धक्कादायक, चमत्कारिक, अनाकलनीय... (आनंद घैसास)

धक्कादायक, चमत्कारिक, अनाकलनीय... (आनंद घैसास)

अनेक संशोधनं वेगवेगळ्या पद्धतींनी होत असतात. त्यातली काही गमतीशीर, चकित करणारी, अनाकलनीय प्रकारची, आश्‍चर्यकारक, आणि धक्कादायकही असतात. गेल्या एका वर्षात अशा प्रकारची अनेक संशोधनं झाली. या संशोधनांची संपूर्ण माहिती घेण्यापेक्षा त्यांचे विचित्र निष्कर्ष पाहण्यात जास्त मजा आहे. अशाच काही संशोधनांविषयीचा हा ओझरता परिचय...

स  र्वप्रथम समस्त वाचकांना २०१७ या नववर्षाच्या शुभेच्छा...! गेल्या वर्षी जानेवारी २०१६ च्या दुसऱ्या रविवारी आपण या ‘विज्ञानजिज्ञासा’ सदरातून प्रथम भेटलो. तो पहिला लेख होता गुरुत्वीय लहरींच्या शोधाबद्दल हाती आलेल्या, पहिल्या निरीक्षणांच्या पहिल्या मिळालेल्या पुराव्याबाबतचा. त्यानंतर दर महिन्याला दोनदा विविध विषयांचा परामर्श घेत काही गहन, तर काही रोजच्या जीवनाशी निगडित असणारे, तसंच घरगुती विज्ञानाचे विषय आपण पाहिले. त्यातले काही नवीन संशोधनाबद्दलचे होते, काही अवकाश-मोहिमांचे होते, तर काही नव्याने केलेल्या सर्वेक्षणामधून होणाऱ्या विश्‍लेषणासंबंधी होते.

आपल्यापैकी अनेकांनी पाठविलेल्या अभिप्रायांबद्दल, विचारलेल्या प्रश्‍नांबद्दल, सुचविलेल्या विषयांबद्दल, सूचनांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा वाचकांच्या या आपुलकीमुळं विविध विषय हाताळण्याची ऊर्मी मला मिळत गेली. या सगळ्या विज्ञानविषयांचे लेख लिहिताना, सध्या सुरू असणाऱ्या संशोधनांबद्दल नव्यानं हाती येत असणाऱ्या अद्ययावत माहितीसंबंधी लिहिण्याचे आणि ते आपल्याला सांगण्याचं एक धोरण मनात ठेवलं होतं. अर्थातच गेल्या एका वर्षात लागलेल्या सगळ्याच शोधांबद्दल या सदरातून सगळंच सांगता आलेलं आहे, असं नाही. काही विषय तर एवढे गहन असतात, की ते सगळ्यांना समजावून सांगणंही कधी जिकिरीचं वाटतं. कधी कधी काही विषय रोजच्या जीवनाशी निगडित नसल्यानं, तात्कालिक महत्त्वाचे नसल्यानं बाजूला पडतात, तर काही जागतिक पातळीवर महत्त्वाचे व भारताची मान अभिमानानं उंचावणारे असल्यानं ते प्राधान्यानं द्यावेसे वाटले. असो.

