
साधारणपणे दीड हजार वर्षापूर्वीपासून आग्नेय आशियातील केवळ कम्बोडियातच नव्हे तर; व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी विविध प्राचीन राज्यांत भारतीय संस्कृतीचा, कलेचा आणि स्थापत्याचा; विशेषकरून हिंदू आणि बौद्ध या धर्मांचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
कम्बोडियातील प्राचीन हिंदू-मंदिरं आणि मूर्ती
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
साधारणपणे दीड हजार वर्षापूर्वीपासून आग्नेय आशियातील केवळ कम्बोडियातच नव्हे तर; व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी विविध प्राचीन राज्यांत भारतीय संस्कृतीचा, कलेचा आणि स्थापत्याचा; विशेषकरून हिंदू आणि बौद्ध या धर्मांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. हा प्रभाव तिथला धर्म आणि धार्मिक संकल्पना, मंदिरस्थापत्य, शिव, विष्णू, गणेश इत्यादी देवी-देवतांच्या मूर्ती, संस्कृत भाषेचा आणि ब्राह्मी लिपीचा वापर, व्यक्तींची नावं, गावांची नावं इत्यादी स्वरूपांतून दिसून येतो. व्यक्तींची आणि गावांची नावं यांचा तिथल्या स्थानिक भाषेमुळे काहीसा अपभ्रंश झालेला असला तरी त्यांचं मूळ स्वरूप ओळखता येतं.
उदाहरणार्थ : थायलंडमधील ‘आयुथाया’ हे राजधानीचं नाव ‘अयोध्या’ या नावाचा थाई उच्चारामुळे झालेला अपभ्रंश आहे.
कम्बोडियातील अठराशे वर्षांपूर्वीच्या फुनान आणि झेनला या प्राचीन राज्यांविषयीची माहिती आपण मागील लेखात पाहिली होती. या दोन राज्यांच्या काळातील काही हिंदू-मंदिरं आणि मूर्तींसंदर्भात या लेखातून जाणून घेऊ या.
फ्नोम दा इथली वैष्णव मूर्ती
किमान सोळाशे वर्षांपूर्वीपासून दक्षिण कम्बोडियातील बंदरांतून भारताबरोबर व्यापार सुरू होता. या व्यापारीसंबंधांबरोबरच भारताचे कम्बोडियाशी सांस्कृतिक संबंधदेखील प्रस्थापित होत होते. यामुळे भारतीय धर्म आणि सांस्कृतिक संकल्पना कम्बोडियात पोहोचण्यास मदत झाली.
दक्षिण कम्बोडियातील प्राचीन फुनान राज्याची एक राजधानी तिथल्या सध्याच्या अंकोरबोरेई नावाच्या ठिकाणी होती. अंकोरबोरेई इथं कम्बोडियातील प्राचीन ख्मेर भाषेतील शिलालेख, मंदिरं आणि हिंदू-देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत.
अंकोरबोरेई येथील फ्नोम दा नावाच्या टेकडीवर एका छोटेखानी लेण्याचे अवशेष सापडले होते. या लेण्यात आणि टेकडीवर, तसंच आसपासच्या भागात सापडलेल्या हिंदू-देवतांच्या काही मूर्ती भारताच्या त्या प्रदेशातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतात.
फ्नोम दा इथल्या या लेण्यात ‘गोवर्धन गिरिधारी’ कृष्णाची एक मूर्ती अभ्यासकांना आढळून आली होती. अंदाजे सहाव्या किंवा सातव्या शतकात, म्हणजे, आजपासून किमान १३०० वर्षांपूर्वी, निर्माण केलेली ही कृष्णाची मूर्ती कम्बोडियातील सुरुवातीच्या प्राचीन मूर्तींपैकी एक महत्त्वाची मूर्ती आहे.
ओठांवर स्मितहास्य असलेली, कमरेत किंचित वाकलेली, गोवर्धन पर्वत तोलून धरण्यासाठी डावा हात वर करून उभी असलेली अशी ही ‘गोवर्धन गिरिधारी’ कृष्णाची मूर्ती आहे. कमरेला नेसलेल्या वस्त्राच्या चुण्या या मूर्तीत दाखवण्यात आलेल्या आहेत. कृष्णाची ही दगडी मूर्ती जवळजवळ सहा फूट उंचीची आहे, तर या मूर्तीचं वजन ४२२ किलो आहे. या मूर्तीच्या चेहरेपट्टीवरून, शरीरयष्टीवरून, तसंच वस्त्र नेसण्याच्या पद्धतीनुसार, या मूर्तीवर भारतातील १५०० वर्षांपूर्वीच्या गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींचा प्रभाव आहे, असं अभ्यासकांचं मत आहे.
दक्षिण कम्बोडियातील फ्नोम दा या टेकडीवर वरील ‘गोवर्धन गिरिधारी’च्या मूर्तीखेरीज दुसरी ‘गोवर्धन गिरिधारी’ कृष्णाची मूर्ती, राम, हरिहर इत्यादी विष्णूच्या विविध रूपांतील सात मूर्ती सापडल्या. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील इथला राजा रुद्रवर्मन यानं या मूर्तींची स्थापना केल्याचा उल्लेख, इथंच सापडलेल्या इसवीसनाच्या बाराव्या शतकातील (म्हणजे आजपासून आठशे वर्षांपूर्वीच्या) एका शिलालेखात आहे. या मूर्ती घडवण्याच्या शैलीवरूनदेखील या मूर्ती इसवीसनाच्या सहाव्या किंवा सातव्या शतकात घडवल्या गेल्या होत्या असं लक्षात येतं. यावरून चौदाशे वर्षांपूर्वी दक्षिण कम्बोडियाच्या फ्नोम दा या भागात वैष्णवांचा किती प्रभाव होता हे समजतं.
