
मुंबईचं आभूषण!
- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com
भारतात रेल्वे आली आणि दळणवळणक्षेत्रात क्रांती घडली. आज आशिया खंडात प्रथम क्रमांकाच्या व जगातील चौथं स्थान पटकावणाऱ्या भारतीय रेल्वेचा प्रवास मोठा रंजक आहे.
भारतातील पहिली रेल्वे धावली ती रुडकीमध्ये बांधकामसाहित्य वाहून नेण्यासाठी. दळणवळणासाठी रेल्वेचा खरा संचार सुरू झाला तो १८५३ मध्ये; परंतु ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणण्याचा घाट घातला तो कशासाठी?
सन १८३२ मध्ये इंग्लंडला वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वेगाडी सुरू झाली. सन १८४३ मध्ये मुंबईच्या बंदरात ग्रॅहॅम क्लार्क नावाचा तरुण इंजिनिअर इंग्लंडहून प्रवास करून पायउतार झाला. त्याला मँचेस्टर, लिव्हरपूल, लँकेशायर इथल्या कापडगिरण्यांच्या उद्योजकांनी भारतात कुठं व कशी रेल्वेगाडी सुरू करता येईल याचा आढावा घेण्यासाठी पाठवलं होतं; जेणेकरून भारतातील स्वस्त कापूस गोळा करून मुंबई बंदरात रेल्वेनं आणता येईल व नंतर समुद्रमार्गे इंग्लंडला रवाना करता येईल.
स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही ब्रिटिशांना हवं होतं. त्या वेळचा भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंज यानं भारतात रेल्वे आणण्याचा प्रकल्प तयार केला. ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला’ या रेल्वे कंपनीनं बोरीबंदर ते ठाणे ही पहिली ३४ किलोमीटरची रेल्वे सुरू केली. ता. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिला ‘अग्निरथ’ समारंभपूर्वक धावण्यास सुरुवात झाली. सन १९४७ पर्यंत भारतात रेल्वेच्या ४२ निरनिराळ्या यंत्रणा कार्यरत झाल्या.

स्वातंत्र्यानंतर मात्र सर्वांना एकत्र गुंफणारी भारतीय रेल्वे सुरू झाली. तिचं जाळं आज देशांतर्गत ६८ हजार किलोमीटर आहे. गावांना जोडणाऱ्या रेल्वेसाठी गावांमध्ये स्थानकं उभी राहिली. जसा रेल्वेचा पसारा वाढला तशी स्थानकांच्या रचनेत कलात्मकता व भव्यता येऊ लागली. वास्तुकलेच्या माध्यमातून पाश्चिमात्य शैलीच्या अवाढव्य व परिपूर्ण इमारती उभारून अलिखित असं वर्चस्व ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलं.
मुंबईत अशा अनेक इमारतींपैकी रेल्वेस्थानकंही महत्त्वाची आहेत. त्यापैकी व्हिक्टोरिया टर्मिनस (आजचं नाव ‘छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस’) हे मुंबईच्या सौंदर्यस्थळांपैकी एक होय. ‘जागतिक वारसायादीत नोंद असलेली इमारत’ म्हणूनही या रेल्वेस्थानकाचं मुंबईनगरीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या वास्तुकारानं १८८७ ते १८८८ या कालावधीत या स्थानकाच्या वास्तूचं रेखांकन केलं. स्थानकाचं काम मिळाल्यावर स्टीवन्सनं युरोपमधील स्थानकांचा दहा महिने बारकाव्यांनिशी अभ्यास केला. इटालियन व्हिक्टोरिअन गॉथिक शैलीच्या इमारतीत भारतीय पारंपरिक वास्तुशैलीच्या घटकांचा सौम्यपणे वापर करण्यात आला.
पांढरा पोरबंदर चुनखडीचा दगड (लाईम स्टोन) व पिवळसर मालाड दगड यांमध्ये निसर्गातील अनेक घटक आलंकारिक रूपात इमारतीच्या निरनिराळ्या भागांमध्ये अवतरले आहेत. इमारतीच्या बाह्य भागावर मानवी पुतळे असून मुख्य घुमटावर प्रगतीच्या देवतेचा पुतळा आहे. अरुण टिकेकर यांनी ‘स्थलकाल’ या त्यांच्या पुस्तकात या रेल्वेस्थानकाचा उल्लेख ‘सौंदर्यखनी...मुंबईचा सर्वात ठसठशीत दागिना’ असा केला आहे. यापेक्षा तिचं सौंदर्य कुठल्या शब्दात वाखाणणार? ब्रिटिशांनी जरी आपल्या भूमीवर ही इमारत बांधली असली तरी इथल्याच भूमीवरील कारागिरांनी ती साकारताना त्यांची शिल्पकला तीमध्ये उतरवली आहे.
ब्रिटिश गव्हर्नरांचे पुतळे इथल्या शिल्पाकृतीत सामावतानाच निरनिराळ्या वेशभूषांमधील भारतीयांच्या प्रतिमाही तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. भारतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणजे पिसारा फुलवलेला मोर...या मोरानंही दरवाज्यावरील कमानींमध्ये स्थान पटकावलं आहे. खार, सुसर, घुबड, नाग, एडका इत्यादींच्या रेखीव प्रतिमाही पाना-फुलांच्या वेलबुट्टीतून डोकावतात.