काही नेहमीचे प्रश्‍न वाचकांकडून, विशेषतः विद्यार्थिदशेतल्या वाचकांकडून येतातच. ते असतात एकतर कृष्णविवराबद्दल, एलियन्सबद्दल, समांतर विश्‍वाबद्दल, अँटिमॅटर आणि अवकाशयानांबद्दल. त्याचंही एक कारण असावं, की विज्ञान म्हणजे काहीतरी परग्रहवासी, विश्‍वाशी संबंधित संशोधनाचं, ग्रह-तारे यांच्या संबंधीचं असतं, ही एक भ्रामक कल्पना. रोजच्या जीवनातल्या घटनांचा, अगदी दात घासण्याचा, स्वयंपाक करण्याचा, झोपेचा, जेवण-खाण्याचा संबंधही विज्ञानाशी असतो, एवढंच नव्हे, तर समाजजीवनाचं, भाषेचं, अगदी अर्थकारणाचंही विज्ञान असतं. इतिहास, भूगर्भशास्त्र, यासोबतच अगदी आपल्या अंगावरच्या कपड्यांपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक विषयांत विज्ञानासोबतच तंत्रज्ञानाचंही फार मोठं योगदान असतं. हा संदर्भ कित्येकदा सुटलेला दिसतो. कारण एकूणच विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे सभोवताली चालणाऱ्या निसर्गाच्या निरीक्षणातून त्यात काही नियम दिसतात काय आणि आपल्या उपयोगासाठी त्या नियमांचा वापर करून घेता येईल काय, हा मुख्य विचार असतो. तो आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण, अशा साध्या गोष्टींमधूनच नवं काहीतरी हाती लागत असतं, असं माझे विज्ञानाचे गुरुजी म्हणायचे. न्यूटनच्या आधी काय कुणी सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं नव्हतं काय? आमचे गुरुजी कोकणातले. ते म्हणायचे ः ‘‘अरे, सफरचंद खाली पडताना हळूच पडत असेल ते... पण नारळ कसा धापकन्‌ येतो खाली... ते तर रोजचंच; पण मग कोकणातल्या कुणाला का नाही लागला गुरुत्वाकर्षणाचा शोध?’’ हा त्यांचा प्रश्‍न खरंच मार्मिक. तर सांगायचा मुद्दा असा, की अनेक संशोधनं वेगवेगळ्या विचारांनी होतच असतात. त्यातली काही गमतीशीर, चकित करणारी, कधी अनाकलनीय प्रकारची, आश्‍चर्यकारक, धक्कादायक ठरणारी असतात. गेल्या एका वर्षातले असे काही संशोधनांचे निष्कर्ष आजच्या गप्पांमधून आपल्याला सांगावेसे वाटतात. अर्थात, त्यांची संपूर्ण माहिती देण्यात वेळ न घालवता, त्यांचे विचित्र निष्कर्ष पाहण्यात जास्त मजा आहे. गेल्या वर्षभरातल्या विज्ञानसंशोधनांचा एक धावता आढावा घेता असे काही धक्कादायक, चमत्कारिक, पण विचार करायला लावणारेही जे काही हाती लागलं ते पाहूया...

***
एका मध्यमयुगीन ‘भयंकर’ ठरलेल्या आणि जनमानसात ज्याबाबत कायमच एक ठाम भीती आहे, अशा संसर्गजन्य रोगाचे जंतू जर आजही संसर्गजन्य मात्रेमध्ये आपल्या आसपास वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये निवास करत असतील, तर ते साहजिकच धडकी भरवणारं आहे. इतकंच नव्हे, तर त्यासंबंधी ताबडतोब उपाययोजना करण्याविषयीच्या हालचालींचीही निकड आहे. कारण तो रोग आहे ‘महारोग’. इंग्लंडच्या ‘ब्राऊनसी आयलंड’ या अभयारण्यात असलेल्या बेटावरच्या लाल खारींचा अभ्यास करणाऱ्या एका गटाला, त्यांनी अभ्यासलेल्या सगळ्य खारींमध्ये ‘मायक्रोबॅक्‍टेरियम लेप्रे’ म्हणजे जुनाट, मध्ययुगीन काळापासून चालत आलेल्या महारोगाचे जंतू आजही सुखानं नांदत आहेत, असं आढळून आलं आहे. याच महारोगाचे भीषण परिणाम मध्ययुगीन युरोपनं भोगले आहेत, एवढे की बायबलमध्येही या भयावह रोगाचा ठिकठिकाणी उल्लेख येतो. आजपर्यंत फक्त नऊ पट्टे असणाऱ्या अमेरिकास्थित ‘अर्माडिलो’ या कवचधारी जंगली प्राण्याच्या शरीरात हे महारोगाचे जंतू असतात, राहतात आणि त्यांच्याकडून मानवाला संसर्ग होऊ शकतो, असं समजलं जात होतं. मात्र युरोपात आणि तेही सामान्यतः आढळणाऱ्या लाल खारींमध्ये हे जंतू सापडल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे. खारींकडून माणसांना संसर्ग होण्याची शक्‍यता जरी फार नसली तरी काळजी घ्यायला हवीच. अर्थात, आता महारोग हा काही भयावह रोग मानला जात नाही. एक-दीड वर्ष सातत्यानं औषधं घेतल्यास तो आता हमखास बराही होतो; पण यातून एक हातात आलं आहे, की आपण ज्या रोगाचं समूळ उच्चाटन झालं असं मानतो, ते काही पूर्णपणे खरं नाही. आज एका प्राण्यामध्ये या जंतूंच्या पिढ्या आपल्या नजरेआड जशा शेकडो वर्षं वाढत होत्या, तसे इतरही रोगांचे जंतू आपल्याला माहीत नसणाऱ्या प्राण्यांमध्ये कदाचित मोठ्या संख्येनंही निवास करून असतील तर? असे हानिकारक छुपे जैविक साठे शोधण्याचं काम आता करावंच लागेल, मानवाच्या पुढच्या निकोप पिढ्यांसाठी...

