
भाषा व्यक्तिमत्त्वाचा पाया
- अपूर्व ओक
आजकाल सर्रास मांडला जाणारा युक्तिवाद म्हणजे भाषा हे फक्त एक संवादाचे माध्यम आहे. इंग्रजी शाळांपुरता तो फक्त एक विषय आहे. खरं बघितलं तर भाषा हा व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे. तो कच्चा राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मातृभाषा ही मेंदूची ऑपरेटिंग सिस्टिम आहे. इतर भाषा या सॉफ्टवेअरसारख्या असतात; पण ऑपरेटिंग सिस्टिम ही तुमची मातृभाषा असते. आज तीच ऑपरेटिंग सिस्टिम पालक हिरिरीने करप्ट करत चाललेत.
गेल्या आठवड्यात मुलाला एका बालनाट्याला घेऊन गेलो होतो. नाटक संपल्यावर पुढच्या रांगेतील दोन आया एकमेकांशी बोलत बोलतच उठल्या, ‘नाटक छान होतं गं; पण याला अर्धे शब्द कळत नाहीत. मग सांगत बसावं लागतं. म्हणून नको वाटतं.’’ असं काही ऐकलं की कितीही टाळायचा म्हटला तरी मराठी पालकांच्या मराठीतून शिक्षणाबद्दल असलेल्या अनास्थेवरून त्रागा होतोच. आता बघा, हा मुलगा शंभर टक्के इंग्रजी माध्यमात शिकणारा मराठी मुलगा होता.
त्याला अगदीच जुजबी मराठी येत होतं. कारण ही मुलं दुसरी-तिसरीत मुळाक्षरांपर्यंत पोचतात. शाळेत, आणि म्हणून घरीही इंग्रजीत संवाद असतो. या पालकांना त्याने मराठी नाटक बघावं असं वाटतं, ते त्याला कळावं असं वाटतं; पण मराठीतून शिकावं हे मात्र त्यांना वाटत नाही. याहून वाईट म्हणजे शब्दांचे अर्थ सांगत बसावे लागतात. म्हणून मग नाटकच नको वाटतं. परिणामी, काही दिवसांनी पालक हा खटाटोप बंद करणार आणि मग मराठीच्या नावे आनंदी आनंद.
अलीकडेच एक बातमी वाचली, की ठाणे महापालिका आता नवीन सीबीएसई शाळा काढणार आहेत त्या पालिकेच्या शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाच्या करणार. आधी मुंबई महापालिकेने मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली हेच केले.
दुसरीकडे नवीन शैक्षणिक धोरण बघितले, तर त्यात मातृभाषेतून शिक्षणाची ‘शिफारस’ केलेली आहे. ‘शिफारस’ शब्द महत्त्वाचा, कारण कुठेही त्याची अट किंवा सक्ती नाही; तरीही पंतप्रधानांसह केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांनी मातृभाषा शिक्षण हेच योग्य आहे, ही गोष्ट उघडपणे बोलून तरी दाखवलेली आहे. राज्याचे विद्यमान शिक्षणमंत्रीही स्पष्टपणे यावर भाष्य करतात. मग पालिकास्तरावर मराठीला मारून इंग्रजी शाळा उभ्या राहतात, ही गोष्ट दिसत नसावी?
जागतिक स्तरावर मातृभाषेकतून शिक्षणाचे महत्त्व अनेकदा अधोरेखित होत आलेले आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ हे आग्रहाने सांगतात की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, ज्ञानग्रहण हे मातृभाषेतून व्हायला हवे. तो प्रत्येकाचा हक्क आहे. इंग्रजी काय, इतर कुठलीही भाषा शिकणे चांगलेच; परंतु एखादी भाषा शिकणे आणि एखाद्या भाषेतून सगळं शिकणे यात किती मोठा फरक आहे, हे अतिशय सहजपणे इंग्लिश माध्यमाची निवड करणाऱ्या पालकांना मात्र कळतच नाही.
काही मोजक्या शाळा, ज्या आग्रहाने मातृभाषेतून शिक्षणाचा प्रसार, प्रचार आणि पुरस्कार करतात त्यांचा अभिमान वाटतो. ठाण्यात या वर्षीच्या नववर्ष शोभायात्रेत डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर या शाळेने मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगणारा चित्ररथ मांडला होता. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी शाळेनेही मातृभाषा शिक्षणाचा प्रचार करणारे फलक शहरात लावून त्यांची मातृभाषेतून शिक्षणावरची निष्ठा व्यक्त केली. या शाळांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर शाळांनीही पुढे यायला हवे. पालकांचे प्रबोधन करायला हवे. भाषा शिकणे आणि भाषेतून शिक्षण घेणे यातला फरक विज्ञानाच्या आधारे विशद करायला हवा. जेणेकरून भरकटलेला पालक योग्य निर्णय घेऊ शकेल. अन्यथा वरील नाटकाच्या वेळी ऐकलेला संवाद भविष्यात कदाचित असा असेल, ‘नो, दे डोन्ट मेक मराठी प्लेज एनिमोअर, देअर इज नो ऑडियन्स...’