anand ghaisas's article in saptarang
anand ghaisas's article in saptarang

भय इथले संपत नाही... (आनंद घैसास)

‘पृथ्वीसन्निध वस्तूं’च्या यादीत सन १९९८ पासून भर पडत गेली आणि त्यांच्या विश्‍लेषणातून विविध शक्‍यता पुढं येत गेल्या.

एकूण लघुग्रहांच्या पट्ट्यात जरी लाखो लघुग्रह असले, तरी ज्यांची कक्षानिश्‍चिती झालेली आहे, असे जेमतेम दोन टक्केच लघुग्रह आपल्याला माहीत आहेत. आज त्यातले एकूण १५ हजार २०६ लघुग्रह नक्की पृथ्वीसन्निध कक्षामध्ये आहेत. पाच हजार ८३५ अमोर कक्षेतले तर काही अतिरा कक्षेतले जेमतेम २० हे तेवढे धोकादायकही नाहीत; पण आठ हजार १४४ अपोलो कक्षांमधले, तर एक १०५ अटेन कक्षामधले मात्र धोकादायक आहेत.

खरंच ही एक भयानक अवस्था असेल, की एक बऱ्यापैकी मोठा, जणू लघुग्रह ठरावा एवढा अशनी, उल्का किंवा त्या आकाराचा एखाद्या टेकडीच्या आकाराचा दगडच म्हणा ना, पृथ्वीच्या दिशेनं झेपावत येत आहे...! हे आताच केलेल्या निरीक्षणांमधून नुकतंच समजून आलं आहे. तो जरी सध्या त्याच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत मार्गक्रमण करत असला, तरी त्याचा हा मार्ग पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला, कक्षेला छेदणारा आहे, असं समजून आलं आहे. मंगळाच्या पलीकडून, लघुग्रहाच्या पट्ट्यातून निघालेला हा दगड, अशनी सूर्याकडे झेपावत चालला आहे. तो पृथ्वीची कक्षा जिथं छेदणार आहे, त्या ठिकाणी तो आजपासून चार वर्षांनी जरी पोचणार असला, तरी चार वर्षांच्या पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या वार्षिक फेऱ्यांनंतर, पृथ्वीही त्याच जागी पोचणार आहे. अर्थात त्या वेळी हे दोघं एकमेकांच्या इतके जवळ येणार आहेत, की त्यांची टक्कर होणं हा तर अगदी साधा तर्क आहे! ते अनिवार्यच असणार... ते तसं घडलं तर पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीवरचं ते मोठं संकट ठरेल... अगदी जीवसृष्टीच नामशेष होण्याचा मोठा धोका फक्त चार वर्षांवर आला आहे... आणि हे वेळोवेळी मीडियात येणाऱ्या जगबुडीच्या अफवांसारखं नाही. ही प्रत्यक्ष निरीक्षणं आहेत... बाप रे...! फक्त चार वर्षं हा कालावधी अशा लघुग्रहापर्यंत पोचून त्यावर काही तरी उपाय करण्यासाठी कमी पडणार आहे... त्याच्यापर्यंत आधीच पोचून एकतर अणुस्फोट करून त्याचा खातमा करायचा किंवा त्याच्या मार्गात बदल होईल, असा त्याला वळवायचा, ढकलायचा की ज्यानं तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं खेचलाच जाणार नाही. मग बदललेल्या लांब अंतरावरून तो सहज दूर निघून जाईल; पण हे सगळं करणं चार वर्षांत जमेल काय?

