अफगाणिस्तानातील बामियान

सन २०१४-१५ च्या दरम्यान ‘युनेस्को’साठी बामियानमधील एका वारसाप्रकल्पावर काम करत असताना मी बामियानला अनेकदा भेट दिली.
Afghanistan Bamiyan
Afghanistan BamiyanSakal
Summary

सन २०१४-१५ च्या दरम्यान ‘युनेस्को’साठी बामियानमधील एका वारसाप्रकल्पावर काम करत असताना मी बामियानला अनेकदा भेट दिली.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

सन २०१४-१५ च्या दरम्यान ‘युनेस्को’साठी बामियानमधील एका वारसाप्रकल्पावर काम करत असताना मी बामियानला अनेकदा भेट दिली. बामियानमधील बुद्धमूर्तींचा परिसर, तेथील लेणी, आजूबाजूच्या परिसरातील पुरातत्त्वीय स्थळं प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. प्रसिद्ध ‘रेशीममार्गा’वर असणाऱ्या बामियानच्या या बौद्ध लेण्यांबद्दल या लेखातून जाणून घेऊ या.

दोन हजार वर्षांपूर्वीच्या चिनी राज्य आणि रोमन साम्राज्य यांच्यातील व्यापारासाठी वापरलेला मार्ग ‘रेशीममार्ग’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मार्गावरील व्यापारातील मुख्य वस्तू ‘चिनी रेशीम’ ही असल्यानं या व्यापारी-मार्गाला विसाव्या शतकातील संशोधकांनी ‘रेशीममार्ग’ असं नाव दिलं. चीन, मध्य आशिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, सीरिया इत्यादी देशांतून जाणारा हा व्यापारी-मार्ग होता. या मार्गावरून केवळ व्यापारच होत होता असे नव्हे तर, त्याद्वारे धार्मिक, सांस्कृतिक देवाण-घेवाणही होत असे. या रेशीममार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अफगाणिस्तानचा प्रदेश आहे.

प्राचीन काळातील व्यापारी-मार्गांवरून जाणाऱ्या व्यापारी-तांड्यांसोबत बौद्ध भिक्षूही प्रवास करत असत. त्यांच्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार आशियातील विविध भागांत झाला. बौद्ध धर्माचा प्रसार उत्तर भारतातून गांधारप्रांतात, म्हणजे सध्याच्या उत्तर पाकिस्तानमध्ये, झाला. तिथून पूर्व अफगाणिस्तानातील जलालाबाद, काबूलच्या प्रदेशात बौद्ध धर्म पोचला. त्यानंतर उत्तर अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वताच्या प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. इसवीसनाच्या सुरुवातीच्या तीन शतकांत म्हणजे साधारणपणे १८०० वर्षांपूर्वी जलालाबाद ते काबूल या परिसरात अनेक बौद्ध स्तूप आणि विहार उदयाला आले होते.

व्यापारी-मार्गावरील बामियान

काबूलपासून २५० किलोमीटरवर हिंदुकुश पर्वतात २५०० मीटर उंचीवर बामियान हे गाव वसलेलं आहे. दोन हजार वर्षांपासून बामियान हे ठिकाण पूर्वेला चीन, उत्तरेला बॅक्ट्रिया, आग्नेयेला भारत आणि पश्चिमेला इराण या देशांशी व्यापारी-मार्गानं जोडलं गेलं होतं. त्यामुळे बामियानमधून या विविध प्रदेशांत जाणाऱ्या व्यापारी-मार्गांवर आणि खिंडींवर नियंत्रण ठेवणं बामियानच्या शासकांना सोपं होतं.

बामियानच्या उत्तरेला असलेल्या हिंदुकुश पर्वतातील खिंडींतून प्रवास करण्याआधी व्यापारी-तांड्यांची बामियानमध्ये भोजनाची आणि निवासाची व्यवस्था होऊ शकत होती. त्यामुळे इसवीसनाच्या अंदाजे दुसऱ्या शतकानंतर बामियान या नगराची तिथून जाणाऱ्या व्यापारी-मार्गामुळे भरभराट होऊ लागली. स्थानिक राजांकडून आणि या मार्गावरील व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या दानातून इथं अनेक बौद्ध स्तूप, विहार, लेणी निर्माण झाली. हळूहळू बामियान हे एक बौद्ध स्थळ म्हणून प्रसिद्ध झालं आणि रेशीममार्गावरील व्यापारी आणि भिक्षू इथं येऊ लागले.

