
समाजात ताठ मानेनं वावरणाऱ्या सर्व स्त्रियांनी ज्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहावं अशी महान स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले यांचं स्मारक
- अंजली कलमदानी
समाजात ताठ मानेनं वावरणाऱ्या सर्व स्त्रियांनी ज्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहावं अशी महान स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचं कार्यक्षेत्र पुणे. स्त्रियांसाठी ज्ञानार्जनाची कवाडं खुली करणाऱ्या सावित्रीबाईंना आजच्या शिक्षित स्त्रीनं वंदन केलंच पाहिजे.
आज ज्या आत्मविश्वासानं प्रगत स्त्रिया समाजात वावरत आहेत त्यासाठी एकेकाळी सावित्रीबाईंनी समाजाकडून दारुण उपेक्षा, तसंच दगडांचा आणि शेणगोळ्यांचा भडिमार सहन केला आहे.
स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंनी क्रांतिकारी पाऊल घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलं. अर्थात्, त्यांना महात्मा जोतिबा फुले यांचं संपूर्ण सहकार्य होतं.
फुले दाम्पत्यानं मुलींसाठी देशातील पहिली शाळा ता. एक जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत सुरू केली आणि स्त्रीशिक्षणाचं बीज भारतात रोवलं. सावित्रीबाई या शाळेत पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या.
पहिल्या शाळेच्या यशानंतर दुसरी शाळा त्यांनी ता १५ मे १८४८ रोजी पुण्यात सगुणाबाईंच्या सहकार्यानं काढली. सनातनी समाजाला टक्कर देत फार मोठं धाडस त्यांनी करून दाखवलं. समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी ज्ञानसंपादनाची संधी उपलब्ध करून देत शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली.
विद्यादानाचं कार्य करणाऱ्या या दाम्पत्याच्या कार्याची दखल ब्रिटिश सरकारनं घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला व सावित्रीबाईंना १८५२ मध्ये ‘उत्कृष्ट शिक्षिका’ म्हणून घोषित केलं. ता. १६ नोव्हेंबर रोजी विश्रामबागवाड्यात मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली सत्कारसोहळा झाला.
सावित्रीबाईंनी शिक्षणक्षेत्रात काम करत असताना १८५३ मध्ये ‘माता बालसंगोपन केंद्रा’ची सुरुवात केली. काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेला त्यांनी अभय दिलं. तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं माता-पित्याप्रमाणे संगोपन केलं व पुढं याच डॉक्टर यशवंत याला दत्तक घेऊन समाजापुढं नवीन आदर्श निर्माण केला.
सन १८८३ मध्ये सासवड इथं सत्यशोधक समाजाच्या परिषदेचं अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवलं. विधवांच्या केशवपनाची अनिष्ट प्रथा बंद व्हावी यासाठी जोतिबा व सावित्रीबाई यांनी मिळून समाजप्रबोधन केलं व केशकर्तन करणाऱ्यांचा संप घडवून आणला.
हा संप यशस्वी झाला व समाजपरिवर्तनाचं एक पाऊलही पुढं पडलं. सावित्रीबाईंच्या रूपानं प्रथमच सामान्य कुटुंबातील स्त्री निर्भय आणि स्वतंत्र झाली व तिनं समस्त स्त्रियांना निर्भय आणि स्वतंत्र होण्याची प्रेरणा दिली. सार्वजनिक क्षेत्रात स्त्री समर्थपणे काम करू शकते हे स्वकार्यानं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
वास्तुसंकुलाचा वापर प्राधान्यानं स्त्रीवर्गाकडे आहे. जुना वारसा जपताना त्यांच्या कार्याचा वारसा पुढं चालवण्यासाठी संकुल उभारण्यात आलं आहे. त्यात सावित्रीबाईंच्या कार्याचं आणि व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवणारं आधुनिक संग्रहालय आहेच;
पण त्याचबरोबर माता-बालसंगोपन केंद्र, स्त्रीकल्याण केंद्र, संगणक प्रशिक्षणकेंद्र, स्त्रियांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी विक्रीकेंद्र, व्यायामशाळा, ग्रंथालय, छोटं व मोठं सभागृह आदींचा समावेश आहे. ज्या काळात ज्या पद्धतीच्या वास्तूमध्ये सावित्रीबाईंनी आपलं कार्य केलं त्या ‘वाडा’ या तत्कालीन व स्थानिक वास्तुशैलीचा अवलंब वास्तूसाठी करण्यात आला आहे.
सध्या पुण्याचं वैशिष्ट्य असलेल्या वाड्यांची जागा टोलेजंग इमारती झपाट्यानं घेत असताना सार्वजनिक वापरासाठी पारंपरिक वाडा या संकल्पनेवर संकुल रेखांकित करण्यात आलं आहे. संकुलातील सर्व कार्यक्षेत्रं मध्यवर्ती चौकाभोवती गुंफण्यात आली आहेत. स्थानिक हवामानाला अनुकूल चौकाचा उपयोग सर्वत्र भरपूर उजेड व हवा मिळण्यासाठी होतो.
