आपण सगळे एक... आणि वेगळेही ! (आनंद घैसास)

आपण सगळे एक... आणि वेगळेही ! (आनंद घैसास)

विशिष्ट प्रदेशांतल्या, विशिष्ट कुटुंबातल्या अनेकांची नाकं आपल्याला एकसारखी दिसत असली तरी, प्रत्येक नाकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये, सौंदर्यात नाक महत्त्वाची भूमिका बजावतं आणि शरीरशास्त्राच्याही दृष्टीनं त्याला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांचा विचार केला, तर मात्र त्या-त्या प्रदेशांतल्या लोकांच्या नाकांमध्ये काही समान घटक असतात, असं दिसतं. हे घटक निश्‍चित होण्यामध्ये मानवी उत्क्रांती, त्या परिसराचं हवामान आदी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, असं एका संशोधनातून नुकतंच सिद्ध झालं आहे. या संशोधनावर एक नजर.

ब  ऱ्याच वर्षांपूर्वीची, नव्वदीच्या दशकातली गोष्ट आहे. मी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात काम करत होतो. त्या काळी पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनसोबत, पाबळच्या आसपासच्या गावांमध्ये आम्ही प्रौढ शिक्षण वर्गांसाठी, रात्रशाळा घेण्यासाठी, वाड्या-वस्त्यांवर महिन्यातून दहा-बारा दिवस राहायलाच जायचो. प्रौढ निरक्षरांना अक्षरवाचन शिकवायचं असल्यानं जवळीक वाढावी म्हणून खास हस्ताक्षरात तयार केलेली, सचित्र-वाचनपत्रं यासाठी तयार केली होती. ती मी नव्हे, तर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामधील विविध तज्ज्ञांनी ती लिहिलेली असायची. कित्येकदा तर अनेकांनी एकत्र बसून ती लिहिलेली असायची. ही सचित्र-वाचनपत्रं तयार करायची संधी मला मिळाली होती. त्यातली सारी चित्रं मी काढलेली असायची आणि ती माझ्या हस्ताक्षरात तयार केलेली होती. त्यात एक चित्र-पत्र होतं ‘आपण सारे एक’ त्यात मानवांचे अनेक नमुने दाखवले होते; पण सर्वांना दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक नाक, दोन कान, एक तोंड अशा साऱ्या समान गोष्टी होत्या. दुसरं एक चित्र-पत्र होतं, ‘आपण सारे वेगळे.’ त्यात मी अनेक नाकं दाखवली होती, कान दाखवले होते, डोळे दाखवले होते. साऱ्यांना डोळे, नाक, कान असले, तरी ते प्रत्येकाचे वेगळे असतात, ते स्पष्ट केलं होतं. यात नाकांच्या बाबतीत वेगळेपणा दाखवण्यासाठी मी आमच्या कार्यालयातल्या दहा जणांच्या नाकाचे प्रत्यक्ष फोटोच काढले होते आणि त्यावरून तंतोतंत चित्रे बनवली होती. गेल्या महिन्यात नाकाबद्दलचं एक संशोधन प्रसिद्ध झालं आणि अचानक त्या चित्र-पत्रांची आठवण आली.

