नुसती गोळाबेरीज काय साधणार?

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सत्तापक्ष ऊर्फ भाजपची बाजू अनेक पातळीवर वरचढ आहे. साधनसंपत्तीची रेलचेल, सुसंघटित पक्षसंघटना, आक्रमक नेतृत्व या भाजपच्या प्रमुख जमेच्या बाजू आहेत. याउलट विरोधी पक्ष विखुरलेले व विस्कळित आहेत. अनेक समंजस नेते विरोधी पक्षात असले तरी त्यांच्यात एकवाक्‍यतेचा अभाव आहे. त्यामुळे या विषम सामन्याचा निर्णय काय लागेल याचे अनुमान आताच बांधणे अवघड ठरेल. कॉंग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांना गळती लागली आहे.

काँग्रेसवर केवळ भाजपला पर्याय देण्याची जबाबदारी नाही, तर या देशात बहुपक्षीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे आव्हान या पक्षाला स्वीकारावे लागणार आहे. ते पेलण्याची ताकद या पक्षात आहे का? या पक्षाचे वर्तमान नेतृत्व त्या जबाबदारीचे भान ठेवणारे आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे कॉंग्रेस पक्षाकडून समाधानकारकरीत्या मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपविरोधी राजकीय आघाडी हे दिवास्वप्न अथवा मृगजळ ठरणार आहे. 

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांनी भाजपला मात दिली, त्याला कॉंग्रेसच्या बरोबरीने विविध राज्यांमध्ये भाजपच्या विरोधातील लहानमोठ्या शक्तींचे एकीकरण होण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याचा वाटाही मोठा आहे. ती प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळेच भाजपविरोधी पक्षांचा कणा किंवा ध्रुव म्हणून कॉंग्रेस पक्षावर जी जबाबदारी येत आहे तिचे महत्त्व आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व त्या जबाबदारीची जाणीव ठेवते काय हा खरा प्रश्‍न आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विश्‍वासघाती कृत्यानंतर त्यांच्या पक्षात बंडखोरी होणे अपेक्षितच होते. शरद यादव यांची तशीही या पक्षात घुसमट होतच होती. त्यांनी या वेळी भाजपविरोधी भूमिका घेणे पसंत केले आणि नितीशकुमार यांची री ओढण्याचे नाकारले. त्यांच्याबरोबर संयुक्त जनता दलाबाहेर किती लोक पडतील, ही संख्या किती असेल या गोष्टी तूर्तास गौण आहेत. सध्या शरद यादव विरोधी पक्षांच्या भाजपविरोधी आघाडीचे पुरस्कर्ते म्हणून पुढे येताना आढळतात. त्यांनी गेल्या आठवड्यात देशाची विविधतेतील एकतेची संकल्पना जतन करण्यासाठी बोलाविलेली विरोधी पक्षांची परिषद यशस्वी ठरली. त्यात 17 विरोधी पक्ष सामील झाले होते. "विरोधी पक्ष मुक्त' भारताची कल्पना साकार करण्यासाठी सरसावलेल्या भाजप व या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या या दंडेलीच्या पुरस्काराला अटकाव करण्यासाठी एवढे पक्ष एकत्र येतात ही लक्षणीय बाब मानावी लागेल. काहीशी आश्‍चर्याची बाब म्हणजे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लावलेली हजेरी ही होती. लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असल्याने विविध मुद्‌द्‌यांवर विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला. यातले किती पक्ष लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील आणि किती भाजपच्या दडपशाहीला बळी पडतील हे पाहावे लागेल. 

सत्तापक्ष ऊर्फ भाजपची बाजू अनेक पातळीवर वरचढ आहे. साधनसंपत्तीची रेलचेल, सुसंघटित पक्षसंघटना, आक्रमक नेतृत्व या भाजपच्या प्रमुख जमेच्या बाजू आहेत. याउलट विरोधी पक्ष विखुरलेले व विस्कळित आहेत. अनेक समंजस नेते विरोधी पक्षात असले तरी त्यांच्यात एकवाक्‍यतेचा अभाव आहे. त्यामुळे या विषम सामन्याचा निर्णय काय लागेल याचे अनुमान आताच बांधणे अवघड ठरेल. कॉंग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांना गळती लागली आहे. सत्तापक्षातर्फे कधी लालूच व आमिषे दाखवून अन्यथा तपास संस्थांचा ससेमिरा लावण्याचा धाक या दोन शस्त्रांचा वापर चालू आहे. त्यामुळे गळती रोखायची कशी हादेखील सर्व विरोधी पक्षांसमोरचा यक्षप्रश्‍न आहे. विशेषतः कॉंग्रेसला गळतीने ग्रासले आहे. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने कॉंग्रेस पक्षापुढील अडचणी मोठ्या आहेत. कॉंग्रेसला भाजपशी विविध आघाड्यांवर लढावे लागणार आहे.