सावित्रीबाईंची राहणी पारंपरिक पद्धतीची होती; मात्र, विचार आधुनिक होते. याच धरतीवर नियोजित संकुलाची इमारत पारंपरिक पद्धतीची असून आतील सर्व सुविधा अत्याधुनिक पद्धतीच्या आहेत. स्त्रीव्यक्तिमत्त्वाच्या नाजूक; तरीही कणखर अशा पैलूंचं प्रतीकात्मक रूपांतर इमारतीच्या निरनिराळ्या घटकांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दृश्य वीटकामात पारंपरिक पुणेरी साड्यांच्या काठपदरामध्ये वापरल्या जाणाऱ्या कलात्मक नमुन्यांचा, प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. असं वीटकाम करताना कारागिरांनी आपलं कसब पणाला लावलं. फरशीकामातही रांगोळीची प्रतीकं कौशल्यानं साधण्यात आली.
देवघरात देवापुढं काढलेल्या रांगोळीपासून प्रेरणा घेऊन व रांगोळी या पारंपरिक कलाकृतीनं वेडावून गेलेल्या भारतात भारतीय शैलीच्या इमारतीवर काम करण्याचा अनुभव घेण्यासाठी काही काळ आलेल्या फ्रँको सशेटी या इटालियन वास्तुविशारदानं फरशीकामातील कलाकृतींची ठिपक्यांवर आधारित रेखांकनं केली आहेत.
वास्तुसंकुलात सुसज्ज वातानुकूलित सभागृहही आहे. सभागृहाचं अंतरंग बाह्य रूपाला साजेसं, तरीही वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीचं, कलात्मकता व आधुनिक तांत्रिक सुविधांनी परिपूर्ण आहे. चर्चासत्रं, प्रदर्शन, शिक्षणासाठी वर्ग या सगळ्यासाठी छोट्या सभागृहाची रचना करण्यात आली आहे.
सर्व स्तरांतील स्त्रियांना वावरासाठी सहज सोपेपणा जाणवेल अशा पद्धतीनं सर्व दालनांची संरचना करण्यासाठी मध्यवर्ती चौरस चौकाचा पुरेपूर उपयोग होतो. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावं यासाठी विविध कलागुणांचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येतं. या जागेवरच सावित्रीबाईंच्या आजोड कार्याची दखल घेणारं आणि स्त्रीत्वासाठी समर्पित असं वास्तुकलेच्या एका विशिष्ट शैलीनं परिपूर्ण स्मारक उभं राहिलं आहे.
‘किमया वास्तुविशारद सल्लागार परिवारा’तील स्त्रीवास्तुविशारदांनी या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त योगदान दिलं. वास्तुकलेतील पारंपरिक आणि आधुनिक अशा संकल्पनांचा समतोल साधून एक आगळंवेगळं वास्तुशिल्प समाजासाठी देण्याचा प्रयत्न ‘किमया’नं केला आहे.
पर्यावरणपूरक रचना ही मध्यवर्ती चौकातून साकारताना इमारतीची उंची माफक ठेवण्यात आली आहे. अस्तित्वातील झाडांचं संवर्धन करून ती नवीन इमारतीच्या आराखड्यात सामावून घेण्यात आली आहेत. पर्यावरणपूरक इमारत बांधताना स्थानिक निकषांवर भर देण्यात आला, ज्याचा विचार मूलभूत आराखड्याच्या समरचनेपासून करण्यात आला आहे.
संकुलाच्या मध्यवर्ती चौकात कठीण पाषाणातून वलयांकित मार्ग काढणाऱ्या पाण्याचं प्रतीकात्मक शिल्प तयार करण्यात आलं आहे. मध्यवर्ती वर्तुळात पोहोचल्यावर पाणी पुढं परत मार्गक्रमण करतं. सावित्रीबाईंची शिक्षणाबद्दलची तळमळ,
शिक्षण घेतल्यावर समाजाचं व स्वतःचं होणारं परिवर्तन व त्यातून झालेलं आत्मपरीक्षण आणि त्यानंतर समाजाला परत देण्याचं भान ही वाटचाल मानवी कृती व बुद्धी यांचं मार्गक्रमण दर्शवते. त्याचबरोबर जोतिबा व सावित्रीबाई यांच्या एकरूपात्मक सहजीवनाचं ते एक देखणं प्रतीकही आहे.
शिल्पाच्या दोन्ही बाजूंना झाडाखाली ‘सावित्रीबाई मुलींना शिकवत आहेत’ व ‘जोतिबा सावित्रीबाईंना शिकवत आहेत’ असे दोन शिल्पसमूह आहेत. ‘सावित्रीबाई फुले स्मारक’ हे फुले दाम्पत्याच्या अनन्यसाधारण अशा कार्याला अभिवादन आहे. सावित्रीबाईंनी स्त्रियांना निर्भय बनवलं, शिक्षित बनवलं याची आठवण आपण सदैव ठेवायला हवी.
अशा या तेजस्वी स्वयंसिद्धेचं स्मारक पुण्यातील महात्मा फुले पेठेत आकारास आलं आहे. त्यांच्या मूळ वाड्यापासून जवळच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत हा प्रकल्प उभा राहिला आहे. पुणे महानगरपालिकेचे अभियंते, वास्तुविशारद, तंत्रज्ञ, कारागीर या सर्वांच्या परिश्रमानं हा प्रकल्प पूर्ण झाला.