इंडोनेशियातील प्रंबानन मंदिरसमूह

इंडोनेशियात अनेक प्राचीन हिंदू-मंदिरं, मूर्ती सापडल्या आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या मंदिरांपैकी प्रंबानन इथल्या मंदिरसमूहाची माहिती या लेखात घेऊ या.
इंडोनेशियातील प्रंबानन मंदिरसमूह
Summary

इंडोनेशियात अनेक प्राचीन हिंदू-मंदिरं, मूर्ती सापडल्या आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या मंदिरांपैकी प्रंबानन इथल्या मंदिरसमूहाची माहिती या लेखात घेऊ या.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

इंडोनेशियात अनेक प्राचीन हिंदू-मंदिरं, मूर्ती सापडल्या आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या मंदिरांपैकी प्रंबानन इथल्या मंदिरसमूहाची माहिती या लेखात घेऊ या.

गेल्या लेखात पाहिल्यानुसार, पश्चिमेकडे भारत आणि पूर्वेकडे चीन यांच्याशी सोळाशे वर्षांपूर्वीपासून सुरू झालेल्या समुद्री व्यापाराचा फायदा प्राचीन इंडोनेशियातील विविध राज्यांना झाला. आग्नेय आशियात उदयाला आलेल्या या विविध राज्यांवर चिनी प्रभावापेक्षा भारतीय धार्मिक आणि राजकीय संकल्पनांचा प्रभाव होता.

इंडोनेशियातील सध्याच्या सुमात्रा या बेटाच्या दक्षिण भागात अंदाजे अकराशे वर्षांपूर्वी श्रीविजयसाम्राज्य होतं, तर त्याच सुमारास शेजारील जावा नावाच्या बेटावर शैलेंद्र आणि संजय घराण्याच्या राजांची प्रमुख राज्ये होती. या दोन घराण्यांतील राजांचे काही मोजकेच शिलालेख आहेत, त्यामुळे या दोन्ही घराण्यांतील सर्व राजांची, तसंच त्यांच्या कार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही; परंतु या घराण्यांच्या काळातील अनेक हिंदू-मंदिरं, बौद्ध-मंदिरं आणि स्तूप इंडोनेशियातील जावा बेटावर आढळतात.

प्रंबानन इथली मंदिरं

जावा बेटावर असलेल्या प्रंबानन या गावाजवळील प्रसिद्ध मंदिरसमूह हा ‘प्रंबानन-मंदिरसमूह’ या नावानं ओळखला जातो. इथल्या शिवभक्त असणाऱ्या संजय घराण्यातील राजा पिकातान याच्या राज्यकालात अकराशे वर्षांपूर्वी या प्रसिद्ध मंदिरसमूहाच्या निर्मितीला सुरुवात झाली. पिकाताननंतरच्या काही राजांनीदेखील या मंदिरसमूहात इतर मंदिरांची भर घातली. पिकाताननंतरच्या राजाच्या काळातील एका शिलालेखात या मंदिराला शिवगृह असं म्हटलं आहे.

इंडोनेशियातील स्थानिक भाषेत मंदिराला ‘चंडी’ असं म्हणतात. त्यानुसार, या मंदिराचं नावदेखील ‘चंडी प्रंबानन’ असं आहे. या मंदिरसमूहात थोडीथोडकी नव्हे तर, लहान-मोठी २४० मंदिरं आहेत. या मंदिरसमूहाच्या मध्यभागी ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांची तीन मोठी पूर्वाभिमुख मंदिरं आहेत.

या तीन मंदिरांपैकी मध्यभागी जवळजवळ ४७ मीटर उंच शिवमंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवमूर्ती आहे, तर गाभाऱ्याच्या तिन्ही बाजूंना असलेल्या खोल्यांमध्ये गणेश, दुर्गा आणि अगस्ती ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील ही दुर्गा महिषासुरमर्दिनीची मूर्ती उल्लेखनीय आहे.

महिषावर उभ्या असलेल्या या अष्टभुजा देवीनं हातात शंख-चक्र-ढाल-तलवार-धनुष्य आणि बाण घेतलेले आहेत.सर्वात खालच्या डाव्या हातानं देवीनं महिषासुराच्या डोक्यावरचे केस धरलेले आहेत. सर्वात खालच्या उजव्या हातात तिनं महिषाची शेपटी धरलेली आहे. मुकुट, कर्णभूषणं, गळ्यातील विविध हार, कंबरपट्टा इत्यादी आभूषणांनी मढलेली ही देवीची मूर्ती आहे.

या दुर्गेच्या मूर्तीस स्थानिक लोक ‘रोरो जोंग्रांग’ या नावानं ओळखतात. या मंदिरसमूहातील २४० मंदिरांच्या निर्मितीबद्दलच्या आख्यायिकेत रोरो जोंग्रांगचं नाव येतं. रोरो जोंग्रांगशी लग्न करू इच्छिणाऱ्या राजपुत्राला तिनं एका रात्रीत एक हजार मंदिरं बांधण्याची अट घातली होती; परंतु सकाळी कोंबडा लवकर आरवल्यानं राजपुत्राचं शेवटचं, हजारावं मंदिर बांधून पूर्ण होत नाही. अट पूर्ण न झाल्यानं त्या दोघांचं लग्न होणं शक्य नसतं. मात्र, कोंबडा आरवण्यामागं रोरो जोंग्रांगचा हात आहे हे समजल्यावर तो राजपुत्र चिडतो आणि तो रोरो जोंग्रांगचं दगडी मूर्तीत रूपांतर करून शेवटच्या निर्माण होण्याऱ्या मंदिरात तिची मूर्ती उभी करतो. अशी रोरो जोंग्रांगची म्हणजेच शिवमंदिरातील वर उल्लेख केलेल्या दुर्गेच्या सुंदर मूर्तीबद्दलची आणि इथल्या २४० मंदिरांच्या निर्मितीबद्दलची आख्यायिका इंडोनेशियात प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेमुळे हे प्रंबानन इथलं मुख्य शिवमंदिर ‘रोरो जोंग्रांग मंदिर’ म्हणूनही ओळखलं जातं.

