esakal | मार्क ट्‌वेन आणि ज्ञान प्रबोधिनी (आनंद आगाशे)
sakal

बोलून बातमी शोधा

anand agashe

मार्क ट्‌वेन आणि ज्ञान प्रबोधिनी (आनंद आगाशे)

sakal_logo
By
आनंद आगाशे anand@medianext.in

"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा
तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या कार्यपद्धतीचा गाभा होय. भावी पिढ्या घडवणारा हा प्रयोग समाजाचा ठेवा असून तो संवर्धित व्हावा ही "प्रशाले'ची तर जबाबदारी आहेच; पण एकूण समाजाचीही आहे.

"तुमच्या मुलाच्या शिक्षणात त्याच्या शाळेला ढवळाढवळ करू देऊ नका,' असं मार्क ट्‌वेन हा प्रतिभावान अमेरिकी लेखक म्हणाला त्याला सव्वाशे वर्षं झाली. सर्वसाधारणपणे शाळांमध्ये मुलांना तेव्हा ज्या सरधोपटपणे शिकवलं जात होतं त्यावरचं ते भेदक भाष्य होतं. खास त्याच्या शैलीतलं. "ज्ञान प्रबोधिनी प्रशाला' हा या सरधोपटपणाला छेद देणारा एक विलक्षण प्रयोग आहे. ट्‌वेनचा मुख्य रोख ज्यावर होता तो शालेय शिक्षणातला साचेबंदपणा काही केवळ ट्‌वेनच्या काळातल्या अमेरिकेतच होता असं नव्हे. तो आपल्याही देशात आजही आहे आणि त्याचं कारण समजण्यासारखं आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतासारख्या विकसनशील देशात साक्षरताप्रसाराला आणि औपचारिक शालेय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला सरकारनं धोरणात्मक प्राधान्य द्यावं यात वावगं काही नाही. सर्व सरकारांनी ते दिलं आणि त्यामुळे त्यात कमी-अधिक सरधोपटपणाही ओघानं आला. आज (9 जून 2019) रोजी "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झाली आहेत, तरीही त्याला "प्रयोग'च म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच प्रवाही आजही आहे. ंच्या बुद्‌ध्यंकाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून दरवर्षी केवळ 40 मुलगे आणि 40 मुलींना पाचव्या इयत्तेत प्रवेश दिला जातो. हे माहीत असूनसुद्धा एक हजाराहून जास्त मुलांचे पालक "प्रबोधिनी'च्या प्रवेश परीक्षेला त्यांच्या पाल्यांना बसवतात. ते विविध आर्थिक, सामाजिक स्तरांतले असतात. उच्चशिक्षित गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या मुलापासून ते अल्पशिक्षित भाजीविक्रेत्याच्या किंवा रिक्षाचालकाच्या मुलापर्यंत समाजाचा एक मोठा "क्रॉस-सेक्‍शन' या शाळेतल्या सर्व वर्गांत दिसतो. या शाळेत उच्च दर्जाचं जे सर्वांगीण शिक्षण दिलं जातं त्या मानानं घेतलं जाणारं शुल्क खूपच कमी आहे, ही एक महत्त्वाची बाब. तेसुद्धा ज्यांना परवडत नाही त्यांना संपूर्ण किंवा अंशतः शुल्कमाफी "प्रबोधिनी' देते. परिणामतः आर्थिक, सामाजिक मागासलेपणामुळे एखाद्या मुलाला "प्रबोधिनी'त प्रवेश मिळाला नाही, असं घडत नाही.

