गीर; आशियातील सिंहगर्जना!

आपल्या वेगळेपणानं स्वतःची छाप निसर्गप्रेमींच्या मनावर पाडणाऱ्या अशाच एका जंगलाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हे जंगल म्हणजे एका रुबाबदार प्राण्याचं आशियातील एकमेव नैसर्गिक आश्रयस्थान आहे.
Tiger
TigerSakal

भारताच्या पश्चिम भागात गेल्यावर निसर्गाचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. त्यातही गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत गेल्यावर तर अधिकच वेगळं. पश्चिम भागात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. इथला जंगलांचा प्रकार वेगळा, पक्षी वेगळे, प्राणी वेगळे, झाडं वेगळी. आणि तरीही या सगळ्याचं मनोहारी रूप लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचं इथलं वेगळेपण इथं फिरताना सारखं जाणवत राहतं व ते क्षणाक्षणाला आनंद देऊन जातं.

आपल्या वेगळेपणानं स्वतःची छाप निसर्गप्रेमींच्या मनावर पाडणाऱ्या अशाच एका जंगलाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हे जंगल म्हणजे एका रुबाबदार प्राण्याचं आशियातील एकमेव नैसर्गिक आश्रयस्थान आहे. या जंगलाचं नाव आहे ‘गीर राष्ट्रीय उद्यान’. आशियाई सिंहांसाठीचं गुजरात राज्यातील जंगल. सिंह या प्राण्यानं आपल्या सर्वांच्या मनावर लहानपणापासूनच जादू केली आहे. अगदी ‘पंचतंत्र’, ‘इसापनीती’च्या गोष्टींपासून ते बालमनाला वेड लावणाऱ्या ‘सिम्बा’ या सिनेमापर्यंत, प्रत्येक रूपातून सिंह आपल्या मनाचा वेध घेत राहिला आहे. त्याच्या रुबाबदार रूपामुळे आपल्याला लहानपणापासूनच त्याचं आकर्षण वाटत आलेलं आहे. असं असताना गीरचं जंगल आपल्याला विशेष आनंद देऊन जातं. फक्त सिंहच नव्हे तर इथं दिसणारे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आपल्याला या जंगलाचं वेड लावतात.

या जंगलाला इतिहासही लाभला आहे. मुळात आशियाई सिंहांच्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला गीरच्या जंगलाचं महत्त्व लगेच पटेल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील अनेक भागांत सिंह अस्तित्वात होते. भारतातील सिंध प्रांत, पंजाब, गुजरात, राजस्थान, हरियाना, बिहार ते अगदी पूर्वेच्या पलामाऊपर्यंत, तर मध्य भारतात रेवा प्रांतातही सिंह अस्तित्वात होते. त्याअगोदरच्या काळात अगदी बंगालमध्येही सिंहांच्या अस्तित्वाची नोंद आढळते. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि कमी झालेला अधिवास यामुळे सिंह भारताच्या बहुतांश भागांतून नाहीसे झाले. पलामाऊ भागातील सिंह सन १८१४ पर्यंत, बडोदा, हरियाना आणि अहमदाबादमधील सिंह १८३० पर्यंत, मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील सिंह १८४० पर्यंत नष्ट झाले. याचं मुख्य कारण अनियंत्रित शिकार हेच होतं. सन १८५७ मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं जवळपास ३०० सिंहांची शिकार केल्याची नोंद आहे. ग्वाल्हेर आणि रेवा प्रांतातील सिंह १८६० पर्यंत, अलाहाबाद प्रांतातील १८६६ पर्यंत, राजस्थान भागातील १८८० पर्यंत नष्ट झाले. गुना, पालनपूर जिल्ह्यांतही सिंहांचं नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही. केवळ जुनागढ जिल्ह्यात अवघे १२ सिंह अस्तित्वात राहिले होते.

