लाओस देशातील श्रीभद्रेश्वर

व्हिएतनाम, कम्बोडिया या देशांच्या शेजारी असलेल्या सध्याच्या ‘लाओस पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ या देशातदेखील भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही दिसून येतात.
Shri Bhadreshwar
Shri BhadreshwarSakal
Summary

व्हिएतनाम, कम्बोडिया या देशांच्या शेजारी असलेल्या सध्याच्या ‘लाओस पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ या देशातदेखील भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही दिसून येतात.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

व्हिएतनाम, कम्बोडिया या देशांच्या शेजारी असलेल्या सध्याच्या ‘लाओस पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ या देशातदेखील भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही दिसून येतात. लाओसमधील महत्त्वाच्या भद्रेश्वर शिवमंदिराबद्दल आणि तेथील कुरुक्षेत्र नावाच्या तीर्थाबद्दल या लेखातून जाणून घेऊ या.

लाओस देशाच्या दक्षिण भागात प्राचीन काळातच म्हणजे, अंदाजे दीड हजार वर्षांपूर्वी, भारतीय धर्म आणि संस्कृती पोहोचली होती. दक्षिण लाओसमधील चंपासक नावाच्या प्रांतातील सध्याच्या ‘वाट फु’ नावाच्या मंदिराच्या परिसरात येथील प्राचीन भारतीय खुणा आढळून येतात.

लाओसमधील स्थानिक भाषेत ‘वाट’ म्हणजे मंदिर आणि ‘फु’ म्हणजे पर्वत किंवा डोंगर. चंपासक प्रांतातील ‘फु खाओ’ असं सध्याचं नाव असलेला पर्वत प्राचीन काळी श्रीलिंगपर्वत आणि लिंगाद्री या नावानं ओळखला जात होता असं तेथील प्राचीन संस्कृत शिलालेखांतून समजतं.

या लिंगपर्वतापासून जवळच मेकोंग नावाची नदी वाहते. पश्चिमेला असणाऱ्या लिंगपर्वताच्या पायथ्यापासून ते पूर्वेला असणाऱ्या मेकोंग नदीपर्यंतच्या दीड किलोमीटरच्या परिसरात एका अक्षात येथे प्राचीन काळात मंदिरं, तलाव आणि काही वास्तू उभारलेल्या होत्या. याच परिसरात डोंगरावर ‘वाट फु’ नावाचं प्रसिद्ध मंदिर आहे. हे एक शिवमंदिर होतं आणि या मंदिरातील शिवलिंगाचं नाव भद्रेश्वर होतं हे तेथील शिलालेखांवरून लक्षात येतं.

वर उल्लेख केलेल्या फु खाओ या पर्वताच्या एका उंच शिखरावर शिवलिंगाच्या आकाराचा सुळका आहे. त्यावरून या पर्वताला ‘लिंगपर्वत’ हे नाव मिळालं. या पर्वताच्या शिखरावर एका मंदिराच्या अवशेषांमध्ये कोरीव शिवलिंग आढळून आलं आहे. या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका गावी सापडलेल्या दीड हजार वर्षांपूर्वीच्या एका खंडित शिलालेखात ‘भगवान श्रीलिंगपर्वत’ असा उल्लेख केलेला आहे. तो या शिखरावरील मंदिरातील शिवलिंगाचा असावा.

कुरुक्षेत्र तीर्थ

या भद्रेश्वर शिवस्थानाशी संबंधित विविध शिलालेखांतून याचं प्राचीन काळी असलेलं महत्त्व लक्षात येतं. वाट फु मंदिराच्या परिसरातील अवशेषांमध्ये देवानीक नावाच्या राजाचा संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेला महत्त्वाचा शिलालेख सापडला आहे. या शिलालेखातील अक्षरांच्या लेखनशैलीवरून हा शिलालेख अंदाजे इसवीसन ४५० ते इसवीसन ५०० वर्ष या काळात म्हणजे, आजपासून दीड हजार वर्षांपूर्वी, लिहिला गेला होता असं फ्रेंच अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे. या राजाचा उल्लेख शिलालेखात ‘महाराजाधिराज श्रीमान श्री देवानीक’ असा केला आहे.