भूकंप किंवा चक्रीवादळासारख्या अचानक येणाऱ्या आपत्तीसारखं जरी हे नसलं तरी या परिस्थितीशी कसा काय सामना करायचा ते ठरवणंही तसं कठीणच. असा मोठा अशनी कोसळणं म्हणजे ‘आकाश कोसळणं’ म्हणतात तसाच प्रकार. हा अशनी किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची भीती सर्वात आधी शास्त्रज्ञांच्या मनात निर्माण झाली ती उत्तर रशियाच्या तुंगुस्का इथं सन १९०८ मध्ये झालेल्या एका स्फोटानं. ही जागा तशी निर्मनुष्य; पण बर्फाळ डोंगरउतारावरची. मैलोन्‌मैल परिसरातली सगळी झाडं उखडून त्यांचा क्षणार्धात कोळसा झाला होता या स्फोटानं. ‘एन्के’ नावाच्या धूमकेतूचा तो एक तुकडा असावा. तो प्रचंड वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर त्याचा हवेच्या घर्षणानं झालेल्या स्फोटाचा हा परिणाम असावा. त्यातून चर्चा सुरू झाल्या. मग जगभरातली विवरं ही अशा अशनी-आघातानं जर झालेली असतील, तर त्यातून काय परिस्थिती निर्माण होत असेल, याचे विविध तर्क मांडण्यात आले. सुमारे ५० ते ६० हजार वर्षांपूर्वी अशा अशनीपातानंच झालेल्या परिस्थितीतून पृथ्वीवरची डायनॉसॉर प्राण्यांची वसाहत नष्ट झाली असावी, असं एक अनुमान त्यातून पुढं आलं आणि कालांतरानं तसे पुरावेही मिळत गेले. त्यामुळं असं काही झालं असावं, ही संकल्पना आजही सर्वमान्य आहे. १९९२ मध्ये एक धूमकेतू (शूमाकर - लेव्ही ९) हा गुरू ग्रहावर आदळताना आपण पाहिला. सुमारे १० किलोमीटर व्यासाच्या या धूमकेतूनं सुमारे पृथ्वीच्या निम्म्या आकाराच्या जखमा गुरूवर केल्याचं आपण पाहिलं आणि ही भीती आणखी भेडसावू लागली. सात ऑक्‍टोबर २००८ ला एक ८० टन वजनाचा अशनी पृथ्वीच्या वातावरणात झेपावला आणि सुदानच्या, आफ्रिकेच्या निर्जन भागात कोसळला. त्याच्या अवकाशातल्या शोधानंतर ‘२००८ टीसी-३’ या नावानं ओळखला जाणारा हा अशनी आपल्याकडं झेपावतोय, हे फक्त १९ तास आधी लक्षात आलं; पण या १९ तासांत त्याचा मार्ग कसा असेल आणि तो कुठं पडेल याचं अनुमान काढायला मात्र वेळ कमी पडला. मात्र, अशा अशनीच्या मार्गाची ती पहिली निरीक्षणं ठरली. त्यातूनच गेल्या वर्षी ‘स्काउट’ हा पृथ्वीकडं झेपावणाऱ्या अशनींवर लक्ष ठेवणारा प्रकल्प पुढं आला. तीन वर्षांपूर्वी, १५ फेब्रुवारी २०१३ ला रशियात चेलियाबिन्स्क नावाच्या गावात एक अशनी आगीचा लोळ मागं सोडत आकाशातून आडवा गेला आणि ही भीती आणखी ठळक झाली. अलेक्‍स अलिशेवस्किख यांनी या अशनीस्फोटानंतर एकाच मिनिटानं काढलेलं त्याचं छायाचित्र बरंच प्रसिद्ध झालं आहे. या पार्श्‍वभूमीवर २५ ऑक्‍टोबर २०१६ ला गेल्या महिन्यात, नासा (नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) आणि फेमा (फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी) यांनी संयुक्तपणे एक कृतिसत्र आयोजिलं होतं. त्यात समजा एक लघुग्रह पृथ्वीकडं येत आहे हे समजलं तर आणि तो चार वर्षांनी आदळेल हेही समजलं, तर कोणत्या तऱ्हेची आपत्तीनिवारणविषयक तयारी करावी लागेल, याचे प्रारूप (सिम्युलेशन) सगळ्यांना देऊन, अशा घटनेत कोणकोणते प्रश्‍न अंतर्भूत आहेत, याच्यावरच्या उपायासाठी काय काय करावं लागेल, या आणीबाणीच्या प्रसंगातून पृथ्वीवासीयांना वाचवण्यासाठी काय करावं लागेल याचा वैज्ञानिक, सामाजिक आणि तांत्रिक बाबींचा ऊहापोह यात करण्यात आला. या येणाऱ्या लघुग्रहाला पृथ्वीपर्यंत पोचूच न देण्यापासून, तो पडताना त्याचे असंख्य तुकडे झाले, तर संकटाची धग कमी होईल काय, इथपासून त्यात कोणत्या राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, संशोधकांच्या आणि अवकाशशास्रातल्या संस्थांचा सहभाग असेल, तो कसा असेल, असा सारा ऊहापोह यात झाला. विविध विषयांतले तज्ज्ञ त्यात सहभागी झाले होते. यातून जे निष्पन्न झालं तेही मनोवेधक आहे. मात्र, त्याआधी या लघुग्रह/अशनीपैकी कोणते आपल्याला जास्त भीतीदायक आहेत हे पाहू या.

