श्‍शूऽऽ सरपंच ते पालकमंत्री सारेच बिझी आहेत?

All are busy, no one taking cognizance of this hamlet
All are busy, no one taking cognizance of this hamlet

नागलवाडी हे ते गाव. तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. या गावात कुणाचे टिनाचे, तर कुणाचे तट्ट्यांचे घर आहे. प्रत्येक घराशेजारी पाणी भरून ठेवण्यासाठी निळे-काळे ड्रम ठेवलेले दिसतील; परंतु रिकामेच. अंगणात उघडी-नागडी, अर्धवट फाटक्‍या कपड्यातील बालके फिरताना दिसतील. या गावातील मळक्‍या, फाटक्‍या साड्यांतील बाया पाठीवर फाटलेले बोरे घेऊन बाहेर पडताना दिसतील. अनेकींच्या काखेत, बोट धरून किंवा मागून कळकट कपड्यातील बालके चालताना दिसतील. तरुण मुलींच्या खांद्यावरही बोरे दिसतील. या बायाही महासत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर निघाल्या नसतील?

या बाया रोज निघतात नागपूर शहराकडे प्लॅस्टिक, काच, कागद, खरडे, लोखंड आदी भंगार गोळा करायला. सूर्य उगवताच त्यांचा हा दिनक्रम सुरू होतो. दिवसभर भंगार गोळा केले की तो विकायचा. त्यातून पैसा आला की मग रात्रीच्या स्वयंपाकासाठी आवश्‍यक तेवढी जिनसं घ्यायची. पाच-दहा रुपयांचे एका भाजीला पुरेल एवढे तेल. पाव-दीड पावाचा भाजीपाला आदी. मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवत मग अन्न शिजवायचे आणि पोटाची आग शमवायची. उगवलेला पुढचा दिवस हेच भुकेचे चक्रव्यूह घेऊन त्यांच्यापुढे उभा असतो.

एकीकडे डुंबायला पाणी..
पाच वर्षांपूर्वी नागलवाडीतील ही वस्ती ज्ञानेश्वर दुरुगवार या संवेदनशील शिक्षकाने दाखविली. भिरभिर फिरणारी शंभरेक बालके बघितल्यावर, "ती शाळेत किंवा अंगणवाडीत का जात नाही?', असा प्रश्‍न पडला. कारणांचा शोध घेतला, तेव्हा कळले की, एकतर ती भंगार गोळा करणाऱ्या आईसोबत जातात किंवा घरी पाणी भरण्यासाठी थांबलेली असतात. दोन-तीन दिवस गावात पाणीच येत नाही. या वस्तीपासून अनुक्रमे चार आणि दहा किलोमीटरवर असलेल्या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील "स्विमिंग पुल'मध्ये भर उन्हाळ्यातही डुंबण्यासाठी तुडुंब पाणी असू शकते, तर इथे निदान पिण्यासाठी पाणी का असू शकत नाही? असाही प्रश्न पडला.

म्हणे, आधी अभ्यास करतो...
या वस्तीपासून शाळा अर्धा किलोमीटरवर मूळ नागलवाडी गावात आहे. बहुतेकांची नावे शाळेत दाखल असतात; परंतु शाळेत जाताना कुणीच दिसली नाही. इथली लेकरे नुसतीच वस्तीत फिरताना दिसली. या वस्तीसाठी असलेली अंगणवाडी तिकडे गावात दिसली.

'सकाळ'मधून 'रिपोर्ट'
या वस्तीवर मग "सकाळ'मधून पानभर 'रिपोर्ट' लिहिला. मग एका समाजकार्य महाविद्यालयाने ही वस्ती दत्तक घेण्याची घोषणा केली. वस्तीला प्राध्यापक-विद्यार्थी आदी लवाजम्यासह भेट दिली गेली. "आधी आम्ही सर्वेक्षण करतो, नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया', असे आश्‍वासन दिले. कामाचे तर दूर, सर्वेक्षणही हाती आले नाही.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी
मग गावाचे सरपंच, ग्रामसेवक, हिंगण्याचे तहसीलदार यांच्या भेटीगाठी घेतल्या. कुणालाच या वस्तीचे सोयरसुतक दिसले नाही. सर्वांनीच त्यांच्या काही ना काही अडचणी मांडल्या. मग या गावात सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घडवून आणल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चळवळीचे पाईक ज्ञानेश्‍वर रक्षक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कोर्ट सिनेमाचे मुख्य कलावंत वीरा साथीदार, परिवर्तन चळवळीचे प्रमुख विलास गजभिये, कवी महेंद्रकुमार मेश्राम, प्रा. कविता कान्होलकर, सुप्रसिद्ध कवी श्‍याम माधव धोंड, भटक्या-विमुक्तांच्यआ चळवळीचे मिलिंद सोनुने, संवेदनशील कार्यकर्ते शिल्पा तिजारे, अंकुश बुरंगे, मांगगारूडी समाजाचे कार्यकर्ते ओंकार नाडे, शिवणकाम प्रशिक्षिका रितू बोरकर यांनी भेट दिली.