चेहऱ्याच्या इतर अवयवांप्रमाणंच नाकाचा आकार हा नेहमीच प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. अगदी एका कुटुंबातल्या प्रत्येकाचं नाकही एकसारखं असतंच असं नाही. मग वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या मंडळींची नाकं तर वेगवेगळी असणारच. चित्रपट कलाकारांचे फक्त डोळे, नाही तर नाकं दाखवून त्यांना ओळखण्याची कोडीही आपण पाहिली असतील. पण फक्त नाक पाहून तो माणूस कोणत्या प्रांतातून आलाय किंवा तो कोणत्या जातीचा, पंथाचा, ज्ञातीचा असेल ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा झाला, तरी ते नेहमी बरोबर येईलच, असं नाही. नाकाच्या आकारातला फरक हा नाकपुड्यांची गोलाई कशी आहे, नाकाची छिद्रं गोल, लंबवर्तुळाकार, तीही पसरट की उभट आहेत, त्यांची लांबी-रुंदी, एकूण नाकाची लांबी-रुंदी कशी आहे, कपाळाशी सखलपणा आहे की नाही, डोळ्यांपाशी खोबण आहे की उंचवटा आहे, नाकाला मध्यभागी टेकडीसारखं टेंबूक आहे, की ते सरळ निमुळतं आहे आदींवरून स्पष्ट होतो. खरं तर आणखीही बरीच वैशिष्ट्यं सांगता येतील. काही नाकं तर वाकडी, ‘नकटी’ असतात. असो. पण आफ्रिकन माणसाची नाकं आणि युरोपियन माणसांची नाकं यात फरक नक्कीच आहे, हे कुणीही सांगेल. लहान आकाराची नाकं, ज्यांच्या नाकपुड्याही लहान आहेत असं कोरिया, जपानकडच्या माणसांमध्ये जसं अधिक दिसतं, तसंच सरळ नाकाचे, उभारी अधिक असणारे, पाश्‍चिमात्य लोक अधिक असतात असा एक सर्वसाधारण समज आहे. एखादं नाक हे ‘भारतीय’ आहे, असं दाखवता येईल काय, असाही प्रश्न मला त्यातून पडला आहे. जरा कठीणच आहे. असो.

आनुवांशिक देणगी
‘बाळाचं नाक कोणासारखं आहे?,’ ‘अगदी बाबांचं नाक घेतलंय हो...’, ‘अरेच्चा, नाक तर आजोबांचं उचललंय लबाडानं...’ अशा चर्चा दवाखान्यात नवजात बाळाला पाहायला येणारे नेहमी करतात. नाकाचा आकार हा आनुवंशिक प्रकार आहे, हे तसं सर्वमान्यच म्हणायला हवं. कारण आई-वडिलांच्या जनुकांच्या संमीलनातून तयार झालेल्या नव्या ‘डीएनए’मधल्या झालेल्या जनुकीय क्रमवारीच्या अदलाबदलीतून, आराखड्यातून, नाकाच्या आकारात बदल होतात, हे आता निश्‍चित माहीत झालं आहे. त्यामुळं ‘नाक’ हा घराणेशाहीचा वारसा असतो, हे साऱ्यांनाच माहीत आहे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं नाकाची चाल असते. आपल्याकडं वधूच्या ‘चाफेकळी’ नाकाला त्यामुळंच महत्त्व आणि ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न...’ अशा म्हणीचाही उगम त्यातूनच. माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं. तिचं ते ‘नकटं’ नाक आड येत होतं. ते शेवटी ‘कॉस्मॅटिक प्लॅस्टिक सर्जरी’ करून त्यांनी सरळ करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच तिचं लग्न जमलं. ही तर गेल्या पाच वर्षांपूर्वीची सत्यघटना आहे. आपल्या नाकाच्या आकारासाठी मायकेल जॅक्‍सननं नाकाचं अशी सौंदर्यवर्धन करण्याची शस्त्रक्रिया वारंवार केली होती. त्याच्या केवढ्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या; पण सध्या फक्त ‘सेलिब्रिटी’च नाही, तर सर्वसामान्य स्त्रिया आणि पुरुषही अशा ‘नाकदुरुस्त्या’ करून घेतात, तेही कोणी तरी ठरवलेल्या सौंदर्याच्या काही निकषांवरून... सौंदर्य म्हणून नाकाला पूर्वापार महत्त्व आहे, हे अगदी रामायणातलं शूर्पणखेचं ‘नाक कापलं’पासून आपल्याला माहीत आहे. आयुर्वेदाचे धन्वंतरी सुश्रुतानंही नाकाच्या शस्त्रक्रियेविषयी बरंच लिहिलेलं आहे. एका प्रसिद्ध खगोलनिरीक्षकाचं, टायको ब्राहीचं नाक एका तलवारबाजीच्या द्वंद्वयुद्धात (२९ डिसेंबर १५६६) अर्धं उडवलं गेलं होतं. त्यानं सोन्याचे किंवा चांदीचं नाक बनवून ते त्या अर्ध्या नाकावर चिकटवून आयुष्यभर वापरलं होतं, अशी आख्यायिका होती. त्याचं थडगं एकदा १९०१मध्ये आणि नंतर २०१०मध्ये उघडून, तिथं असणारे नाकाच्या आणि कवटीच्या हाडांचे शिल्लक राहिलेले अवशेष मिळवून त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला, की टायकोचं ते ‘कृत्रिम नाक’ पितळेचं होतं! असो.