***
सन १९९८ पासून नासा आणि युरोपीय समुदाय यांनी संयुक्तपणे अशा लघुग्रहांची माहिती जमवण्यासाठी खास मोहीम उघडली. तीत अनेक आणि विविध तरंगलांबीत काम करणाऱ्या वेधशाळांचा जरी सहभाग असला, तरी लघुग्रहाचा लागलेला शोध ‘इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल युनियन मायनर प्लॅनेट सेंटर’कडं सर्व पुराव्यांनिशी द्यायचा, मग ते तो तपासून पाहतील आणि त्यानंतर त्या लघुग्रहाला यादीत समाविष्ट करतील, अशी पद्धत तयार करण्यात आली. त्याप्रमाणे आता तीन मुख्य वर्गीकरणांप्रमाणे या अवकाशीय वस्तूंच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. तीन प्रकार म्हणजे अशनी, लघुग्रह आणि धुमकेतू. आजच्या घडीला, म्हणजे एक नोव्हेंबर २०१६ पर्यंत एकूण १५ हजार २०६ अशा पृथ्वीकक्षेजवळून जाणाऱ्या ‘पृथ्वीसन्निधकक्षा’ (एनईओ म्हणजे नीअर अर्थ ऑब्जेक्‍ट्‌स) वस्तू या प्रकल्पातून मिळाल्या आहेत. यातल्या १०६ वस्तू म्हणजे धूमकेतू किंवा त्यांचे अवशेष आहेत; तसंच त्यांच्या कक्षा, मार्ग आणि त्यांचे आकार लक्षात घेता त्यांच्यापासून आपल्याला फारशी भीती नाही, हेही समोर आलं आहे. सुमारे एक मीटर ते त्यापेक्षा लहान आकाराच्या वस्तूंना ‘अशनी’ किंवा ‘उल्का’ म्हणतात. यांच्यापासूनही फारसा धोका नाही.

कारण हे क्वचितच जमिनीपर्यंत पोचतात. वातावरणाशी घर्षण झाल्यानं हवेतच जळून त्यांची राख होते किंवा जर ते जमिनीपर्यंत पोचलेच तर होणारं नुकसान स्थानिक आवारापुरते मर्यादित असेल. मात्र, जे आकारानं १५० मीटरपेक्षा जास्त व्यास असणारे आहेत, ते मात्र ‘लघुग्रह’ म्हणून ओळखले जातात आणि तेच सगळ्यात धोकादायक ठरू शकतात. कारण, ते जमिनीवर विवरं करू शकतात. त्यामुळं मोठे उद्रेक होऊ शकतात. या हानीची व्याप्ती एखाद्या शहरापासून ते एखाद्या देशापर्यंत असू शकते. खरं तर ‘लघुग्रहांचा पट्टा’ असं आपण ज्याला म्हणतो, तो मंगळाच्या कक्षेपलीकडं ते गुरूच्या कक्षेच्या अलीकडं आहे, असं गृहीत धरलं जात; पण प्रत्यक्षात तसं सगळ्याच लघुग्रहाबाबत नाही. सूर्याभोवती फिरण्याच्या या छोट्या वस्तूंच्या कक्षा फारच विविध आहेत, असं दिसून येतं. एकतर या लंबवर्तुळाकृती असतात. या लंबवर्तुळाचं एक टोक सूर्यापासून जवळ, तर दुसरं टोक सूर्यापासून लांब असतं. या दोन बिंदूंना, सूर्याजवळच्या बिंदूला ‘उपसूर्यबिंदू’, तर सूर्यापासून लांबच्या बिंदूला ‘अपसूर्यबिंदू’ असं म्हणतात. पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या (पृथ्वीसन्निधकक्षा असणाऱ्या) या वस्तूंच्या कक्षा सुमारे चार प्रकारांत मोडतात. त्यांना ‘अतिरा’, ‘अमोर’, ‘अटेन’ आणि ‘अपोलो’ या नावानं ओळखलं जातं. अतिरा (यांना काही जण ‘अपोहेले’ असंही म्हणतात.) आणि अमोर गटातल्या कक्षा छेदत नाहीत; पण या वस्तूंच्या कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणानं बदलूही शकतात आणि ते मग दुसऱ्या गटात जातात. अटेन आणि अपोलोकक्षा मात्र पृथ्वीची कक्षा छेदणाऱ्या वस्तू असल्यानं त्या अधिक धोकादायक ठरतात. यातल्या ‘अतिरा’च्या कक्षेचं सूर्यापासूनचं अंतर पाहिल्यास ती पृथ्वीकक्षेपेक्षा कमी अंतराची, लहान असते, तर ‘अमोर’ कक्षा ही पृथ्वीपेक्षा थोडी जास्त ते लघुग्रहाच्या पट्ट्यापर्यंत अशी दीर्घ अंतराची असू शकते; पण ‘अपोलो’ प्रकारची कक्षा ही उपसूर्यबिंदू शुक्राच्या अंतराच्या आत ते अपसूर्यबिंदू लघुग्रहांच्या पट्ट्यापर्यंत दूर अशी असते. अटेनच्या कक्षा या शुक्र ते पृथ्वीच्या दरम्यान उपसूर्यबिंदू, तर पृथ्वी ते मंगळाच्या दरम्यान अपसूर्यबिंदू असणाऱ्या असतात. पृथ्वीच्या आगेमागे असलेली त्यांची कक्षा ही अधिक वाईट; त्यामुळे ही कक्षा असणाऱ्या वस्तूंनाच ‘सगळ्यात घातक’ समजलं जातं. ०.९८३ खगोलीय एकक (सूर्य ते पृथ्वीच्या सरासरी अंतराला खगोलीय एकक मानतात) ते १.३ खगोलीय एकक या अंतरातल्या अटेनच्या कक्षा या सगळ्यात धोकादायक समजल्या जातात, तर १५० मीटरपेक्षा मोठा आकार असलेली वस्तू ही अधिक धोकादायक मानली जाते, तर एक किलोमीटरपेक्षा मोठे लघुग्रह फारच हानिकारक असतात. सुमारे चार मीटर किंवा १३ फूट व्यासाचे अशनी वर्षातून एकदा तरी पृथ्वीवर आदळतात, तर सात मीटरपेक्षा मोठे अशनी सुमारे पाच वर्षांतून एकदा पडताना दिसतात; पण ते येताना एवढ्या वेगानं वातवरणात घुसतात की त्यामुळं होणारा स्फोट हा १५ किलोटन क्षमतेचा, म्हणजे हिरोशिमाच्या ‘लिटिल बॉय’च्या अणुबॉम्बच्या क्षमतेचा असतो. मात्र, वातावरणात बऱ्याच उंचीवर हा स्फोट होतो. त्यामुळं जमिनीवर यांचा परिणाम दिसून येतोच असं नाही; पण वातावरणाच्या वरच्या थरात होणारे हे स्फोट वेधशाळांमध्ये मात्र नोंदले जातातच. मात्र, जर एखादा अशनी १५० मीटरपेक्षा मोठा असेल, तर तुंगुस्काच्या घटनेएवढा (१० मेगाटन) परिणाम दिसू शकतो. एवढ्या मोठ्या आकाराचे अशनी सुमारे दोन हजार वर्षांत आदळण्याची शक्‍यता दिसते, तर एक किलोमीटर किंवा त्याहून मोठ्या आकाराचे अशनी पडण्याची शक्‍यता लाख वर्षांत सुमारे दोन घटना एवढी दिसते; परंतु अशाच घटनेनं पृथ्वीवरची पूर्ण मानवजात नष्ट होण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते. ‘भय इथले संपत नाही,’ असं वर जे म्हटलं ते त्यामुळंच. १९९८ पासून या पृथ्वीसन्निध वस्तूंच्या यादीत भर पडत गेली आणि त्यांच्या