'अनुभवा'रण्य (अनुज खरे

अनुज खरे informanuj@gmail.com
रविवार, 21 एप्रिल 2019

अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर "त्याचे' डोळे चमकले. आमच्या ध्यानीमनीही नसताना वाघानं आम्हाला दर्शन दिलं...

अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर "त्याचे' डोळे चमकले. आमच्या ध्यानीमनीही नसताना वाघानं आम्हाला दर्शन दिलं...

मे महिन्याच्या अखेरचे दिवस होते. दुपारचे साडेतीन वाजले असतील. सूर्यनारायणानं हळूहळू पश्‍चिमेचा रस्ता धरला होता. तरीही त्याची किरणं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची एकही संधी सोडत नव्हती. तळ्याच्या काठी उभं राहून समोरच्या पहाडावरचा परिसर आता स्पष्ट दिसत होता. दरवर्षीप्रमाणं झाडांचा खराटा झाला होता. नुकत्याच संपलेल्या पर्णवर्षावानं जमिनीला नवं आच्छादन मिळालं होतं. राखी रानकोंबडा, नवरंगसारखे पक्षी पानांच्या रांगोळीची उलथापालथ करून किडे वेचण्यात मग्न झाले होते. तळ्यावरून वाहणारा मंद वारा मधूनच शरीराला दिलासा देऊन जात होता. नेहमीप्रमाणं माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच तळ्याच्या काठावर असणाऱ्या कुसुमच्या हिरव्यागार छायेखाली बसून मी उन्हं कलण्याची वाट बघत होतो.

... नागझिरा. महाराष्ट्रातलं एक सुंदर जंगल. पुण्यातील माझ्या तीन-चार मित्रांबरोबर त्या वर्षी नागझिरा भेटीला आलो होतो. नागझिरा व्याघ्रप्रकल्प होण्याच्या खूप आधीचा तो काळ होता. त्या काळात आम्ही जंगल पायी तुडवत असू. निसर्गपर्यटनाची व्याप्ती एखादया बंद गाडीतून फिरण्याइतकीच मर्यादित होती. अभयारण्याचा दर्जा असल्यामुळं पायी फिरण्याची मुभा होतीच. दिवस मोठा असल्यामुळं साधारण चार वाजले, की भटकंतीला बाहेर पडायचं हा आमचा शिरस्ता. वाटेत वन विभागाचं एखादं वाहन मिळालं, तर त्यानं नाही तर अकरा नंबरच्या गाडीनं इच्छितस्थळी आम्ही पोचत असू. आम्ही चौघांनी वाकडा बेहडा या ठिकाणी जायचं ठरवलं. मजल-दरमजल करत, वाटेत दिसणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण करत आम्ही गौर गल्लीच्या आणि टायगर ट्रेलच्या चौकात पोचलो, तेव्हा एक तास झाला होता आणि तिथं आम्हाला "विठ्ठल' भेटला. वन विभागात काम करणारा हा चक्रधर टॅंकरच्या साह्यानं जंगलातल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याचं काम करत असे. कटेवरचा हात सोडवून नागझिऱ्यातल्या जीवांना "जीवन' पुरवणारा हा "विठुराया' कधीकधी आम्हाला त्याच्यासमवेत घेऊन जात असे. त्याच्याबरोबर आम्ही वाकड्या बेहड्यापर्यंत गेलो. तिथं पाणी टाकून झाल्यावर टायगर ट्रेलच्या पाणवठ्यातही पाणी सोडलं. लिंक रोडच्या टोकाशी आल्यावर विठ्ठलनं आम्हाला तिथल्या मचाणावर बसण्याचा सल्ला दिला. सहा वाजून गेलेच होते. संधिप्रकाशात बाहेर पडणारं एखादं अस्वल आम्हाला दर्शन देईल आणि आम्हाला त्याचं निरीक्षण करता येईल, या हेतूनं आम्ही मचाणावर बसलो. वाऱ्याचा वेग आता थोडा वाढला होता. तेंदू, कुसुमच्या पानांची सळसळ दूरवरूनही कानी पडत होती. आपापल्या रातथाऱ्यावर परतण्याची पक्ष्यांची भाऊगर्दीही सुरू होती. चितळं, सांबरं यांचीही पाण्यावर येण्याची लगबग सुरू होती. तरीही कमालीची सावधानता बाळगून चारही बाजूंकडं लक्ष ठेवून ही जनावरं पाण्यावर येऊन गेली. सुर्व्याही आजची उमेदवारी संपली या थाटात आकाशाच्या पटलावरून काढता पाय घेत होता. अंधाराचं साम्राज्य हळूहळू वाढायला लागलं, तसा रातकिड्यांनाही कंठ फुटला... आणि रात्रीचा दिवस सुरू झाला.