नाकाचं काम नक्की आहे तरी काय?
नाकाचं हाड वाढले, सतत सर्दी होण्याचा त्रास होत आहे, रात्री नाकानं घेतला जाणारा श्वास अपुरा पडतो, तोंडानं श्वास घ्यावा लागतो, त्रासदायक घोरणं होतं अशा कारणांसाठी उपाय म्हणूनही नाकाच्या शस्त्रक्रिया होतात. पण नाकात एवढं काय आहे? लहानपणापासून आपल्याला नाक हे ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे, असं प्रामुख्यानं शिकवलं जातं; पण वास, गंध ओळखणं हे नाकाच्या इतर कामांपैकी एक आहे. नाकाचं पहिले महत्त्वाचं काम श्वास घेणं हे आहे. म्हणजे आत येणारी हवा शरीराच्या तापमानाला आणून पुढं पाठवणं, ती जास्त कोरडी असेल तर त्यात पुरेशी आर्द्रता निर्माण करणं आणि हवेबरोबर येणारे धुळीचे कण गाळून; तसंच हवेतून येणाऱ्या काही सूक्ष्मजंतूंनाही श्‍लेष्माच्याद्वारे रोखून, शरीराला मानवेल अशी हवा फुफ्फुसाकडं नेण्याचं महत्त्वाचं काम नाकाचं असतं. या बाबतीत शरीराच्या इतर अवयवांमध्ये निसर्गात राहण्याच्या दृष्टीनं, अनुकूलनाच्या तत्त्वानुसार जसा बदल अपेक्षित आहे, तसा नाकाच्या बाबतीतही झाला असावा काय, असा प्रश्न काही मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या काही संशोधकांना पडला. नाकाचं काम आणि त्याचा आकार याचा काही संबंध आहे का, असेल तर जगाच्या कोणत्या भागात राहणाऱ्या लोकांवर असा प्रभाव असेल, असा विचार आल्यामुळं एक संशोधन केलं गेलं. त्याची माहिती ‘प्लॉस’ या सॅन फ्रॅन्सिस्को इथल्या जैवसंशोधनाला वाहिलेल्या शोधनिबंध प्रसिद्ध करणाऱ्या वेबसाइटनं सर्वांत आधी १६ मार्चला प्रसिद्ध केली, ती पाहण्यासारखी आहे. विषय आहे ‘मानवाच्या अधिवासाचा त्याच्या नाकाच्या आकाराच्या उत्क्रांतीवर झालेला परिणाम.’ हे संशोधन काय आहे ते पाहूया.

