ऐतिहासिक सोमेर मंदिर

महाशिवरात्र कालच (ता. १८) झाली. त्यानिमित्तानं पुणे शहरालगतच्या पाषाण-सोमेश्वरवाडी या उपनगरातल्या शिवमंदिराबद्दल जाणून घेऊ या.
Someshwar Temple Pashan
Someshwar Temple PashanSakal
Summary

महाशिवरात्र कालच (ता. १८) झाली. त्यानिमित्तानं पुणे शहरालगतच्या पाषाण-सोमेश्वरवाडी या उपनगरातल्या शिवमंदिराबद्दल जाणून घेऊ या.

- अंजली कलमदानी anjali.kalamdani10@gmail.com

महाशिवरात्र कालच (ता. १८) झाली. त्यानिमित्तानं पुणे शहरालगतच्या पाषाण-सोमेश्वरवाडी या उपनगरातल्या शिवमंदिराबद्दल जाणून घेऊ या. प्रत्येक गावात एक छोटंसं शिवमंदिर असतं. त्याच्याशी काही दंतकथा निगडित असतात. गावातील लोकांची श्रद्धा तिथं एकवटलेली असते. पुणे शहराच्या आसपास डोकावलं तर अजूनही काही छोटेखानी गावं आपलं अस्तित्व, आपलं गावपण टिकवून आहेत. त्यापैकीच एक आहे पाषाणजवळची सोमेश्वरवाडी. औंध­-बाणेर या जुन्या गावठाणांचा परिसर नव्यानं विकसित होऊन शहरी आधुनिकतेचा नवा चेहरा लेऊन लोकप्रिय झाला आहे. या परिसरापासून जवळच राम नदीच्या काठी सोमेश्वरमंदिराचा रम्य आणि शांत परिसर आहे.

शहरापासूनची अलिप्तता आणि गावपण इथं अजून तरी टिकून आहे. काळ्या पाषाणांत असलेल्या या नदीकाठच्या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. पाषाण गावात सांगितल्या जाणाऱ्या दंतकथेचा पुण्याच्या गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे. ती दंतकथा अशी : या परिसरात एक गुराखी गाई चरण्यासाठी घेऊन येत असे. दूध न देणारी एक गाय मात्र इथं एका वारुळावर दुधाचा पान्हा सोडत असे. गुराख्यानं वारुळाची जागा खणून पाहिल्यावर तिथं त्याला पाच शिवलिंगं आढळली. त्या जागी गुराख्यानं छोटेखानी मंदिर बांधलं व त्याला ‘सोमेश्वर’ असं संबोधलं जाऊ लागलं. नंतरच्या काळात या मंदिरपरिसरात पाषाण गाव वसलं.

या दंतकथेला सनावळींचा अथवा कागदोपत्री पुरावा नसला तरी मंदिराच्या शैलीवरून, परिसराच्या आराखड्यावरून मंदिराच्या प्राचीनतेचा अंदाज बांधता येतो. गुराख्यानं बांधलेल्या छोटेखानी मंदिराचं मोठं मंदिर शाहूमहाराजांच्या मातुःश्रींनी १७०८ ते १७४९ या कालावधीत बांधल्याचा उल्लेख आढळतो. मुख्य मंदिराचे मंडप शिवरामभाऊ यांनी १७८० मध्ये बांधले. छोट्या शिवबांसह मातुःश्री जिजाबाई यांचं वास्तव्य पुण्यात असताना जिजाबाई या मंदिरात दर्शनाला येत असत व त्यामुळे या परिसराला ‘जिजापूर’ असं संबोधलं जाई अशी एका कथेची जोडही या देवस्थानाला आहे.

पेशवाईत सन १७६१ ते १७७२ या कालावधीत दुष्काळ पडला असता सोमेश्वरमंदिरात मंत्रघोषासाठी व पूजेसाठी चौथे पेशवे माधवराव यांनी पंडितांना आवाहन केलं होतं. सोमेश्वरानं प्रसन्न होऊन दुष्काळाचं सावट दूर केलं या श्रद्धेतून ३३०० रुपये दक्षिणा चालू केल्याचाही उल्लेख आहे. सूर्योदयापासून ते माध्यान्हीपर्यंत व सायंकाळी मंत्रघोषासह पूजा करणाऱ्या पंडितांना १६२ रुपये मानधन देण्यात आलं होतं. पाषाणच्या तलावातून गव्हर्नर बंगल्याला - म्हणजे सध्याच्या पुणे विद्यापीठाच्या इमारतीला - तसंच खडकीला भरपूर पाणीपुरवठा केला जात असे.

दंतकथा, तसंच अपुरी व त्रोटक ऐतिहासिक माहिती उपलब्ध असली तरी मंदिराच्या भव्यतेवरून त्याला राजाश्रयाची जोड होती हे निश्चित.

हे मंदिर राम नदीच्या काठी उभारलेलं असल्यामुळे गावातून मंदिराकडे जाताना अनेक टप्प्यांमध्ये मंदिरपरिसर नदीच्या दिशेनं उतरत जातो. इतर मंदिरांमध्ये जाताना आपण पायऱ्या चढून मंदिरात जातो. इथं तसं नाही. सोमेश्वराला जाताना टप्प्याटप्प्यानं पायऱ्या उतरत जावं लागतं. नदीकाठी असणाऱ्या मंदिरांचा हा वेगळा अनुभव घेताना कळसाचं दर्शन सर्वप्रथम घडतं.