"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'सारख्या शाळेची गरज पालकांना मोठ्या प्रमाणात वाटते, हे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या वाढत्या संख्येचं दुसरं कारण आहे. साचेबंद शिक्षणपद्धतीत एकामागोमाग एक इयत्ता पार करत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षांत चांगले गुण मिळू शकतात; पण त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व कितपत फुलतं, संतुलित बनतं हा प्रश्‍न बऱ्याच पालकांना भेडसावतो. "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'त हा पाया चांगला घातला जाईल, असा विश्‍वास पालकांना वाटतो. या प्रशालेचा माजी विद्यार्थी, एक पत्रकार आणि माजी पालक म्हणून मला स्वतःला तो सार्थ वाटतो. या विश्‍वासाची इमारत "ज्ञान प्रबोधिनी'च्या चार वैशिष्ट्यांवर उभी असल्याचं माझं निरीक्षण आहे.
1)"ज्ञान प्रबोधिनी प्रशाला' आणि "ज्ञान प्रबोधिनी' ही तिची मातृसंस्था, या दोहोंचं सुकाणू "प्रबोधिनी'च्याच माजी विद्यार्थ्यांकडं सतत राहिलं आहे. या सूत्रसंचालकांची पहिली पिढी "प्रबोधिनी'चे संस्थापक-संचालक डॉ. आप्पा पेंडसे यांच्याबरोबर वावरली, त्यांच्या तालमीत तयार झाली. देशापुढचे प्रश्‍न सोडवण्याचा अंकुर शालेय वयातच मुलांच्या मनात रुजवण्याच्या उद्देशानं आप्पांनी "प्रबोधिनी'ची सन 1969 मध्ये स्थापना केली. आप्पांकडून त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेलं हे बाळकडू मग गेली 50 वर्षं संक्रमित होत राहिलं. बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी विश्‍वस्तभावनेचं हे "स्पिरिट' एखाद्या संस्थेच्या पाच दशकांच्या वाटचालीत यत्किंचितही कमी झालेलं नसण्याचं असं उदाहरण विरळा."प्रबोधिनी'तल्या, "प्रशाले'तल्या अनेक कार्यकर्त्यांच्या अंगी उच्चकोटीची शैक्षणिक पात्रता आणि क्षमता आहे. त्या जोरावर देशात, परदेशांत बक्कळ पैसा कमावण्याची संधी असूनही ती नाकारून हे सगळेजण "प्रबोधिनी'त समर्पित भावनेनं काम करत आहेत. याचं मूळ विश्‍वस्तभावनेच्या त्या "स्पिरिट'मध्ये आहे.

2)"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'त (पुणे) दरवर्षी पाचवीला प्रवेश दिल्या जाणाऱ्या मुला-मुलींची कमाल संख्या 80 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली; पण "ज्ञान प्रबोधिनी' या मातृसंस्थेच्या कामाची व्याप्ती मात्र सातत्यानं विस्तारत राहिली. "प्रशाला' आणि"मातृसंस्था' यांचं परस्परांशी असणारं हे नातं जैव आणि परस्परपूरक राहिलं आहे. मातृसंस्थेच्या छत्राखाली "शैक्षणिक उपक्रम संशोधिका', "प्रज्ञा मानस संशोधिका', "छात्र प्रबोधन' मासिक, नेतृत्व संवर्धन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, सामाजिक अध्ययन केंद्र, ग्रामविकसन, कृषी-तांत्रिक विद्यालय, जिजामाता दल, नागरी वस्ती सल्ला व प्रशिक्षण केंद्र, उद्योजकता विकास केंद्र असे अनेकविध उपक्रम जोमानं सुरू असतात. प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमांशी काही ना काही कारणानं संपर्क असतो, राखला जातो; त्यामुळे "शाळेबाहेरच्या जगा'बद्दलची त्यांची जाण समृद्ध व्हायला मदत होते. त्यातलेच काहीजण पुढच्या काळात यांपैकी कोणत्या ना कोणत्या क्षेत्राशी स्वतःला जोडूनही घेतात.

