वसंताची चाहूल... काळजी वाढवणारी? (आनंद घैसास)

वसंताची चाहूल... काळजी वाढवणारी? (आनंद घैसास)

अमेरिकेत यंदा वसंताचं आगमन लवकर झाल्यामुळं वैज्ञानिकांनी संशोधनातून त्यातले दीर्घकालीन दुष्परिणाम दाखवून दिले आहेत. फक्त अमेरिकेत नव्हे, तर जगभरच ऋतूंचं चक्र बदलत असल्याचं जाणवून येत आहे. आर्क्‍टिक सागरातला बर्फाच्छादित भाग कमी होणं, कार्बनडाय ऑक्‍साईडची पातळी वाढणं, सागराची पातळी वाढणं असे अनेक गंभीर परिणाम आता दिसायला लागले आहेत. या परिणामांमागची नक्की कारणं काय आणि त्यावरचे उपाय काय याचं विश्‍लेषण.

वसंतातली ‘नवी पालवी’ कधी येते याचंही गणित हवामानावर अवलंबून असतं. हवामान हे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या संदर्भात, तिच्या अक्षाच्या २३.५ अंशांतून कलण्यामुळं बरंचसं अवलंबून असतं. या कलण्यामुळं पृथ्वीवर सूर्याकडून येणारी ऊर्जा कमी-अधिक प्रमाणात मिळत असल्यानं ते होतं, असं कधी तरी शाळेत वाचलं होतं. पाठही केलं होतं; पण नीट कळलं होतं असं नाही. पृथ्वीच्या या साडेतेवीस अंशांतून कलण्यानं ऋतूंची निर्मिती होते, हे मात्र मनावर कायमचं बिंबलं होतं- बिंबलेलं आहे. ऋतू का आणि कसे होतात, ते काही इथं सविस्तर सांगण्याचं प्रयोजन नाही. आपल्याला ते माहीतच असावं; पण जाता -जाता आधी हे उजळणीसारखं माझ्या मनात आलं, की सूर्याचा प्रकाश आणि उष्णता काही काळ उत्तर गोलार्धात जास्त काळ (आपल्याकडं जेव्हा दिवस मोठा, रात्र छोटी असते), तर दुसऱ्या म्हणजे दक्षिण गोलार्धात काही काळ जास्त (आपल्याकडं जेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी असते) असं होण्यानं ऋतूंची निर्मिती होते. खरे ऋतू दोनच. उन्हाळा आणि हिवाळा. आपण पावसाळ्याला तिसरा ऋतू मानून टाकला आहे; पण ते योग्य नाही. भारतीय (शक) कालगणनेमध्ये बारा महिन्यांतल्या प्रत्येक दोन महिन्यांचा एक ऋतू मानला आहे. चैत्र-वैषाख: वसंत, ज्येष्ठ-आषाढ: ग्रीष्म, श्रावण-भाद्रपद: वर्षा, आश्विन-कार्तिक: शरद, मार्गशीर्ष-पौष: हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन: शिशिर ऋतू. वर्षाची, चैत्राची सुरवात ज्या गुढीपाडव्यानं करायची तो दिवस खरं तर वसंतसंपाताचा दिवस असायला पाहिजे. म्हणजे त्या दिवशी रात्र आणि दिन या दोन्हींच्या कालावधीत समानता पाहिजे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी हे होतही होतं. ज्या वेळी पृथ्वीचा अक्ष सूर्यासोबत बरोबर समांतर असेल, त्या वेळी असं होतं. असं वर्षातून दोन वेळा आताही होतं. एकदा २१ मार्चला, तर एकदा २२ सप्टेंबरला. या दोनही वेळी दिवस-रात्र बारा-बारा तासांची असते; पण पृथ्वी काही कालगणनेप्रमाणे फिरत नाही, तर तिच्या अवकाशातल्या फिरण्यावरून आपण कालगणना करायचं ठरवलं आहे. मग त्यात पृथ्वीच्या बदलत्या वागण्याप्रमाणं सुधारणा करणं तर आवश्‍यक आहे, नाही का? तशी सुधारणा आपण भारतीयांनी केलीही आहे. मेघनाद साहांच्या अध्यक्षतेखाली एका समितीनं अशी ‘भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका’ तयार केलेली आहे. ती खरं तर आपण सर्वांनी वापरात आणली पाहिजे. जुनं सोडून देऊन विज्ञानाधिष्ठित असलेली ही कालगणना वापरली पाहिजे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून दर वेळी या कालगणनेप्रमाणं आजचा दिवस कोणता, ते नेहमी सांगितलं जातं; पण आपणच ती वापरात आणत नाही. असो. तर मी सांगत होतो, की वसंतात वृक्षांना नवी पालवी फुटते, हे सर्वमान्य आहे. शिशिरातली पानगळ संपून गेल्यावर हे होतं. त्यानंतर नवा बहर येतो...वगैरे.

