‘शहरी नक्षलवाद’ संज्ञा ही सत्ताधाऱ्यांची क्‍लृप्ती

Anand Teltumbade
Anand Teltumbade

प्रश्न  : तुमच्या घराची झडती घेण्यात आली. माओवाद्यांशी तुमचा पत्रव्यवहार झाल्याचा आणि त्यांनीच केलेल्या आर्थिक मदतीने तुम्ही परदेशात गेल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.
उत्तर  : आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी परदेशात मला बोलावले जाते. त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. माओवाद्यांबरोबर माझा कुठलाही पत्रव्यवहार नाही. मुळात माओवादी असा पत्रव्यवहार करतील का? पोलिसांचे आरोप धादान्त खोटे आहेत, हेच यातून स्पष्ट होते. मी माओवादीसमर्थक नाही. उलट मला कोणताच वाद पूर्ण मान्य नाही. आधार किंवा पुरावे नाहीत अशा गोष्टीच्या संशयावरून पोलिस लोकांना त्रास देऊ शकतात, असा आपल्याकडे कायदा आहे. ही प्रक्रिया हाच मोठा जाच आहे, तिथे कायद्याच्या न्यायाविषयी काय बोलणार? एक व्यक्ती म्हणून बचावासाठीचा काही मार्ग उरत नाही.

तुमच्यावरही शहरी नक्षलवादाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. शहरी नक्षलवाद हा काय प्रकार आहे?
: केंद्रात व राज्यात सत्तेत असणारे उजव्या विचारसरणीचे लोक खूप क्रिएटिव्ह आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना काही तरी ओळख दिली पाहिजे, यासाठी त्यांनी ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्द शोधलाय. सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका करणाऱ्यांच्या बदनामीसाठी जाणीवपूर्वक ही ओळख देण्याचा प्रयत्न आहे. विरोधी मत असणाऱ्यांना त्यांना ‘समज’ द्यायची असते. 

आदिवासी भागात विनायक सेन, सुधा भारद्वाज त्यागभावनेने काम करतायत. लोकांमध्ये काम करणाऱ्यांना त्रास दिल्याने ते बोलायचे बंद होतील, असा त्यांचा समज दिसतो. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा पण मी लिहीत होतो, या पुढेही लिहीत राहीन. तुमच्या अंत:प्रेरणेतून निघालेला आवाज चिरडण्यासाठी ‘शहरी नक्षलवादी’ या आयुधाचा वापर केला जात आहे .

एल्गार परिषदेचा सरकारने खूपच धसका घेतल्याचे वाटते का? या परिषदेचा हेतू काय होता?  
: हिंदुत्ववादी शक्तींच्या वाढत्या ब्राह्मण्यशाहीवर एल्गार परिषदेने जोरदार प्रहार चढवला. हिंदुत्ववादी शक्तींशी दोन हात करण्याचा निर्धार कौतुकास्पदच आहे; पण मिथक आणि अस्मितेच्या पलीकडे जाऊन या आव्हानाला सामोरे जायला हवे. तरीदेखील ‘एल्गार परिषद’ ही हिंदुत्ववादाला थेट आव्हान देणारी होती. कारण दलित व मराठा समाजातील अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन यानिमित्ताने झाले. 

कोरेगाव भीमा दंगल ही दलित-मराठा संघर्ष घडविण्यासाठी आखलेला कट होता, असा आरोप केला जातो... 
: त्या घटनेचे अनेक पदर आहेत. एल्गार परिषदेचा याच्याशी संबंध नाही. नवपेशवाईच्या विरोधातील संघर्षासाठी ही परिषद होती. पण सरकारने त्याला एक विशिष्ट रंग दिला. दुसऱ्या दिवशीची दंगल कोणी घडवली? दलित ज्या ठिकाणी श्रद्धेच्या भावनेने जमा होतात, तिथे दलित दंगल घडवतील की दुसरे घडवतील? दलितांचे दंगलीत मोठे नुकसान झाले; मग ही दंगल दलित कसे घडवून आणतील? त्याच वेळी भिडे आणि एकबोटे यांचा काही तरी ‘प्लॅन’ सुरू असल्याची चर्चा होती. हे जर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळू शकते, तर पोलिसांना याची कल्पना नसेल? त्यांच्या गुप्तचर विभागाला माहिती पाहिजे. कोरेगाव भीमाची दंगल ही घडवून आणलेली होती. या कटाचा दुसरा भाग म्हणजे मराठा विरुद्ध दलित संघर्ष उभा करणे. पण दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या गावातल्या लोकांनी समेट केला. स्थानिकांचा दंगलीत सहभाग नव्हता. दुसऱ्या बाजूला एल्गार परिषदेच्या संयोजकांमध्ये मराठा संघटना होत्या. त्यांनी ‘बंद’लाही पाठिंबा दिला. त्यामुळे काहींना अभिप्रेत असलेला संघर्ष झाला नाही. ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी झाल्याने सर्वसामान्यांच्या भावनाही स्पष्ट झाल्या. ही सरकारला चपराक होती. कोरेगाव भीमाचे प्रकरण माओवादाशी जोडण्यामागे बरेच हेतू आहेत. एकबोटे-भिडे यांच्याविरुद्ध कारवाईला कलाटणी देता येते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाच्या संदर्भात ‘सनातन’कडे संशयाची सुई असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मागणीची दिशा बदलते; तसेच दलितांचा रोष माओवादाच्या विरुद्ध जोडून परिस्थिती शिथिल करता येते. त्यामुळे हे कुभांड पोलिसांकरवी रचले गेले आहे. 

