टिकटिक वाजते डोक्‍यात...! (आनंद घैसास)

टिकटिक वाजते डोक्‍यात...! (आनंद घैसास)

‘विचार मेंदूनं करावा आणि प्रेम हृदयानं करावं’ असं म्हटलं जातं...पण हे म्हणणं काही खरं नाही. प्रेमसुद्धा डोक्‍यानंच केलं जातं, असं एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे...म्हणजे, कुणावर प्रेम जडलं असेल, तर आधी डोक्‍यात ‘टिकटिक’ वाजते आणि नंतर या टिकटिकीचा परिणाम म्हणून हृदयाच्या ठोक्‍यातली धडधड वाढते!

आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की काय होतं? एखाद्याबद्दल किंवा एखादीबद्दल अचानक आपलेपणा कसा काय वाटू शकतो? मी शारीरिक आकर्षणाबद्दल बोलत नाही. कॉलेजजीवनात रांगड्या; पण देखण्या, हुशार तरुणाबद्दल ‘क्रश’ वाटणं किंवा सुडौल, सौंदर्यवती तरुणीवर फिदा होणं हे साहजिक असलं, तरी त्यातून प्रत्यक्ष प्रेमात पडणं ही गोष्ट विरळाच. ‘लव्ह ॲट फर्स्ट साइट’ हे खरं की सहवासातून सावकाश जमत जाणारं प्रेम खरं? काही आगा-पीछा नसताना आयुष्यभराचा विश्‍वास ठेवणं घडतंच कसं? त्याला काही वैज्ञानिक कारणमीमांसा आहे काय? जैवविज्ञानाच्या, मानसशास्त्राच्या आणि मेंदूत तयार होणाऱ्या लहरींच्या संबंधात प्रत्यक्ष निरीक्षणांमधून याबाबत संशोधन करण्याचं अनेकांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यातून या प्रेमाचा उगम हृदयात नक्कीच नव्हे, तर मेंदूतच असतो, हे स्पष्ट झालं आहे. ‘टिकटिक’ डोक्‍यातच वाजत असते हे निश्‍चित; पण तिचा परिणाम ‘धडधड वाढते ठोक्‍यात’ असा असतो, हेही तितकंच खरं. एकूणच ज्या भावना तयार होतात, त्या मेंदूतच तयार होत असतात. मेंदूच्या एकूणच कामकाजासंबंधी, ते मेंदूत कसं चालतं, त्याची सगळीच वैज्ञानिक कारणं अजून काही समजून आलेली नाहीत; पण एक मात्र समजून आलं आहे, की मेंदूत जे काही विचार येतात, ते म्हणजे काही प्रकारच्या रसायनांची चेतापेशींमध्ये होणारी निर्मिती, देवाणघेवाण, बदल आणि त्याचसोबत तयार होणाऱ्या काही विद्युतचुंबकीय लहरींचीही देवाणघेवाण असते. ठराविक विचारांच्या वेळी मेंदूतल्या काही ठराविक क्षेत्रातच ते घडतं. दिसणे, रंग ओळखणं, वास ओळखणं, आवाज ओखळणं, भीती वाटणं, आनंद होणं हे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे होतं. आठवणी आणि स्वप्नं म्हणजेही असाच पेशींमधल्या रासायनिक आणि विद्युत दळणवळणाचा प्रकार असतो.

