रशियन साहित्याची त्रिधारा

रशियन साहित्य म्हटलं की चोखंदळ वाचकांच्या नजरेसमोर चेखव, तल्स्तोय (टॉलस्टॉय) आणि दस्तयेवस्की ही एकोणिसाव्या शतकातील विख्यात त्रिमूर्ती उभी राहते.
russian literature
russian literaturesakal
Summary

रशियन साहित्य म्हटलं की चोखंदळ वाचकांच्या नजरेसमोर चेखव, तल्स्तोय (टॉलस्टॉय) आणि दस्तयेवस्की ही एकोणिसाव्या शतकातील विख्यात त्रिमूर्ती उभी राहते.

- अनघा भट anaghab2@gmail.com

रशियन साहित्य म्हटलं की चोखंदळ वाचकांच्या नजरेसमोर चेखव, तल्स्तोय (टॉलस्टॉय) आणि दस्तयेवस्की ही एकोणिसाव्या शतकातील विख्यात त्रिमूर्ती उभी राहते. एका परीनं ते साहजिकही आहे. या तीन लेखकांच्या साहित्याचा ठसा जगभरातल्या साहित्यिकांवर आजतागायत टिकून आहे. या तिघांनी रशियन साहित्याला मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून रशियन साहित्याची पुढची वाटचाल सुरू राहिली. सन १९९० च्या दशकात सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर रशियन साहित्यात त्याचे कोणकोणते पडसाद उमटले? समकालीन रशियन साहित्याची वैशिष्ट्यं कोणती? यांसारख्या प्रश्नांचा हा आढावा...

नव्वदच्या दशकात रशियातल्या अनेक गोष्टी बदलल्या. पूर्वी सोव्हिएत सरकारच्या हातात असणारा प्रकाशनव्यवसाय खासगी कंपन्यांच्या मालकीचा झाला. स्वामित्वहक्क, पुस्तकांचं मार्केटिंग, निरनिराळे पुरस्कार, बुक फेस्ट अशा सर्व गोष्टी निखळ व्यावसायिक पातळीवर सुरू झाल्या. ‘नोवी मीर’, ‘प्रोग्रेस’, ‘रादुगा’ यांसारख्या सरकारी मालकीच्या प्रकाशनसंस्था बंद पडल्या. त्यांच्याकडून भारतात भाषांतरित स्वरूपात प्रसिद्ध होणारं साहित्य, बालसाहित्य, नियतकालिकं आणि पाठ्यपुस्तकं यांचं वितरण व विक्री बंद झाली.

सन २०१४ पासून मी मॉस्को इथं दर वर्षाआड भरणाऱ्या रशियन साहित्याच्या भाषांतरकारांच्या संमेलनाला आणि पुस्तकमेळाव्याला उपस्थिती लावते आहे, निरनिराळ्या प्रकाशनसंस्थांशी, त्यांच्या प्रतिनिधींशी बोलते आहे, लेखकांच्या भेटी घेते आहे. या लेखात मांडलेली निरीक्षणं अर्थातच या गोष्टींवर आधारलेली आहेत. ‘ग्लासनस्त’ आणि ‘पिरिस्त्रोयका’ म्हणजेच ‘मतस्वातंत्र्य’ आणि ‘संस्थात्मक पुनर्रचना’ यांचं युग सुरू झाल्यानंतर साधारणत: १९८८ पासून ते सोव्हिएत सत्तेचं विघटन होऊन ‘रशियन फेडरेशन’ हा नवा देश अस्तित्वात येईपर्यंत रशियन साहित्यात साधारणतः तीन प्रवाह दिसतात : एक म्हणजे, कम्युनिस्ट राजवटीत ज्या लेखकांचं साहित्य प्रकाशित होऊ शकलं नव्हतं अशांच्या साहित्याचं प्रकाशन (यामध्ये मिखाइल बुल्गाकव यांचं ‘मास्टर आणि मार्गारिटा’, अनातोली रिबाकोव यांचं ‘चिल्ड्रन ऑफ अरबात’, बरीस पास्तरनाक यांचं ‘डॉ. ज्हिवागो’, अलिक्सांदर सल्ज्हिनीत्सिन यांचं ‘कडेलोटावर रशिया’ इत्यादींचा समावेश होतो), ज्याला लोकप्रिय म्हणता येईल असं लेखन (उदाहरणार्थ : चेचेन युद्धाविषयी, सामाजिक-राजकीय विषयांवर लिहिणारे झखार प्रिल्येपिन, डिटेक्टिव्ह-फिक्शन लिहिणारे बरीस अकूनिन, युझेफाविच इत्यादी) आणि रशियन भाषेतील पोस्टमॉडर्न किंवा उत्तराधुनिक साहित्यचळवळीचे प्रणेते वीक्तर पिल्येविन, व्लाजिमीर सरोकिन, बरीस अस्ताफ्येव, सिर्ग्येइ नोसव, फाझिल इस्कंदर, ल्युद्मिला पित्रुशेवस्काया इत्यादींचं साहित्य.