लोकशाहीत निवडणुकीच्या माध्यमातूनच याचे उत्तर शोधले जाऊ शकते; पण सध्या तशी परिस्थिती आहे का? 
: संघाच्या किंवा भाजपच्या विरोधात ज्या स्तरावर विरोधाची चळवळ उभी राहिली पाहिजे ती राहत नाही. भाजपने, संघाने ध्रुवीकरण करून आपला ‘मतदारसंघ’ तयार केलेला आहे. तो घट्ट आहे. त्यांची मोदीभक्ती ढळणार नाही. मोदीभक्त आणि विरोधक यांची संख्या सारखीच आहे. मधले जे लोक आहेत, त्यांनी आपले मत बनवलेले नाही, असे ४५ ते ५० टक्के लोक आहेत. त्यांना आपल्या बाजूने ओढण्याचे भाजपचे ‘टार्गेट’ आहे. 

भाजपकडे एक चेहरा आहे; तर विरोधकांकडे चेहरा नाही. अशा परिस्थितीत कशी लढाई उभी राहणार? 
: काँग्रेसने स्वत: श्रेष्ठ असल्याच्या भ्रामक कल्पनेतून (मॅंग्लामॅनिया) बाहेर यायला हवे. काँग्रेसला मान्य करावे लागेल, की भाजपला मिळालेल्या ३१ टक्‍क्‍यांव्यतिरिक्त इतर मतांवर केवळ काँग्रेसचा नव्हे तर इतर सर्व विरोधकांचा हिस्सा आहे. त्यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी नेतृत्व करण्याबरोबरच थोडे नमते घ्यावे लागेल. 

२०१९च्या निवडणुकीकडे रणांगण म्हणून पाहिले जातेय...
ः सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भक्कम फळी उभारली नाही, तर २०१९ ची निवडणूक ही देशात सौहार्द आणि शांतता असण्याची ही शेवटची निवडणूक असेल. यापूर्वीही भारत गरीब, हलाखीतला देश होता; पण आपली मूल्ये निराळी होती. विविधता हे देशाचे वैशिष्ट्य होते. ती प्रत्येकाने आत्मसात केली होती. पण आता मतभेदांसह सौहार्द असण्याचे दिवस संपतील. याचा धर्माशी काही संबंध नाही. फॅसिस्ट मुसोलिनीप्रमाणे ‘हम करे सो कायदा’ या दिशेने आपण चाललो आहोत. 

तुम्ही स्वत: कुठला ईझम मानता? 
: मला कुठलाच वाद मान्य नाही. जे वाद होते ते आधी कामाचे होते, आता त्यांचा उपयोग नाही; मग तो आंबेडकरवाद असो वा मार्क्‍सवाद. कारण इतिहासाचा वेग पूर्वी खूप संथ होता. परिस्थितीत शंभर वर्षे फरक घडत नव्हता. आता मात्र एका वर्षातच खूप  गोष्टी घडतात. 

भविष्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी आंबेडकरवाद किंवा गांधीवादाचे गृहीतक आता लागू होणार नाही. बाबासाहेबांचे योगदान, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असणे या गोष्टी वेगळ्या; पण त्याचा ‘वाद’ करणे योग्य नाही. जे बदल आता वेगाने होताहेत, त्याला तुम्ही या वादांत बांधून ठेवू शकत नाहीत. साध्या मोबाईलने आज जे काही घडवले, त्याचा यापूर्वी कधी विचार केला नव्हता. मी जिथे काम करतो त्या ‘बिग डेटा’ने जग बदलले. जग जसं होतं, तसं आता राहिलेले नाही. उदाहरणार्थ- आंबेडकरवादाचा विचार करू. दलितांची परिस्थिती पाहून १९२० ते १९५६ च्या काळात डॉ. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीतून जो विचार दिला, त्याला आपण आंबेडकरवाद म्हणतो. दलितांची परिस्थिती तेव्हा जशी होती, तशी आता राहिलेली नाही. सर्व मापदंड बदललेत. त्या वादाचा आता आपण कसा उपयोग करून घेणार आहोत? गांधीवाद किंवा आंबेडकरवादापेक्षा मार्क्‍सवादातील काही थिअरी मला मान्य होतात. त्यामध्ये एक वैज्ञानिक धाटणी आहे, ती मला पटते. इतिहासाच्या बदलाचे मार्क्‍सवादाचे सूत्र आहे. त्याने वर्ग संकल्पित केले, तेही मला मान्य आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com