विश्‍लेषणातून या शक्‍यता पुढं येत गेल्या. एकूण लघुग्रहांच्या पट्ट्यात जरी लाखो लघुग्रह असले, तरी आपल्याला मिळालेले, शोध लागून ज्यांची कक्षानिश्‍चिती झालेली आहे, असे जेमतेम दोन टक्केच लघुग्रह आपल्याला माहीत आहेत. आज त्यातले एकूण १५ हजार २०६ नक्की पृथ्वीसन्निध कक्षामध्ये आहेत, हे माहीत आहे. त्यात पाच हजार ८३५ अमोर कक्षेतले तर काही अतिरा कक्षेतले जेमतेम २० हे तेवढे धोकादायकही नाहीत; पण आठ हजार १४४ अपोलो कक्षांमधले, तर एक १०५ अटेन कक्षामधले मात्र धोकादायक. त्यातही एक किलोमीटरपेक्षा मोठे असणारे एकूण ८७३ आहेत. तर ज्यांच्या कक्षा पृथ्वीच्या अगदी जवळच्या, म्हणजे चंद्रअंतराच्या साधारण १५ पट अंतराच्या आतल्या आहेत त्यांना (सुमारे १५७) अत्यंत धोकादायक समजलं जातं. अशा ‘पृथ्वीसन्निध कक्षा वस्तू’चं अंतर, आकार आणि संवेग हे त्यांचा धोकादायकपणा किती स्तरावर आहे, ते ठरवण्यासाठी वापरला जातो. हे सगळंच आकारानं लहान, सूर्यप्रकाशातही जास्त उजळ न दिसणारे असल्यानं ते शोधण्यास जसा त्रास होतो, तसंच त्यांचा आकार आणि कक्षा ठरवण्यासही. त्यामुळं ज्यांची निरपेक्ष दृश्‍यप्रत २२ पेक्षा जास्त ते आकाराने लहान किंवा १५० मीटरहून लहान, म्हणून ते फारसे धोकादायक नाहीत; तसंच जे पृथ्वीपासून चंद्र-अंतराच्या २० पटींहून दूर अंतरावरून जाणार असतील, तेही निरुपद्रवी गणले जातात. शिवाय ज्यांचा संवेग जास्त ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निसटून जाऊ शकतात; पण संवेग कमी असेल तर मात्र पकडले जातील, खेचले जातील हेही तितकंच खरं. सध्या अशा पृथ्वीसन्निध कक्षा वस्तूपैकी एकूण एक हजार ७४० अवकाशीय वस्तूंना ‘पोटेन्शियल हझार्ड’ म्हणजे ‘संभाव्य उपद्रवकारक’ गटात टाकले गेले आहे आणि त्यांच्यावर नुसतंच लक्ष ठेवण्यात आलेलं नाही, तर त्यातले कोणते रोज पृथ्वीच्या किती जवळ आणि किती संवेगानं जात आहेत, याचं एक कोष्टकच आता प्रसिद्ध होत असते. आजपासूनच्या मला मनोवेधक वाटलेल्या काही पृथ्वीसन्निध अशनींचं कोष्टक सोबत दिलं आहे. यात अंतरं ही चंद्र-अंतराच्या पटीत दाखवण्याची रीत आहे, ज्यात पृथ्वी ते चंद्र-अंतराची सरासरी, जी तीन लाख ८६ हजार किलोमीटर आहे, त्या एककाचा वापर करतात. तर या अवकाशीय वस्तूंचं अंतर हे पृथ्वीच्या केंद्रापासून त्या वस्तूंच्या केंद्रापर्यंतचं घ्यायची रीत आहे. यातल्या सर्व वस्तूंना नावं देण्याची एक रीत आहे, ज्यात ज्या वर्षी तिचा शोध लागला ते वर्ष, त्यानंतर यादीतली अकारविल्हे मुळाक्षरं आणि त्यानंतर त्या महिन्यातला तो कितवा शोध आहे ती संख्या अशी काहीशी पद्धत असते. त्यात बदलही असतात.