सोमेश्वरमंदिराच्या दणकट प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दीपमाळेबरोबरच मंदिराच्या तटबंदीसह परिसराची व्याप्ती दिसून येते. दीपमाळेच्या बाजूनं पायऱ्या उतरताना नजरेत भरतो तो गर्भगृहावरील घुमटाकार कळस. कळसावर कुठलंच नक्षीकाम, मूर्तिकाम नसून त्याचा विशिष्ट घुमट मोठा डौलदार दिसतो. भरपूर सावली देणाऱ्या वृक्षांमुळे मंदिरपरिसराच्या भव्यतेत भर पडली आहे.

मंदिरपरिसरातील दीपमाळ कुठल्याही कलाकुसरीशिवाय सरळसोट असली तरी नजरेत भरते. संपूर्ण मंदिरपरिसरात काळ्या पाषाणाचा रांगडेपणा, भारदस्तपणा जाणवतो. इतरत्र असणाऱ्या मंदिरांच्या निरनिराळ्या घटकांवरील कलाकुसरीचा अभाव इथं असला तरी परिसरातील भव्यता, साधेपणा व त्या जोडीला असलेली शांतता मनाचा ठाव घेते. पिंपळ, बकुळ अशा वृक्षांच्या पानांची सळसळ इथं अनुभवायला मिळते. मंडपातून गर्भगृहात शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी जाताना नतमस्तक होऊन छोट्या द्वारातून पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. मंदिरपरिसराची स्वच्छता आवर्जून ठेवली जात असल्याचं जाणवतं. मंदिराचा परिसर व मंदिराबाहेरील भाग हा अजून तरी कुठल्याही अतिक्रमणांपासून मुक्त आहे.

मंदिराच्या पश्चिमेला राम नदीकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. दगडी पायऱ्या उतरून नदीकाठी गेल्यावर, आपण शहराच्या परिसरात नसून एखाद्या खेडेगावातच आहोत असं वाटतं. छोट्या प्रवाहाच्या राम नदीचा परिसर नयनरम्य आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर कार्तिकेयाचं मंदिर आहे.

नदीच्या प्रवाहाच्या नियंत्रणासाठी जुन्या काळात बांधलेली दगडी झडप इथं अजूनही अस्तित्वात आहे. काळाच्या संक्रमणात मंदिरपरिसराच्या जतन- संवर्धनाची गरज निर्माण झाली. मंदिराचे विश्वस्त व माजी आमदार (कै) विनायक निम्हण यांच्या पुढाकारानं मंदिरपरिसराचं पुनरुज्जीवन झालं.

मंदिराभोवतीच्या दुर्लक्षित ओवऱ्यांना उजळ रूप प्राप्त झालं असून, ओवऱ्यांमध्ये मंदिराचं व परिसराचं ऐतिहासिक महत्त्व चित्ररूपानं साकारण्यात आलं आहे. ओवऱ्यांचा एक भाग भक्तांच्या ध्यानमंदिरासाठी राखून ठेवण्यात आला असून काळ्या दगडात मंदिराची व परिसराची डागडुजी करण्यात आली आहे. नदीकाठच्या दुर्मिळ अशा कार्तिकेय मंदिराचं काम मात्र अपुरं राहिलं आहे.

श्रावण महिना, महाशिवरात्र अशा उत्सवाच्या काळातच मंदिरपरिसर भक्तांनी गजबजून जातो. शिवपिंडीला चंदनाची उटी लावली जाते. यज्ञमंडपात यज्ञ होतो. मंदिरपरिसरात काळ्या पाषाणाची फरसबंदी पुन्हा करण्यात आली आहे. झाडांभोवती मोठे पार बांधण्यात आले आहेत. मंदिरपरिसराला लागून असलेल्या मोकळ्या जागांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा तयार करण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर भव्य चौकाला डौलदार वृक्षांचं छत्र आहे.

दक्षिणेकडे विस्तीर्ण उद्यान, उत्तरेला शाळा असूनही चौकाभोवती ‘गावपणा’चं वातावरण आहे. वृक्षांच्या पारावर गावातील ज्येष्ठ नागरिक विसावलेले असतात. माफक वर्दळ व रहदारी यांमुळे परिसरात विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. दक्षिणेकडील बागेत अलुतेदार-बलुतेदार आणि गावातील वातावरण दाखवणारी ग्रामसंस्कृती विकसित करण्यात आली आहे.

पावसाळ्यात राम नदीकाठी निरनिराळ्या पक्ष्यांचा स्वैर संचार पाहायला मिळतो. राम नदीच्या स्वच्छतेबाबतची दखल मात्र आवर्जून घेतली गेली पाहिजे. शहरातील हे छोटं देवस्थान नैसर्गिक परिसरानं समृद्ध आहे. सुट्टीच्या दिवशी शहराच्या मॉलमध्ये हिंडून दमलेली पावलं कधी मंदिराकडे वळली तर दीर्घकाळ स्मरणात राहणारा निर्मळ आनंद, मनःशांती इथं निश्चितच मिळते. ‘शिवशंभो’ची आरोळी व त्यानंतरचा घंटानाद मनाच्या तरलतेला स्पर्श करून जातो. परत फिरताना आपण आपल्या बरोबर घेऊन जातो तो निखळ आनंद आणि समाधान. इथल्या भारलेल्या स्पंदनांना लाभलं आहे वास्तूचं समर्पक कोंदण. दोहोंच्या परस्परपूरकतेमधून येणारी अनुभूती भाविकांच्या श्रद्धेची पातळी निश्चितच उंचावते.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com