तेरे सामने आसमाँ और भी है...

डॉ. यशवंत थोरात
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मी त्या मुलांना म्हणालो ः ‘‘तुम्हाला रागावण्याचा अधिकार आहे. मात्र एक लक्षात ठेवा, की रागामध्ये एक शक्ती असते. ती चुकीच्या दिशेला गेली, तर तिचं रूपांतर केवळ भावनिक अतिरेकात होईल; पण रागाला योग्य वळण दिलंत, तर तोच राग विधायक बदलाच्या दृष्टीनं अतिशय ताकदीचं असं साधन ठरेल.’’

मी त्या मुलांना म्हणालो ः ‘‘तुम्हाला रागावण्याचा अधिकार आहे. मात्र एक लक्षात ठेवा, की रागामध्ये एक शक्ती असते. ती चुकीच्या दिशेला गेली, तर तिचं रूपांतर केवळ भावनिक अतिरेकात होईल; पण रागाला योग्य वळण दिलंत, तर तोच राग विधायक बदलाच्या दृष्टीनं अतिशय ताकदीचं असं साधन ठरेल.’’

नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं होतं. कॉलेजांना नुकतीच सुरवात होत होती. आर्टस, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या शाखांमधल्या विद्यार्थ्यांशी मी गप्पा मारत होतो. ते सगळे शेवटच्या वर्षातले विद्यार्थी होते आणि कॉलेज व विद्यापीठाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय करायचं याविषयी त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल होतं.

मी त्यांना म्हणालो ः ‘सर्वसाधारणपणे एखाद्यानं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे त्या शिक्षणातून त्याला किमान दोन गोष्टी मिळाल्या असतील, असं गृहीत धरलं जातं. एक म्हणजे, त्याला जीवनाकडून काय अपेक्षित आहे, याची काहीएक कल्पना त्याच्या मनात तयार होते आणि दुसरं म्हणजे, जे हवं ते साध्य करण्यासाठी काय करायला हवं, याची जाणीव त्याला झालेली असते. त्यानं घेतलेल्या शिक्षणातून या गोष्टी किमान सैद्धान्तिक पातळीवर त्याला समजल्या असतील, असं मानलं जातं.’

यावर मुलं मला म्हणाली ः ‘आम्ही कुठला व्यवसाय करू, याबद्दल आम्हाला निश्‍चित काही सांगता येणार नाही; पण एक गोष्ट नक्की, की आम्हाला यश, पैसा आणि पूर्वी जगलो त्यापेक्षा चांगलं जीवन हवं आहे.’ त्यांच्यापैकी बहुतेक जण अतिशय सामान्य कुटुंबांमध्ये जन्मले होते आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा अडचणी, कष्ट आणि आई-वडिलांचा त्याग यांच्या सोबतीनंच झाला होता. ते आता त्यांच्या आयुष्याच्या प्रवेशद्वारावर उभे होते आणि ही स्थिती बदलण्यासाठी कमालीचे उत्सुक होते.

त्यांना आता चांगलं घर, गाडी आणि चैनीच्या वस्तूंबरोबरच समाजात एक ओळखही हवी होती. त्यापैकी काही जण नागरी सेवांमध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते, तर काही जण उद्योग किंवा आर्थिक क्षेत्रात संधी शोधत होते. बऱ्याच जणांना वेगवेगळे व्यवसाय करायचे होते; तर काहींना शेतीमध्ये रस होता. एक गोष्ट मात्र त्यांच्यात समान होती व ती म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अधिक चांगलं, उच्च स्तरावरचं जीवन हवं होतं. त्यांना अधिक चांगलं जगायचं होतं.

मी जीवनात यशस्वी झालो आहे, असं त्यांना खात्रीनं वाटतंय, तसा त्यांचा विश्‍वास आहे; त्यामुळं यशस्वी जीवनाचा हा फॉर्म्युला मी त्यांना सांगावा, असं त्यांचं म्हणणं होतं.

