क्षेत्र नीरानरसिंहपूर

श्रीलक्ष्मीनृसिंहमंदिर हे पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकाला भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावर असून हे ठिकाण भक्त प्रल्हादाची तपोभूमी म्हणून ओळखलं जातं.
nira narsingpur temple
nira narsingpur templesakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

मंदिर-उभारणीला पूर्वी राजाश्रय मिळायचा आणि त्यामुळे मंदिरांची भव्य संकुलं उभी राहत; पण सद्य परिस्थितीतही जर त्याच वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी सक्षम, भक्कम पाठबळ लाभलं तर त्यांचं आयुर्मान वाढण्यास व जतन-संवर्धनास मदत होते. नीरानरसिंहपूर इथल्या मंदिरपरिसराला व संपूर्ण गावाला असा सक्षम शासकीय वरदहस्त २०१६ मध्ये लाभला. त्यामुळे मंदिराच्या, घाटांच्या संवर्धनाबरोबरच गावासाठी पूल, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कचरानिर्मूलन, भक्तनिवास या मूलभूत सुविधांची जोड मिळाली व संपूर्ण गावासाठी हे वरदान ठरलं.

गेल्या पाच वर्षांत जतन-संवर्धनाबरोबरच गावाला नवसंजीवनी लाभली आहे. यादवकालीन मंदिर असलेल्या गावाची पेशवाईच्या कालखंडात सरदार विंचूरकरदाणींच्या प्रयत्नांनी भरभराट झाली.अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवलेल्या विंचूरकरदाणींनी मंदिराची फेरउभारणी सन १७५६ मध्ये केली; पण कालांतरानं गावाकडे दुर्लक्ष होऊन पुनरुज्जीवनाची गरज निर्माण झाली.

श्रीलक्ष्मीनृसिंहमंदिर हे पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकाला भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावर असून हे ठिकाण भक्त प्रल्हादाची तपोभूमी म्हणून ओळखलं जातं. नयनरम्य अशा दोन नद्यांच्या संगमावर विस्तृत घाट असून धाधजी मुधोजी यांनी काही घाट बांधले, तर काही घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.

काळ्या पाषाणातील भव्य मंदिराच्या शिखरावर निरनिराळ्या आकारांतील चुन्यातील १७६ मूर्ती आहेत. वास्तुकला, मूर्तिकला, अभियांत्रिकीशास्त्र, नृसिंहलक्ष्मी व भक्त प्रल्हाद यांच्या आख्यायिकांची जोड असलेलं मंदिराचं महत्त्व भक्तांसाठी अनमोल आहे.

काळ्या पाषाणातील भव्य मंदिराच्या शिखरावर निरनिराळ्या आकारांतील चुन्यातील १७६ मूर्ती आहेत. वास्तुकला, मूर्तिकला, अभियांत्रिकीशास्त्र, नृसिंहलक्ष्मी व भक्त प्रल्हाद यांच्या आख्यायिकांची जोड असलेलं मंदिराचं महत्त्व भक्तांसाठी अनमोल आहे.

मंदिराचा परिसर जरी मोठा असला तरी निरनिराळ्या भागांच्या बांधणीचा काळ वेगवेगळा आहे. वास्तुशैलीतील फरक त्यानुसार दिसून येतो. कळसांवरील मूर्तींमध्ये दशावतारांच्या मूर्ती साकारताना स्थानिक प्रतिमांचाही अंतर्भाव आहे.

‘गेलो नरसिंह पुरा। नरसिंह दारूषणे पतका पुरलासे अंतु। नीरेभीवरे संगमी स्नान । करोनिया तेथे पै झाली सुस्नातू’ तेराव्या शतकात संत नामदेवमहाराजांनी तीर्थयात्रेदरम्यान नीरा नरसिंहपूरला भेट दिल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगातून दिसून येतो. इथल्या पुराच्या पाण्याच्या पातळी ४६६.५ मीटर असून मंदिराचं जोतं ४६८ मीटर या पातळीला सुरू होतं.

अर्थातच तटबंदीचं उंच जोतं हा मंदिराच्या स्थापत्याचा महत्त्वाचा भाग आहे. कधी अती पूर आला व गाव पाण्याखाली गेलं तरी ग्रामस्थांना मंदिराचा निवारा आश्वासक आहे. उंच तटबंदीच्या आतमध्ये मंदिराचं संकुल असून तिन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्यानं उतरत जाणारे घाट म्हणजे उंचीवरील मंदिरासाठी बांधलेली संरक्षण भिंत व पाषाणातील सुबक पायऱ्या जोतेसंवर्धनाचं काम चोख बजावतात.

पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ घडीव काळ्या पाषाणात पायऱ्या, उत्तम भाजलेल्या नारिंगी वीटकामाचेबुरुज व त्यावर सागवानी लाकडाचा कलाकुसरीनं परिपूर्ण नगारखाना अशा तीन वेगवेगळ्या सामग्रीतून साकारलेली सौंदर्यपूर्ण रचना आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर नजरेस पडतो तो लाकडातील सभामंडप. यादवकालीन मंदिराचा सभामंडप मूळ मंदिराच्या आकारमानाशी प्रमाणबद्धता साधून पेशवाईच्या कालखंडात बांधलेला आहे.