भाजपबरोबर कॉंग्रेसला सर्वप्रथम नेतृत्वाच्या आघाडीवर आव्हान आहे. व्यक्तींचे नाव घेऊन याचे विश्‍लेषण करायचे झाल्यास नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व तूर्तास तरी निर्विवाद आहे. याउलट राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रस्थापित होताना आढळत नाही. सदैव आणि अखंड राजकारण हा त्यांचा ध्यास आहे. याउलट राहुल गांधी हे अजूनही अर्धवेळ राजकारणी आहेत. हा कॉंग्रेस नेतृत्वाचा सर्वांत मोठा कच्चा दुवा आहे. राजकारणात सातत्य लागते आणि विशेषतः विरोधात असताना सतत जनतेसमोर राहणे आणि सत्तापक्षाचे कच्चे दुवे जनतेसमोर चव्हाट्यावर मांडण्याचे काम करायचे असते. राहुल गांधी हे कोणत्याच घटनात्मक पदावर नाहीत. त्यामुळे तर त्यांना सतत जनतेबरोबर राहणे अधिक अनिवार्य! डावपेचांच्या बाबतीत कॉंग्रेस पक्ष अद्याप कमजोर आहे. राहुल गांधी यांच्या मोटारीवर गुजरातमध्ये हल्ला झाला. याचा राजकीय लाभ कॉंग्रेसला उठविताच आला नाही. उलट भाजपने संसदेचा वापर करून राहुल गांधी सुरक्षा कवच तोडून नियमभंग करतात हे चव्हाट्यावर आणले. त्यामुळे नेतृत्व व रणनीती तसेच डावपेचांच्या आघाडीवर कॉंग्रेस पक्ष अजूनही दुर्बळ आहे. पक्ष-प्रतिमा, नेतृत्वाची प्रतिमा हादेखील राजकारणात एक मोठा घटक मानला जातो आणि तेथेही मोदी व भाजप हे आघाडीवर आहेत. नंतरचा प्रमुख घटक आहे तो सुसंघटित, सुसज्ज पक्षसंघटना हा! कॉंग्रेस आणि संघटना हा विरोधाभासच आहे. 

कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता तोपर्यंत पक्षसंघटनेला दुय्यम स्थान व महत्त्व असायचे. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने कॉंग्रेसची संघटना कमजोर व खिळखिळी होत गेली. कोणाही पंतप्रधान व अध्यक्षाने संघटनेच्या बांधणीचे महत्त्वच लक्षात घेतले नाही. सूर्य-चंद्र असेपर्यंत सत्तेत राहणार असल्याच्या भ्रामक समजुतीमुळे कॉंग्रेस नेतृत्वाने संघटनेचे महत्त्व राखले नाही. आज या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर अडचणींचा जो डोंगर उभा आहे, त्यामध्ये नेते म्हणून राहुल गांधी यांना जसा दोष दिला जातो, तेवढाच दोष आधीच्या कॉंग्रेस नेतृत्वाला पक्षसंघटना कमजोर व दुबळी करण्यासाठी द्यावा लागेल. याच्याच जोडीला जनतेत व जनमानसांत पक्षाबद्दल विश्‍वासार्हता निर्माण करण्याची बाबही महत्त्वाची असते. साठ वर्षांचे ओझे डोक्‍यावर असल्याने कॉंग्रेसला ते अवघड होताना आढळते. यावर कॉंग्रेसला मात करता येईल त्यादिवशी कॉंग्रेसच्या जीर्णोद्धारास सुरवात होईल. अन्यथा एकट्या कॉंग्रेसमध्ये भाजपचा मुकाबला करण्याची शक्ती राहिलेली नाही. त्यासाठी एक व्यापक व समविचारी आघाडी हाच पर्याय ठरेल. तसेच कॉंग्रेसला स्वतःबद्दलचा अहंकारही कमी करावा लागेल आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी मोठे मनही दाखवावे लागेल, तरच भाजपला पर्याय उभा करणे शक्‍य होणार आहे. 

Web Title: Anant Bagaitekar writes about Congress and other parties