***
सांधेदुखीवर, संधिवातावर जालीम उपाय म्हणून वापरात असणारं एक औषध चक्क दुसऱ्या एका व्याधीमुळं पडणाऱ्या टकलावर, गळणाऱ्या केसांवर उपाय करू शकतं, असा अनुभव नुकताच नोंदला गेला आहे. या सांधेदुखीच्या औषधाच्या वापरातून एका पुरुषाच्या आणि एका महिलेच्या डोक्‍यावर पडलेल्या टकलावर, अंगावरच्या, काखेतल्या केसांची पुनर्वाढ होताना, तिथं नवे केस उगवताना दिसून आले आहेत. या दोघांनाही ‘अलोपेसिया युनिव्हर्सालिस’ नावाची एक व्याधी होती. या व्याधीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युन सिस्टीम) ज्यावर अवलंबून असते, त्या संप्रेरकांच्या अतिरिक्त परिणामांमुळं केस मुळापासून गळण्याचा प्रकार होत असतो. ‘ऱ्हुमटॉईड आर्थ्रायटिस’ या सांधेदुखीच्या एका प्रकारावर औषध म्हणून ‘टोफॅसिटिनिब सायट्रेट’ हे औषध दिलं जातं. या औषधात शरीराच्या इम्युन सिस्टीमला थोपवून धरण्याचा एक गुण असतो. त्याचाच परिणाम म्हणून हा केसांच्या वाढीचा प्रकार होतो, असं दिसून आलं आहे; पण या औषधाचे काही अतिरिक्त परिणामही (साइड इफेक्‍ट) होतात, ज्यापासून जपलं पाहिजे असं ‘फायझर’ या प्रमुख औषधनिर्मिती संस्थेनं सांगितलं आहे. या ‘टोफॅसिटिनिब सायट्रेट’ औषधामुळं मऊ कातडीला, पोटातल्या जठर आणि आतड्यांना चिरा पडून जखमा होतात. या ‘त्वकशोथ’ झालेल्या जागी जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. त्यातच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानं त्याचे वाईट परिणाम होण्याची दाट शक्‍यता असते. असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतीत दिला आहे. मग यावर अधिक संशोधन झाल्यास कदाचित एखादा चांगला तोडगा निघू शकेल, असा दिलासाही व्यक्त केला आहे...

***
फॅशनच्या दुनियेत जाणाऱ्या तरुणांना एक वाईट बातमी ठरावी, असे एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. फॅशनच्या दुनियेत उंच माणसांना जास्त मागणी असते. विशेषतः ज्यांच्या पायांची उंची अधिक, त्यांना अधिक सुंदर म्हणण्याचा प्रघात आहे. एका अथेरोस्लेरोसिसच्या (शरीरातल्या रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड होणं या व्याधीच्या) रुग्णांच्या सर्व्हेक्षणाच्या दरम्यान असं लक्षात आलं आहे, की ज्यांच्या पायांची लांबी जास्त असते, त्यांना पोटाचा, विशेषतः मोठ्या आतड्याचा किंवा गुदद्वाराच्या नजीकच्या भागाचा कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते. महिलांमध्ये पायांची सरासरी उंची ३१.१ इंचांपेक्षा जास्त असेल तर ही शक्‍यता इतरांपेक्षा ४२ टक्के जास्त असते, तर पुरुषांमध्ये पायांची (उंची) सरासरी ३५.४ इंचांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना ही शक्‍यता इतरांपेक्षा ९१ टक्के जास्त असते ! हे विचार करायला लावण्यासारखे आहे. कारण यात एकूण १४ हजार ५०० केसेसचा अभ्यास करण्यात आला, ज्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हा अभ्यास अमेरिकेतल्या मिनेसोटा युनिव्हर्सिटीच्या ‘एपिडेमिओलॉजी’ म्हणजे ‘रोगपरिस्थितिनिदान’ शाखेच्या डॉ. गौलामे ओनियाघाला या प्रकल्पप्रमुखांनी एका शोधनिबंधातून प्रसिद्ध केला आहे. हाडांच्या लांबीच्या वाढीस जबाबदार असणाऱ्या घटकांचा थेट संबंध आतड्याच्या कर्करोगाशी असतो, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

