
जमिनीची खरेदी-विक्री ही पद्धत सर्वत्र नित्याची बाब झाली आहे. जमिनीच्या तुकड्याची मालकी सांगणारा जो कागद असतो तो दस्तऐवज.
भूमी अभिलेख संग्रहालय
- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com
‘आपल्या मालकीचा एखादा तरी जमिनीचा तुकडा असावा अशी प्रत्येकाच्या मनात कुठं तरी सुप्त इच्छा असते...’
रेडइंडियन-प्रमुख चीफ सिॲटल यानं १८५४ मध्ये जमिनीच्या मालकीवरून काढलेले हे उद्गार खूपच अंतर्मुख करणारे आहेत. तो म्हणतो :‘ तुम्ही जमिनीची आणि आकाशाची खरेदी अथवा विक्री कशी काय करू शकता? आमच्या लेखी ही कल्पना विचित्र आहे. जर हवेचा ताजेपणा आणि पाण्याचा खळखळाट यांवर आपण मालकी दाखवू शकत नाही तर मग आपण त्या बाबी खरेदी तरी कशा करू शकतो? आपण पृथ्वीचा एक भाग आहोत आणि पृथ्वी आपल्यामध्ये सामावलेली आहे. पृथ्वी मानवाची नाही, तर मानव पृथ्वीचा आहे. पृथ्वी आपल्याला सामावून घेते. पृथ्वी मौल्यवान आहे आणि तिचा विध्वंस करणं हा तिच्या निर्मात्याचा घोर अपमान आहे.’
जमिनीची खरेदी-विक्री ही पद्धत सर्वत्र नित्याची बाब झाली आहे. जमिनीच्या तुकड्याची मालकी सांगणारा जो कागद असतो तो दस्तऐवज. हा दस्तऐवज तयार करणं, गावाचं सर्वेक्षण करून त्याला शिस्तबद्ध पद्धत घालणं याला फार जुना इतिहास आहे. आज ‘गुगल अर्थ’ या साइटवर गेलं की एखाद्या यानात बसल्याप्रमाणे एखाद्या देशातून दुसऱ्या देशात सहज भ्रमण करणं शक्य आहे. भारतात जमिनीचं सर्वेक्षण करून नकाशे करण्याची परंपरा प्राचीन आहे. जमिनीची प्रतवारी ठरवून तीवर महसूल आकारण्याच्या पद्धतीचे उल्लेख ‘ब्रह्मांडपुराण’, ‘शुल्बसूत्र’, ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ यांत आढळतात. प्राचीन जमीनमहसुलाविषयी ‘मनुस्मृती’मध्ये माहिती मिळते. मनू म्हणतो : ‘ज्याप्रमाणे जळू, वासरू आणि मधमाशी आपलं अन्न मिळवतात (अन्नदात्याच्या नकळत) त्याप्रमाणे राजानं कर गोळा करावेत, प्रजेवर करांचं ओझं होऊ देऊ नये.’
भूतलावरील छोट्या भागाची मोजणी, नोंदणी व नकाशे ठेवण्याची पद्धत इसवीसनपूर्व ३२० मध्ये सम्राट अशोकाच्या राज्यात होती. ‘रज्जुक’ नावाचा अधिकारी त्यासाठी नेमला जाई. त्यानंतर सन ५०८ मध्ये त्रैकुटक राजाच्या काळात ताम्रपटावर अशा नोंदी आढळतात. यामध्ये जमीन दान दिल्याचा दिवस, राज्याच्या वंशावळी, दानाचा प्रकार, गावाच्या चतुःसीमा आदींच्या नोंदी दान घेणाऱ्याच्या नावासकट आहेत. संस्कृत भाषेत लिहिलेला ताम्रपट रायगड जिल्ह्यातल्या माटवन गावात सापडला आहे. मोहेंजोदडो व हडप्पा या संस्कृतींमध्येही जमिनीच्या तुकड्यांचं विभाजन करण्याची पद्धत होती.