बामियानच्या बुद्धमूर्ती

इसवीसनाच्या अंदाजे सहाव्या शतकाच्या शेवटी (आजपासून १४०० वर्षांपूर्वी) बामियान इथं दोन मोठ्या आकाराच्या बुद्धमूर्ती कोरून निर्माण करण्यात आल्या होत्या. बामियानमधील कड्याच्या पूर्वेकडील भागात ३८ मीटर उंच बुद्धमूर्ती आधी कोरून निर्माण केली गेली, त्यानंतर या कड्याच्या पश्चिमेकडील भागात ५५ मीटर उंचीची बुद्धमूर्ती निर्माण केली गेली.

बामियानमधील प्रचंड कड्याच्या दर्शनी भागात केवळ छिन्नी-हातोडा वापरून या बुद्धमूर्ती कोरण्यात आल्या होत्या. या दगडाच्या मूर्तींवर मातीचं लिंपण करून बुद्धमूर्तींच्या वस्त्राच्या चुण्या निर्माण करण्यात आल्या. यानंतर या मूर्तींवर सर्वत्र जिप्समचा गिलावा करून मूर्तींचा पृष्ठभाग गुळगुळीत केला गेला. या जिप्समच्या गिलाव्यावर रंगकाम केलं गेलं. या बुद्धमूर्तींच्या पावलांच्या मागून एक प्रदक्षिणापथदेखील निर्माण करण्यात आला, तसंच या दोन्ही बुद्धमूर्तींच्या डाव्या आणि उजव्या बाजूनं वर जाण्यासाठी जिनेही कोरण्यात आले होते.

बामियानच्या या दोन बुद्धमूर्तींना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याच कड्यात जवळजवळ ७५० लेण्या कोरण्यात आल्या होत्या ही माहिती अनेकांना नसते. या लेण्यांच्या भिंतींवर आणि छतावर गिलावा करून त्यावरही बुद्ध, बोधिसत्त्व, भाविक यांची अनेक चित्रं काढण्यात आलेली होती. बामियान येथील या मूर्ती आणि चित्रांत भारतीय, इराणी, आणि मध्य-आशियाई कलाशैलीचं मिश्रण दिसून येतं.

बामियान इथं कोणताही दानलेख नसल्यानं येथील या बुद्धमूर्ती, ही लेणी निर्माण करणारे दानकर्ते, कलाकार कोण होते याची माहिती आपल्याला मिळत नाही; परंतु प्रचंड आकाराच्या बुद्धमूर्ती निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता, येथील बौद्ध संघानं स्थानिक शासकांकडून राजकीय आणि आर्थिक पाठबळ मिळवलं असणार असा अंदाज लावता येऊ शकतो, तसेच येथील चित्रांतून आणि मूर्तींतून दिसणाऱ्या शैलींवरून या कामासाठी गांधार, बॅक्ट्रिया येथून कारागीर बोलावले गेले असावेत असं लक्षात येतं.

इसवीसन अंदाजे ६३० च्या दरम्यान (आजपासून अंदाजे १३५० वर्षांपूर्वी) चिनी भिक्षू शॉन झांग यांनी बामियानला भेट दिली होती. बामियानमध्ये महासांघिक नावाच्या बौद्ध निकायाच्या लोकोत्तरवादिन या उपनिकायाचे भिक्षू येथे राहत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. बामियानच्या पश्चिम भागात येथील स्थानिक राजाचं नगर असल्याचा, तसंच बामियानमध्ये अनेक बौद्ध विहार बांधलेले असल्याचा उल्लेखही त्यांच्या प्रवासवर्णनात आढळतो.