***
उंच उंच इमारतींचं जरी त्यांत राहणाऱ्यांना खूप अप्रूप वाटत असलं आणि स्मार्ट सिटीतल्या फक्त उच्चभ्रू लोकांचीच ती मक्तेदारी ठरत असली, तरी ती वाढत्या जागेच्या समस्येवर एक उपाय म्हणूनच गणली जाते. या उंच इतारतींचे जसे फायदे आहेत, तसेच त्यांचे तोटेही आता पुढं येत आहेत. त्यातला एक मुद्दा थेट आपल्या आयुष्याशी निगडित आहे. ‘कार्डिॲक ॲरेस्ट’ म्हणजे अचानक येणारा, हृदयक्रिया बंद पडण्याचा झटका. या प्रकारात त्या रुग्णाला त्वरित आरोग्यसेवा मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आवश्‍यक ती आरोग्यसेवा चटकन उपलब्ध होत नाही, ही मुख्य अडचण आहे आणि ते जीवघेणं ठरतं, असं एका सर्वेक्षणातून समजून आलं आहे. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवरच्या घरांच्या बंद दरवाज्यामागं अडकलेल्या रुग्ण व्यक्तीला चटकन मदत मिळणंही शक्‍य होत नाही. त्याची विविध कारणंही समोर आली आहेत. एकतर आजूबाजूचे शेजारी घरी असतीलच असं नसतं. ते मदत करण्यालायक असतील असंही नाही. इमारतीत असणाऱ्या लिफ्टपैकी व्यवस्थित सुरू असणारी लिफ्ट योग्य वेळात उपलब्ध होईलच असं नाही. इमारतीच्या लॉबींची दारं अनेकदा बंद असतात आणि किल्ल्या ज्या माणसाकडं असतात, त्यांचा पत्ताच नसतो. त्यामुळंही आरोग्यसेवा देणाऱ्याला रुग्णापर्यंत पोचण्यास उशीर होतो. आलेल्या रुग्णवाहिकेतल्या लोकांना पटकन समजेल अशा ठिकाणी इमारतीचा नकाशा उपलब्ध नसतो. लपलेले आणि अरुंद जिने आणि अशा जिन्यांवर अडगळीचं सामान टाकलेलं असणं, हे सगळे अडथळे पार करत रुग्णापर्यंत पोचणं हे उशीर करणारं ठरतं. तेच घातक ठरतं. कारण, अशा रुग्णाला लवकर आरोग्यसेवा मिळणं हाच त्याच्या बचावाचा मुख्य स्रोत असतो. गेल्या पाच वर्षांत केलेल्या आणि कॅनडातल्या काही स्मार्ट सिटीत केलेल्या या सर्वेक्षणातून असं आढळून आलं आहे, की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, पहिल्या ते तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांपैकी ४.२ टक्के रुग्ण बचावले आहेत. तीन ते दहाव्या मजल्यांवर राहणाऱ्यांपैकी २.६ टक्के रुग्ण वाचवता आले आहेत, सोळाव्या मजल्यावर राहणाऱ्यांपैकी जेमतेम एक टक्काच रुग्ण वाचू शकले आहेत, तर गेल्या पाच वर्षांत २५ व्या मजल्यापेक्षा अधिक उंचीवर घर असणाऱ्यांपैकी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कुणीच वाचू शकलेलं नाही. त्याचं कारण फक्त आणि फक्त उशिरा मिळालेली आरोग्यसेवा हेच आहे, असे न्यूयॉर्कच्या तत्काळ आरोग्यसेवा विभागाच्या डॉ. रॉबर्ट सिल्व्हरमन यांनी याबाबत माहिती पुरवताना सांगितलं. अमेरिका आणि कॅनडातल्या अद्ययावत सुविधा असणाऱ्या पुढारलेल्या शहरांत जर ही अवस्था असेल, तर आता उंच इमारतीत राहायला जागा घेताना जरा विचारच करायला हवा...