या देवानीक राजानं वाट फु मंदिराच्या परिसरात ‘कुरुक्षेत्र’ नावाचं महातीर्थ निर्माण केलं होतं हे नमूद करणारा हा शिलालेख आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमन करून या शिलालेखात म्हटलं आहे की, या कुरुक्षेत्र तीर्थात स्नान केल्यानं हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर वाजपेय यज्ञ केल्यासमान, तसंच लक्ष गाईंचं दान केल्यासमान पुण्य मिळतं. या शिलालेखात देवानीक राजाची तुलना धर्मराज युधिष्ठिराबरोबर आणि अर्जुनाबरोबर केली आहे.

महाभारतातील व्यक्तींचा, ठिकाणांचा उल्लेख असणारा आग्नेय आशियातील हा सर्वात जुना शिलालेख आहे. म्हणजे, आजपासून किमान १५५० वर्षांपूर्वी भारतापासून दूर असणाऱ्या लाओस देशातील प्राचीन राज्यात महाभारत हा ग्रंथ पोहोचला होता. या काळात उत्तर भारतात गुप्त राजघराण्याची सत्ता होती. भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतून अजूनही उभी असलेली भारतातील सर्वात प्राचीन शिवमंदिरं आणि विष्णुमंदिरं ही गुप्त राजवंशाच्या काळातील आहेत.

दुर्दैवानं देवानीक राजाच्या या शिलालेखातील या ठिकाणाचा उल्लेख असलेला शब्द आता पुसट झाला आहे. त्यामुळे वाट फु मंदिर असलेल्या या ठिकाणाचं तत्कालीन नाव कोणतं होतं हे समजत नाही; परंतु येथील नंतरच्या काळातील अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखातून या ठिकाणाशी संबंधित ‘लिंगपूर’ गावाचा उल्लेख येतो, तसंच येथील वाट फु या मंदिरातील शिवलिंगाचं नाव ‘श्रीभद्रेश्वर’ होतं हेदेखील प्राचीन शिलालेखांतून समजतं.

वाट फु येथील हे नंतरच्या काळातील दान दिल्याचे शिलालेख कम्बोडियातील ख्मेर वंशातील राजांचे आहेत. दक्षिण लाओसमधील या प्रदेशात ख्मेर राजांनी वर्चस्व निर्माण केलं होतं. भद्रेश्वरमंदिर असलेला हा प्रदेश लाओस आणि कम्बोडियामधील सध्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळ आहे हे यासंदर्भात लक्षात घेतलं पाहिजे.

श्रीभद्रेश्वर साधारणपणे इसवीसनाचं सातवं शतक ते बारावं शतक या काळात कम्बोडियातील ख्मेर राजांनी वाट फु परिसरात विविध वास्तू उभारल्या आणि दानं दिली. याचं कारण म्हणजे, कम्बोडियातील ख्मेर राजांसाठी येथील लिंगपर्वत आणि भद्रेश्वर शिवाचं हे मंदिर अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं होते. कम्बोडियातील तेराशे वर्षांपूर्वी राज्य करणाऱ्या जयवर्मन राजानं भद्रेश्वर मंदिराला दानं दिली होती. लिंगपर्वत ही देवाची जमीन असल्याचं मानलं जात असल्यानं तेथील प्राण्यांना मारण्यास बंदी घातली होती. यावरून या लिंगपर्वताचं पावित्र्य आणि स्थानमाहात्म्य ख्मेर राजांसाठी किती महत्त्वाचं होतं ते लक्षात येतं. अगदी आठशे वर्षांपूर्वीपर्यंत कम्बोडियातील हर्षवर्मन, त्रिभुवनादित्यवर्मन इत्यादी ख्मेर राजांनी या ठिकाणी दानं दिलेली आहेत. आठशे वर्षांपूर्वीच्या एका शिलालेखात उल्लेख केल्यानुसार, श्रीभद्रेश्वराच्या कृपेनं कम्बोडियातील ख्मेर राजांनी आपल्या विविध शत्रूंवर आणि शेजारील राज्यांवर विजय मिळवला होता.

