देखणा शिल्पाविष्कार

देखणा शिल्पाविष्कार

नुग्गेहळ्ळीचं श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिर.
नुग्गेहळ्ळी. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. कावेरी नदीच्या कृपेनं इथं पाणी भरपूर, त्यामुळे संपूर्ण परिसर हिरव्यागार नारळी-पोफळींच्या रायांनी विनटलेला. वरवर पाहिलं तर भारतातल्या इतर अनेक शांत, सुंदर खेडेगावांपैकीच नुग्गेहळळी आज भासतं; पण एकेकाळी हे गाव म्हणजे विजय सोमनाथपुरा या नावानं प्रसिद्ध असलेला अग्रहार होता आणि इथं एकच नव्हे तर, अनेक वेदपाठशाळा होत्या हे आज कुणाला सांगूनसुद्धा खरं वाटणार नाही.

होयसळ राजवटीत हे गाव बोमण्णा दंडनायक या शूर सरदाराच्या आधिपत्याखाली होतं आणि तत्कालीन होयसळसम्राट वीर सोमेश्वर याच्या सन्मानार्थ बोमण्णा दंडनायकानं गावात दोन भव्य मंदिरं बांधली. एक, तो स्वतः शिवभक्त होता म्हणून सदाशिवाचं आणि दुसरं, होयसळराजे वैष्णव होते म्हणून श्रीलक्ष्मी-नृसिंहाचं. ही दोन्ही मंदिरं आज इतक्या वर्षांनंतरही नुग्गेहळ्ळी गावात गतवैभवाची साक्ष देत उभी आहेत. त्यातल्या श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिराची ओळख आज आपण करून घेणार आहोत.

हे मंदिर बोमण्णा दंडनायकानं सन १२४६ मध्ये बांधून पूर्ण केलं असं मंदिरात असलेल्या शिलालेखात नमूद आहे. नुग्गेहळळी हे गाव हासन शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर तिपटूरहून चेन्नरायपट्टणकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. होयसळ स्थापत्यशैलीचे अभ्यासक जेरार्ड फूकेमा यांच्या मते, हे मंदिर म्हणजे उत्तर होयसळ स्थापत्यशैलीचं एक उत्कृष्ट नमुनेदार उदाहरण आहे.

होयसळ मंदिरस्थापत्यशैलीची काही वैशिष्ट्यं आहेत. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराची जगती किंवा जोतं तारकाकृती आकाराचं असतं व ते जमिनीच्या समतलाहून बरंच उंच असतं. प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रानुसार, जगती जमिनीपासून उंचावर धरली जाते. कारण, त्यामुळे मंदिराची उंची वाढते, मंदिराच्या वास्तूला पक्कं अधिष्ठान मिळतं आणि मंदिराचं बाहेरून दर्शन घ्यायला प्रदक्षिणापथही उपलब्ध होतो. ही जगती किंवा पीठ हे त्याच्या आकारानुसार विविध प्रकारचं असू शकतं. उदाहरणार्थ : चतुरस्र, आयताकृती, वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार किंवा तारकाकृती, म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला स्टेलेट म्हणतात तसं. होयसळमंदिरांची जगती ही सहसा तारकाकृती असते. कारण, त्यामुळे मंदिराच्या वास्तूला अनेक कोन येतात आणि मंदिराच्या भिंतीवर, म्हणजेच मंडोवरावर, जास्त कोनाडे बसवणं आणि कोरीव करणं सोपं जातं. श्रीलक्ष्मी-नृसिंहाचं हे मंदिरही तारकाकृती अधिष्ठानावर उभारलेलं आहे.

होयसळ मंदिरस्थापत्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, वेदिबंधाचे सुस्पष्टपणे रेखलेले स्तर. वेदिबंध म्हणजे मंदिराचं जोतं आणि मुख्य भिंत यांच्यामधला भाग. हा भाग विविध आडव्या स्तरांमध्ये विभागलेला असतो. वेदिबंधाची रुंदी ही अर्थातच पीठाच्या रुंदीपेक्षा कमी आणि मंदिराच्या मंडोवराच्या रुंदीपेक्षा जास्त असते. यामुळे मंदिराच्या संपूर्ण वास्तूलाच एक प्रकारचा निमुळतेपणा प्राप्त होऊन मंदिर बोजड वाटत नाही. स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथांनुसार, वेदिबंधाच्या स्तरांची संख्या ही सहसा विषम असते आणि त्यांवरील कोरीव कामानुसार त्यांची नावं ठरलेली असतात. 