‘‘मी यशस्वी झालोय असं तुम्हाला का वाटतं?’’ मी त्यांना विचारलं. ‘‘यशस्वी नाहीतर काय? तुमच्या अवतीभवतीच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही अयशस्वी ठरल्याच्या निदर्शक आहेत की काय? ही काही अपयशाची बिरुदं नक्कीच नाहीत,’’ ते ठामपणे म्हणाले.
मग मी थोडा वेगळाच युक्तिवाद केला. ‘‘या सगळ्या गोष्टी समजा असल्या तरी त्यामुळं मी सुखी आहे का?’’ मी त्यांना प्रश्‍न केला.
पण ती मुलं काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. ‘‘आम्हाला तुम्ही तत्त्वज्ञान नका सांगू... फक्त या सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या तेवढंच सांगा. त्यामुळं आम्ही सुखी होणार की नाही, याची तुम्ही नका काळजी करू; तो आमचा प्रश्‍न आहे,’’ ते एका सुरात म्हणाले.
त्यांचं एका अर्थानं बरोबरच होतं. संपत्तीच्या हव्यासाच्या संदर्भात प्रवचन देणारा मी असा कोण लागून गेलो होतो? आणि शेवटी एखाद्यानं आपलं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला तर ते चूक थोडंच होतं? चांगल्या गोष्टी हव्याशा वाटणं हे अनैतिक कसं म्हणता येईल?
‘‘हे बघा, यशासाठी कुठलाही शॉर्टकट असू शकत नाही,’’ मी गंभीरपणे सांगायचा प्रयत्न केला; पण त्यावर ‘‘असं कोण म्हणतो?’’ असा त्यांचा प्रतिप्रश्‍न होता. ‘‘जे लोक कायदा वाकवतात किंवा मोडतात ते श्रीमंत कसे होतात? त्यांना प्रतिष्ठा कशी मिळते? आणि दुसऱ्या बाजूला जे नेहमी कायद्यानं वागतात ते नेहमीच मागे कसे पडतात?’’ त्यांचा सवाल बिनतोड होता.

‘‘तसं काही वेळा घडलंही असेलही...’’ मी थोडं नरमाईच्या सुरात म्हणालो ः ‘‘पण साधनं आणि पद्धती शेवटी महत्त्वाची असतेच. चुकीच्या आणि अनैतिक मार्गानं मिळवलेल्या संपत्तीला जीवनात फारसं महत्त्व मिळत नाही.’’
‘‘तुम्ही कुठल्या जगात जगत आहात?’’ मुलं उपहासानं म्हणाली. त्यातला भावूक डोळ्यांचा एक मुलगा गंभीरपणे म्हणाला ः ‘‘सर, जर तुमचा जन्म रस्त्यावरच्या एखाद्या झोपडपट्टीत झाला असता आणि तुम्ही हे सगळं मिळवलं असतंत, तर मग तेव्हाही तुम्ही असंच बोलला असतात का?’’
त्याचा प्रश्‍न अगदी सरळ आणि प्रामाणिक होता. मी जर वेगळ्या परिस्थितीत जन्मलो असतो, तर मी असंच बोललो असतो का, हा विचार माझ्यासाठी नवा होता. मात्र, त्या भावुक मुलाचे डोळे मला वेगळंच काही सांगत होते. ‘‘सर, तुम्ही नक्कीच असं म्हणाला नसता. तुम्ही जर माझ्यासारखे झोपडपट्टीत जन्मला असतात तर तुम्हीसुद्धा ‘शक्‍य तेवढी जास्तीत जास्त संपत्ती लवकरात लवकर मिळवा; साधनांची आणि मार्गाची अजिबात चिंता करू नका,’ असंच आम्हाला सांगितलं असतं. आज प्रत्येक जण तेच तर करतोय...’’ त्याचे डोळे मला सांगत होते.

तरुणांची ही एक नवीन बाजू आता समोर येत आहे. ज्या समाजात ते जन्मले आहेत, त्या समाजाविषयी त्यांच्या मनात स्पष्टपणे राग आहे. लोकांच्या दुटप्पी वागण्याचा त्यांना आता कंटाळा आलाय; त्याचबरोबर पालक, शिक्षक आणि राजकारण्यांच्या उपदेशाचाही त्यांना उबग आलाय. त्यांना जे उपदेशाचे डोस पाजले जातात, त्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात लोक वेगळंच वागतात हे त्यांना पदोपदी दिसतं आणि त्यामुळं त्यांचा संताप होतो. सगळ्याच नेत्यांचे पाय मातीचे असतात, याचा पदोपदी प्रत्यय आल्यामुळं निर्माण झालेल्या नैराश्‍यातून त्यांचा हा अनावर संताप निर्माण झाला आहे. ढोंगी आणि दांभिक जीवन जगण्यापेक्षा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग चोखाळण्याची त्यांची तयारी आहे. हे त्यांचं तत्त्वज्ञान आहे. क्‍लेशदायक असलं तरी प्रामाणिक!
मी त्यांच्याशी प्रतिवाद करत होतो; पण ते मला म्हणाले ः ‘‘सर, डोळे उघडून पाहा आणि मग आम्हाला खरं खरं सांगा की, आम्ही योग्य मार्गाचा अवलंब करून जीवनाची शर्यत हरावी की बुद्धीचा वापर करून आणि पकडले जाणार नाही याची काळजी घेऊन इतर सर्व जण जातात त्याच मार्गानं जाऊन जीवनातली शर्यत जिंकावी?’’