फ्नोम दा इथल्या या मूर्तींच्या कोरीव कामावर तत्कालीन भारतातील गुप्तकाळातील शिल्पांच्या शैलीचा प्रभाव आहे. नंतर हा भारतीय प्रभाव कमी होऊन, प्राचीन कम्बोडियातील मूर्तिकार स्वतंत्रपणे ख्मेर शैलीच्या मूर्ती घडवू लागले. असं असलं तरी कम्बोडियाच्या कला-इतिहासात फ्नोम दा इथल्या या मूर्तींचं स्थान अजोड आहे.
सांबोर प्रेई कुक इथली मंदिरं
कम्बोडियातील सध्याचं सांबोर प्रेई कुक म्हणजे तिथल्या झेनला या दुसऱ्या प्राचीन राज्याच्या राजधानीचं ईशानपूर हे ठिकाण असावं असं काही अभ्यासकांचं मत आहे. झेनला राज्याचा राजा ईशानवर्मन यानं हे राजधानीचं शहर वसवलं होतं. ‘सांबोर प्रेई कुक’ या नावाचा कम्बोडियातील ख्मेर भाषेत ढोबळमानानं अर्थ ‘जंगलातील मंदिरं’ असा होतो. आज जंगलात असलेलं राजधानीचं हे शहर आजपासून अंदाजे १४०० ते १३०० वर्षांपूर्वी गजबजतं होतं.
सांबोर प्रेई कुक इथं मंदिरांचे काही समूह आढळून आले आहेत. तिथले मंदिरसमूह आणि विखुरलेली मंदिरं मिळून इथं विटांनी बांधलेली कमीत कमी १३० मंदिरं होती. केवळ गाभारा आणि त्यावरील शिखर असं साधं स्वरूप या मंदिरांचं होतं. वैशिष्ट्य म्हणजे, सांबोर प्रेई कुक इथली काही मंदिरं अष्टकोनी गाभाऱ्याचीदेखील आहेत.
सांबोर प्रेई कुक इथल्या काही मंदिरांतील दरवाज्यांच्या चौकटीवर संस्कृत आणि स्थानिक ख्मेर भाषेत कोरलेले लेखही आढळून आले आहेत. या शिलालेखांतून या मंदिरांच्या इतिहासावर काहीसा प्रकाश पडतो. ही प्राचीन मंदिरं विटांनी बांधलेली आहेत. मात्र, त्यांतील दरवाज्याची चौकट, मूर्ती ज्या चौथऱ्यावर उभी केली जाते ते पादपीठ, मूर्ती आणि मंदिरांतील खांब दगडी आहेत.
सांबोर प्रेई कुक इथल्या काही मंदिरांमध्ये शिवलिंग स्थापन केलेलं होतं, तर काही मंदिरं विष्णूची होती. इथल्या काही मंदिरांमध्ये हरिहराची मूर्तीही आढळून आली आहे. हरिहर म्हणजे एकाच मूर्तीत अर्धी मूर्ती शंकराची आणि अर्धी मूर्ती विष्णूची दाखवलेली असते. या मूर्तीमध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांना एकत्र पूजता येतं.
कम्बोडियातील या सुरुवातीच्या हिंदू-मंदिरांच्या आणि मूर्तींच्या उदाहरणांवरून, १४०० वर्षांपूर्वी भारतीय धर्म, कला, स्थापत्य आणि संस्कृती यांचा प्रभाव दूरवरच्या कम्बोडियामध्ये कसा पडला होता हे लक्षात येतं. अंकोरबोरेई आणि त्यानंतरच्या सांबोर प्रेई कुक या दोन राजधान्यांमधील धार्मिक परंपरांचा, मंदिरस्थापत्याचा आणि शिल्पांचा प्रभाव कम्बोडियात अंकोर या परिसरातील त्यानंतर स्थापन झालेल्या प्रसिद्ध ख्मेर राज्यावर पडला.
इसवीसन ८०२ मध्ये जयवर्मन (दुसरा) या राजानं कम्बोडियातील महेंद्रपर्वतावर, म्हणजे सध्याच्या अंकोरजवळील फ्नोम कुलेन नावाच्या पर्वतावर, स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. या घटनेनं कंबोडियातील प्रसिद्ध अंकोरपरिसरातील ख्मेर राज्याचा पाया घातला गेला. फ्नोम कुलेन या नावानं सध्या ओळखल्या जाणाऱ्या कम्बोडियातील पर्वताचं प्राचीन नाव महेंद्रपर्वत होतं, हीदेखील लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
जयवर्मन (दुसरा) याच्यानंतर, कम्बोडियातील अंकोरच्या परिसरात इंद्रवर्मन, उदयादित्यवर्मन, सूर्यवर्मन इत्यादी राजांनी, आपल्या राजधान्या स्थापन केल्या आणि त्याचबरोबर बांते श्राय, अंकोरवाट यांच्यासारखी शिवाची आणि विष्णूची प्रसिद्ध मंदिरंही बांधली. ही पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर अंकोरपरिसरातील काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध मंदिरांबद्दलची माहिती आपण पुढील लेखांमधून घेणार आहोत.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
Web Title: Anand Kanitkar Writes Cambodia Gowardhan Giridhari Krishna Idol
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..