रणथंबोर : वाघांच्या खडकाळ साम्राज्यात

रणथंबोरच्या जंगलातील वाघ.
रणथंबोरच्या जंगलातील वाघ.

राजस्थानातील रणथंबोर व्याघ्रप्रकल्प हे भारताच्या जैवविविधतेची साक्ष देणारं एक नितांतसुंदर जंगल. अनेक ऐतिहासिक स्थळांचं सौंदर्य जपणाऱ्या राजस्थाननं निसर्गसौंदर्यही अनेक वर्षं जपलं आहे. थरच्या वाळवंटामुळे शुष्क हवामान आणि कोरडा रेताड प्रांत लाभलेल्या राजस्थानात अनेक गोष्टींचं वैविध्य आहे. तीच गोष्ट निसर्गाबाबतही. नानाविध प्रकारचे पक्षी, प्राणी, झाडं राजस्थानात आढळतात. इतकं कोरडं आणि शुष्क वातावरण असूनही रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वाघ वास्तव्याला असणं हे म्हणजे निसर्गाच्या चमत्कारासारखं आहे. त्याला कारणही तसंच खास आहे.

मुबलक पाणी, मुबलक अन्न आणि मोठ्या प्रमाणावर असलेले गवताळ मैदानांचे भाग यांमुळे रणथंबोर हे वाघांसाठी नंदनवन ठरलं आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यातील हा व्याघ्रप्रकल्प सुमारे १४११.२९ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. यापैकी सुमारे १११३.३६ चौरस किलोमीटर भाग हा कोअर आणि सुमारे २९७.९२ चौरस किलोमीटर भाग बफर क्षेत्रात मोडतो. सन १९७३ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळालेला हा प्रकल्प पहिल्या नऊ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. त्यामुळे या जंगलाला सुरुवातीपासूनच संरक्षण मिळालं. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे हळूहळू जंगलाचं क्षेत्र वाढीला लागलं. रणथंबोर एकूण दहा झोनमध्ये विभागलेलं आहे. यापैकी पाच झोन कोअर भागात, तर उर्वरित पाच झोन बफर भागात मोडतात. या दहाही झोनमध्ये पर्यटन करता येतं. पर्यटनासाठी जिप्सी आणि कँटर यांचा वापर केला जातो. कँटरमध्ये १८ पर्यटक बसू शकतात, तर जिप्सीमध्ये सहा. 

जंगलाच्या मध्यभागी एक सुंदर किल्ला आहे. रणथंबोर. यावरूनच जंगलाला ‘रणथंबोर व्याघ्रप्रकल्प’ हे नाव मिळालं आहे. या किल्ल्यावरही पर्यटनासाठी जाता येतं. पाचव्या शतकात या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं असं म्हणतात. त्यानंतर अनेक घराण्यांनी यावर राज्य केलं. राजा हमीरदेव हा रणथंबोरला लाभलेला सर्वात शूर राज्यकर्ता. अल्लाउद्दीन खिलजीनं या किल्ल्यावर आक्रमण केल्यावर हमीरदेवानं अतुलनीय शौर्यानं त्याचा पराभव केला; पण खिलजीनं त्याच्या तीन मुख्य सरदारांना फितवलं आणि राजा हमीरदेवाचा पराभव केला. यानंतर राजघराण्यातील तमाम स्त्रियांनी राजपूतांच्या प्रथेप्रमाणे किल्ल्यावर जोहार केला. चितोडच्या राणी पद्मिनीनं केलेला जोहार हा सर्वात मोठा जोहार मानला जातो. त्याखालोखाल रणथंबोरचा जोहार हा दुसरा मोठा जोहार समजतात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकूण सात दरवाजे आहेत. नौलखा पोल, हथिया पोल, गणेश पोल, सूरज पोल, दिल्ली पोल आणि सात पोल. हे सातही दरवाजे स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहेत. 

याशिवाय, भेट देण्यायोग्य अनेक इमारती किल्ल्यावर आहेत. पैकी बत्तीसखांबी छत्री खूपच सुंदर आहे. किल्ल्यावर हिंदूंची २१ मंदिरं आहेत. याशिवाय एक जैनमंदिर आणि एक मशीदही आहे. २१ मंदिरांपैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे त्रिनेत्री गणेशमंदिर. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी या त्रिनेत्री गणेशाला पत्र पाठवण्याची प्रथा आहे, त्यामुळे या त्रिनेत्री गणेशाच्या नावानं रोज हजारो पत्रं येतात. जंगलाबरोबरच या किल्ल्यालाही जरूर भेट द्यावी असा हा किल्ला आहे.

