बार्से : धरतीवरचं नंदन‘वन’

भारताच्या ईशान्य भागावर निसर्गाचा वरदहस्त असल्याचं आपल्याला जाणवतं. इथल्या राज्यांत निसर्ग जरा अधिकच बहरला आहे. याच भागात निसर्गसौंदर्यानं नटलेलं एक राज्य आहे व ते म्हणजे सिक्कीम.
Red Panda
Red PandaSakal

भारताच्या ईशान्य भागावर निसर्गाचा वरदहस्त असल्याचं आपल्याला जाणवतं. इथल्या राज्यांत निसर्ग जरा अधिकच बहरला आहे. याच भागात निसर्गसौंदर्यानं नटलेलं एक राज्य आहे व ते म्हणजे सिक्कीम. भारतातील पहिलं ‘सेंद्रिय’ राज्य. भौगोलिक रचनेमुळे या राज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला आणि ईशान्य दिशेला चीन आणि पूर्वेला भूतान हे देश आहेत, तर सिक्कीमच्या दक्षिणेला पश्चिम बंगाल या राज्याची सीमा आहे. चीनच्या शेजारामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिलेलं असं हे राज्यं; पण खरं सांगायचं तर निसर्गदेवतेनं आपल्या रंगांची इथं मुक्तहस्ते उधळण केली आहे.

सिक्कीममध्ये चार जिल्हे आहेत. पूर्व सिक्कीम, पश्चिम सिक्कीम, उत्तर सिक्कीम आणि दक्षिण सिक्कीम. तसं बघायला गेलं तर बहुतेक पर्यटक सामान्यतः पूर्व सिक्कीम म्हणजेच गंगटोक आणि उत्तर सिक्कीम म्हणजे ‘ला चुंग’ वगैरे ठिकाणांना मोठ्या प्रमाणावर भेट देतात; पण पश्चिम सिक्कीममध्ये असलेली ओखरे, बार्से आणि युक्सम ही ठिकाणं म्हणजे अलौकिक निसर्गसौंदर्याची उदाहरणं. यातील बार्से आणि युक्सम ही ‘होम स्टे’ची सुविधा पुरवणारी गावं. सभोवताली पसरलेलं दाट जंगल, भरपूर धबधबे आणि असंख्य पक्ष्यांची विविधता हे युक्समचं वैशिष्ट्य. बागडोगरापासून सुमारे सहा तासांवरच्या या गावातून ‘कांचनजंगा राष्ट्रीय उद्याना’कडे जाण्याचा मार्ग आहे. नैसर्गिक विविधतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या गावाला परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. ट्रेकिंग, हायकिंग आणि पक्षी-निरीक्षण असं सगळंच इथं करता येऊ शकतं.

‘तिस्ता’ आणि ‘रंगीत’ या सिक्कीममधून वाहणाऱ्या दोन महत्त्वाच्या नद्या. चांगल्या पर्जन्यमानामुळे या दोन्ही नद्यांना मुबलक पाणी असतं. हिमालयाच्या शेजारामुळे थंडीही सिक्कीममध्ये चांगलीच पडते. तापमान इतकं खाली उतरतं की या नद्यांचं पाणीही गोठून जातं. सिक्कीमच्या एकूण भूभागाच्या ८० टक्के भूभाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. सिक्कीममध्ये एक राष्ट्रीय उद्यान आणि सहा वन्यजीव अभयारण्यं आहेत. या सात संरक्षित क्षेत्रांनी सिक्कीमच्या एकूण भूभागाच्या ३० टक्के भाग व्यापला आहे. सन १९१४ मध्ये सिक्कीमच्या तत्त्कालीन महाराजांनी निसर्गाच्या संरक्षणासाठी विशेष पावलं उचलली आणि आणि अनेक जंगलांना संरक्षण दिलं. सिक्कीममधील जनतेच्या लाकडाच्या गरजा आणि पाळीव प्राण्यांच्या चराईसाठी काही खास वनं ठेवण्यात आली आणि बाकी उर्वरित जंगलांमध्ये निसर्गाच्या संवर्धन-संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात आले. सन १९७५ मध्ये सिक्कीम भारतात विलीन होईपर्यंत याच कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असे.

सन १९७५ मध्ये भारतात विलीन झाल्यावर सिक्कीममध्ये या वनांच्या संरक्षणासाठी वनविभागाची निर्मिती करण्यात आली. वनविभागाच्या उत्कृष्ट कारभारामुळे आजही मोठ्या प्रमाणावर जंगलभाग इथं टिकून आहे. आज आपण यापैकी ‘बार्से’ या वन्यजीव अभयारण्याची माहिती घेणार आहोत. सुमारे १०४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्याला ‘बार्से रोडोडेंड्रॉन अभयारण्य’ या नावानंही ओळखलं जातं. ‘कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान’ आणि पश्चिम बंगालमधील ‘सिंगलीला राष्ट्रीय उद्यान’ यांना एकमेकांशी जोडण्यात बार्से वन्यजीव अभयारण्य ‘कॉरिडॉर’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतं.