मुस्लिम आक्रमण

साधारणपणे इसवीसनाच्या आठव्या आणि नवव्या शतकात बामियानच्या परिसरात इस्लामचं हळूहळू आगमन झालं. इसवीसनाच्या आठव्या शतकात बामियानच्या शासकाचं धर्मांतर करण्यात आलं. इसवीसनाच्या नवव्या शतकात बामियान येथे भारतातून (म्हणजे कदाचित गांधारप्रदेशातून किंवा काश्मीरमधून) भाविक येत असल्याची नोंद अरब लेखकांनी केली आहे. येथील बौद्ध लेण्यांतील काही चित्रं इसवीसनाच्या दहाव्या शतकात काढली गेली होती असं नवीन संशोधनातून स्पष्ट झालं आहे. कदाचित या काळात पुन्हा एकदा बौद्ध राजा बामियानमध्ये राज्य करू लागला असावा.

अफगाणिस्तानातील गझनी येथील सुबुक्तीगिन नावाच्या सुलतानानं राज्यविस्तार करताना इसवीसनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी बामियानवर स्वारी केली. सुबुक्तीगिननं बामियानच्या तेव्हाच्या राजाचं धर्मांतर केले. (भारतावर स्वारी करणारा गझनीचा सुलतान महमूद हा याच सुबुक्तीगिनचा मुलगा होता). सुबुक्तीगिनच्या स्वारीच्या आधी किंवा त्यानंतर येथील बौद्ध आचार्य आणि भिक्षू बामियान सोडून कायमचे निघून गेले असावेत. बामियानचं बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून असलेलं महत्त्व यानंतर हळूहळू लयाला गेलं.

यानंतर तीनशे वर्षांनी, मंगोल शासक चेंगिझ खान यानं अफगाणिस्तानवर स्वारी केली, तेव्हा इसवीसन १२२२ मध्ये त्यानं बामियानवर हल्ला केला. बामियानच्या मध्ययुगीन किल्ल्यावरील हल्ल्यादरम्यान चेंगिझ खानाचा नातू ठार झाला. त्यामुळे चिडलेल्या चेंगिझ खानानं बामियानच्या किल्ल्यातील वसाहत पूर्णपणे नष्ट केली. त्या वेळी येथील रहिवासी एकतर मारले गेले किंवा जवळच्या पर्वतामध्ये पळून गेले. त्यामुळे या किल्ल्याचं नाव ‘शहर-ए-घोलघोला’ (म्हणजे ‘किंकाळ्यांचं शहर’) असं पडलं. या घटनेनंतर बामियानचं व्यापारी-मार्गावरचं शहर म्हणून असलेलं महत्त्व संपलं.

या हल्ल्यानंतर मात्र बामियानमधील बौद्ध विहारांची, बुद्धमूर्तींच्या पूजेची स्मृती पूर्णपणे नष्ट झाली. इसवीसनाच्या तेराव्या शतकात बामियानला भेट देण्याऱ्या प्रवाशांना तेथील मूर्तींच्या इतिहासाविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र, त्यांच्या प्रचंड आकारामुळे या मूर्ती ‘एक आश्चर्य’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.

एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानातील या बुद्धमूर्तींची आधुनिक जगाला परत ओळख करून दिली. त्यानंतर बामियान हे अफगाणिस्तानातील महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सन १९६०-७० च्या दरम्यान अनेक परदेशी प्रवासी तुर्कस्तानपासून ते इराक, इराणमधून मोटारीनं प्रवास करत अफगाणिस्तानमध्ये येत असत. त्या वेळी हे परदेशी पर्यटक अफगाणिस्तानातील हेरात, काबूल या शहरांबरोबरच बामियानलासुद्धा भेट देत असत.

सन १९९६ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू झाली. मार्च २००१ मध्ये तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर याच्या आदेशानं बामियान येथील बुद्धमूर्ती नष्ट करण्यात आल्या. छोटी रॉकेट्स आणि रणगाड्यांच्या हल्ल्यानं अनेक दिवस या मूर्ती नष्ट करणं सुरू होतं. या हल्ल्याच्या धक्क्यांमुळे या मूर्तींबरोबरच आजूबाजूच्या लेण्यांमधील मातीचा गिलावा आणि त्यावरील चित्रं खाली पडून नष्ट झाली.

आता वीस वर्षांनी अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे एकेकाळी विविध संस्कृतींनी समृद्ध असणाऱ्या अफगाणिस्तानातील या बामियान लेण्यांचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी आहे.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com