रणथंबोर जंगलं म्हणजे रखरखीत खडकाळ पट्ट्यांचा प्रदेश. जंगलाच्या कोणत्याही भागातून फिरा, इथल्या भौगोलिक रचनेमुळे तुमची हाडं खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाहीत! पण तरीही हे जंगल अतिशय सुंदर आहे. कारण, अप्रतिम लँड्स्केप्स. गवताळ प्रदेश, डोंगर, टेकड्या याचबरोबर जंगलात अनेक मोठे तलाव आहेत. तलावांच्या आजूबाजूला जैवविविधता बहरली आहे. माणिक तलाव, राजबाग तलाव, पद्म तलाव असे काही महत्त्वाचे मोठे तलाव. पद्म तलावाच्या काठावर ‘जोगी महाल’ नावाचा सुरेख महाल आहे. भारतातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडांमध्ये गणलं जाणारं वडाचं झाड या ठिकाणी आहे. 

वाघांच्या दृष्टीनं या तलावांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तलावाच्या काठी पूर्वी एक वाघीण राहत असे, तिचं नाव मछली! तिच्यामुळे रणथंबोर जगाच्या नकाशावर आलं असं म्हटलं जातं. या वाघिणीला ‘लेडी ऑफ द लेक’ असंही म्हटलं जाई. सर्वसामान्यपणे नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वाघांचं आयुर्मान तेरा ते पंधरा वर्षं असतं; पण १९ वर्षं जगलेली ही मछली वाघीण त्याला अपवाद ठरली. 

सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांनी या वाघिणीवर एक सुंदर माहितीपट बनवला आहे. रणथंबोरमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर तर आहेच; पण त्याशिवाय अनेक प्रजातींचे पक्षी, प्राणी, उभयचर तिथं आढळतात. रणथंबोरमध्ये एक झाड मोठ्या प्रमाणावर आढळतं ते म्हणजे ‘ढोंक.’ अतिशय टणक लाकूड असलेलं हे काटेरी झाड. आरवली पर्वतरांगांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आहे. कोणत्याही टोकाच्या वातावरणात हे झाड तग धरू शकतं. इथले स्थानिक लोक या झाडाचा उपयोग निरनिराळ्या कारणांसाठी करतात.

रणथंबोर जंगलाच्या इतिहासात एका व्यक्तीचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं, ते म्हणजे फतेहसिंह राठोड. रणथंबोरमध्ये पर्यटन फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय फतेहसिंह यांनी आयुष्याची चाळीस वर्षं रणथंबोर जंगलाच्या संवर्धन-संरक्षणासाठी खर्च केली. 

सन १९५५ मध्ये ‘सवाई माधोपूर वन्यजीव अभयारण्य’ म्हणून या जंगलाला मान्यता मिळाली होती. १९७३ मध्ये त्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाल्यावर १९८० मध्ये या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचाही दर्जा देण्यात आला. १९८४ मध्ये ‘सवाई मानसिंह अभयारण्य आणि कैलादेवी अभयारण्या’चाही या व्याघ्रप्रकल्पात समावेश करण्यात आला. जंगलाच्या या सर्व वाटचालीत फतेहसिंह राठोड यांचं मोठं योगदान मानलं जातं. नजर जाईल तिथपर्यंत सपाट खडकाळ मैदानं, खडकाळ जमिनीतही बहरलेलं निसर्गवैभव, पाण्याच्या अप्रतिम जागा, जंगलाच्या मध्यभागी असलेला रणथंबोर किल्ला, या सगळ्याच्या साक्षीनं समृद्ध झालेली जैवविविधता यामुळे पर्यटक रणथंबोरच्या प्रेमात न पडला तरच नवल.

कसे जाल? - पुणे/मुंबई-सवाई माधोपूर-रणथंबोर किंवा पुणे/मुंबई-जयपूर-सवाई माधोपूर-रणथंबोर.

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे.

काय पाहू शकाल? : वाघ, काळवीट, Small Indian Civet, Palm Civet, मुंगूस, तरस, रानकुत्री, Sloth Bears, Hedge Hog. 

पक्षी : सुमारे ३२० हून अधिक प्रजातींचे पक्षी : मोर, Grey Francolin, Painted Spurfowl, Hoopoe, Lesser Whistling Teals, Indian Roller, Stork Billed Kingfisher, Pied Kingfisher, Sirkeer Malkoha, Bown Hawk Eagle,, Great Thick-knee.

वृक्ष : ढोंक, पिंपळ,  बोर, खैर, तेंदू.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com