या घटना घडतात त्या एकाच वेळी अनेक चेतापेशींच्या जवळिकीतून, त्यांच्यातल्या देवाणघेवाणीतून, म्हणून या घटनांना ‘सिनॅप्स’ असं नाव पडले. यात चेतापेशीत (न्यूरॉन्स) काही रसायनं (यांना ‘संप्रेषक  संप्रेरक’ म्हणजे ‘न्यूरोट्रान्समीटर हार्मोन्स’ असं म्हणतात) तयार होतात, ती दुसऱ्या पेशीवरच्या संग्राहकांवर (रिसेप्टर) जाऊन चिकटतात किंवा याच जागी काही संप्रेरकांच्या बदलांमुळं विद्युतस्पंदांची देवाणघेवाण होत असते. या सगळ्याची माहिती आपल्याला ‘ईईजी’ (इलेक्‍ट्रोएनसेफेलोग्राफ) आणि ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) या दोन प्रकारांमधून मिळत असते. चेतापेशींमध्ये होणारे ‘सिनॅप्स’ संदेशवहन जेव्हा रासायनिक क्रियांमधून होतं, तेव्हा मुख्यतः त्यात चार प्रकारचे संप्रेरक तयार होत असतात. ही सगळीच कार्बनी संयुगं असतात; पण फारच विशिष्ट प्रकारच्या पेशींमध्ये आणि परिस्थितीत ती निर्माण होतात. तीही फारच कमी कालावधीसाठी टिकतात. त्यांच्यात लगेचच बदल होत ती इतर संयुगात विरून जातात. ‘ग्लुटामेटर्जिक’ रसायनं (उत्तेजित करणारी संप्रेरकं), ‘गॅबरर्जिक’ (हे संप्रेरक ‘संदमनकारी’ म्हणजे अवरोध, निरोधन करणारं असतं), ‘कोलिनर्जिक’ (स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणाच्या हालचालींना प्रेरणा देणारं संप्रेरक), तर ‘अड्रेनर्जिक’ (अनैच्छिकऐवजी ऐच्छिक स्नायूंकडं रक्तप्रवाह अधिक प्रवर्तित करणारं, ऊर्जा वाढवणारं, लढायची प्रेरणा देणारं, हृदयाचे ठोके वाढवणारं, उत्तेजित करणारं संप्रेरक) असे यात प्रकार असतात. या सगळ्या संप्रेरकांची निर्मिती आणि त्यांचं पाझरणं चेतापेशींमध्ये संदेशवहन करतं, त्यालाच आपण आपल्याला ‘समजणे’, ‘विचार’, ‘भावना’ असं म्हणत असतो. या संप्रेरकांची निर्माण होण्याची, वितरित होण्याची रीतच आपल्या स्मृतींचा ठेवाही बनत असते! ‘सिनॅप्स’च्या विद्युतसंदेशवहनात चेतापेशींच्या आवरणाच्या पापुद्य्रावर काही जागा अशा असतात, की त्या एकमेकींजवळ आल्या की एका पेशीच्या आवरणालगत तयार होणाऱ्या विद्युतभाराच्या फरकामुळं ‘प्रवर्तना’नं (इंडक्‍शन) दुसऱ्या पेशीभित्तिकेवरही विरुद्ध ध्रुवीय विद्युतभार तयार होतो. या वेळी जे स्पंद तयार होतात, ते जरी क्षणिक असले, तरी त्यामुळं सेकंदाला एकपासून ४०पर्यंत वारंवारिता (हर्टझ) असणारे तरंग, लहरी तयार होतात. या त्वरित आणि क्षणिक होणाऱ्या विद्युतक्रियेपेक्षा रासायनिक सिनॅप्स जरी थोडा अधिक काळ टिकणारा असला, तरी दोन्ही क्रिया कित्येकदा एकत्रित किंवा एकमेकींवर अवलंबून असणाऱ्या असतात. या लहरींची जी वारंवारिता असते, तीवरून ‘डेल्टा’लहरी म्हणजे शून्य ते चारपेक्षा कमी, ‘थिटा’लहरी म्हणजे चार ते सात, ‘अल्फा’लहरी म्हणजे आठ ते १५, ‘बीटा’लहरी म्हणजे १६ ते ३१, तर ‘गॅमा’ लहरी म्हणजे ३२ च्या पुढं अशा प्रकारे ओळखल्या जातात. या सगळ्यांनाच ‘मेंदू-तरंग’ असं म्हटलं जातं.

