आर्टसचं काय करायचं...?

उत्तम कांबळे
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

समाजाला डॉक्‍टर, इंजिनिअर, संशोधक यांची जशी गरज असते, तशीच आवश्‍यकता विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक यांचीही असते. समाजाची मूल्यात्मक आणि वैचारिक जडणघडण हा वर्ग करत असतो आणि ही जडणघडण प्रामुख्यानं होते ती आर्ट्‌स अर्थातच कला शाखेच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांमधल्या अशा प्रकारच्या सुप्त गुणांना सुयोग्य आकार देण्याचं काम ही शाखा करत असते. मात्र, या शाखेकडं जायला विद्यार्थी तितकेसे राजी नसतात, असं गेल्या अनेक वर्षांपासूनचं चित्र आहे. या शाखेत प्रवेश घेण्यापासून पाल्यांना परावृत्त करण्याकडंच पालकांचाही कल असतो. या शाखेविषयी एवढी अनास्था का निर्माण झाली आहे ?

समाजाला डॉक्‍टर, इंजिनिअर, संशोधक यांची जशी गरज असते, तशीच आवश्‍यकता विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक यांचीही असते. समाजाची मूल्यात्मक आणि वैचारिक जडणघडण हा वर्ग करत असतो आणि ही जडणघडण प्रामुख्यानं होते ती आर्ट्‌स अर्थातच कला शाखेच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांमधल्या अशा प्रकारच्या सुप्त गुणांना सुयोग्य आकार देण्याचं काम ही शाखा करत असते. मात्र, या शाखेकडं जायला विद्यार्थी तितकेसे राजी नसतात, असं गेल्या अनेक वर्षांपासूनचं चित्र आहे. या शाखेत प्रवेश घेण्यापासून पाल्यांना परावृत्त करण्याकडंच पालकांचाही कल असतो. या शाखेविषयी एवढी अनास्था का निर्माण झाली आहे ?

दहा जुलैच्या एका संततधारेच्या सायंकाळी नाशिकच्या थोरात सभागृहात जमलेल्या गुणवान विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समारंभातला प्रमुख पाहुणा प्रश्‍न विचारू लागला.
मेडिकलला ज्यांना जायचं आहे, त्यांनी हात वर करावेत.
खूप हात वर झाले.
इंजिनिअरिंगला ज्यांना जायचं आहे, त्यांनी हात वर करावेत.
आणखी हात वर झाले.
आयआयटीसाठी ज्यांना ट्राय करायचा आहे, त्यांनी हात वर करावेत.
अजून काही हात वर झाले.
कॉमर्स फॅकल्टी
हातांची संख्या कमी झाली होती.
आता लास्ट क्वेशन ः आर्ट फॅकल्टी...
वर आलेले हात दिसेनात. कारण, बहुतेकांनी आपले हात वर जाऊ नयेत यासाठी खालच्या खाली दाबून ठेवले होते. काहींनी हातावर हात ठेवून घडी घातली होती. काही पालक आपल्या मुलाचे हात वर जाणार तर नाहीत ना, याची करड्या नजरेनं काळजी घेत होते...
प्रश्‍नकर्त्यांची मोठी पंचाईत झाली...पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत तो नजर टाकत होता; पण वर आलेले हात मात्र त्याला दिसत नव्हते.
‘ओके. दुसऱ्या विषयाकडं वळू या,’ असं म्हणत तो बोलत राहिला.

