esakal | वाचकावर चेटूक करणारी आर्त प्रेमकथा (अनुजा जगताप)
sakal

बोलून बातमी शोधा

book review

वाचकावर चेटूक करणारी आर्त प्रेमकथा (अनुजा जगताप)

sakal_logo
By
अनुजा जगताप

कॉलेजमध्ये असताना "गॉन विथ द विंड' हा चित्रपट बघितल्यानंतर मनात रेंगाळत राहिली स्कार्लेट ओ हारा. खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालेली स्कार्लेट त्या वयात बंडखोर; पण हळवी नायिका म्हणून आवडून गेली होती. मग एकदा टॉलस्टॉयचं "ऍना कॅरेनिना' वाचनात आलं. विवाहित असलेल्या ऍनाला प्रेमाचा अर्थ कसा लागला असेल? तिला प्रेम म्हणजे आयुष्य फुलवणारा बगीचा वाटला असेल, की आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा वैशाखवणवा? "प्रेमा'कडं केवळ रोमॅंटिक अँगलमधून न बघणाऱ्या या नायिकांच्या मांदियाळीत अजून एकीची भर पडली ती राणी कर्णिक या नायिकेची! ही नायिका अशा-तशा लेखकानं रेखाटलेली नाही. ती उतरली आहे प्रसिद्ध लेखक विश्राम गुप्ते यांच्या लेखणीतून. त्यांच्या "चेटूक' या कादंबरीत. वसंताच्या प्रेमात वेडी झालेली राणी खरंतर प्रेमात पडलीये "प्रेम' या संकल्पनेच्या. कोवळ्या वयात वाचलेल्या फडके-खांडेकर-बालकवी यांच्या कथा-कवितांमधून "प्रेमा'च्या प्रतिमेत गुंगलेली राणी खऱ्या प्रीतीच्या शोधात निघते आणि एका संघर्षाला सुरवात होते...
"ईश्वर डॉट कॉम', "नारी डॉट कॉम' अशी वेगळ्या वाटेवरची अफलातून पुस्तकं लिहिणारे गुप्ते "चेटूक' या कादंबरीतून पन्नास-साठच्या दशकातल्या नागपुरातल्या टिपणीसपुऱ्यातल्या दिघ्यांच्या घरामधली ही प्रेमकथा सांगतात. दिघ्यांच्या या घरात प्रत्येकावरच कसलं न कसलं चेटूक आहे. अमृतरावांवर गांधीवादाचं, नागूताईवर कुटुंबाचं, यशवंतावर प्रपंचाचं, वसंतावर राणीचं आणि राणीवर "प्रीती'चं!
यशवंताच्या लग्नात सीमांतपूजनाला राणी फुलराणीच्या वेशात हातात हिरवा चुडा घालून, हिरवी साडी नेसून कविता गुणगुणत वसंताला म्हणते : ""मी तुमच्याशी गांधर्वविवाह करायला आली आहे.'' आलेलं वऱ्हाड या झंझावातानं सैरभैर होतं. दुसऱ्याच दिवशी राणी-वसंताचं लग्नही लागतं. मात्र लग्नाच्या दोन-तीन दिवसांनंतर राणीला प्रश्न पडतो : "दिघ्यांच्या या मातीच्या सारवलेल्या घरात मी नेमकं काय करायला आले आहे? काय झालं होतं आपल्याला त्या रात्री?' प्रीतीची कवनं गुणगुणारी आणि आत्म्याच्या गोष्टी बालणारी राणी वसंताचा स्पर्श झाल्यावर गोठून जाते. दगडाची होऊन जाते. यानिमित्तानं गुप्ते यांनी प्रेम म्हणजे शारीर की अशारीर हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न सुंदरपणे मांडला आहे. त्या काळातल्या, सतरा-अठरा वयाच्या राणीला आपल्या तरल प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ नये हे वाटणं आजची पिढी रिलेट करू शकेल का, असा प्रश्न मनात आला.

"चेटूक' जरी राणीमुळं मनाचा ठाव घेत असली, तरी गुप्ते यांनी चितारलेली इतर व्यक्तिचित्रं- विशेषत: नागूताईचं खूपच प्रभावी आहे. घरात घडणाऱ्या घटना आणि त्यांच्या मनातली आवर्तनं वाचावीत अशीच. राणीच्या प्रेमातलं चेटूक जावं, ती आपल्याला वश व्हावी म्हणून सलमाबीकडून "हॉडॉप सिक'चा मंत्र आणणारा वसंताही लेखकानं तितक्‍याच ताकदीनं उभा केला आहे. गुप्ते यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्यं म्हणजे कोणत्याही घटना वा प्रसंगांचं बाराकाईनं केलेलं वर्णन, शिवाय मनोविश्‍लेषणातून नात्यांतले उलगडणारे पदर. दिघ्यांचं मातीचं घर, त्यातलं अंगण, छपरीतली बैठक, अमृतरावांचा तक्तपोस, चूल, ओठाण... हे सर्व चित्रणातून डोळ्यांसमोर जिवंत उभं राहतं. कथानकातली राणी प्रीतीचा शोध घेता घेता कोणत्याही नात्याचा, सामाजिक भानाचा इतकंच काय पोटच्या पोरांचाही विचार न करता पुढंपुढं जात राहते.

फेसबुकवर लिखाण करून लेखक झालोय असं वाटणाऱ्या आणि कमी शब्दांत जास्तीत जास्त माहितीचाच स्फोट हव्या असणाऱ्या आजच्या वाचकाला कदाचित ही कादंबरी पसरट, रेंगाळत जाणारी वाटू शकेल; पण ज्याप्रमाणं शास्त्रीय संगीत ऐकताना सुरवातीची आलापी ही वातावरणनिर्मिती करून सुरावटींचं एक मोहोळ तयार करणारी हवी, तशीच काहीशी गुप्ते यांची शैली आहे. त्यामुळंच कादंबरी उत्तरोत्तर चढत जाते.
रोहन प्रकाशनानं त्यांच्या "मोहर' या मुद्रेअंतर्गत नव्या स्वरूपातलं "चेटूक' नुकतंच प्रकाशित केलं आहे. विश्राम गुप्ते यांचं नाव आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांनी कव्हरवर केलेली जादू यामुळं कादंबरी पटकन हातात घ्यावीशी वाटते. वाचायला सुरवात होते आणि गुंतवून ठेवत, अस्वस्थ करत ही कादंबरी अंतर्मुख करून जाते. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणं कादंबरीत्रयीतली "चेटूक' ही पहिली कादंबरी आहे. पुढचे दोन भाग येईपर्यंत ही तगमग अशीच...

पुस्तकाचं नाव : चेटूक
लेखक : विश्राम गुप्ते
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (020-24480686)
पानं : 334, किंमत : 350 रुपये

loading image
go to top