मात्र, गेल्या महिन्यात एक बातमी वाचली, त्यामुळं जरा आश्‍चर्य आणि काळजी दोन्ही वाटलं, म्हणून ते तुम्हाला सांगावंसं वाटलं. कारण त्याचा आपल्याशी फारच जवळचा संबंध आहे, अगदी ती बातमी अमेरिकेतली असली तरी. या बातमीतल्याच नाही, तर मी सध्या अनुभवत असलेल्या काही गोष्टीही आल्हाददायक वाटत असल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र काळजीत टाकणारे आहेत. फक्त आपल्यालाच नाही, तर संपूर्ण जगाला. कारण त्या बातमीत यंदा जरा लवकरच, म्हणजे १५ मार्चलाच वसंतातली पहिली पालवी अमेरिकेतल्या उत्तर आणि मध्यभागातल्या आडव्या पट्ट्यात अवतरल्याचं निरीक्षण अमेरिकेतल्या ‘क्‍लायमेट सेंट्रल’ या संस्थेने प्रसिद्ध केलं आहे. तसंच कॅलिफोर्निया विभागात पावसाचं प्रमाण गेल्या दहा वर्षांपेक्षा छान झाल्याचाही आढावा आहे. नद्या-नाले वाहू लागले आहेत. पाण्याचं दुर्भिक्ष संपल्यानं जनतेला दिलासा मिळाल्याचं काहींनी लिहिलं आहे, तर काहींनी जुन्या म्हणींचा आधार घेत ‘एप्रिल रेन ब्रिंग्ज फ्लॉवर्स इन मे’ वगैरेही आनंदात लिहिलं आहे. नेटवरून अनेकांनी कौतुकही केलं आहे. हे मीही अनुभवत आहे, कारण मी सध्या कॅलिफोर्नियातच आहे. एका ‘स्प्रिंग रन’ मध्ये मीही गेल्या महिन्यात भाग घेतला होता. मी इथं आहे नोव्हेंबरपासून... आणि खरं सांगू? आजही इथं पाऊस पडतोय...नोव्हेंबरपासून चालू झालेला पाऊस अजून चालूच आहे! कंटाळा आलाय पावसाचा आणि त्यात झाडं मात्र नवीन पालवीनं डवरली आहेत... दिसायला सारं प्रसन्न, छान वाटत आहे; पण हेच तर काळजीचं कारण आहे. कारण पालवीसोबतच फुलं फुलण्याचेही दिवस आधी येतील, असं आता जाणवत आहे. कारण काही ठिकाणी कळ्या धरणं, मोहोर येणं सुरूही झालं आहे. या अवकाळी पावसानं हा येणारा ‘बहर’ ओला होणार, काळा पडणार... कुसून, नासून जाणार...कारण फुलं फुलली तरी त्यांच्यातून फलधारणा होण्यासाठी निसर्गात हे काम करणारे भुंगे, किडे, माशा, फुलपाखरं मात्र अजून कोषातच असणार किंवा तीही पावसानं वाहून गेली असणार! त्यामुळं या ऋतूंच्या चक्रावर आधारित असणारं प्रत्येक झाड-झुडूप काही प्रमाणात त्यांच्या पुनरुत्पादन चक्रापासून वंचित राहणार...याचा दूरगामी परिणाम फारच वाईट होऊ शकतो....पण हे असं का झालं याकडं नीट विचार करून लक्ष द्यायला हवं आहे.
दुसरी बातमीही अशीच. तीही मला माझ्या एका आवडीतूनच मिळाली. मला स्वत:ला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला खूप आवडतं. नुकताच मी कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या सीमेवर असणाऱ्या ‘लेक टाहो’ परिसरात जाऊन आलो. सर्व बाजूंनी हिमाच्छादित डोंगर असणारं ते एक सुंदर सरोवर आहे. तिथं मग स्किइंग, ट्रेकिंग, हायकिंग, शिवाय स्नो-ट्यूबिंग, स्कायडायव्हिंग वगैरे करण्याचीही सोय आहेच. तिथं एक जाहिरात हाती लागली. पर्यटनासंबंधी. बोटीनं पर्यटनाला जायचं. साहसी मोहीम- ‘ॲडव्हेंचर टुरिझम’ असं तिचं नाव. ८२०० फुटांचं गलबत. १३ डेकचं (मजल्यांचं).  ३२ दिवसांचा प्रवास- तोही उत्तर युरोपातून निघून अमेरिकेत न्यूयॉर्कला येण्याचा. गलबताचं नाव ‘क्रिस्टल सेरेनिटी.’ बहुतेक ऑगस्टमधे ही साहसी मोहीम निघेल... गेल्या वर्षीप्रमाणे...त्वरित नावे नोंदवा...वगैरे....