मेंदूचा इलेक्‍ट्रोएनसेफेलोग्राफ काढताना धातूच्या अनेक चकत्या डोक्‍याच्या विविध भागांवर लावल्या जातात. या चकत्यांना बारीक तारा लावलेल्या असतात. त्या संगणकाला जोडलेल्या असतात. मेंदूत तयार होणाऱ्या लहरी जरी सूक्ष्म असल्या, तरी या साधनातून ते तरंग संग्रहित केले जातात, काही प्रमाणात वर्धित केले जातात आणि त्यातून संगणकीय आलेख तयार केले जातात. या नोंदींमध्ये तरंगांची वारंवारिता, तरंगांच्या शिखर-दरीच्या रचनांमध्ये अचानक होणारे बदल एका मिलिसेकंदाच्या सूक्ष्मतेनं टिपण्याची सोय असते.

‘एमआरआय’ म्हणजे ‘मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ या पद्धतीत प्रखर चुंबकीय क्षेत्र असणारे विद्युतचुंबक आणि रेडिओतरंग वापरलेले असतात. काही अणूंची केंद्रकं उच्च चुंबकीय क्षेत्रात ठराविक रेडिओतरंग उत्सर्जित करतात, काही तरंग शोषतात, काही परावर्तित करतात, तर काहीत बदल घडवून आणतात. हे रेडिओतरंग ठराविक ऊर्जेचेच असतात. मेंदूच्या एमआरआयमध्ये मुख्यतः हायड्रोजनच्या अणूंचा उपयोग केला जातो. चेतापेशींमध्ये जे पाणी आणि इतर कार्बनी रसायने, तैले असतात, त्यातल्या संयुगात हायड्रोजनचं प्रमाण आणि त्यांची परिस्थिती कशी असते, हे आता ज्ञात आहे. त्यात तयार होणारे रेडिओतरंग हायड्रोजनच्या कशा आणि किती प्रमाणात विखुरण्यानं, घनतेनं आणि कोणत्या संयुगांमधून आले आहेत हे दर्शवतं. डोक्‍याच्या आजूबाजूला लावलेले रेडिओसंग्राहक (अँटेना) या अणूतून येणारे तरंग संग्रहित करून संगणकाकडं पाठवतात, तर ‘एफएमआरआय’ या पद्धतीत काही रेडिओस्पंद मेंदूत मुद्दाम सोडण्याची आणि त्यात काय बदल होतात, ते नोंदण्याचीही सोय असते. त्यात रासायनिक बदलही नोंदले जातात. चेतासंस्थेशी संबंधित काम करताना या पेशींमधला ऑक्‍सिजनही फार महत्त्वाचा धरला जातो. त्यासाठी ‘ऑक्‍सिहेमोग्लोबिन आणि डिऑक्‍सिहेमोग्लोबिन’ या रसायनांमधल्या रेडिओप्रारणांचा प्रामुख्यानं अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे दर मिलिसेकंदाला एक प्रतिमाचित्र घेतलं जातं; तसंच संगणकीय चित्रात रेडिओप्रारणांचे विविध स्तर वेगवेगळ्या रंगानं दर्शविण्याची सोय केलेली असते. त्यातून संपूर्ण मेंदूचं काम कसं चालत आहे, त्याचं त्रिमित चलच्चित्रही यात तयार करता येतं.  