‘रोडोडेंड्रॉन’ या एप्रिल महिन्यात फुलणाऱ्या वनस्पतीसाठी प्रसिद्ध असलेलं हे अभयारण्य. या वनस्पतीपासून स्थानिक लोक सरबत आणि दारू तयार करतात. वन-उपजांचा पाहिजे तेवढाच वापर इथल्या लोकांकडून होतो. याशिवाय या अभयारण्यात अनेक प्रजातींची आमली (ऑर्किड), नेचे आणि दगडफुलं पाहायला मिळतात. या अभयारण्यात ४ ते ४.५ किलोमीटरचा ‘नेचर ट्रेल’ आहे. अत्यंत सुंदर पद्धतीनं तयार केलेला असा हा ‘नेचर ट्रेल’. साधारणतः दर एक-दीड किलोमीटर अंतरावर बसण्याची सोय केलेली आहे. याच्या शेवटच्या भागात आपण पोहोचलो की कांचनजंगा शिखराचं सुरेख दृश्य दिसतं.

नजरेचा आणि शरीराचा दोहोंचा शीण घालवणारं असंच ते दृश्य असतं. या ठिकाणी फायर-टेल्ड् मायझॉरनिससारख्या काही सुंदर पक्ष्यांचं दर्शन घडतं. इथं वनविभागाचं एक विश्रामगृह आहे. या विश्रामगृहातही निवासाची सोय आहे; पण बहुतांश पर्यटक गावातील ‘होम स्टे’मध्ये राहण्याचा पर्याय निवडतात. या अभयारण्यात पक्ष्यांच्या विविधतेची अगदी रेलचेल आहे. ‘ट्रेल’च्या सुरुवातीला असलेल्या कॅफेटेरियाच्या आजूबाजूला ब्लॅक-फेस्ड् लाफिंग थ्रश, स्पॉटेड लाफिंग थ्रश, व्हाईट-ब्राऊड् फुलव्हेटा असे अनेक पक्षी असतात. ओढ्यांच्या बाजूनं ब्राऊन डीपर आणि फोर्क्ड्-टेल यांसारखे पक्षी आढळतात. हे पक्षी इथं आढळणं म्हणजे उत्तम ओढे आणि भरपूर पाणीसाठा यांचं ते द्योतक आहे. सिक्कीमचा राज्यप्राणी असणारा ‘रेड पांडा’ इथं अर्थातच मोठ्या संख्येनं आढळतो. याशिवाय बिबट्या, लेपर्ड कॅट आदी सस्तन प्राण्यांची संख्याही चांगली आहे. तिबेटी लांडगा आणि रानकुत्रा या प्राण्यांचीही नोंद या भागात झालेली आढळते.

पृथ्वीवरील या नैसर्गिक नंदन‘वना’चं महत्त्व इथल्या लोकांनी अचूक जाणलं आहे. भारताच्या शिरपेचातल्या या निसर्गरूपी तुऱ्याची देखभाल इथल्या प्रशासनाकडून अगदी व्यवस्थित राखली जाते. राज्यात जवळपास प्रत्येक गावात ‘इको-डेव्हलपमेंट कमिटी’ स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या कमिट्यांचं कामकाजही अत्यंत सुसूत्रतेनं सुरू असतं.

आपलं निसर्गावर असलेलं अवलंबित्व इथल्या लोकांनी ओळखलं आहे. निसर्गाला न ओरबाडता, निसर्गाचा हात धरून त्यानं ठरवून दिलेल्या वाटेवर चाललो तरच आपली प्रगती होऊ शकेल हे त्यांना समजलं आहे. मी आपल्या राज्याची आणि सिक्कीमची तुलना करू इच्छित नाही. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्यं आणि बलस्थानं वेगवेगळी असतात; पण त्यांच्या ‘इको-डेव्हलपमेंट कमिटी’नं राबवलेल्या अनेक चांगल्या गोष्टी अनुकरणीय आहेत. अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि आम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांना सर्वार्थानं ‘मोकळा श्वास’ घ्यायला शिकवणारं असं हे राज्य.

माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं इथं आल्यावर नव्यानं कळतं. आपल्याला सर्वार्थानं निसर्गाच्या जवळ नेणारं हे राज्य म्हणजे ‘जरूर पाहावं असं काही’ या प्रकारात मोडणारं आहे. भूलोकीच्या नंदन‘वना’ला प्रत्येकानं भेट द्यायलाच हवी.

कसे जाल?

पुणे/मुंबई-बागडोगरा-मल्ली-जोर्थंग-सोंबारे-ओखरे-हिले-बार्से

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी

नोव्हेंबर ते मे (पहिला आठवडा)

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी - बिबट्या, भेकर, रेड पांडा, यलो थ्रोटेड मार्टिन, लेपर्ड कॅट, क्रेस्टलेस पॉर्क्युपाईन, मास्क्ड् पाम सिवेट इत्यादी.

पक्षी - सुमारे ६०० हून अधिक प्रजातींचे पक्षी : ब्लॅक-फेस्ड् लाफिंग थ्रश, स्पॉटेड लाफिंग थ्रश, व्हाईट ब्रोड फुलव्हेटा, फायर टेल्ड् सनबर्ड , हिल पारट्रीज् , ब्लड फीजंट, मोनाल फीजंट, रुफस सिबिया, ग्रेट पॅरटबिल, मिसेस गोल्ड्स सनबर्ड, यलो-बिल्ड् ब्लू मॅगपाय, व्हाईट-टेल्ड् नटहॅच, ग्रीन-बॅक्ड् टीट, बार-विंग्ड् युहिना, व्हाईट-थ्रोटेड युहिना, फायर-टेल्ड् मायझॉरनिस, ब्राऊन डीपर, फोर्क्ड्-टेल इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com