तुम्ही म्हणाल यात काय विशेष?... अहो, याचा मार्ग आर्क्‍टिक प्रदेशातून, उत्तर ध्रुवीय प्रदेशातून, नव्यानं मोकळ्या झालेल्या, बर्फाच्या मागे सरकण्यानं तयार झालेल्या, आर्क्‍टिक सागरामध्ये हिमाची बेटं तयार झालेल्या भागातून जाणार आहे! अमेरिकेचं या प्रदेशावर सागरी मार्गासाठी लक्ष आहेच. कारण, कॅनडाच्या सहकार्यानं या मार्गानं वाहतुकीचा मार्ग मोकळा मिळाला, तर उत्तर आशियाशी तो एक जवळचा थेट संपर्क मार्ग होणार आहे; पण हे शक्‍य होत आहे, त्याचं कारणच आर्क्‍टिक सागराचा हा भाग जो पूर्वी हिमाच्छादित होता, तो आता चक्क बदलतोय आणि त्याचा अटलांटिक महासागर बनतोय.

अलास्काच्या युनिव्हर्सिटीचे इगोर पॉलियाकॉव्ह यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या संशोधनाबद्दल सात एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या ‘सायन्स’ या संशोधनकार्याला वाहिलेल्या नियतकालिकात त्यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे. ध्रुवीय सागराचा काही भाग बदलून अटलांटिक महासागरात सामील होतोय, हे त्यांनीही म्हटलं आहे. याचा अर्थ तिथलं पाणीच बदलत आहे असा होतो...याबाबत त्यांनी म्हटलं आहे, ‘२०१५ हे वर्ष खरं तर या संशोधनास उद्युक्त करणारं ठरलं, कारण नेहमीच्या संशोधनासाठी लावण्यात येणारे तरंगते संवेदक (बॉयू) कुठं लावायचे याचीच मोठी अडचण आली. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. एवढा खराब बर्फ (बर्फानं एकूण व्यापलेल्या जागाच कमी झाल्यानं) कधीच मिळाला नव्हता. हे फक्त वातावरणाच्या तात्कालिक तापमानामुळं नव्हे, तर वर्षभरातल्या वाढीव तापमानामुळं निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या परिणामांचा तो एक परिपाक होता.’ अर्थात हे परिणाम काय ते आपण त्यांच्या शोधनिबंधातून पाहू शकतो. ते थोडक्‍यात असे की, वातावरणाच्या तापमानातल्या वाढीमुळं बर्फ वितळतो, हे जरी खरं असलं, तरी ध्रुवीय प्रदेशातला बर्फ हा काही एकसंध नसतो. तसंच त्याच्या पाण्याच्या गुणधर्मातही फरक असतो. वरचा, उंचीवरचा बर्फ हा गोड्या पाण्याचा, त्याखालचा स्तर खारं समुद्राचं पाणी आणि वातावरणातून पडलेलं हिम यांच्या मिश्रणानं बनलेला, त्याखाली फक्त खाऱ्या पाण्याचा बर्फ, तर त्याखाली थोडा उबदार, महासागराच्या पाण्याचा आतून वाहणारा प्रवाह...तर कधी अतिशीत बर्फाहून थंड असणारं अनियमित प्रसरण झालेलं पाणी...पण या सर्वांतच एकूण तापमानाच्या बदलामुळं अदलबदली होते. म्हणजे वरचा गोड्या पाण्याचा बर्फ वितळून खाऱ्या बर्फात, त्याच्या खालच्या खाऱ्या पाण्यात मिसळतो आणि प्रत्येक स्तरातल्या तापमानात त्या पाण्याच्या विविध घटकांमुळं तापमानात कमी-अधिक बदल होत जातात. या तापमानवाढीमुळं एकूण बर्फाच्छादित परिसराची भराभर हानी होत जाते. या सर्वच स्तरांवर सुमारे दोन अंशांची सरासरी तापमानवाढ (वार्षिक) दिसून आली आहे, हे आता काळजीचं मुख्य कारण आहे. कारण गेल्या वर्षीच्या वातावरणीय तापमानाच्या वाढण्यानं या प्रक्रियांमधल्या बदलांच्या वाढीचा वेग दुप्पटीनं वाढला आहे. त्यामुळंच हे नवे ध्रुवीय सागरी मार्ग खुले होत आहेत, अटलांटिक महासागराशी हे क्षेत्र जोडलं जात आहे...पण तेच आता पर्यटकांचं आकर्षण ठरत आहेत, एवढंच नव्हे, तर या ध्रुवीय प्रदेशात (पूर्वी हा प्रदेश हिमाच्छादित असल्याने) आतपर्यंत पोचता येत नव्हतं. ते आता पोचणं सोपं झाल्यानं तिथल्या खनिजसाठ्यांकडं आता अमेरिका, कॅनडा आणि उत्तर युरोपातल्या या प्रदेशालगतचे इतर सहा देश यांचं लक्ष लागलं आहे. खनिजसाठ्यांच्या उत्पादनासाठी खाणी खोदण्याचंही योजलं जात आहे! त्यातही आता स्पर्धा होणारच- कारण या देशांच्या संघाच्या अध्यक्षपदी (दोन वर्षांसाठी) येत्या महिन्यापासून अमेरिकन अध्यक्ष विराजमान होत आहेत आणि त्यांनी पर्यावरणासंबंधी आधीच अनुदार धोरण जाहीरही केलं आहे, जे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालं आहे...तेही काळजीचं आणखी एक कारण आहेच.

