आश्वासक पूर्वतयारी

आश्वासक पूर्वतयारी

दिल्लीत झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी पदकांचं लक्ष्य साधलं. चुरस असलेल्या ३० पैकी १५ सुवर्णपदकं भारतानं जिंकली. त्याचबरोबर एकंदरीत ८२ पदकांपैकी ३० पदकांचा भारतीयांनी वेध घेतला. ऑलिंपिक क्रीडास्पर्धा शंभर दिवसांवर असताना भारतीय नेमबाजांची ही कामगिरी नक्कीच अपेक्षा उंचावणारी आहे. स्पर्धेतील यशाबरोबरच नेमबाजांची कामगिरी ऑलिंपिक क्रीडास्पर्धेची पूर्वतयारी आश्वासक असल्याचंच दर्शवत आहे.

सन २०१९ मधील स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या कामगिरीचा आलेख चढता होता. कोरोनाच्या महामारीमुळे सरावही थांबल्यावर कामगिरीचा आलेख चढाच राहिला याचं विशेष समाधान वाटतं. या विश्वकरंडक स्पर्धेत अनेक नव्या प्रकारांचा समावेश होता. आपण यजमान असल्यानं त्यात आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर असणं, तसंच पदकसंख्या जास्त असणं अपेक्षितच होतं; परंतु एक मार्गदर्शक म्हणून प्रत्येक स्पर्धेत खेळाडू कशा प्रकारे खेळला आणि दडपणाचा सामना त्यानं कसा केला हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. एकंदरीत पाहिल्यास ऑलिंपिकसाठी आपली पूर्वतयारी अचूक नेम साधत आहे!

नवी दिल्लीतील स्पर्धेत जवळपास ५० देशांचा सहभाग होता. रायफल प्रकारात हा सहभाग अपेक्षेपेक्षा जास्त होता. त्यामुळे यातील स्पर्धा जास्त चुरशीची झाली. कोरोनाची साथ कायम असताना या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर देश सहभागी झाले. या देशांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास मला फार महत्त्वाचा वाटतो. हे जागतिक स्तरावर भारताची उंचावणारी प्रतिमा दाखवते, तसंच जागतिक नेमबाजीत भारतात स्पर्धा केल्यास त्याचा आपल्या नेमबाजांना फायदा होईल याचीही खात्री दिसते. आपल्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीचं हे फलित आहे.

हे मनोगत आहे भारतीय नेमबाजीच्या प्रशिक्षक दीपा देशपांडे यांचं. नेमबाजीच्या सध्याच्या स्थितीविषयी त्यांच्याशी आणखी काही मुद्द्यांवर साधलेली ही तपशीलवार बातचीत :

प्रश्न : आपण या स्पर्धेत जिंकलेल्या १५ पैकी ८ सुवर्णपदकं सांघिक स्पर्धेत आहेत. त्यांचा ऑलिंपिकमध्ये समावेश नाही, त्यामुळे पदक क्रमवारीतील वर्चस्व नेमकं काय सांगतं ?
 नव्यानं समावेश केलेल्या स्पर्धाप्रकारांमुळे आपली पदकसंख्या वाढली यात शंका नाही; परंतु फक्त ऑलिंपिक स्पर्धाप्रकारातील पदकसंख्या मोजली तरीही भारत पदकक्रमवारीत अव्वलच राहिला असता. यातील काही प्रकारांतील आपली कामगिरीच बोलकी आहे. पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन पुरुषांच्या गटात आपल्या तिन्ही नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे या रायफलप्रकारात सर्वच देशांचा चांगला सहभाग होता, त्यामुळे ही कामगिरी उल्लेखनीय आहे. दहा मीटर एअर रायफल प्रकारात आपली मक्तेदारी आहेच; पण आता ५० मीटर प्रकारातही आपल्या नेमबाजांची कामगिरी चांगली होते आहे. ऑलिंपिकच्या तयारीच्या दृष्टीनं हे खूपच आश्वासक आहे.

