांसमोर येतात, ते शाळेतील निरागस विद्यार्थी आणि खळाळत्या उत्साहाने भरलेले त्यांचे निःस्वार्थ, अबोध बालपण! आम्ही शिक्षकांनी व्यवसायामुळे अभ्यासलेला विद्यार्थ्यांचा मूल्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम यांत्रिक जीवनात एक आशेचा किरण घेऊन येतो. राष्ट्रीय उद्दिष्टांना पोषक असा अभ्यासक्रम ठरवताना बहुमोल गाभाघटक, मूल्य यांची रचना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केली होती. सन 1986 च्या नवीन शैक्षणिक धोरणाने सारे शिक्षक ते अधिकाऱ्यांना त्याची ओळख करून देण्यात आली होती. संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण रक्षण, श्रमनिष्ठा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्त्री-पुरुष समानता इत्यादी दहा मुख्य व इतर वैयक्तिक मूल्य-उपमूल्यांचा यात समावेश केला होता. त्यापुढील काळात पाठ्यक्रम म्हणजे पुस्तके आणि अध्ययन अनुभव यावर आधारित असावे, किंबहुना प्रत्येक आशयातून जाणीवपूर्वक मूल्यशिक्षण व्हावे, ही अपेक्षा, हा आग्रह धरला जात आहे. पण आज तंत्रज्ञानात हरवलेला माणूस शोधताना माणूस नाही तर मूल्येच हरविल्याचे मला वाटत राहते. आमच्या संस्कृतीने, निसर्गाने, पूर्वजांनी दिलेली मूल्ये आज आम्ही पायदळी तुडवत आहोत, त्यामुळे मनाला विशद वाटणाऱ्या घटना आज राजरोस पाहायला, ऐकायला मिळत आहेत. शाळेत डब्यातील पोळीभाजीचा घास वाटून खाणारी मुले समाजात उद्धट, उर्मट वागतात, तेव्हा मी शोधते ती हरवलेली संवेदनशीलता. परिपाठात प्रार्थनेच्या वेळी ज्या मुखातून परमेश्‍वराचे गुणगान बाहेर पडते, त्याच ओठातून आई-माईच्या उद्धाराचे अर्वाच्य शब्द ऐकून कान बधिर होतात.

एखाद्या देवळासमोर भक्तांची रांग ओसंडून वाहते आणि तेथेच संगणकावरील किंवा पोपटासारख्या आज्ञाधारक पक्ष्याकडून भविष्याचा वेध घेणारे नागरिक पाहून मी शोधत राहते 21 व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टी! ज्ञान प्रबोधिनीचे विज्ञान गीत 'जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका' आम्ही केवळ ऐकतो, म्हणतो, पाठ करतो. पण, मेंदूत वा हृदयात ते झिरपतच नाही आणि मग डोळसपणे शोधावी लागते, पुस्तकांतून शिकलेली वैज्ञानिक दृष्टी!
आपले सर्व सण, उत्सव निसर्गपूजा शिकवतात. ज्या झाडे-वेली, कीटक, पक्ष्यांशी खेळत, ज्या जैविक-अजैविक घटकांशी हातात हात गुंफून लहानाचे मोठे झालो तोच संपन्न वारसा हातातून अलगदपणे निसटून जातोय की काय? असे सध्याचे वातावरण पाहून वाटते. आम्ही एखादा 'डे' वा वीक स्पेशल सेलिब्रेट करून मोहीम आखून पर्यावरण रक्षणाचा झेंडा मिरवतो. पर्यावरण रक्षणाचा असा लाखो वर्षांचा ठेवा केवळ एखादा 'डे' वा 'वीक'ने भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे ओंजळीने समुद्रात भर टाकणे! शालेय अभ्यासक्रमाने कोणतीच मूल्ये संस्कार म्हणून रुजवली नाहीत का? आम्ही शिकवले ते धडे, मिळवले ते मार्क वा ग्रेड! आज समाजातील सर्व स्तरातील म्हणजे मजूर ते पुढारी, क्‍लार्क ते डॉक्‍टर, इंजिनिअर-शास्त्रज्ञ साऱ्यांचीच पुढची पिढी व्यवस्थित जीवन जगत स्पर्धेत सहभागी होत पुढे जात आहे. आम्हाला मिळाले नाही, आमच्या वेळी फार हालात दिवस गेले, अशा विविध कारणांमुळे प्रत्येक जण पुढील पिढीला (पाल्याला) उत्तम जीवनमान देत आहे. आम्हाला आमच्या नशिबानं मिळालंय, हा अर्थ घेत पाल्याने हक्काबरोबरच कर्तव्याचीही जाणीव ठेवली पाहिजे. 'कामात बदल म्हणजे विश्रांती' किंवा 'अखंड परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली' या आदर्शवत घडलेली आमची पिढी हीच अपेक्षा जेव्हा पुढल्या पिढीकडून बाळगते, तेव्हा ती ठरते 'जनरेशन गॅप' किंवा घरातील ज्येष्ठ सुनावतात 'कलियुगाची फळे!'

मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणक ही जलद काम करून वेळ वाचवणारी यंत्रे आहेत. हे आम्ही विसरून ती मनोरंजन, टाइमपासची अत्यावश्‍यक सेवा ठरवत आहोत. परिणामी स्वावलंबन, नीटनेटकेपणा, परस्पर सहकार्य, स्वच्छता-शूचिता या हास्यास्पद, अवास्तव, स्वप्नाळू अपेक्षा ठरतात. नगरपालिकेच्या शाळेत शिकलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर वा डॉ. रघुनाथ माशेलकर, अवकाशवेध घेणारे डॉ. जयंत नारळीकर, वैयक्तिक सुख विसरणारे डॉ. अब्दुल कलाम, पुस्तकांनाच खरी संपत्ती मानणाऱ्या 'इन्फोसिस'च्या सुधा मूर्ती यांचे श्रमनिष्ठा बाळगणारे जीवन चरित्र आम्ही वाचून काचेच्या सुंदर कपाटात बंद करून नजरेआड करतो. वानगीदाखल सभांमध्ये फक्त उदाहरणासाठी वापरतो!
जीवन आदर्शवत बनविणाऱ्या या अक्षय मूल्यांचा विसर न पडता स्वतःचे व इतरांचे जीवन फुलवत नेण्यासाठी वापर करूयात. पूर्वपुण्याईने मिळणाऱ्या हा मूल्यांचा ठेवा 'न उतता न मातता' अक्षय सांभाळूया. सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे ध्येय ठेवणाऱ्या आदर्श भारतीय शिक्षण पद्धतीच्या अक्षय मूल्यांचा अंगीकार अक्षय तृतीयेपासून अखंड करून वर्तनपद्धती घडवूया!

Web Title: akshay tritiya : combination of science and spirituality