आणि यातूनच सुरू झाला गीरच्या अभयारण्याचा प्रवास. पूर्वी हा भाग जुनागढच्या नबाबाचा प्राण्यांची शिकार करण्यासाठी राखून ठेवलेला खासगी भाग होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात फक्त याच भागात आणि तेही केवळ १२ सिंह शिल्लक राहिल्यावर ब्रिटिश व्हाईसरॉयनं ही बाब नबाबाच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर नबाबानं या भागाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या भागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. स्वातंत्र्योत्तर काळातही वनविभाग, सरकार आणि काही वन्यजीवप्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे गीर आपलं गतवैभव पुन्हा प्राप्त करू शकलं आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक वर्षं भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह होता हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पुढं १९७२ मध्ये वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्याचं घोषित करण्यात आलं. आज संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर, सिंह आता गीरच्या जंगलापुरतेच मर्यादित राहिले आहेत. आज सुमारे १४१२ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रात हे जंगल पसरलेलं आहे. यापैकी सुमारे २५८ चौरस किलोमीटर भाग हा राष्ट्रीय उद्यान म्हणून, तर सुमारे ११५३ चौरस किलोमीटरचा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सन २०१५ मध्ये आशियाई सिंहांची चौदावी गणना घेण्यात आली. त्यात या सिंहांची संख्या सुमारे ५२३ पर्यंत पोहोचली. २०१० मध्ये ही संख्या ४११ होती, तर २००५ मध्ये ३५९. सन २०१५ च्या गणनेनुसार जुनागढ जिल्ह्यात २६८ सिंह होते, सोमनाथ जिल्ह्यात ४४, अमरेली जिल्ह्यात १७४, तर भावनगर जिल्ह्यात ३७ सिंह होते. हा सर्व भाग गीर जंगल आणि त्याच्या आसपासचा आहे. केवळ १२ ते सुमारे ५२३ हा प्रवास अनेक लोकांच्या अथक् प्रयत्नांमुळे आणि सिंहांना मिळालेल्या संरक्षणामुळे शक्य झाला.

गीरच्या जंगलातून सात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्या वाहतात. हिरन, शेत्रुंजी, माचुंद्री, दातर्डी, शिंगोडा, गोदावरी, रावल या नद्यांमुळे गीरच्या जंगलातील अनेक पशू-पक्ष्यांची तहान भागते. याशिवाय सुमारे ३०० ठिकाणी वनविभागानं कृत्रिम रीतीनं पाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात इतर ठिकाणचं नैसर्गिक पाणी कमी झालं की बरेचसे प्राणी-पक्षी या पाण्यावर अवलंबून असतात. गीरच्या जंगलाचा भाग हा काटेरी झुडपं आणि शुष्क झाडांनी व्यापलेला आहे. हे जंगल ‘शुष्क पानगळी’ आणि ‘शुष्क पानगळी झुडपी’ प्रकारात मोडणारं आहे. पश्चिम भारतातील हे सर्वात शुष्क पानगळी जंगल म्हणून ओळखलं जातं. सिंहांचा विचार केला तर त्यांना अशाच प्रकारच्या अधिवासाची गरज असते. त्यामुळे सिंह या भागात मोठ्या संख्येनं टिकून राहिले आहेत.

गीरच्या जंगलात सिंहांव्यतिरिक्त अनेक प्रकारचे प्राणी-पक्षीही पाहायला मिळतात. जंगलाचा भाग कोरडा, रखरखीत वाटला तरीही या वातावरणात टिकून राहणारे अनेक प्राणी-पक्षी आहेत. गीरच्या जंगलात फिरताना, सिंहांच्या पाऊलखुणा पाहत त्यांचा मग काढताना, इतर प्राणी-पक्षी बघताना ऊर अभिमानानं भरून येतो, वेगळाच आनंद मिळतो. विनाशाच्या मार्गावर असलेल्या एका अप्रतिम प्रजातीला, अर्थात वनराज सिंहाला वाचवल्याचा हा अभिमान पुढील जबाबदारीची जाणीवही करून देतो...जबाबदारी ही सिंहगर्जना अशीच टिकवून ठेवण्याची!

कसे जाल? :

पुणे/मुंबई-जुनागढ-गीर

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी :

नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल? :

सस्तन प्राणी : आशियाई सिंह, बिबट्या, रानमांजर, तरस, कोल्हा, खोकड, मुंगूस, चांदी अस्वल, रानमांजर, रस्टी स्पॉटेड कॅट, चितळ, नीलगाय, सांबर, चौशिंगा, चिंकारा, रानडुक्कर इत्यादी.

पक्षी : सर्पगरूड , तुरेवाला सर्पगरूड , बोनेलीज् इगल, मत्स्यगरूड , इंडियन ईगल आऊल, रॉक बुश क्वेल, मोर, तिसा, ब्राऊन कॅप्ड् पिग्मी वूडपेकर, बुरखा हळद्या, क्रेस्टेड ट्री स्विफ्ट, स्वर्गीय नर्तक, कापशी, सोनपाठी सुतार इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com