...तर अशा साधनांच्या मदतीनंच ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ की नाही, की त्या निव्वळ कविकल्पना आहेत, याचा शोध काही संशोधकांनी घेतला आहे. २०१० मध्ये फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत कॉलेजमधल्या एक हजार ६२१ विद्यार्थ्यांच्या एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे, की प्रेमात पडलेल्या, त्या बंधनात मनापासून पडलेल्या जोड्यांमध्ये चिंताग्रस्तता, अस्वस्थता कमी प्रमाणात होती. मग ती चिंता कॉलेज, अभ्यास, आर्थिक, कौटुंबिक वा इतर कोणत्याही विषयाशी संबंधित असो. याशिवाय, मानसिक तणाव आणि मनोविकार (आणि तत्संबंधित आजारही) कमी प्रमाणात दिसले. त्याच्या उलट ‘एकटे’ राहणाऱ्यांमध्ये मानसिक तणाव आणि चिंता अधिक प्रमाणात दिसून आल्या. हेलन फिशर या रटगर्स युनिव्हर्सिटीतल्या मानववंशशास्त्राच्या प्राध्यापिकेनं (अँथ्रोपोलॉजिस्ट) ‘प्रेमाचं जैवशास्त्रीय पायाभूत कारण’ (बायॉलॉजिकल बेस ऑफ लव्ह) या विषयावर संशोधन केलं आहे. त्यातून प्रेमभावनेचा मेंदूत होणाऱ्या काही घटनांशी सरळ संबंध असतो, हे कळलं आहे. प्रेमात पडलेल्या काही पुरुषांचे आणि महिलांचे या संदर्भात त्यांनी एफएमआरआयही प्रयोगादरम्यान काढण्यात आले. या प्रयोगात सहभागी झालेल्यांना काही फोटो दाखवण्यात आले. अनेक समान दिसणाऱ्या फोटोंमध्ये ते प्रेम करत असलेल्या व्यक्तीचाही फोटो ठेवला होता. तो समोर येताक्षणी मेंदूत काय फरक घडून येतो, त्याची यात नोंद घेतली गेली. यात मेंदूतल्या ज्या जागी एखादं ‘पारितोषिक मिळाल्यावर’ जशी उत्तेजना होते, त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आनंदाची भावना निर्माण होणाऱ्या जागांमध्येही उत्तेजना तयार होते, असं दिसून आलं. या वेळी इथं ‘नोरेपिनेफ्रिन’ नावाचं एक ‘चेतापारेषक’ संप्रेरक रसायन (न्यूरोट्रान्समीटर हार्मोन) मेंदूच्या मध्यभागी असणाऱ्या ‘पॉन्स’ या विभागात तयार होतं आणि स्रवतं असं दिसून आलं. या ठिकाणी मेंदूतल्या अत्यंत दाटीवाटीनं वसलेल्या चेतापेशींच्या केंद्रकामध्ये हे संप्रेरक इतर संप्रेरकांच्या विविध संघटन-विघटनातून निर्माण होतं. या संप्रेरकाचं कामच उत्तेजना देणं, रक्तदाब वाढवणं, एकाग्रता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं हे आहे. हे ‘नोरेपिनेफ्रिन’ संप्रेरकच प्रेमभावनेचं ‘टिकटिक-धडधडी’चं मुख्य कारण होतं!

या सर्वेक्षणातून ज्या १३ समान गोष्टी पुढं आल्या, त्या प्रेमभावनेच्या दर्शक ठरतात, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

१) ‘तुमसे बढकर दुनिया मे ना देखा कोई और...’ - तो किंवा ती खास, सगळ्यांपेक्षा वेगळी व्यक्ती वाटणं. त्याच्यात/तिच्यात जे आहे ते दुसऱ्या कुणातही नाही असं वाटणं. हे होते मध्य मेंदूत होणाऱ्या ‘डोपामाइन’ या संप्रेरकाच्या वाढीव पाझरण्यामुळं.
२) ती किंवा तो नेहमीच बरोबर असतो/असते. आपल्या प्रियकराबद्दल एक सकारात्मक भूमिका कायम असते. हे होतं ‘नोरेपिनेफ्रिन’ या संप्रेरकामुळंच.