***
असाच आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे उच्च शिक्षितपणाचा आणि मेंदूच्या कर्करोगाचा ट्यूमरचा मेंदूतल्या गाठी होण्याचा संबंध. उच्च शिक्षणामुळं मेंदूचा कर्करोग होतो की काय? खरं तर नाही. विज्ञानाच्या कार्यकारणभावात हे बसणारं नाही; पण स्वीडनच्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे, की कॉलेजमध्ये निदान तीन वर्षं ज्यांचं उच्चशिक्षण झालं आहे, अशा खासकरून हिलांमध्ये-ग्लिओमाचे-मेंदूत कर्करोगानं ट्यूमर होण्याचं प्रमाण २३ टक्के अधिक आहे, तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण १९ टक्के अधिक आहे. अरे, म्हणजे उच्च शिक्षण टाळावं की काय? तर नाही. याची सकारात्मक बाजूही पाहायला हवी. लंडन युनिव्हर्सिटीच्या ‘बालक आरोग्य संस्थे’च्या वतीनं या प्रकल्पात सहसंशोधक म्हणून काम करणाऱ्या अमल खानोलकर यांनी याबाबत सांगितलं ः ‘‘असे निष्कर्ष येण्याचं कारणच उच्चशिक्षण झालेल्या व्यक्तींमध्ये आरोग्याबाबत असणारी जागृती हे आहे. लवकर झालेलं निदानच यातून दिसतं. त्यातूनच योग्य आणि वेळेत होणारे उपचारही लक्षात घ्यायला हवेत, जे त्यांना जीवनदायीच ठरलेले आहेत. याउलट शैक्षणिक पात्रता कमी असलेल्यांमध्ये अशी जाणीवच नसल्यानं निदानच वेळेत केलं जात नाही, त्याची नोंदच होत नाही. किंबहुना, कोणत्या रोगानं रुग्णाला त्रास होत आहे, हेच कित्येकदा कळत नाही. मग उपचारांचाही उपयोग होत नाही अशी स्थिती होते, ही खरी शोकान्तिका आहे.’’

***
आयुष्यातले विविध वाढींचे टप्पे आपल्याला जन्मतःच मिळणाऱ्या जनुकांसोबत जणू ठरविल्याप्रमाणेच मिळालेले असतात, असा एक विचार जनुकांच्या आनुवांशिकतेतून पुढं आला होता. डीएनएच्या एकूण रचनेवर, त्यातल्या गुणसूत्रांच्या क्रमवारीवर, कुणाला कधी दात येणार, ते कधी पडणार, नवे दात कधी येणार, वयात येण्याचं वय काय, मिसरूड कधी फुटणार, एवढंच काय, टक्कल कधी पडणार, तेही गुणसूत्रांच्या क्रमवारीवर अवलंबून असतं, अशा प्रकारचं संशोधन झालं आहे. किंबहुना, कोणत्या गुणसूत्रामुळं काय होत असतं, याचा शोध सततच सुरू आहे. यातलीच एक जरा खासगी म्हणावी अशी घटना, पण तीही या गुणसूत्रक्रमावर आणि काही जनुकांवर अवलंबून असते, असंही आता पुढं आलं आहे. ती म्हणजे ‘समागमाचा, संभोगाचा पहिला अनुभव घेण्याची प्रत्येकाची वेळ’. हीसुद्धा डीएनएमधल्या काही जनुकांवरच अवलंबून असते, असं दिसून आलं आहे. तारुण्य, संभोगासाठी योग्य अशी मानसिकता, उपलब्ध संधीचा थोड्या धाडसानंच घेतलेला निर्णय, सामाजिक रूढी, नीतिमत्तेच्या संकल्पनांवर वरचढ ठरत घडत असणारी ही घटना खरंतर अनेक सामाजिक घटकांशीही निगडित असते; पण या नव्यानं घेतलेल्या केंब्रिजच्या जेनेटिक रिसर्च संस्थेच्या प्रकल्पात एकूण एक लाख २५ हजार माणसांच्या जनुकांचं वर्गीकरण किंवा त्यातल्या जनुकांच्या गटांचा, गुणसूत्रांच्या विशिष्ट क्रमवारीचा या ‘संभोग-वयाशी’ प्रथम संभोगानुभवाशी संबंध जोडता येईल आणि यासाठी ठराविक ३८ जनुकं जबाबदार असतात, असं प्रतिपादन या प्रकल्पाचे सहसंशोधक डॉ. फेलिक्‍स डे यांनी केलं आहे. ‘पण विद्यार्थिदशेत होणारा प्रथम संभोग शिक्षणापासून दूर जाण्याचं, प्रगतीत मागं पडण्याचं, अडथळा ठरण्याचं कारणही ठरू शकतो,’ असाही निष्कर्ष त्यांनी नोंदविला आहे. भारतीय परंपरेशी ते सुसंगतच ठरतं... विद्यार्थिदशेत ब्रह्मचर्यपालनाचं महत्त्व आपल्याकडं पूर्वापार सांगितले जातं, याची यातून आठवण झाली. असो. आज एवढंच पुरे.

आपल्या या वैज्ञानिक गप्पा आता अशाच दर पंधरवड्यातून एकदा सुरू राहणार आहेत. या ‘विज्ञानजिज्ञासे’च्या, आनंदाच्या मार्गावर असेच ज्ञानकण वेचत पुढं जात राहूया... समस्त वाचकांना नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com