शेरशहा सुरीनं प्रथम जमिनीच्या मालकीची नोंद करून सारा वसूल करण्यासाठी ‘कबूलीयत’ ही पद्धत १५४० ते १५४५ या काळात राबवली. यामध्ये राज्यकर्ता व शेतकरी यांच्यात करारपत्र तयार करून सारा व जमिनीची मालकी यांच्या नोंदी केल्या जात. अकबराचा मंत्री राजा तोडरमल व त्यानंतर मलिक अंबर या दोघांनी जमिनीचं सर्वेक्षण करून त्यावर रीतसर सारा भरण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीचा पायंडा पाडला.
राजा तोडरमलानं जमीन मोजण्याची सळई व साखळी यांचा वापर करून बिघा या परिमाणामध्ये जमिनीची नोंद करण्याची पद्धत वापरली.
‘उत्तम’, ‘मध्यम’ व ‘निकस’ अशी जमिनीची प्रतवारी करून करपात्र उत्पन्न ठरवलं. दख्खनच्या पठारावर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची पद्धत आदिलशाहीमध्ये मलिक अंबरानंच घालून दिली. मराठ्यांच्या राज्यात अशा पद्धतीला ‘कमाल धारणा’ असं संबोधलं जाई.
पेशवाईतील दुसऱ्या बाजीरावाच्या काळात १८१० मध्ये पुण्यापासून उत्तरेकडे प्रवासासाठी, तसंच युद्धासाठी मोहिमेवर जाणाऱ्या पुणेकरांसाठी एक नकाशा तयार करण्यात आला होता. त्यात वाटेत लागणाऱ्या नद्या, डोंगर, गावं आणि नाशिक व बुऱ्हाणपूरपर्यंतच्या दिशा दाखवलेल्या होत्या.
सन १८२६ मध्ये ब्रिटिशांनी भारताच्या क्षेत्राचं भूमापन करण्याचा कॅडेस्टल सर्व्हे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत केला. जमिनीच्या जागेवर रीतसर सर्वेक्षण करून भूमापन नकाशे तयार करण्याचा अवलंब ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण या गावी केला. सन १८५० पासून अशा तऱ्हेनं तयार केलेल्या निरनिराळ्या भूमापन-आलेखांचा अनोखा खजिना राज्याच्या भूमापन आणि जमाबंदी विभागाकडे आहे. अशा तऱ्हेनं निरनिराळ्या कालखंडांत विविध तत्कालीन पद्धतींनी तयार केलेल्या नकाशांचा संग्रह माहितीपूर्ण व मनोवेधक आहे.
‘भूमी अभिलेख विभाग’ हा अठराव्या शतकापासून जमिनीची नोंदणी, प्रतवारी, अभिलेख तयार करणारा शासनाचा महत्त्वाचा विभाग. या विभागाकडून अनेक प्रकारचे भूमी अभिलेख तयार करण्यात आले व विकासकामासाठी व मालकी हक्कनिश्चितीसाठी महत्त्वाचा पाया ठरले आहेत. ब्रिटिशकाळापासून वेगवेगळ्या कालावधीत मोजणी, प्रतवारी करण्याची साधनं, नकाशांच्या अचूकतेत आधुनिकीकरण व बदल घडत गेले. भूमी अभिलेख विभागाकडून वापरण्यात येणारी साधनं, उपकरणं, तयार करण्यात आलेले विविध नकाशे, दस्तऐवज, अभिलेख ही पुरातत्त्व संपदा बनलेली आहे.