३) ‘याड लागलं रं, याड लागलं रं’ अशी ‘सैराट’ भावना...इतर कशात लक्ष न लागणं, झोप उडणं, भूक मंदावणं, अचानक ‘मूड’ जाणं आणि येणंही. या सगळ्या गोष्टी जणू एखाद्या व्यसनाच्या अमलाखाली असल्यासमान होत असतात. अचानक उत्तेजित होणं आणि जराशा नकोशा प्रसंगानं नैराश्‍याच्या गर्तेत जाणं हे दोन्ही होतं, तेही पटापट. मेंदूतल्या ‘व्यसनाधीनते’च्या’ जागी,  प्रेमभावनेमुळंही याच प्रकारचे ‘सिनॅप्स’ होतात, असं दिसून आलं आहे. ४) ‘तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे...’ दुरावा कोणत्याही कारणानं आलेला असला, तरी तो प्रेमभावना वाढवणारा असतो. प्रेमात भर पाडणारा, भावनिक नातं अधिक दृढ करणारा असतो. ही भावना मध्य मेंदूतली एक जागा, जिला ‘पारितोषिक-जागा’ असं म्हटलं जातं, तिथं घडून येते. पारितोषिक मिळण्यात होणारा उशीर, ‘डोपामाईन’ संप्रेरक तयार करणाऱ्या चेतापेशींना ते अधिक प्रमाणात तयार करण्यास उद्युक्त करतो हे त्याचं प्रमुख कारण.
५) ‘तुझ्यात जीव रंगला...’ जागेपणीचा जो कालावधी असतो, त्यातला ८५ टक्के वेळ ‘प्रेम’ ज्याच्यावर असतं, त्याच्यासंबंधीचा विचार करण्यात, बोलण्यात, सतत त्यांचे संदर्भ देण्यात जातो. यातून एक प्रकारची मालकी हक्काची भावनाही वाढीस लागते. या वेळी मध्यमेंदूत ‘सेराटोनिन’ संप्रेरकांची पातळी खालावलेली दिसते. मालकी हक्काच्या विचारांच्या वेळीही असंच होतं, हे आधीच कळलेलं आहे.
६) भावनिक परावलंबित्व हा शब्द जरा कठीण आहे; पण आपल्या ‘प्रियकरा’वर गरजेहून जास्त अवलंबून असणं, प्रत्येक बाबतीत ‘त्याला काय वाटेल’ याचा विचार, प्रसंगी त्याच्यासोबतच्या इतरांचा मत्सर आणि त्याचबरोबर कायमचं दूर होण्याची भीती ही असतेच असते. यात ज्यांची नाती मोडलेली आहेत, प्रेमभंग झालेले आहेत यांच्या बाबतीत तर मेंदूच्या पुढच्या भागात (सिंग्युलेट गायरस) कोकेन न मिळाल्यानं जी अस्वस्थता येते, त्या प्रकारची अस्वस्थता तयार करणाऱ्या क्रिया मेंदूच्या याच भागात होत असतात, असं दिसून आलं आहे. जर्नल ऑफ न्यूरोफिजिओलॉजीच्या २०१० च्या अंकात याबद्दल सविस्तर विवेचन आहे, ते खूप बोलकं आहे. त्यात तर ‘प्रेम हे एक व्यसनच (ॲडिक्‍शन) आहे’, असं म्हटलं आहे!
७) ‘खायी है रे हमने कसम संग रहने की...’ जन्मभराची सोबत ही भावना तर अगदी आपल्या अन्नपाण्याच्या गरजेच्या, तहानेच्या, भुकेच्या भावनेशी साम्य असणारी आणि उपजतच आहे, असं दिसलं. न्यूयॉर्कमधल्या ‘अल्बर्ट आइनस्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिन’च्या ल्युसी ब्राऊन या न्यूरोलॉजिस्टनं (चेताभिषक) २०११ मध्ये सादर केलेल्या एका शोधनिबंधात ही ‘जोडीदाराची भावना’ कदाचित उपजतच आलेल्या पुनरुत्पादनाच्या भावनेच्या मुळाशी निगडित असावी, असा निष्कर्ष काढला आहे. संततीच्या संगोपनासाठी ते आवश्‍यक आहे, हे नैसर्गिक कारण यामागं असावं.