प्रश्न : ऑलिंपिकमध्ये असलेल्या महिलांची १० मीटर एअर रायफल, तसंच ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारतास वैयक्तिक पदक नाही?
 या दोन्ही प्रकारांत वैयक्तिक पदक नसलं तरीही भारताची आघाडीची नेमबाज अंजुम मौदगिल हिनं एअर रायफलमध्ये चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याचबरोबर अंतिम फेरीतील सुरुवातीचे दोन शॉट्स वगळता तिची कामगिरी उत्तम होती. यापुढील तिच्या सरावात त्यादृष्टीनं बदल करता येईल. पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातही आपल्या मुली चांगली प्रगती करत आहेत. हवामान प्रतिकूल असताना कामगिरीत सातत्य राखण्याचा सराव त्या करत आहेत. वैयक्तिक प्रकारात जरी अपेक्षित कामगिरी झाली नसली तरी त्यानंतर झालेल्या सांघिक प्रकारातील मुलींची कामगिरी खूपच आश्वासक आहे. ज्या संयमानं सर्वच मुलींनी आणि विशेषकरून तेजस्विनीनं नेमबाजी केली ती कौतुकास्पद आहे. यामुळे तिचा आणि आमचाही आत्मविश्वास वाढला आहे.

प्रश्न : दिल्लीच्या स्पर्धेनंतर एकही विश्वकरंडक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑलिंपिकपूर्वी अपेक्षित नाही, त्याचबरोबर ही स्पर्धा जवळपास दीड वर्षानंतर....त्यामुळे कामगिरीकडे कसं बघता येईल ?
 ऑलिंपिकपूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा  फारसा अनुभव आपल्याला लाभणार याचा अंदाज आम्हाला सुरुवातीपासूनच होता. कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता हा ऑलिंपिकच्या पूर्वतयारीतील सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्यामुळेच ऑक्टोबरपासूनची सर्व सरावशिबिरांची त्यादृष्टीनं पूर्वतयारी करण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील निवडचाचण्या हाही सरावातलाच भाग होता. त्यानंतर झालेली ही विश्वकरंडक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा-अनुभवाच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची होती. प्रशिक्षक म्हणून आम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे.  या स्पर्धेतील अनुभव आगामी महत्त्वाच्या तीन महिन्यांच्या योग्य नियोजनासाठी खूपच उपयोगी पडेल. बहुतेक सर्व खेळाडूंची तयारी चांगली झाली आहे. स्पर्धात्मक सरावाच्या दृष्टीनं आता पुढील कार्यक्रम आखण्यात येईल. मे महिन्यातील युरोपीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना पाहुणे म्हणून खेळू देण्याची भारतीय संघटनेची विनंती मान्य करण्यात आली आहे. याचा ऑलिंपिकसाठी फायदा होणार आहे.

ऑलिंपिक प्रकारातील भारतीयांची कामगिरी
दहा मीटर एअर रायफल, पुरुष : दिव्यांशसिंह पन्वरला ब्राँझ (दोघे पात्र)
दहा मीटर एअर रायफल, महिला : एकही पदक नाही (दोघे पात्र)
५० मीटर रायफल थ्री पोझिशन, पुरुष : ऐश्वर्यप्रतापसिंह तोमरला सुवर्ण (दोघे पात्र)
५० मीटर रायफल थ्री पोझिशन, महिला : एकही पदक नाही (एक पात्रता)
१० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी : दिव्यांशसिंह पन्वर आणि एलावेनिल वालारिवान यांना सुवर्ण
१० मीटर एअर पिस्तूल, पुरुष : सौरभ चौधरीला रौप्य, अभिषेक वर्माला ब्राँझ (दोघे पात्र)
२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल, पुरुष : विजयवीर सिधूला रौप्य (एकही नाही)
१० मीटर एअर पिस्तूल, महिला : यशस्विनीसिंह देसवाल हिला सुवर्ण, तर मनू भाकरला रौप्य (दोघी पात्र)
२५ मीटर पिस्तूल, महिला : चिंकी यादवला सुवर्ण, राही सरनौबतला रौप्य, तर मनू भाकरला ब्राँझ (दोघी पात्र)
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी : सौरभ चौधरी - मनू भाकरला सुवर्ण, तर अभिषेक वर्मा - यशस्विनसिंह देस्वाल यांना ब्राँझ.
पुरुष ट्रॅप : पदक नाही, तसंच पात्रताही नाही
महिला ट्रॅप : पदक नाही, तसंच पात्रताही नाही
पुरुष स्किट : पदक नाही (दोन पात्रता)
महिला स्किट : ब्राँझ (एकही नाही)
ट्रॅप मिश्र दुहेरी : पदक नाही, पात्रताही नाही
                     (शब्दांकन : संजय घारपुरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com