या संपदेचं जतन व्हावं व सर्वसामान्यांना या आगळ्यावेगळ्या क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून तिचं संग्रहालय बनवण्याची संकल्पना भूमी अभिलेख व जमाबंदी आयुक्तांनी २००३ मध्ये मांडली. महाराष्ट्र शासनानं महत्त्वाच्या ऐतिहासिक तंत्रज्ञानाच्या वस्तूंचं संवर्धन व्हावं म्हणून अद्ययावत संग्रहालय तयार करण्यासाठी निधी ‘महत्त्वपूर्ण व्यवस्थापनाचे सशक्तीकरण आणि भूमी अभिलेखाचे अद्ययावतीकरण’ या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून दिला. विधानभवनासमोरील नव्या शासकीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील काही भाग संग्रहालयनिर्मितीसाठी उपलब्ध झाला. पुरातत्त्व संपदेसह संग्रहालय सर्व वयाच्या लोकांना आकर्षक वाटावं म्हणून त्याची रचना ही आव्हानात्मक गोष्ट होती.
संग्रहालय म्हटल्यावर कंटाळवाण्या वातावरणातील, अपुऱ्या प्रकाशातील चौकोनी काचपेट्या नजरेसमोर येतात. ही प्रतिमा मोडून संग्रहालयातील फलक औत्सुक्यपूर्ण बनवण्यासाठी आयताकृती दालनामध्ये सौम्य, लयदार गोलाईत प्रदर्शनफलकांसाठी कलात्मक फर्निचरचा अवलंब केला. अशा लयदार आरेखनामुळे संग्रहालयात फिरण्याची गती आणि दिशा या बाबी आपोआपच तयार होतात. आजूबाजूची माफक रंगसंगती व भरपूर प्रकाश यांमुळे संग्रहालय बघणाऱ्यांचं लक्ष प्रदर्शित केलेल्या माहितीवर व वस्तूंवरच सहजपणे केंद्रित होतं.
सर्वेक्षणासाठी वापरला जाणाऱ्या वस्तू केवळ बघण्यापेक्षा त्या वापरायच्याही कशा याचं प्रात्यक्षिक जर बघणाऱ्याला स्वतः करायला मिळालं तरच त्या वस्तूंबद्दल जिज्ञासा वाढेल म्हणून काही उपकरणं ही विशिष्ट रचना करून वापरण्यासारखी ठेवली आहेत. जुने सचित्र नकाशे, सर्वेक्षणाची उपकरणं ते अद्ययावत उपग्रहप्रतिमा यांतून भूमी सर्वेक्षण या तांत्रिक कलेची रंगतदार वाटचाल उलगडत जाते. भूमापनाच्या शंकू, साखळी, प्लॅन टेबल, इलेक्ट्रॉनिक रोलर इत्यादी वस्तू व त्यांची माहिती प्रदर्शित करण्यासाठी विविध आकारांच्या, उंचीच्या, काचपेट्या टाकाऊ लाकडापासून करून घेतल्या. फेरवापराचं तत्त्व इथं चांगल्यापैकी राबवता आलं. छतालाही अशाच लाकडाचं आभासी छत; त्यावर, सकृद्दर्शनी दिसणार नाहीत अशा पंख्यांचं वारं वातानुकूलित पद्धतीनं सर्वत्र खेळवलं जाईल याप्रकारे ती रचना साधली आहे.
मराठे व इंग्रज युद्धाच्या लढाईच्या व्यूहरचनेचा नकाशा, कापडावरील चिकटवलेला जोधपूरचा त्रिमितीमधील नकाशा, सात बेटांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा ४०० वर्षांपूर्वीचा नकाशा, उल्कापातामुळे नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा जुना नकाशा व अद्ययावत उपग्रहावरून काढलेलं छायाचित्र अशा दुर्मिळ व औत्सुक्यपूर्ण गोष्टींचा समावेश संग्रहालयात आहे. सबंध देशात अशा प्रकारचं हे एकमेव संग्रहालय करण्याचा मान पुण्याला मिळाला. ...तर असा भूमी सर्वेक्षणाच्या वाटचालीच्या जतन-संवर्धनाचा नावीन्यपूर्ण व आधुनिक पद्धतीनं सादर करण्याचा खटाटोप एकदम रंगतदार ठरला.
(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)