या शिवमंदिराच्या दोन्ही बाजूंना ब्रह्मा आणि विष्णूची अंदाजे ३३ मीटर उंच मंदिरं आहेत. या मंदिरांतील गाभाऱ्यात ब्रह्मा आणि विष्णूची उभी मूर्ती आहे. या दोन्ही मंदिरांसमोरदेखील दोन लहान मंदिरं आहेत, ज्यांना गरुडमंदिर आणि हंसमंदिर म्हणून अनेकदा संबोधलं जातं. मात्र, या दोन्ही मंदिरांमध्ये कोणतीही मूर्ती नसल्यानं ही नक्की विष्णू आणि ब्रह्मा यांचं वाहन असलेल्या गरुड आणि हंस यांची मंदिरं होती का याबद्दल निश्चित सांगता येत नाही. शिवमंदिराच्या समोरील लहान मंदिरामध्ये मात्र पाषाणाचा नंदी आहे.

रामायण शिल्पपट्ट

प्रंबानन इथली ही मंदिरं भारतीय पद्धतीप्रमाणे जगतीवर (म्हणजे जोत्यावर) आहेत. या जगतीवर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. या जगतीवर चारही बाजूंनी नक्षीकाम केलेला कठडा आहे. या कठड्यावर बाहेरील बाजूनं घट, वृक्ष, मकर, सिंह, इत्यादी भारतीय चिन्हं कोरलेली आहेत. शिवाय, नर्तिका आणि वादक यांच्या मूर्तीदेखील कोरलेल्या आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या या मंदिरांच्या जगतीवरील कठड्याच्या आतील बाजूला राम आणि कृष्ण यांच्याशी संबंधित अनेक कथांचे शिल्पपट्ट कोरलेले आहेत.

शिव आणि ब्रह्मा यांच्या मंदिरांच्या कठड्यांवर रामायणाशी संबंधित ५४ शिल्पपट्ट कोरलेले आहेत. रामायणातील विविध प्रसंग म्हणजे सीताहरण, राम-रावणयुद्ध, सीतेची सुटका, सीतेचा त्याग ते रामाला पटलेली लव-कुशाची ओळख इथपर्यंतचा कथाभाग या ५४ शिल्पपट्टांतून दर्शवलेला आहे.

इथल्या विष्णुमंदिराच्या कठड्यांवर कृष्णजीवनातील कथा दर्शवणारे जवळजवळ ३० शिल्पपट्ट कोरलेले आहेत. या मंदिरांच्या मुख्य गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा करत असताना आपल्या डाव्या बाजूच्या कठड्यावर हे शिल्पपट्ट दृष्टीस पडतात.

प्रंबानन मंदिरसमूहाच्या या मुख्य भागात या सहा मंदिरांबरोबरच इतर दहा छोटेखानी मंदिरं आहेत. या मुख्य भागाच्या बाहेर चारही दिशांना चार ओळींत एकूण २२४ मंदिरं उभारलेली होती. हा मंदिरसमूह तुलनेनं ज्वालामुखीच्या जवळ असल्यानं कदाचित भूकंपाच्या धक्क्यांनी ही छोटेखानी मंदिरं पडली असावीत. त्यातील मोजकीच मंदिरं उदाहरणादाखल पुन्हा उभी केलेली असल्यानं यांपैकी अनेक मंदिरांच्या जागी घडीव दगडांचे ढीग अजूनही दिसतात. कदाचित भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक कारणांमुळे इथल्या संजय घराण्याची या भागातील राजधानी दूर गेल्यामुळे अंदाजे एक हजार वर्षांपूर्वीपासूनच प्रंबानन इथला हा मंदिरसमूह विस्मृतीत जाऊ लागला होता.

स्थानिकांमध्ये या मंदिराची रोरो जोंग्रांगच्या आख्यायिकेच्या स्वरूपातून ओळख राहिली होतीच...परंतु २८० वर्षांपूर्वी एका युरोपीय अधिकाऱ्यानं या सुंदर मंदिरसमूहाची पाश्चात्य जगाला पुन्हा ओळख करून दिली. त्यानंतर हळूहळू या मंदिरसमूहातील काही मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात आली. आता इंडोनेशियामध्ये येणारे,पर्यटक या मंदिरसमूहाला आवर्जून भेट देतात. अशा या प्रंबानन मंदिरसमूहाला ‘इंडोनेशियातील अभिजात शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना’ म्हणून ‘युनेस्को’नं १९९१ सालीच जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. प्राचीन इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्याच्या विस्ताराची आणि जावा बेटावरील महत्त्वाच्या बौद्ध स्थळाची माहिती पुढील लेखांत...

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com