जागतिक वारसायादीत नोंद होण्यासाठी जे निकष पडताळले जातात त्यांचा उल्लेख करताना ‘रेल्वेस्थानकांमधील प्रगत तंत्रज्ञान वापरून उभारलेली इमारत...भारतीय हिंदू व मुघल शैली आणि गॉथिक शैली यांच्या मिलाफानं साकारलेला ब्रिटिशांच्या काळातील वास्तुरूप ठसा’ असं नमूद करण्यात आलं आहे.
गतिमान जीवनशैली अंगीकारलेल्या मुंबईकरांना या स्थानकातून रोज ये-जा करताना इमारतीकडे बघायला सवड नसते. मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या या स्थानकावरून रोज १२५० रेल्वे गाड्या १८ प्लॅटफॉर्मवरून सुटतात व दिवसाला तब्बल तीस लाख प्रवासी इथून ये-जा करत असतात. जमिनीवरील व्याप्तीच्या दृष्टिकोनातून पाहता इंग्लिश ‘सी’ आकारासारख्या दिसणाऱ्या या इमारतीचे घुमट, खिडक्या, कमानी, खांब यांमध्ये प्रमाणबद्धता तर आहेच; शिवाय, नक्षीदार घटकांनी त्यांची सुबकताही वाढवलेली आहे.
इमारतीच्या आकारमानाचा विचार करता, अशा घटकांमुळे इमारतीच्या अवजडपणाचं रूपांतर नकळतपणे लालित्यपूर्ण सौंदर्यस्थळांमध्ये होतं. अशा गोष्टींचा आनंद घेण्यासाठी स्थानकाच्या इमारतीत तळमजल्यावरील दालनात ‘हेरिटेज गॅलरी’ हे संग्रहालय तयार करण्यात आलं आहे.
रेल्वेचा इतिहास, भारतीय इतिहासाशी निगडित रेल्वेस्थानकांवरील प्रसंग, रेल्वेच्या तंत्रज्ञानातील सिद्धान्त यांचं सचित्र प्रदर्शन संग्रहालयातील दालनात पाहायला मिळतं. मर्यादित जागा, निधी, काळ आणि अमर्याद उपलब्ध माहिती व प्रदर्शनीय वस्तू यांची सांगड घालत संकल्पनेपासून केवळ पाच महिन्यांत संग्रहालयाची निर्मिती झाली. रेल्वेच्या उत्साही अभियंत्यांनी निरनिराळे जुने फोटो, वस्तू, मॉडेल्स, पत्रव्यवहार हे सगळं जमवलं. उपलब्ध जागेत आकर्षक वाटेल अशा पद्धतीनं त्यांची छाननी करताना वास्तुविशारदांची कसरत झाली.
स्टीव्हन्सनं ब्रिटिश स्थानकाचे तयार केलेले तपशीलवार मूळ नकाशे व रेखांकनंही रेल्वेच्या संग्रहात आहेत. आधुनिक विद्युत्-रचना, नवीन लाकूडकाम; परंतु सामग्रीचा पोत मात्र तत्कालीन लाकूडकामाशी मिळता-जुळता घेतला आहे. पूर्वीच्या रेल्वेस्थानकावरील धातूच्या अवजड घंटा संग्रहालयातील मध्यवर्ती तयार केलेल्या माफक गोलाई असलेल्या फर्निचरमध्ये कल्पकतेनं सामावल्या आहेत.
मोजकेच; पण प्रभावी असे प्रदर्शनाचे फलक तयार करताना जेम्स वॅाटच्या वाफेच्या इंजिनाची नजाकत, महात्मा गांधी-पंडित नेहरू यांचे रेल्वेमधील प्रवास, रेल्वेच्या इंजिनाची रूपं, स्थानकांच्या वेगवेगळ्या प्रतिमा आदींची जास्तीत जास्त माहिती सामावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सौंदर्यखनी इमारत वैशिष्ट्यपूर्ण अशा विद्युतीकरणानं २०१५ मध्ये उजळून निघाली. तिचं रात्रीचं मनोहारी रूप हे पर्यटकांसाठी आणि मुंबईच्या दृष्टीनं अनोखं आकर्षण आहे. ही विद्युत्-रचना साकारताना तिच्या बारीकसारीक अशा घटकांवर जास्त काम करून हे घटक उजळून निघण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं रचना केलेली आहे.
भारतातील सर्वधर्मीय सणांना अनुसरून रोषणाईच्या बावीस रचना एलईडी तंत्रज्ञानाच्या साह्यानं तयार करण्यात आलेल्या आहेत व खगोलशास्त्रीय कालपत्रकाप्रमाणे (Astronomical clock) त्यांचं नियंत्रण-कार्यान्वयन करण्यात येतं. शनिवार-रविवारची विद्युत्-रचना विशेष असते. मुंबईकरांचा वेगळा उत्साह तीमधून प्रतीत होतो. भारतात अशा प्रकारच्या रचनेचं पहिल्यांदाच होणारं रेखांकन हे ‘किमया वास्तुविशारदां’साठी आव्हान होतं व आज मुंबईकर त्याचा अभिमानानं आनंद घेताना दिसून येतात.