मी अडखळलो. त्यांच्याशी बोलायला माझ्याकडं शब्द नव्हते. याबाबतीत शास्त्रांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. ‘प्रत्यक्ष एवं प्रमाणम्‌’ म्हणजे ‘तुम्ही जे अनुभवता तेच सत्य आहे.’ इथं ती मुलं जे म्हणत होती तेच सत्य होतं, अशी स्थिती असताना त्यांना पटेल असं मी काय सांगू शकणार होतो?
एक पिढी म्हणून आपण अयशस्वी ठरलो, याचं दुःख माझ्या चेहऱ्यावर उमटलं. एक नवा, सहिष्णू आणि समता असलेला भारत निर्माण करण्याच्या इराद्यानं आम्ही सुरवात केली होती; पण आम्ही तसा भारत घडवण्यात अपयशी ठरलो. मी अपराधी मुद्रेनं त्यांच्याकडं पाहायला लागलो आणि माझ्या मनाची अवघडलेली स्थिती त्यांना माझ्या डोळ्यांत दिसली. आम्ही आमचं जीवन सुखानं जगलो; पण आम्ही त्यांच्या डोळ्यातून त्यांची स्वप्नं चोरली. अनेक सामान्य स्त्री-पुरुषांमधलं मोठेपण पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. कुठलंही दडपण किंवा मोह यांची पर्वा न करता हे लोक त्यांच्या तत्त्वानुसार जगलेले आम्ही पाहिले; पण जेव्हा आमची वेळ आली तेव्हा व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यात आम्हाला अपयश आलं. आम्ही एक आशावादी जगाचा भाग होतो; पण विख्यात कवी टी. एस. इलियट म्हणाला त्याप्रमाणे, ‘आम्ही जीवन जगलो, पण त्यातला आत्माच हरवून बसलो’ आणि आता मी आणि ती मुलं एकमेकांसमोर उभे होतो. आमच्या भविष्याची वारसदार असलेली ती मुलं फैज अहमद फैजच्या शब्दांत मला आक्रोशून सांगत होती ः

ये दाग दाग उजाला, ये शबगजीदा सहर
वो इंतजार था जिस का, ये वो सहर तो नही

‘हा प्रकाश अंधारात मिसळलेला आहे. हा सूर्योदय सूर्यास्तात लपेटलेला आहे.
ज्या पहाटेची आम्ही वाट पाहत होतो, ती पहाट ही नक्कीच नव्हे.’
आपण जे केलं त्याचा आपल्याला पश्‍चात्ताप होईल आणि आपण ते सुधारू शकू? की आता फार उशीर झाला आहे, असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. त्याच क्षणी मला असं वाटलं, की हा क्षण मी जर दवडला आणि त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही तर मग मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. त्यांनी अनुभवलेल्या त्यांच्यासभोवतीच्या वास्तवाकडं डोळेझाक करून मी त्यांच्याशी उच्च मूल्य आणि आदर्श याविषयीच बोलत राहिलो, तर मी त्यांच्यापासून कायमचा दूर जाईन, अशी भीती मला वाटली. तलवारीच्या पात्यावरून चालल्यासारखी माझी अवस्था झाली होती. मला त्यांच्या अवतीभवतीच्या वास्तवाशी सुसंगत असाच सल्ला त्यांना द्यायचा होता; पण त्याच वेळी ‘तुम्ही स्वार्थाच्या पलीकडं असलेल्या उच्च मूल्यांचा विचार केला नाहीत, तर तुमचा हा प्रवास अर्थहीन असल्याचं तुम्हाला शेवटी जाणवेल,’ हेही मला त्यांना समजावून द्यायचं होतं.