वाट फु येथे डोंगराच्या मध्यभागी साधारणतः एक हजार वर्षांपूर्वी ख्मेर शैलीत निर्माण केलेलं भद्रेश्वराचं पूर्वाभिमुख मंदिर आहे. मुख्य चौकोनी गाभारा आणि त्यासमोर दगडी मंडप असं या मंदिराचं स्वरूप आहे. मंडपाच्या दरवाज्याच्या बाहेरील बाजूस ख्मेर शैलीप्रमाणे द्वारपाल आणि स्त्रीदेवता कोरलेल्या आहेत. अंदाजे सहाशे वर्षांपूर्वी लाओसमध्ये झालेल्या बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर या मंदिरात बुद्धमूर्ती स्थापन केलेली दिसून येते.

या डोंगरावर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या होत्या. या मंदिराच्या समोरच नदीपर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ताही केलेला होता. डोंगराच्या पायथ्याशी काही तलाव, तसंच इतर वास्तूही होत्या. शेकडो वर्षांपूर्वी ख्मेर राजांनी निर्माण केलेल्या या वास्तू आता ढासळणाऱ्या अवस्थेत उभ्या आहेत.

भद्रेश्वराच्या मंदिरापासून जवळच कातळात पाच मुखांची आणि दहा हात असलेली कम्बोडियातील ख्मेर शैलीतील उभी सदाशिवमूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती अंदाजे नऊशे वर्षांपूर्वी कोरलेली असावी. त्या मूर्तीच्या पायांशी एका बाजूला ब्रह्मा, तर दुसऱ्या बाजूला बैठी विष्णुमूर्ती आहे. या सदाशिवमूर्तीत तीन मुखं दिसतात आणि वर चौथं मुख दिसतं. ही कातळात कोरलेली अर्धउठावातील मूर्ती असल्यानं मागील पाचवं मुख कोरलेलं नाही. ख्मेर राजांच्या काळातील (अंदाजे आठशे वर्षांपूर्वीच्या) ब्राँझच्या पंचमुखी आणि दशभुजा असलेल्या अशा पद्धतीच्या सदाशिवमूर्ती कम्बोडियात सापडल्या आहेत, हे यासंदर्भात लक्षात घेतलं पाहिजे.

या सध्याच्या वाट फु किंवा प्राचीन भद्रेश्वरमंदिराच्या डोंगरात एक खोदलेली छोटेखानी गुहादेखील सापडली आहे. या गुहेतील भिंतीवरील शिलालेखानुसार, ‘वक्त्रशिव’ नावाच्या माणसानं ही ‘वक्त्रगुहा’नामक गुहा शैव साधूंना तपःसाधना करण्यासाठी निर्माण केली होती. या गुहेतील शिलालेखात या डोंगराचं नाव ‘भद्रेश्वरशैल’ असं नमूद केलेलं आहे.

प्रत्येक राजघराण्याचं त्यांच्यावर कृपादृष्टी असणाऱ्या पवित्र आणि महत्त्वाच्या देवतेचं मंदिर असतं. आताच्या लाओसमधील लिंगपर्वताच्या छायेखाली असणारं भद्रेश्वराचं मंदिर, तेथील कुरुक्षेत्र तीर्थ, तपःसाधना करण्यासाठी कोरलेली वक्त्रगुहा आणि शेकडो वर्षं कम्बोडियातील ख्मेर राजांनी श्रीभद्रेश्वराला दिलेली दानं यावरून ख्मेर राजांसाठी असलेलं या शैवस्थानाचं महत्त्व लक्षात येतं. या विविध कारणांनी ‘युनेस्को’नं सन २००१ मध्ये या परिसराला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केलं आहे.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com