प्राध्यापकांनी करुन दिली कटिंग
प्रा. डॉ. हिरालाल मेश्राम यांनी तर हाती कैची-कंगवा घेत पोरांच्या लांबसटक बटा कापून दिल्या. "बार्टी'चे तत्कालीन संचालक राजेश ढाबरे यांनी मुलांच्या शैक्षणिक साहित्याचा भार उचलला. इटलीवरून नागपूरला परतलेले माही बाबा यांनी गावाला भेट दिली. त्यांनी आणि सायकल स्टोअर्सचे राजारामजी दोनाडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी सायकल दिल्या. रश्‍मी मदनकर यांनी "मेट्रो ट्रेन'च्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करीत स्कूल बॅग दिल्या. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या झीनत सय्यद यांनी गाडीभर कपडे, स्वेटर वाटले. आमगाव देवळीच्या बॅंक आफ महाराष्ट्र शाखेच्या लिशा देशभ्रतार यांनी क्रीडा साहित्य दिले. सामाजिक कार्यकर्ते जीवन जवंजाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाची मेजवानी दिली. हिंगण्यातील स्थानिक पत्रकारांनीही या वस्तीसाठी त्यांची लेखणी उचलली.

युवा चेतना मंचने घेतला वसा
...आणि अखेर "युवा चेतना मंच'चे दत्ताभाऊ शिर्के आणि डॉ. श्रुती आष्टनकर यांनी खऱ्या अर्थाने या गावाच्या उत्थानाचा विडा उचलला. गेली चार वर्षे त्यांनी या वस्तीत ते प्रत्यक्ष काम करीत आहेत. डॉ. श्रुती आष्टनकर यांनी महिला आणि तरुण मुलींना त्यांच्या शारीर क्रियांबाबत जाणीव करून दिली. रोजगारासाठी प्रशिक्षण दिले. मुलांसाठी वह्या-पुस्तके, सायकल तर दिल्याच; परंतु इथल्या प्रत्येक मुलाचे शिक्षण झाले पाहिजे ही जबाबदारी उचलली. त्यांच्या आरोग्यासाठी अनेकदा डॉक्‍टरांची टीम आणली. ही वस्ती म्हणजे आपले दुसरे घरच आहे या जाणिवेने त्यांनी "लॉकडाउन'च्या तीन महिन्यांच्या काळात प्रत्येक घरी अन्नधान्य दिले. अक्षरशः गाव जगविले. त्यासाठी त्यांनी अनेक दानदाते शहरातून या वस्तीत आणले.

दत्तक विधान..छे फसवे!
...परंतु ही वस्ती ज्यांच्या कार्यक्षेत्रात येते, ते कोणतेही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी जागचे हलले नाहीत. नाही म्हणायला जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी "ही वस्ती मी दत्तक घेतली आहे', अशी घोषणा विभागीय आयुक्तांसोबत माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी घेतलेल्या बैठकीत केली होती. "आमच्या गावाले गोदमंधी घेनारे सायेब कुठे गेले सर?' असा सवाल परवा येथील नागरिक प्रतापराव नाडे यांनी केला तेव्हा "दत्तक विधान किती फसवे असते', याचा प्रत्यय आला.

सहावा वर्ग का नाही?
...आता "झुडपी जंगल आहे' असे सांगत वनविभाग चार पिढ्यांपासून वास्तव्य केलेली ही वस्ती उठवायला निघाले आहेत. वस्तीत घरकुल भेटले नाहीत. पाणी नियमित येत नाही. लोकांकडे "जॉब कार्ड' नाही. "जॉब कार्ड'धारकांना काम नाही. भत्ताही मिळत नाही. पाचवीच्या पुढे मुलांचे शिक्षण थांबते. तरी शिक्षण विभाग सहावा वर्गही उघडू शकत नाही. या आधीच्या प्रीती मिश्रीकोटकर आणि विद्यमान जयश्री जोशी या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न केला का, हेही कळत नाही. या वस्तीचे कुणालाही सोयरसुतक नाही.

वेबिनारमध्ये गुंतले सामाजिक कार्यकर्ते
सामाजिक कार्यकर्ते "वेबिनार' आणि "झूम कॉल'वर इंटरनॅशनल संमेलने, काव्यसंमेलने आणि परिसंवाद घेत जगाचे प्रश्न सोडविण्यात गुंतले आहेत. सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री तर लोकशाही बळकट करण्यात "बिझी' आहेत. ग्रामसेवक, खंडविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यावर प्रचंड ताण आहे. त्यांची तर धड झोपही होत नाही. त्यामुळे कुणालाच या वस्तीत काहीही करण्याची फुरसत नाही. एकूणच काय तर या देशातील सर्वच शहाणी माणसे देशाला महासत्ता करण्याच्या महान कार्यात अहोरात्र गुंतली आहेत.

मला काम करायचयं  
...परंतु तरीही कवी दोस्त प्रसेनजित गायकवाड परवा ही वस्ती पाहतो आणि "इथे मला काम करायचं आहे मित्रा' म्हणतो. तेव्हा मला ही वस्ती आता महासत्तेकडे वाटचाल करणारच याची खात्री पटते आणि मग मला प्रचंड आनंद होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com