ए. ए. झैदी, ब्रूक मॅटर्न, पीटर क्‍लाईस, ब्रायन मॅकइकॉय, क्रिस ह्युजेस आणि मार्क डी. शिव्हर या गटानं हे संशोधन केलं. हा एक आंतरविश्वविद्यालयीन प्रकल्प होता. यात एकूण माहिती गोळा करण्यात आली होती ती ४२५७ जणांची. त्यातल्या ३७४६ जणांची आनुवंशिकता, म्हणजे त्या सर्वांच्या आई-वडिलांचीही माहिती होती. ते मूळ कुठं जन्मले, राहिले-वाढले आणि त्यांचे आई-वडील कुठं राहिले-वाढले इत्यादी. यापैकी २६३६ जणांच्या माहितीवरून त्यांच्या वंशात फारसा संकर झालेला नाही ना- म्हणजे कोणी युरोपियन माणसाची बायको एशियन आहे किंवा आफ्रिकन माणसाची बायको जपानी आहे, असा काही प्रकार नाहीये ना, याचीही खात्री करून घेण्यात आली होती. म्हणजे त्यावरून त्यांच्या नाकात होणारा फरक हा थेट ‘आंतर-वांशिक’ नाही, याची काळजी घेण्यासाठी असे लोक निवडले होते. जगातल्या राहण्याच्या त्यांच्या स्थानावरून त्यांचं साधारणत: चार प्रमुख गटांत वर्गीकरण करण्यात आलं. उत्तरेकडचे युरोपियन लोक, पश्‍चिम आफ्रिकन, पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया इथले लोक असं हे वर्गीकरण होतं. यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नाकाचं त्रिमित प्रकाशचित्र तर घेण्यात आलं होतंच, शिवाय प्रत्येकाच्या नाकाची ठराविक प्रकारे मोजमापंही घेण्यात आली होती. त्यात नाकाची चेहऱ्यामधली जागा, नाकाचं एकूण क्षेत्रफळ किती इथपासून ओठाच्या कडांपासून नाकपुड्यांचं अंतर किती, चेहऱ्यापासून नाकाची उंची किती, दोन डोळ्यांमधे अंतर किती आहे, नाकपुड्यांची लांबी-रुंदी, त्यावरून नाकाच्या नलिकेचं आकारमान असे एकूण सतरा प्रकार यात अभ्यासले गेले. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीची उंची, वजन, त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध (बीएमआय), रंगाचा गोरेपणा (नुसता दिसण्यातला नाही तर त्वचेतल्या मेलॅनिनची टक्केवारी), लिंग, वंश, वय अशा संबंधित अनेक गोष्टी यात नोंदण्यात आल्या होत्या.
यासोबत या सगळ्या जणांच्या राहण्याच्या जागांचं, त्या प्रांताचं वार्षिक सरासरी तापमान, हवेची सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता यांचीही नोंद घेण्यात आली. या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण करण्यात आलं, तेव्हा त्यातून असं स्पष्ट दिसून येत आहे, की, स्त्रियांची नाकं पुरुषांपेक्षा नेहमीच आकारानं लहान, थोडी नाजूक, नाकपुड्यांचा आकार अधिक कमनीय आणि उभारीही माफक असणारी असतात...दुसरा महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’...प्रत्येक नाकात काही तरी वेगळेपण असतंच असतं.... तर त्या पुढची अधिक महत्त्वाची फलितं म्हणजे उत्तरेकडच्या युरोपियन लोकांची नाकं आफ्रिकेतल्या किंवा आशियातल्या लोकांपेक्षा अधिक उभार असलेली, लांब असतात, पण आकारानं लहान, निमुळती असतात. आफ्रिकेतली नाकं क्षेत्रफळानं अधिक आणि नाकपुड्याही पसरट आकाराच्या असणारी; पण उभारी नसणारी असतात. तीच अवस्था दक्षिण आशियातल्या लोकांच्या नाकाची. मात्र, ही नाकं आफ्रिकेतल्या नाकांपेक्षा थोडी अधिक उभारी असणारी असतात. पूर्व आशियातल्या जपानसारख्या देशातल्या लोकांची नाकं बसकी; पण निमुळती बारीक नलिका असणारी असतात. हे वर्गीकरण निष्कर्ष इथंच थांबत नाहीत, तर त्यामागची कारणमीमांसाही शोधतात.