सन १९९२ मध्ये ‘मॅन बुकर प्राईझ’च्या धर्तीवर ‘रशियन बुकर प्राईझ’ देणं सुरू झालं. सन २०१७ पर्यंत हा ब्रिटिश-रशियन पुरस्कार देण्यात येत होता. ब्रिटन आणि रशिया यांच्यातल्या ताणलेल्या संबंधांची परिणती म्हणून हा पुरस्कार २०१७ नंतर बंद पडला. सन २००५ पासून रशियाचा ‘बल्शाया क्नीगा’ हा पुरस्कार अस्तित्वात आला. त्याखेरीज ‘टॉलस्टॉय म्युझियम इस्टेट’ २००३ पासून देत असलेला ‘यास्नया पल्याना’ हा पुरस्कार, सन १९७८ मध्ये अस्तित्वात आलेला ‘आंद्रेई ब्येली पुरस्कार’ हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. विख्यात रशियन कवी आंद्रेई ब्येली यांच्या नावानं देण्यात येणारा हा पुरस्कार (तेव्हाच्या) लेनिनग्रादमधल्या एका ‘सामइझदात’ (सरकारी धोरणांना विरोध केल्यानं ज्या लेखकांना आपलं साहित्य प्रकाशित करता येत नसे, ते स्वखर्चानं गुप्तपणे छापून ते साहित्य वितरित करत. याला ‘सामइझदात’ असं नाव आहे) या नियतकालिकानं सुरू केला. पुरस्काराचं स्वरूप म्हणजे एक रूबल, एक सफरचंद आणि वोद्काची एक बाटली! असं असूनही हा पुरस्कार चांगला प्रतिष्ठेचा गणला जातो. वर उल्लेखिलेल्या तिन्ही पुरस्कारांचे पुरस्कारार्थी काही वेळा समानच आहेत; उदाहरणार्थ : व्लाजीमिर सरोकिन, व्लाजीमिर मकानिन, आंद्रेई बितोव, अल्येक्सेई वर्लामव, ल्युद्मिला उलीत्स्काया, वीक्तर पिल्येविन इत्यादी.

एकविसावं शतक सुरू होताना रशियन साहित्यात दिसणाऱ्या अजून एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सन १९१७ पासून अस्तित्वात आलेल्या सोव्हिएत राजवटीनं ‘होमो सोविएटिकस’, धर्म-भाषा-प्रांत यांच्या भेदापलीकडे गेलेला, सोव्हिएत नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला. सोव्हिएत युनियनचं जेव्हा विघटन झालं तेव्हा रशियन वंशाचे अनेक लोक मध्य आाशियाई सोव्हिएत संघराज्यांत निदान दोन पिढ्या तरी राहत होते. रशियन वंशाचे असून मध्य आशियाई सांस्कृतिक संचिताबद्दल लिहिणारे आणि वंशानं रशियन नसूनही रशियन भाषा ही आपल्या अभिव्यक्तीची भाषा बनवणारे असे दोन लेखकप्रवाह आपल्याला आज दिसतात.