८) ‘तुझ्यासाठी कायपण करीन...’  कोणतंही धाडस करण्यात मागं-पुढं न पाहणं, प्रसंगी जीव धोक्‍यात घालण्याची तयारी हे अतिरिक्‍त नोरेपिनेफ्रिनच्या निर्मितीनं होतं.
९) ‘हा ड्रेस त्याला आवडेल काय?’ हा विचार येतोच येतो, असं एका २०१३ च्या सर्वेक्षणात आढळून आलं. अधिक आकर्षक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, ‘टेस्टोस्टेरॉन’ अधिक असणाऱ्या पुरुषांकडं तशाच भिन्नलिंगी म्हणजे इस्ट्रोजेन आणि ऑक्‍झिटोसिन अधिक असलेल्या महिला नकळत आकर्षित होतात, प्रेमात पडतात असं दिसून आलं आहे.
१०) ‘तूही रे...फक्त तू आणि तूच...’ हा विश्वास, ही भावना प्रेम करणाऱ्यांमध्ये असतेच; थोडा मत्सरही असतो. तारुण्यसुलभ आकर्षणानंतर प्रत्यक्ष समागम होण्यापर्यंत, मूल होण्यापर्यंतही ही आपली जोडी टिकावी म्हणून हा नैसर्गिक उपजत घडणारा प्रकार असावा. हा डोपामाईनचा परिणाम.
११) शारीरिक जवळीक किंवा प्रत्यक्ष समागमापेक्षा प्रेमात पडलेल्या दोघांमध्ये भावनिक जवळीक अधिक महत्त्वाची ठरते. सर्वेक्षणात दिलेलं ‘शारीरिक संबंध ही आमच्या प्रेमातली अत्यंत महत्त्वाची बाब आहे’ हे वाक्‍य ६४ टक्के महिलांनी आणि बरोबर ६४ टक्के पुरुषांनीही नाकारलं आहे! शिवाय हे नाकारणारी काही जोडपी नव्हती!
१२) ‘ये क्‍या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्‍यूं हुआ...’ प्रेम का, कसं होतं हे सांगता येत नाही. त्यामागं काही कार्यकारणभाव दिसून येत नाही. इतकंच नव्हे, तर कुणाच्या बाबतीत का प्रेम वाटेल, हे ठरवता येत नाही; तसंच कुणावर ठरवून प्रेम करता येत नाही. कदाचित थोडा हताशपणाच जाणवतो की ‘अरेच्चा, आपण तर प्रेमात आहोत...!’ हे कधी कधी नंतरच उमगते ! पण खरं कारण, मेंदूत झालेलं संप्रेरकांचं स्रवणं असतं...
१३) ‘अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले...’ गंमत अशी की प्रेमात असणाऱ्यांनाच आपलं प्रेम कमी झालं की काय असं नेहमीच वाटतं; तेही अनेक वर्षांची साथसोबत झाल्यावर! पण तरीही असं वाटणं हेही प्रेमात असल्याचंच लक्षण आहे, असं हे शास्त्रज्ञ म्हणतात. काही कारणानं एकमेकांपासून दूर राहणाऱ्या दोघांमध्ये भावनिक जवळीक जास्त असते, दूरत्व प्रेमभावना वाढवते, असेच अनेकांच्या बाबतीत जाणवलं आहे... ‘त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा’ असं खऱ्या प्रेमात असणाराच म्हणू शकतो, हे आता विज्ञानसंमत होत आहे... प्रेमाची हीच तर गंमत आहे...‘सगळ्यांवर प्रेम करा’ असं सांगणं सोपं आहे; पण ते होणं आपल्या हातात नाही...कारण ते ठरवून करताच येत नाही...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com