बदलांची 'नांदी' (अनीश प्रभुणे)

अनीश प्रभुणे prabhune.aneesh@gmail.com
रविवार, 1 एप्रिल 2018

एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती मार्मिक भाष्य करते.

एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती मार्मिक भाष्य करते.

साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य आणि चित्रकला किंवा खरं तर कोणताही कलाप्रकार हा माणसाच्या अंतर्मनाचा उद्‌गार असतो. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये कलाप्रकारांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच बहुधा, कलाकारांकडं समाज कायमच एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. कलाकाराकडून असलेल्या अपेक्षा आणि कलाकाराचे स्वतःबद्दल असलेले समज यांमध्ये कायमच तफावत असते. कदाचित कलाकाराचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य यांमध्ये असणारी ही दरी हीच एखाद्याच्या आयुष्यातील नाट्यमयता.

अशी कल्पना करा, की सध्याच्या काळात, सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळं खासगी आणि सामाजिक आयुष्य यांमधल्या रेषा पुसत होत चाललीये, अशा काळात "न्यूयॉर्क फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा'सारख्या प्रतिष्ठित वाद्यवृंदाला या रेषांमधला फरक लक्षातच येत नाहीये! या वाद्यवृंदाचा प्रसिद्ध आणि बुजुर्ग कंडक्‍टर आता निवृत्त होतोय आणि त्याच्या जागेवर एक विक्षिप्त, प्रयोगशील; पण अत्यंत प्रतिभावान असा एक तरुण कंडक्‍टर आता या वाद्यवृंदाचा ताबा घेतो. या नवीन संचालकाच्या वयापेक्षाही अधिक काळ ऑर्केस्ट्रामध्ये वादन केलेले अनेक वादक इथं आहेत. नवी दृष्टी आणि नवी पद्धत सगळ्यांना रुचेल, की पाश्‍चात्य शास्त्रीय संगीतासारखा कठोर कलाप्रकारांत आणि कर्मठ प्रेक्षकांत, "नव्याची नवलाई' फक्त नऊ दिवसच टिकेल, या संकल्पनेभोवती "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज फिरते.

"ओबो' हे वाद्य वाजवणाऱ्या ब्लेअर टींडाल या वादकाच्या "मोझार्ट इन द जंगल: सेक्‍स, ड्रग्स अँड क्‍लासिकल म्युझिक' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा आधार घेऊन रोमन कोपोला, अँलेक्‍स टिम्बर्स आणि जेसन श्वार्टझमन यांनी "ऍमेझॉन'साठी "मोझार्ट इन द जंगल ही सिरीज निर्माण केली आहे. ब्लेअरचे स्वतःचे अनुभव आणि काही प्रमाणात "काल्पनिक वास्तव' यांचं सुरेख मिश्रण मूळ पुस्तकात आहे. मालिकेमध्ये रूपांतर करताना मूळ पुस्तकाचा गाभा जिवंत ठेवून त्यावर अभिनय आणि संवादाची उत्तम सजावट केली आहे.

न्यूयॉर्क फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्राचा संचालक - थॉमस पेम्ब्रीज (माल्कम मॅक्‍डोवेल) निवृत्त होतो आणि त्याची जागा तरुण संचालक रोड्रिगो (गेल गार्सिया बेर्नाल) घेतो इथून ही मालिका सुरू होते. अनुभवी वादक, नवीन संचालक, ऑर्केस्ट्रामध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करणारी हेली रटलेज (लोला कर्क) अशा व्यक्तिरेखांबरोबर आपला प्रवास सुरू होतो. एखाद्या कलाकारास त्याच्या अंतर्मनातलं संगीत आळवण्याची असलेली ऊर्मी, नवे पायंडे पडताना जुन्या परंपरांशी होणारा संघर्ष आणि या सर्व गोष्टींच्या पलीकडं असलेला जगण्याचा रोजचा झगडा या वेगवेगळ्या; परंतु एकमेकांशी गुंता असलेल्या विषयांमधून आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा; तसंच कथानकाचा वेध घेतो.

ही वेब सिरीज नावाप्रमाणंच एखाद्या मनस्वी कलाकारास जंगलामध्ये (अर्थात प्रतीकात्मक) नेऊन ठेवल्यावर काय होतं, याचं समर्पक चित्रण आहे. सुसंस्कृत समाज आणि जंगलाचे नियम यांमध्ये मोठी तफावत असते. जेव्हा एखादा कलाकार, सुसंस्कृत समाजानं तयार केलेल्या जंगलात येऊन पडतो, तेव्हा कुठल्या कायद्यानं हे जग चालतं आणि त्यामध्ये जगताना आपली कला जोपासायची का जगण्याची केविलवाणी धडपड करायची, यामध्ये अडकलेली पात्रं ही या मालिकेची बलस्थानं आहेत. नर्म विनोदी अंगाने जाणारी ही मालिका, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समाजरचना आणि त्यांचं होणारं अवमूल्यन याला हलकेच चिमटे काढत सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करते. कथेचा मूळ गाभा गहन असल्यानं या मालिकेच्या संवेदना न्यूयॉर्क किंवा अमेरिकेपुरत्या मर्यादित न राहता सर्वदूर पोचतात.
माल्कम आणि गेल या मुख्य अभिनेत्यांचा जबरदस्त अभिनय, एखाद्या चित्रपटास शोभेल अशी दिग्दर्शनाची शैली आणि सुसंगत लिखाण यांमुळे ही सिरीज रसिकांना आणि समीक्षकांनाही भावली. पाश्‍चात्य शास्त्रीय संगीत हाच या मालिकेचा महत्त्वाचा विषय असल्यानं त्याचा अप्रतिम वापर या मालिकेत आहे, हे वेगळं सांगायला नकोच! प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब्स आणि एमी पुरस्कारांमध्ये "विनोदी मालिका' या श्रेणीमध्ये "मोझार्ट इन द जंगल'ला अनेक नामांकनं मिळाली. 2016 च्या गोल्डन ग्लोब्जमध्ये "सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका' आणि "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (गेल गार्सिया बेर्नाल)' हे पुरस्कार या मालिकेनं मिळवले. त्याचबरोबर 2016 आणि 2017 चे ध्वनिमिश्रणाचे एमी पुरस्कारसुद्धा याच मालिकेनं पटकावले.

कलाक्षेत्रात असणारं राजकारण, वैयक्तिक हेवेदावे आणि त्यातून होणारी जीवघेणी स्पर्धा, पक्षपाती वागणूक आणि यापलीकडं एक कला म्हणून त्या तिच्याकडं बघण्याचे-वेगळ्या पातळीवरचे संघर्ष निर्माण करणारे- वेगळे दृष्टिकोन हे सर्व गंभीर मुद्दे ही मालिका अत्यंत सहजपणे हाताळते. कलेमागचं आणि कलाकारांमधलं नाट्य सुलभपणे उलगडून दाखवून मानवी प्रवृत्तीचे अनेक कंगोरे दाखवणारी "मोझार्ट इन द जंगल' हे वूडहाउस किवा पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणाच्या काहीशी जवळपास जाते. वरवर पाहता आलबेल आणि उच्चभ्रू वाटणाऱ्या गोष्टीची काळी बाजू कोणताही आडपडदा न ठेवता दाखवण्यात ही सिरीज यशस्वी होते. या सिरीजचे आतापर्यंत चार सीझन्स झाले आहेत आणि ते "ऍमेझॉन प्राइम'वर पाहण्यास उपलब्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aneesh prabhune write article in saptarang