मी गर्दीतच बसून हे दृश्‍य पाहत होतो... मोठं गंभीर दृश्‍य आहे, असं वाटत होतं. काही वर्षांपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून पहिल्या ५० मुलांची गुणवत्तायादी जाहीर व्हायची. गुणवत्तायादी जाहीर करणं म्हणजे जणू काही विषमताच जाहीर करणं याचा साक्षात्कार बोर्डाला झाला. मग यादी बंद पडली. आता गुण जाहीर होतात. गेल्या ६०-७० वर्षांत बोर्डाला अजूनही अशी कळ सापडलेली नाहीय की ज्यातून विषमता व्यक्त होणार नाही. पाठ्यपुस्तक मंडळाचंही नेमकं तसंच आहे. जग चंद्रावर जातं तेव्हा आपल्याकडं डोंगराचे स्तर किती आणि कसे असतात, हे शिकवलं जातं... पिंडाला शिवणारे कावळे अपवादानंच दिसतात; पण खडे चोचीत घेऊन मडक्‍यात टाकणारे कावळे मात्र पानापानांत दिसतात... असो. आर्ट्‌ससाठी कुणीच हात वर करत नाही. अपवादानंच हात वर होतात... त्यातही ज्यांना कुठंच प्रवेश मिळत नाही...व्यावसायिक अभ्यासक्रमाला जाता येत नाही, असे आर्ट्‌सकडे वळतात... आर्ट गाळात चाललं आहे, याची चाहूल १९९० च्या दशकाच्या आसपासचलागत होती. सरकारचं लक्ष नव्हतं. होत ते शिक्षकांचं. कारण त्यांच्या रोजी-रोटीचा किंवा नोकरीचा प्रश्‍न होता... घरोघर फिरून ते आर्टसाठी विद्यार्थी गोळा करतात...त्यांना एमएपर्यंत उत्तीर्ण करण्याची हमी देतात... तासाला न बसण्याचीही सवलत देतात आणि विशेष म्हणजे, आपण दिलेलं वचन पूर्ण करून दाखवितात. त्यामुळं दोन गोष्टी घडतात, एक ः गुरुजींची नोकरी टिकते आणि दोन ः वर्गाचं तोंड न बघता विद्यार्थी झटपट पास होतात. आपल्या शिक्षणव्यवस्थेतला हा चमत्कार आहे. आपल्या समाजात एकूणच चमत्काराला खूप महत्त्व आहे. कुठं होत नाहीत चमत्कार? बुवा-बाबापासून राजकारणापर्यंत ही सारी व्यवस्था चमत्कारांनी भरलेली आहे. त्या अर्थानं तसे आपण संपन्न आहोत. आपली बीपीएल लाइन खाली जात असली तरी मिरॅकल लाइन मात्र वर वर येत चमकताना दिसते...तर आर्ट्‌स शाखा आचकेउचके घेत टिकून राहिलीय ती गुरुजींच्या पुण्याईमुळं...त्यांच्या कौशल्यामुळं... अस्ताला चाललेल्या विषयांचं महत्त्व ते पटवून देतात...रेडिओवर संस्कृतमधून बातम्या सुरू आहेत म्हणून तिथं रोजगाराच्या संधी खूप आहेत, असं सांगतात. पाली भाषेतले स्तूप खूप सापडायला लागलेत म्हणूत पाली शिका वगैरे वगैरे सांगितलं जातं. काही जण आकर्षितही होतात. विषय सुरू राहतो.

एकूणच आर्ट्‌सकडंं होणारं दुर्लक्ष आणि तिच्याविषयी निर्माण होत असलेली अनास्था एक समाज, एक देश म्हणून चिंतेची बाब बनत आहे. जीवन किंवा एकूणच समाज केवळ व्यवसायाभिमुख शाखांवर कधी समृद्ध होत नाही. सुसंस्कृतही होत नाही. डॉक्‍टर जसे पाहिजेत, अभियंते जसे पाहिजेत, तसे समाजाला कलावंत, विचारवंत, समीक्षक, विश्‍लेषक, अभ्यासक, सिद्धान्त मांडणारे, होकायंत्र म्हणून समाजरूपी जहाजाला दिशादर्शन करणारे अशा सगळ्यांची गरज असते. शस्त्राबरोबर, उपकरणाबरोबर खेळणारे जसे लागतात, तसे शब्दांशी मैत्री करणारेही लागतात. ज्या समाजात वेगवेगळे समाजशास्त्रज्ञच नसतील, तर तो समाज नेमका कुठं जाईल? मूल्यं, तत्त्वज्ञानं, सिद्धान्त तयार करणारे नसतील तर समाज एकतर्फी प्रवास करायला लागेल; पण दिवसेंदिवस आपलं शिक्षण व्यवसाय, नफा-तोटा, मॉल, कंपन्या यांचाच हात पकडायला लागलं असल्यानं व्यवसायातल्या लाटा जशा बदलतील, तसे अभ्यासक्रम बदलतात. शिक्षण जीवनाभिमुख पाहिजे की व्यवसायाभिमुख? शिक्षण मूल्याधिष्ठित पाहिजे की बाजाराधिष्ठित, शिक्षण स्वयंकेंद्री माणूस बनवणारं पाहिजे की समाजाभिमुख बनवणारं, शिक्षण प्रयोग करणारं पाहिजे की १०-१५ वर्षांचा इव्हेंट? असे कळीचे प्रश्‍न उभे आहेत आणि तूर्त तरी बाजाराचाच विजय होतोय, असं चित्र निर्माण होत आहे.