एकूणच २०१६ हे वर्ष पृथ्वीच्या सरासरी तापमानासाठी सारे विक्रम मोडीत काढणारं, कमाल तापमान नोंदवणारं ठरलं आहे. त्यासोबत अनेक गोष्टी निगडित आहेत. एक म्हणजे वातावरणातल्या कार्बन डायऑक्‍साइड वायूचं वाढतं कमाल प्रमाण. त्यामुळं तापमानवाढीचा होणारा ‘हरितगृह’ परिणाम. जंगलाखाली असणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रफळातली घट, एकूण पावसाचं प्रमाण कमी होणं, जमिनीत पाण्याचा स्तर आणखी खाली जाणं, माती धरून ठेवणारी झाडं कमी झाल्यानं येणाऱ्या पावसाच्या पाण्यानं पूर येऊन पाण्यासोबत सुपीक जमीनही वाहून जाणं, हे एका छोट्याशा नगण्य वाटणाऱ्या, म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात १.३ टक्‍क्‍यांनी वाढ होण्यामुळं होते; पण यामागची कारणं काय आहेत, याचा जरा विचार केला, तर त्यानं होणारे पुढचे दुष्परिणाम कदाचित टाळता येतील; पण विचार न करून आता चालणारच नाही... कारण परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत.