मुख्य मंदिराभोवती तीन बाजूंनी असलेल्या दगडी ओवऱ्या पश्चिमेकडील नगारखान्याला मिळतात. नगारखान्याच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त दालन आहे. दुसऱ्या मजल्यावरून संपूर्ण परिसराचं, नदीपात्राचं, घाटांचं, विहंगम दृश्य नजरेस पडतं. मंदिराच्या पूर्वेकडील ओवऱ्या मूळ यादवकालीन असल्याचं बांधणीच्या तपशिलांवरून दिसून येतं. याच ओवऱ्यांमधून पुढं संगमावर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. संगमावर सोळाखांबी मारुतीचं मंदिर असून त्यापुढं संगमावर नदीकाठी दशक्रियाविधी करण्याची परंपरा आहे.

नृसिंह हे विष्णूचं दशावतारातील रूप असल्यामुळे दशावतारातील अनेक प्रतिमा मंडपावरील व रंगमंडपावरील चुन्याच्या मूर्तिकामातून दिसून येतात. नृसिंह हे विष्णूचं उग्र रूप मानलं जातं. ज्या वेळी नरसिंहाबरोबर लक्ष्मीची स्थापना असते तेव्हा लक्ष्मीनृसिंह हे विष्णूच्या शांत रूपाचं प्रतीक मानलं जातं. मुख्य गाभाऱ्याच्या दक्षिणेला लक्ष्मीचं मंदिर व गुप्तगंगा आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर इथल्या मंदिराला श्रीलक्ष्मीनरसिंह देवस्थान म्हटलं जातं. मुख्य मंदिराच्या भोवती असलेल्या ओवऱ्यांव्यतिरिक्त दक्षिणेला श्रीदत्तमंदिर असून उत्तरेला शिवमंदिर आहे.

मुख्य शिखरावर लक्ष्मी, शिव, मारुती, सरस्वती यांच्या पट्ट्यावरील मूर्तींच्या तुलनेत मोठ्या आकारांच्या मूर्ती पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशांना साकारताना शिखराच्या तळभागावरील सर्व प्रतिमा हत्तीवर स्वार असलेल्या व्यक्तींच्या, देवतांच्या रूपामध्ये आहेत. मंदिरपरिसर, प्रवेशद्वार, अर्धमंडप, घाट इथंही हत्तीच्या मूर्तींचं अस्तित्व स्पष्ट जाणवतं. बुद्धिमत्ता, ऐश्वर्य, बलाढ्यतेचं प्रतीक असलेल्या गजराजांच्या प्रतिमाचं अस्तित्व ठळकपणे प्रतीत होतं. इथल्या घाटांना ठरावीक नावं असली तरी सुमारे ८०० मीटर लांबीचे घाट हे नीरानरसिंहपूरचं वैशिष्ट्य आहे व त्यांचंही संवर्धन होत आहे.

सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधलेल्या मुख्य मंदिराच्या चुन्यातील कळसाची काळानुरूप पडझड झाली होती. मंदिराची व परिसराची रेखांकनं झाल्यावर मंदिराच्या जतन-संवर्धनाचा आराखडा तयार होऊन काम सुरू झालं. मंडपाच्या लाकडावरील तैलरंग उतरल्यावर त्यांचं मूळ स्वरूप उजळपणे दिसू लागलं. कालबाह्य लाकडं उतरवून नवीन लाकडांची जोड मिळाल्यामुळे मंडपाचं स्थैर्य अबाधित झालं आहे. महत्त्वाचं आव्हान हे शिखराचं व मूर्तींच्या संवर्धनाचं होतं.

चुन्यात योग्य मिश्रण साधून कळसाचं संवर्धन तामिळनाडूतील कारागिरांनी पूर्ण केलं. कळसाला धक्का न लावता पहाड उभारून हे काम करावं लागतं व उंचावर वारा ऊन्ह-पाऊस हे सगळं सांभाळून कारागिरी साधणं हे कौशल्याचं काम असतं. आवारातच जुनी चुन्याची घाणी व दगडी चाक असून त्याचंही संवर्धन करण्यात आलं. कालौघात झालेली विसंगत बांधकामं उतरवण्यात आली. लाकडी नगारखान्याची जुनी खराब झालेली लाकडं बदलून नगारखाना नव्यानं पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.

तिथल्या दालनात जतन-संवर्धनाच्या कामाचं व मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व दाखवणारी गॅलरी तयार होत आहे. आवारातील लहान-मोठ्या मंदिरांचं मूळ स्वरूपामध्ये जतन झालं. रंगशीळामंडपाच्या दगडांची स्वच्छता झाल्यावर तिथं पूरक अशी विद्युतव्यवस्था करण्यात आली. मूळ गाभाऱ्याला चिकटवलेल्या आधुनिक फरशा काढून दगडी भिंतीचं संवर्धन करण्यात आलं आहे.

मूळ मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याच्या गटानं काम केल्यावर मूर्तीवर चढलेलं एमसील व सिमेंटची १५ किलो वजनाची पुटं उतरवल्यावर पाचव्या शतकातील वाकाटक राजवटीतील मूर्ती अवतरली. यावरून मूळ मंदिराच्या काळाचा अंदाज बांधता येईल. शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे वज्रलेपाचे दुष्परिणाम अनेक ठिकाणी दिसून येतात. मंदिराच्या व परिसराच्या जतन-संवर्धनाचं काम करताना पुरातत्त्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहाणे, तसंच कंत्राटदार, ‘किमया’चे सल्लागार, कारागीर, विश्वस्त यांनी एकत्र मूठ बांधून काम केल्यामुळे कामाचा दर्जा सांभाळून मंदिराचं मूळ स्वरूपात जतन-संवर्धन करणं शक्य झालं.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com