3) खुद्द प्रशालेच्या स्तरावर "प्रबोधिनी'त मोठी लवचिकता आहे असा माझा अनुभव आहे. "सीबीएससी' अभ्यासक्रमाबरहुकूम प्रशालेतलं औपचारिक अध्ययन-अध्यापन एकीकडं सुरू असतं आणि त्यामुळे "बोर्डा'च्या परीक्षेत वर्षानुवर्षं "प्रबोधिनी'चा उत्कृष्ट निकाल लागतो यात आश्‍चर्य नाही; पण त्यापलीकडं जाऊन मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमतांना आव्हान देण्याचं धोरण "प्रबोधिनी'त अवलंबलं जातं. बहुसंख्य शाळांमध्ये मुलांना करायला सांगितल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये पालकच जास्त कामाला लागतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे."प्रबोधिनी'त हे कटाक्षानं टाळलं जातं. आणि असं असूनही मुलं ओझ्यानं वाकलेली नसतात; आनंदी असतात. "प्रत्येक मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते,' याचं भान ठेवून "प्रशाले'त मुलांच्या "मेंटरिंग'साठी औपचारिक/अनौपचारिक व्यवस्था करण्यात आली आहे, हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.

4) हे सगळं साध्य करायचं तर शाळेनं मुलांच्या "संगोपना'साठी भरपूर वेळ देणं गरजेचं आहे."ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'चे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा तो वेळ देतात. मनापासून देतात. मुलांच्या वाढीमध्ये केली जाणारी "वेळेची गुंतवणूक' हा सर्वांत कळीचा मुद्दा असतो, याची जाणीव सध्या अनेक घरांमध्येसुद्धा आई-वडिलांना नसते. "प्रबोधिनी'त मात्र ती जाणीव प्रत्येक गोष्टीत दिसते. "ज्ञान प्रबोधिनी ही हिंदू धर्मप्रेमींनी चालवलेली संस्था आहे' असा आक्षेप काही जणांकडून घेतला जातो. माझं स्वतःचंही "मत' तेच आहे, तरी तो माझा "आक्षेप' मात्र नाही. याचं कारण, हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाम, ख्रिस्ती आणि अन्य धर्मांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरस्कार करणाऱ्या कितीतरी शाळा आणि शैक्षणिक संस्था आपल्या अवतीभवती आहेत. त्यात जर टीकाकारांना काही वावगं वाटत नसेल, तर केवळ "ज्ञान प्रबोधिनी'बद्दल हा आक्षेप घेणं ही आत्मवंचना तरी आहे किंवा अप्रामाणिकपणा तरी. स्वतः हिंदुत्ववादी नाही. खरं म्हणजे मी कोणताच "धर्मवादी' नाही. हे खुद्द "प्रबोधिनी'तही अनेकांना माहीत आहे आणि तरीही तिथल्या मला रुचणाऱ्या उपक्रमांशी जोडून घ्यायला मला कधी अडचण आलेली नाही. तिथं कुणी मला आजतागायत आडकाठी केली नाही किंवा नापसंतीसुद्धा दर्शवलेली नाही. हिंदुत्ववादी नसलेले "प्रबोधिनी'चे असे आणखीही कितीतरी माजी विद्यार्थी मला माहीत आहेत. त्यातल्या काहींची समाजवादी विचारसरणीशी जवळीक आहे, तर काहींची साम्यवादाशी! यातच सारं काही आलं. "ज्ञान प्रबोधिनी'नं स्वतःची कवाडं कुणासाठीच बंद केलेली नाहीत हा याचा साधा अर्थ आहे. ज्याअर्थी शिक्षण, संशोधन, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतल्या प्रसिद्ध आणि अज्ञात व्यक्ती "प्रबोधिनी'शी जिव्हाळ्याचे संबंध राखतात आणि मदत करतात, त्याअर्थी त्यांना या संस्थेच्या सचोटीबद्दल अतिशय कौतुक आणि आदर वाटतो असंच मी समजतो. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या कार्यपद्धतीचा गाभा राहिला आहे. भावी पिढ्या घडवणारा हा प्रयोग समाजाचा ठेवा आहे. तो संवर्धित व्हावा ही "प्रशाले'ची तर जबाबदारी आहेच; पण एकूण समाजाचीही आहे.

loading image