भवताल आणि नाकाचा संबंध
उष्ण कटिबंधात जिथं हवा मूलत:च गरम असते, तिथं नाकं मोठी आणि त्यांच्या आतली जागा जास्त पसरट असते, कारण फुफ्फुसात जाणारी हवा गरम करण्याची तिथं आवश्‍यकताच नाही, तसंच दमटपणाही वाढवायची गरज नाही. तिथं अंगाच्या कातडीचा रंगही अतिनील किरणांच्या परिणामानं अधिक गडद झालेला आढळतो, तर याविरुद्ध उत्तरेकडच्या थंड हवामानाच्या प्रदेशातल्या लोकांची नाकं लांब नलिका असणारी, नाकाची टोकं (नाकपुड्या) बारीक आणि छोटी असणारी, तर अधिक उभार असल्यानं घशापर्यंतच्या आतल्या मार्गाची लांबी वाढवणारी आहेत, असं समजून आलं आहे. ही नाकाची लांबी आणि आकारातला बदल म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीच्या बदलाचाच, अनुकूलनाचाच एक भाग असावा, असं यातून अनुमान काढण्यास काय हरकत आहे, असा दावा या संशोधक मंडळींनी केला आहे.

‘थॉमस सिद्धांता’ला पुष्टी
गेल्या शतकात थॉमस नावाच्या एका शास्त्रज्ञानं अशीच संकल्पना मांडली होती, जिला ‘थॉमस सिद्धांत’ असं म्हटलं जात असे. त्याला पाठिंबा देणारंच हे संशोधन ठरलं आहे. मानवाची मूळ वसाहत म्हणजे आदिमानव हे आफ्रिकेत तयार झाले आणि तिथून सागर किनाऱ्यानं आणि नद्यांच्या प्रवाहांच्या किनाऱ्यानं मानवांची वस्ती जगभर पसरत गेली, असा एक सिद्धांत आहे... मानवाच्या कातडीचा रंग त्याला मिळणाऱ्या अतिनील किरणांच्या मात्रेनुसार बदलत गेला, त्यामुळे विषुववृत्ताच्या आसपास काळ्या कातडीचे लोक होते. आपण जसजसं उत्तरेकडं जाऊ तसतशी कातडी अधिक फिकट होत गेलेली दिसते. म्हणून उत्तरेत गोरे लोक. तसंच मानवाचे शरीरही वातावरणाच्या आणि परिसराच्या अनुकूलनानं, गरजेनुसार बदलत गेलं असणार. त्याचाच भाग म्हणजे नाकाच्या आकारातल्या गरजेनुसार झालेला हा बदल असावा, असा जणू पुरावाच आता या संशोधनातून हातात आला आहे, असं या मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे.

गंमत आहे ना? शिवाय एक विशेष गोष्ट म्हणजे हा एक आंतरविश्वविद्यालयीन प्रकल्प असल्याने विविध ठिकाणी असलेल्या शास्त्रज्ञांनी एकत्रपणे केलेलं हे काम आहे. शिवाय या कामाला आर्थिक मदत करणाऱ्या संस्थाही विविध आहेत. युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अँड डिफेन्स, इलिनॉइस युनिव्हर्सिटी, फ्लेमिश इन्स्टिट्यूट, बेल्जियम, पेन स्टेट ह्युमन इव्होल्युशन अँड डेव्हलपमेंट अशा संस्थांनी यांना आर्थिक साह्य केलं होतं. या संशोधनात या संस्थांचं, एकूण संशोधनाची संरचना, आराखडा, व्याप्ती, कार्यवाही, संबंधित माहिती गोळा करणं, त्याच्या विश्‍लेषणाच्या पद्धती आणि शेवटी त्याला प्रसिद्धी देण्यात येणार किंवा नाही, या सगळ्या गोष्टींवर कोणतंही बंधन असणार नाही, या तत्त्वावर हे अनुदान दिलं गेलं होते. हा शोधनिबंध आणि त्याची पूर्ण माहिती आता सर्वांना खुली करण्यात आली आहे.

आता एक मात्र निश्‍चित, आपलं नाक हे अनेक पिढ्यांच्या नैसर्गिक उत्क्रांतीचं फलित म्हणून तयार झालं आहे, तर मग नाक वर करून चालायला काय हरकत आहे?... कसं का असेना...आणि हो, तो आपला पिढीजात वारसाही आहेच की!

अधिक माहितीसाठी : http://journals.plos.org/plosgenetics/article?id=10.1371/journal.pgen.1006616
ही वेबसाइट पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com