जीवनाधिष्ठित शिक्षण म्हणजे कुणी नोकऱ्याच करू नयेत, असा टोकाचा अर्थ अभिप्रेत नाही; पण लाटांवर शिक्षण चिकटवणं काही बरोबर नाही. मध्यंतरी डीएड, बीएड, बीपीएड, एमएसडब्ल्यू वगैरेच्या खूप लाटा आल्या, विरल्या आणि बेकारांची तुफान फौज तयार करून गेल्या. शिक्षणसम्राटांच्या तिजोऱ्या भरल्या आणि बेकारांच्या तिजोऱ्या मोकळ्या झाल्या. व्यवसायाचं भविष्य काय, त्याचे मार्ग कोणते याचा विचार न करताही व्यवसाय आणि शिक्षण यांचं नातं गच्च केलं जात आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे माणसाची समग्र जडणघडण, शिक्षण म्हणजे प्रयोग, शिक्षण म्हणजे समाज सुसंस्कृत, विचारी बनवण्याचं साधन या कल्पना आता कुठल्या कुठं उडून गेल्या आहेत. परिणामी, ‘आर्ट्‌सला जाणार’ यासाठी एक हातही वर झाला नाही. याचा अर्थ असाही नव्हे, की आर्ट्‌सला गेल्यावर समाजाचे सारेच्या सारे अभौतिक प्रश्‍न सुटतात; पण हेही खरं आहे, की कला शाखेत माणसाचा विचार, त्यानं जन्माला घातलेल्या जगाचा विचार, माणसाचा आतला आणि बाहेरचा विचार सर्वाधिक घडतो. माणसाचा नागरिक आणि नागरिकांचा समूह बनवण्यासाठी तत्त्वज्ञान लागतं, मूल्यं लागतात, संस्कृती लागते, माणसाकडून माणसाकडं करण्यासाठी एक प्रवास लागतो. मात्र, आता सारा प्रवास माणसाकडून वस्तूकडं आणि शिक्षणाकडूनही वस्तूकडं सुरू असल्याचं सरसकट चित्र दिसत आहे. व्यवसाय हाही मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला तरी आपल्याला कधीतरी विचार करावा लागेलच की आपल्याला डॉक्‍टर किती हवेत, अभियंते किती हवेत...पण तसं होत नसल्यानं लोकप्रिय व्यावसायिक शिक्षणाचा महापूर येतो...अन्य सामाजिक शाखांचा संकोचही होतो... बिनव्यावसायिक शाखांचं महत्त्व काय, त्यांचा उपयोग काय, त्यातल्या यशोगाथा काय, समाजाच्या लांब प्रवासात त्यांची उपयुक्तता काय आणि एकूणच माणसाची जडणघडण करण्यात त्यांची उपयुक्तता काय हे कुणी मुलांना नीट समजून सांगतात की नाही, याविषयी शंका आहे. विशेष म्हणजे मुलं स्वतःची स्वप्नं पूर्ण करतात की कुटुंबातल्या रिमोट कंट्रोलची हे तपासण्याची व्यवस्था नाहीय. मानवी जीवनातून भाषा, समाजशास्त्रं, मूल्यं आदींची शिकवण देणाऱ्या शाखाच ‘आयसीयू’मध्ये जाऊ लागल्या...डिलिट होऊ लागल्या तर पुढं तयार होणारा माणूस कसा असेल? माणूस नुसताच राजकीय नसतो, तो नुसताच व्यावसायिकही नसतो, तर त्यापलीकडं आणखी कुणीतरी असतो... तो शोधायचा आणि टिकवायचा कसा, हा तर खरा प्रश्‍न आहे... शिक्षणाचा हब, शिक्षणाचा मॉल आणि शिक्षणाचा बाजार भरवणारे सम्राट आणि त्यात ग्राहक म्हणून जाणारे या सगळ्यांनीच विचार करायला हवा... आर्ट्‌सला मठ्ठ पोरंच जातात... त्यांना करिअर नसतं, ती दरिद्रीच राहतात, या कल्पनांमधूनही कधीतरी मोकळं व्हायला हवं...

Web Title: Artasacam what to do ...?