अफगाणिस्तानला लागून असलेल्या ताजिकिस्तानमधल्या दुशान्बे शहरात जन्मलेले, वाढलेले आणि सोविएत संघाच्या विघटनानंतर विस्थापित होऊन रशियात आलेले लेखक आंद्रेई वोलस हे पहिल्या प्रकारच्या लेखकांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या ‘खुर्रमाबाद’ या सन २००० मध्ये आलेल्या पुस्तकात सोव्हिएत संघाच्या विघटनाचे हादरे बसून आपल्याच देशात देशोधडीला लागलेली, अचानकपणे विस्थापित झालेली, वांशिक-धार्मिक-प्रांतिक अस्मितांमुळे उसळलेल्या दंगलींमध्ये होरपळून निघालेली माणसं भेटतात, तर त्यांच्याच ‘पंजरूदला परत’ या कादंबरीचा नायक ताजिक वंशाचा विख्यात फारसी कवी अबू अब्दल्ला जफर इब्न मुहम्मद रुदाकी हा आहे. प्रस्तुत कादंबरीत लेखकानं समरकंदची पातशाही, रूदाकीचा कवी म्हणून प्रवास आणि ताजिकिस्तानचं सृष्टिसौंदर्य वाचकांच्या पुढं उभं केलं आहे. वोलस यांना ‘बल्शाया क्नीगा’ आणि ‘रशियन बुकर पुरस्कार’ हे पुरस्कार लाभलेले आहेत.

वंशानं रशियन नसून रशियन ही आपली अभिव्यक्तीची भाषा मानून लेखन करणारे दोन महत्त्वाचे लेखक-कवी म्हणजे शमशाद अब्दुल्लाएव आणि सुखबात अफलातुनी. जन्मानं उझबेक असलेले अब्दुल्लाएव रशियन भाषेत कविता लिहितात. केवळ रशियन कवितेलाच नव्हे तर, जागतिक कवितेला भरीव योगदान देणारे अब्दुल्लाएव काव्यातल्या ‘फेरगाना स्कूल’चे प्रणेते आहेत. ‘वर्डस् विदाउट बॉर्डर्स’ या ऑनलाईन नियतकालिकानं अब्दुल्लाएव यांच्या कवितांची भाषांतरं प्रसिद्ध केली आहेत. सुखबात अफलातुनी (मूळ नाव यिव्ग्येनी अब्दुल्लाएव) हे ताश्कंदस्थित रशियन कवी व लेखक आहेत. अफलातुनी यांना ‘बल्शाया क्नीगा’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

रशियाच्या बाहेर राहून सातत्यानं रशियनमध्ये लेखन करणाऱ्या विख्यात लेखिका म्हणजे जीना रूबिना. ताश्कंदमध्ये जन्मलेल्या आणि १९९० च्या दशकात इस्राईलमध्ये स्थायिक झालेल्या रूबिना इस्राईलमधील ‘रशियन लेखक संघा’च्या अध्यक्ष आहेत, तसंच ‘बल्शाया क्नीगा’ पुरस्कारानं सन्मानित आहेत. एकंदरच, समकालीन रशियन साहित्यामध्ये लेखिकांचं भरीव योगदान आहे. नोबेल पुरस्कारानं भूषवल्या गेल्यानंतर स्वेतलाना अल्येक्सेइविच यांचं नाव सर्वदूर परिचित झालं आहे.

‘झिंकी बॉईज’ आणि ‘युद्धाचा चेहरा स्त्रीचा नाही’ या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्याखेरीज तच्याना तल्स्ताया, मरीया अर्बातवा, नीना सादूर (नाटककार), एल्येना फनाईलवा व ग्युझेल याखिना या महत्त्वाच्या समकालीन लेखिका आहेत. कझान इथं जन्मलेल्या व वंशानं ततार असणाऱ्या ग्युझेल याखिना यांची ‘यास्नया पल्याना’ आणि ‘बल्शाया क्नीगा’ हे दोन्ही पुरस्कार मिळालेली ‘झुलेखानं डोळे उघडले’ ही कादंबरी खूप गाजते आहे. आपल्या आजीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या कादंबरीत याखिना यांनी एका ततार मुस्लिम स्त्रीचा जीवनप्रवास चित्रित केला आहे. त्याला स्टॅलिनच्या ‘डिकुलाकायझेशन’ या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आहे.

(सदराच्या लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त रशियन भाषेच्या सहायक प्राध्यापक आणि ‘केल्याने भाषांतर’ या नियतकालिकाच्या संपादक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com