नाव     कधी दिसणार     अंतर
(चांद्रएकक)    व्यास
(मीटर)    सापेक्ष संवेग
(किमी/सेकंद)
२०१६ व्हीडब्ल्यू ८०     आज     ७२     ३५ते ७०    ७.२९
२०१० केएक्‍स ७     आज     ५२     २१०     १२.११
२०१६ यूबी १०७     १४/११/१६     ८.४     २६ ते ५७     ४.९०
२०१६ यूवाय ५६     १८/११/१६     ७.२     ४६ ते १००     ११.८७
२००८ यूएल१०     १२/१२/१६     १५.२     ५०० ते १ किमी     १३.१५
२०१५ वायए     १३/१२/१६     ९.६ ते २०८        
२०१५ एक्‍सएक्‍स १६९    १३/१२/१६     ७.४     ९ते२०    ६.४३

या कोष्टकावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की यात प्रत्येकाचा संवेग वेगळा आहे.
त्यांचं पृथ्वीपासूनचे अंतर वेगळं आहे आणि आकारही वेगळा आहे. मात्र, आकारावरून वस्तुमानाचा अदांज येत नसतो. एखादी वस्तू धातूनं बनलेली असेल किंवा नुसतीच धूळ असेल किंवा धूमकेतू असेल तर बर्फच... त्यामुळं जवळून जाणाऱ्या या वस्तूवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वेगवेगळा प्रभाव पडून तिच्या कक्षेत फरक पडू शकतो. ती पृथ्वीकडं खेचली जाऊ शकते, तर कधी दूरही फेकली जाऊ शकते. गंमत म्हणजे अशा वस्तूच्या ‘मार्गबदलाचा उपाय’ हा सगळ्यात अधिक चांगला पर्याय आहे. गेल्या महिन्यातल्या अशनीपातानं होणाऱ्या आपत्तीचं निवारण करण्याच्या सराव कृतिसत्रातून पुढं आलेल्या अनेक संकल्पनामधून निवडला गेलेला हा उपाय आहे. मात्र, तोही गमतीशीर प्रकार आहे. त्यात वापरायचं काय तर, अशा जवळून जाणाऱ्या अशनीपर्यंत तर पोचायचं आहेच; पण तिचा स्फोटानं विनाश करायचा नाही किंवा तिला अग्निबाणानं ढकलणं, ओढणं असं काहीही करायचं नाही. तर तिथं जाऊन त्या अशनीला, त्या दगडाला चक्क चकचकीत रंगानं रंगवायचं ठरलं आहे! काय असेल या रंगाचा उपयोग? त्याला लांबूनही पाहता यावं, ओळखता यावं यासाठी हे करायचं नाही... तर सूर्याकडून येणारे प्रकाशकिरण या रंगावर पडले, की पूर्वी जसे त्याच्या काळपट रंगात ते होते, तसे ते आता शोषले जाणार नाहीत, तर चमकदार रंगानं परावर्तित होतील. या परावर्तनाचं जे बल एका दिशेला, सूर्याकडच्या दिशेला निर्माण होईल, तेवढं बलही या वस्तूचा अवकाशातला त्याचा मार्ग बदलण्यास, त्याची कक्षाबदल होण्यास पुरेसं ठरेल! या नवीन तंत्रानं आपण नुकतेच काही प्रकाशलहरींवर वाहत जाणारे ‘अवकाशपतंग’ तयार करून त्यांच्या चाचण्या केल्या आहेत आणि एक पतंग तर दूरच्या ताऱ्यांच्या दिशेनं, सूर्यमालेबाहेरही पाठवला आहे. ही रंगरगोटी म्हणजे त्याचीच पुढची पायरी ठरेल... नियोजनबद्ध वैज्ञानिक उपाययोजना या असल्या ‘आकाश कोसळण्याच्या’ भयाला संपवण्यात यशस्वी ठरेल आणि खरंच वेळ आली, तर त्या उपाययोजना जीवसृष्टीचं जतन करण्यास समर्थ ठरतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com