होयसळमंदिरांच्या वेदिबंधात सहसा भित्ती, कणी, अधपदम्, कीर्तिमुखस्तर, गजथर, अश्वथर, नरथर, कुंभथर, पुष्पथर असे नऊ थर सुस्पष्टपणे रेखलेले असतात. नरथरात बरेचदा भागवत, रामायण आणि महाभारतातले प्रसंग कोरलेले असतात. नुग्गेहळळीच्या श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिराच्या वेदिबंधावर मात्र भित्ती, गजथर, अश्वथर, पुष्पथर, नरथर, मकरथर आणि मयूरथर असे सात थर कोरलेले आहेत आणि नरथरावर भागवत आणि रामायण-महाभारतातले प्रसंग कोरलेले आहेत.

हे मंदिर त्रिकूटमंदिर आहे, म्हणजे तीन शिखरं; पण त्यांना जोडणारा एकच सभामंडप. मात्र, मुळात हे एककूटच मंदिर असावं. कारण, मंदिराचं एक शिखर मूळ होयसळशैलीत कोरीव कामानं पूर्ण भरलेलं आहे; पण इतर दोन शिखरं त्यामानानं साधी आणि नंतरच्या विजयनगर स्थापत्यशैलीशी साधर्म्य दर्शवणारी आहेत. 

मात्र, नुग्गेहळळीच्या श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या मंडपाच्या मुख्य भिंतीवर म्हणजेच मंडोवरावर केलेलं अप्रतिम कोरीव काम. सहसा भारतीय मंदिरांवर शिल्पकार आपली नावं कोरून ठेवत नाहीत; पण होयसळकाळातले शिल्पकार मात्र आपली नावं आपण कोरलेल्या शिल्पांखाली कोरून ठेवत असत.

नुग्गेहळळीच्या श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिरातील शिल्पं ही बायचोजा आणि मालितम्मा या प्रख्यात शिल्पकारांनी कोरलेली आहेत. दोघांचीही शैली होयसळपद्धतीनं अनेक अलंकारयुक्त देखण्या, काहीशा बुटक्या आणि घाटदार मूर्ती बनवायचीच असली तरी त्यांच्या स्वतःच्या कलेची छाप त्यांनी घडवलेल्या मूर्तींवर स्पष्ट कळून येते. बायचोजाची शिल्पं मंदिराच्या दक्षिण मंडोवरावर आहेत, तर मालितम्माची उत्तर भिंतीवर. बायचोजानिर्मित शिल्पं अधिक नाजूक आणि रेखीव आहेत; पण मालितम्माची शिल्पं गतीचा आभास करून देणारी आणि म्हणूनच अधिक जिवंत वाटतात. इतर कुठल्याही होयसळमंदिरावर न दिसलेलं एक शिल्प मला इथं आढळलं व ते म्हणजे झोपाळ्यावर बसलेल्या श्रीविष्णू-लक्ष्मीचं. दोन्ही बाजूंना दोन दासी उभ्या राहून झोपाळ्याचं दोरखंड हलवताना दाखवलेल्या आहेत. दोरखंडाच्या वळ्या, वरचा आकडा, बाजूचे खांब इत्यादी बारकावे सुरेख कोरलेले आहेत. 

अजूनही तमिळ लग्नांमध्ये वधू-वरांना श्रीविष्णू-लक्ष्मीच्या जागी कल्पून लग्नसोहळ्यामध्ये त्यांना एका सुशोभित झोपाळ्यावर बसवून झोके दिले जातात. त्या लग्नविधीला ‘ऊंजल’ असं नाव आहे. तेराव्या शतकातही ही परंपरा दक्षिण भारतात असावी असं यावरून स्पष्ट होतं. हे अत्यंत देखणं, नाजूक शिल्प बायचोजाच्या हातचं आहे.

हे मंदिर त्रिकूटपद्धतीचं असल्यामुळे आत तीन गाभारे आहेत आणि श्रीविष्णूची वेणुगोपाळ, चेन्नकेशव आणि श्रीलक्ष्मी-नृसिंह अशा तीन वेगवेगळ्या स्वरूपांत उपासना केली जाते. मंदिर आजही पूजेत आहे. नवरंगमंडपाची वितानशिल्पं, म्हणजे छतावरील शिल्पंही, अत्यंत देखणी आणि नजाकतीनं कोरलेली आहेत. मुद्दाम जाऊन बघावं असं हे नुग्गेहळळीचे श्रीलक्ष्मी-नृसिंहमंदिर आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com