माणसाच्या कृतींचे दुष्परिणाम
गेल्या पाच कोटी वर्षांत झाली नाही, एवढी हवामानातली कार्बन डायऑक्‍साइडची पातळी येत्या अर्धशतकात आपण गाठण्याची शक्‍यता आहे. हे चुकून लिहिलेलं नाही किंवा टंकलेखनाचीही चूक नाही, किंवा मुद्दाम केलेली अतिशयोक्ती नाही. हे एका संशोधन प्रकल्पाचंच फलित आहे. हे संशोधन खरं तर ‘एक’ म्हणणं चूक ठरेल. कारण यात अनेक संशोधनांचा, संशोधकांचा, प्रकल्पाचा समावेश आहे. पृथ्वीच्या भूगर्भातल्या, जमिनीच्या विविध स्तरांतल्या पाण्याची पातळी किती याचं विश्‍लेषण करणारे भूगर्भशास्त्रज्ञ, हवामान-रसायनशास्त्रज्ञ, सागरीविज्ञान संस्थांमध्ये जगभरातील नोंदी ठेवणाऱ्या संस्था, अंटार्क्‍टिकाच्या हिमाखाली अडकलेल्या प्राचीन हवेच्या साठ्यांचे विश्‍लेषण करणारी संशोधनं, समुद्रतळातून त्याहीखाली दबलेल्या मातीतले प्राचीन हवामान दाखवणारे नमुने, या सर्वांचं विश्‍लेषण करून त्यातून तयार केलेलं संगणकीय प्रतिमान (सिम्युलेशन) असं दर्शवतं, की पाच कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची जी स्थिती होती, तशी आता परत होण्याची शक्‍यता आहे. फक्त काही हजार वर्षात!...ती नैसर्गिक नाही, तर माणसानं वातावरणात सोडलेल्या कार्बन डायऑक्‍साइड वायूचा हा परिणाम असेल. वेस्लियन युनिव्हर्सिटीच्या डाना रॉयर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. जगातल्या एकूण १५०० जागांवर घेतलेल्या निरीक्षणांच्या आधारे (वर नोंद केलेल्या संस्थांच्या मदतीनं) आणि एकूण ४२ कोटी वर्षांच्या कालावधीचा माग काढणाऱ्या संगणकीय प्रतिमानांतून हा निष्कर्ष काढला गेला आहे. कार्बन डायऑक्‍साइडच्या वायूप्रदूषणानं जे घडायला नैसर्गिकरित्या तीस लाख वर्षं लागली असती, ते निव्वळ एका तपात (बारा वर्षं) घडलं आहे. तेही मानवी वापरातून निर्माण झालेल्या वायू उत्सर्जनानं. हवेतल्या सरासरी कार्बन डायऑक्‍साइडचं प्रमाण २०१७ मध्ये सुमारे ४१० पीपीएम एवढं होईल, अशी शक्‍यता यात वर्तवण्यात आली आहे. हे असंच चालू राहिलं, तर सन २०५०मध्येच पृथ्वीवरच्या ऋतूंच्या चक्रावर मोठा परिणाम होईल. शिवाय हे असंच पुढंही चालू राहिलं, तर  २२००वर्षापर्यंत अत्यंत वाईट स्थिती येईल. ध्रुवीय प्रदेशातल्या आणि पर्वतशिखरांवरच्या बर्फांच्या वितळण्यानं सागराची पातळी सुमारे तेरा फुटांनी वाढेल. याचे सर्वदूर परिणाम होतील. किनाऱ्यावरचा सखल भूभाग सागरात बुडून जाईल. ‘सध्या ज्या दरानं खनिज तेलांचा वापर वाहनांसाठी होत आहे, त्यामुळं हे प्रामुख्यानं होत आहे,’ असं त्या संशोधनात सहभागी असणारे, ‘पॅलिओक्‍लायमेट’ (अतिप्राचीन हवामान) विषयाचा अभ्यास करणारे, रिचर्ड झिबी यांचं मत आहे. ‘‘जमिनीतला कार्बन आपण वातावरणात सोडतोच; पण तो तात्काळ वातावरणातून काढून घेणं मात्र लगेच शक्‍य नाही. वनस्पती जाळून काही क्षणात नष्ट होते, तेव्हा त्यातून प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्‍साइड बाहेर पडतो; पण एक वृक्ष वाढण्यासाठी आणि तिच्यामार्फत हवेतलं हे प्रदूषण काढून टाकण्यासाठी मात्र कित्येक दशकं जावी लागतात. त्या वनस्पतीतून जंगलं तयार झाल्यावरच हे शक्‍य होते,’’  अशीही टिप्पणी त्यांनी यात केली आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत आणि सध्याही पुण्या-मुंबईतच काय, सगळ्या महाराष्ट्रात चालू असणाऱ्या उष्णतेच्या लाटेनं आता हे प्रत्यक्षच जाणवू लागलं आहे. पाहा, फेब्रुवारीपासूनच उकाड्याला सुरवात झाली आहे. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला असला, तरी येणाऱ्या पावसाळ्याचं काय? अजून ग्रीष्माचे दोन महिने, मे आणि जून जायचे आहेत. एक लक्षात घ्या, पन्नास अंशांच्यावर (सेल्सिअस) तापमानाला बटाटेही शिजून नरम पडायला सुरवात होते... आपला मेंदू बटाट्याहून नक्कीच मौल्यवान आहे. डोकं थंड ठेवा... पाऊस उशिरा आला तर? किंवा लवकर येऊन अतिवृष्टी झाली तर? दोनही प्रकार काळजी वाढवणारेच आहेत...

चला, थंड डोक्‍यानं; पण निग्रहाने कामाला लागा. एक झाड, मग ते तुळशीचे असो, नाही तर मनीप्लॅंट असो, आजच लावा. पावसाळा येण्याची वाट पाहण्यात, वेळ घालवण्यात आता अर्थ नाही. तो वेळेवर यावा आणि पुरेसा पडावा हाच तर खटाटोप आता करावा लागणार आहे... तोही जाणीवपूर्वक. ऋतू कोणताही असो, हिवाळा, उन्हाळा की पावसाळा- मनात कायम हिरवागार जिव्हाळा जपा....म्हणजे उजाडणारा उद्याचा दिवस ‘उजाड’ होणार नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com