आता समोरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त डाव्या बाजूनं उजवीकडं जाणारे चितळांच्या धावपळीचे आवाज तेवढे ऐकू येत होते. समोर काही तरी नाट्य घडतंय हे आम्हाला फक्त जाणवत होतं. आमच्यातल्या दोघांची मचाणावर बसण्याची ती पहिलीच वेळ. त्यामुळं त्यांची अगदी भीतीनं गाळण उडाली होती. मी आणि माझा अजून एक मित्र त्या दोघांना जमेल तसा धीर देत होतो... आणि एका क्षणी सगळं स्तब्ध झालं. आजूबाजूचे आवाज, पानांची सळसळ, सारं सारं थांबलं. बाजूच्या दोघांच्या श्वासाचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येत होता. आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेण्याचा माझा आटोकाट प्रयत्न सुरू होता. जणू काही प्राणांनी कर्णयुग्मात प्रवेश केला होता. या सगळ्यात पाच-दहा मिनिटं गेली असतील. अचानकच आमच्या समोरून चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. अचानक आलेल्या त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा शत्रूपक्षातला प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर "त्याचे' डोळे चमकले. आमच्या ध्यानीमनीही नसताना वाघानं आम्हाला दर्शन दिलं. आम्ही अक्षरशः थिजून गेलो. वाघानं एक तुच्छ कटाक्ष आमच्याकडं टाकला आणि तो जंगलाकडं चालता झाला. थोडा वेळ मध्ये गेल्यावर आम्ही मचाणावरून खाली उतरलो आणि पर्यटनसंकुलाच्या दिशेनं चालायला लागलो. कोणाच्याही तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. जे अंतर कापायला आम्हाला संध्याकाळी एक तास लागला, ते अंतर आम्ही अवघ्या 25 मिनिटात पार केलं. आजही तो प्रसंग आठवला, की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.

असे अनेक अनुभव, अनेक आठवणी असणारं नागझिरा वन्यजीव अभयारण्य. अभयारण्याची स्थापना झाल्यावर अनेक वर्षांनी म्हणजे सन 2013 मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी प्रकारात मोडणारं नागझिरा अभयारण्य सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये वसलेलं आहे. अभयारण्याच्या पिटेझरी प्रवेशद्वारापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर पर्यटन संकुल आहे. आजही जंगलाच्या आत आपण या इथं वास्तव्य करू शकतो. अशा प्रकारची मुभा असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव व्याघ्र राखीव क्षेत्र. भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या या जंगलाला भेट देण्यासाठी ऑक्‍टोबर ते जून हा कालावधी योग्य आहे. जैवविविधता ठासून भरलेल्या या जंगलात तुम्हाला भौगोलिक विविधताही तितकीच आढळते. अनेक प्रकारचे किटक, पक्षी, सस्तन प्राणी, वृक्ष, लता, वेली यांनी नागझिऱ्याला समृद्ध केलं आहे.

वाघाची पुढची पिढी सक्षम होण्यासाठी वयात आलेल्या वाघांनी आपल्या हद्दीच्या शोधार्थ दुसऱ्या जंगलात जाणं गरजेचं असतं. वयात आलेल्या वाघांना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित जंगलांचे काही हिस्से असावे लागतात. त्याला "कॉरिडोर्स' म्हणतात. त्या दृष्टीनं नागझिऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या ताडोबा, बोर, उमरेड-कऱ्हांडला, पेंच; मध्य प्रदेशातलं कान्हा, पेंच; आंध्र प्रदेशमधील कावल या जंगलांना जोडण्यात आणि या जंगलांतून होणाऱ्या अशा युवा वाघांच्या स्थलांतरात नागझिऱ्याची मोलाची भूमिका आहे.

एखादी गोष्ट, एखादं वेडच असं असतं ज्याची वाट बघण्यात, त्याच्या मागं धावण्यात आपलं सगळं आयुष्य निघून जातं. त्या वेडाच्या मागं धावताना मग आपल्याला जाणीव होते की हा ध्यास, हे वेड आपण पूर्ण करू शकलो नाही. तरीही हा प्रवासच इतका सुंदर होता, की आपण कधीच थकून गेलो नाही. किंबहुना त्या वेडामागं धावण्याची ऊर्मी अधिक येते. या निसर्गवेडाची जाणीव मला नागझिऱ्यात आल्यावर पहिल्यांदा झाली. नागझिऱ्यातली ती झाडं, वेली, पशू, पक्षी, फुलपाखरं, नागझिऱ्याचं ते तळं या सर्वानी मनावर एक वेगळीच जादू केली. गेली अनेक वर्षं मी इथं येतोय; पण ही जादू आजही तशीच टिकून आहे. प्रत्येक वेळेस हे जंगल काहीसं नवीन दिसतं. नव्यानं साद घालतं. आपल्याशा वाटणाऱ्या या रांगड्या गुरूनं इथल्या प्रत्येक पानाफुलातून, झाडाझुडपातून, वेलींतून, भूमी आणि आसमंत पादाक्रांत करणाऱ्या प्रत्येक जीवातून, प्रसंगी इथल्या वाटांवरच्या खाचखळग्यातून मला खूप काही शिकवलं. हे "वेड'च हळूहळू आयुष्य बनून गेलं.
(शब्दांकन ः ओंकार बापट)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anuj khare write nagzira jungle article in saptarang