आता सत्य बोलण्याशिवाय माझ्यापुढं दुसरा पर्याय नव्हता. शब्दांची अतिशय काळजीपूर्वक निवड करत मी त्यांना म्हणालो ः ‘‘तुम्ही जे सांगता ते खरं आहे, हे मी नाकारू शकत नाही. तुम्हाला दिला जाणारा उपदेश आणि सभोवतालचं वास्तव यातलं अंतर दिवसागणिक वाढत जात आहे.
त्यामुळं तुम्हाला रागावण्याचा अधिकार आहे. मात्र, एक लक्षात ठेवा, की रागामध्ये एक शक्ती असते. ती चुकीच्या दिशेला गेली तर तिचं रूपांतर केवळ भावनिक अतिरेकात होईल; पण रागाला योग्य वळण दिलंत तर तोच राग विधायक बदलाच्या दृष्टीनं अतिशय ताकदीचं असं साधन ठरेल. २० व्या शतकाच्या प्रारंभी आपण पारतंत्र्यात होतो. त्या वेळच्या तरुणांची स्थितीही तुमच्यासारखी होती. त्यांचे वाडवडील स्वातंत्र्याच्या गप्पा मारत होते; पण गुलामगिरी कवटाळत होते. आपल्या देशाच्या ऐतिहासिक परंपरेचा त्यांना अभिमान होता; पण ते इंग्लिश साहेबापुढं झुकत होते. ते खूप चिडलेले होते आणि आपला विश्‍वासघात झालाय, असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी काय केलं ? गुलाम म्हणून राहणंच आपल्यासाठी योग्य आहे, हे त्यांनी मान्य केलं का? होय. काही जणांनी ते स्वीकारलं; पण इतर अनेकांनी आपल्या मनातल्या संतापाला योग्य दिशा दिली. त्यांनी आपल्या सुखाचा त्याग केला; प्राणांचं बलिदान दिलं. ते ब्रिटिशांशी लढले. त्यांनी दीर्घकाळ तुरुंगवास भोगला. तुरुंगातल्या हाल-अपेष्टा सहन केल्या; पण अखेर त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दाखवलं. ‘ब्रिटिश साम्राज्यावरही सूर्य मावळतो, मावळू शकतो,’ हे त्यांनी सिद्ध केलं. त्या वेळच्या समाजावरच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा मार्ग त्यांनी निवडला. स्वतः सगळा त्रास सहन करून ते त्या मार्गावर ठाम राहिले. माझ्या पिढीला स्वातंत्र्य वारसाहक्कानं मिळाले. आम्ही ते मिळवलं नाही; त्यामुळं आम्ही अनेक गोष्टी गृहीत धरल्या. आम्ही पथभ्रष्ट झालो आणि वेळोवेळी अनेक तडजोडी केल्या. आपल्या सार्वजनिक जीवनात प्रत्येक ठिकाणी माजलेल्या भ्रष्टाचाराचं हेही एक कारण असू शकेल. या चौरस्त्यावर आता तुम्ही उभे आहात आणि कुठला मार्ग निवडायचा हे तुम्हाला ठरवायचंय...आमच्याकडं बोट दाखवून तुम्ही अप्रामाणिकपणाचा मार्ग निवडू शकता किंवा ‘तुम्ही हे आता थांबवा. आता खूप झालं; या पुढं हे चालणार नाही,’ असंही निर्धारानं म्हणू शकता. तुमचा मार्ग तुम्हालाच निवडायचा आहे. वाटेल त्या मार्गानं झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग तुमच्यासमोर आहेच. तुमची तीच इच्छा असेल, तर त्या मार्गावरून पुढं जा. नाहीतर मग हा समाज पुन्हा उभा करण्याच्या कठीण मार्गाची निवड करा. तुमच्यासाठी आणि जे तुमच्यामागं येतील त्यांच्यासाठी तुम्ही काय करावं, हे मी तुम्हाला सांगणार नाही; पण योग्य काय आणि अयोग्य काय याची निवड तुम्हालाच करायची आहे...’’ एवढं बोलून मी तिथून निघालो.

‘‘सर थांबा !’’ ती मुलं म्हणाली ः ‘‘आम्हाला उपदेश करून तुम्ही असे निघून जाऊ शकत नाही. तुमची चूक झाली हे तुम्हाला मान्य असेल, तर मग आता परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला मदत करा. खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर उभे राहा. समाजातल्या दोषांविरुद्ध लढण्यात आम्हाला मदत करा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत आमच्याबरोबर सहभागी व्हा. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा भारत निर्माण करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा...’’ त्यांच्याकडं मागं वळून बघितलं आणि एका जुन्या कवितेच्या ओळी मला अचानक आठवल्या ः

मंझिल मिले या ना मिले, मुझे इस का गम नही
मंझिल की जुस्तजू मे मेरा कारवाँ तो है

‘आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू की नाही हे मला माहीत नाही, त्याचं काही वाटतही नाही; पण आपण ध्येयप्राप्तीसाठी योग्य मार्गावरून जात आहोत, हे अधिक महत्त्वाचं!’

Web Title: And also your face sky