सूर्य भासणाऱ्या मोदींनी द्यावे लक्ष

Article about Prime Minister Narendra Modi and Their Government
Article about Prime Minister Narendra Modi and Their Government

2019 वर्षाची ओळख नि:संशयपणे निवडणुकीचे वर्ष ही आहे. ते लक्षात घेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. तीन राज्यातील पराभवानंतर कार्यकर्त्याचे मनोधैर्य वाढावे यासाठी मोदी यांनी ही बेगमी केलेली दिसते. जवळजवळ प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करणारे प्रश्‍न एएनआयच्या संपादक मुलाखतकार स्मिता प्रकाश यांनी विचारले अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर उत्तरे दिली. पत्रकारांना सामोरे जात नाहीत, मोकळेपणाने उत्तरे देत नाहीत हे मोदींवरचे आक्षेप त्यांच्या कार्यकर्त्यानाही एव्हाना मनोमन पटू लागले असताना त्यांनी मौन सोडले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मुलाखत का दिली गेली असे प्रश्‍न मोदींबाबत लागू होत नाहीत. शिवाय त्यांनीही कोणतीही घोषणा न केल्याने अलिखित आचारसंहितेचे पालन केले गेले. मोदीविरोधकांनी मुलाखतीत नवे होते तरी काय असा प्रश्‍न केला आहे. भक्‍तांमध्ये स्वाभाविकपणे चैतन्य पसरले आहे. 

अत्यंत धोरणी आणि काहीतरी बरे करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशीच मोदींची तुलना सूर्याशी केली होती. त्यांच्यासारख्या उच्चपदस्थाला जी प्रतिमा वापरण्याचा मोह आवरता येत नाही ती अन्य कार्यकर्ते आणि भक्‍तांची भावना असेल तर नवल नाही. मोदी तसेही स्वत:ला सूर्य समजतात. रवी मी हा त्यांचा स्थायीभाव. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मावळलेल्या 2018 साली कित्येक योजनांचे अंतर पार करीत नेतृत्वाची चमक दाखवली. कोणत्याही लोकशाहीवादी देशासाठी विरोधी पक्षाचे महत्व फार, राहुल यांनी प्रगल्भ होणे हे सुचिन्ह आहे. ते या देशाचे पुढेमागे पंतप्रधान होण्याची दाट शक्‍यता असल्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा कागद भर पत्रपरिषदेत फाडण्याचा नाट्यमय बालीशपणा व्यक्‍तिमत्वाच्या इतिहासाचा भाग होणे श्रेयस्कर आहे. काँग्रेस परतीच्या वाटेवर असली तरी सध्याच्या पहाण्या/सर्वेक्षणे राहुल गांधींच्या तुलनेत मोदींना कित्येक टक्‍क्‍यांनी पुढे दाखवतात. 

ममता बॅनर्जी, मायावती, गेला बाजार पुन्हा देवेगौडा यांच्या सत्ताकांक्षांना धुमारे फुटत असले तरी महागठबंधनाची शक्‍यता आजही किंतुपरंतूची आहे. 2009 ची लाट अस्तंगत झाली तरी लोकप्रियतेत आजही आघाडीवर असलेल्या मोदींच्या प्रतिपादनाला भारतीयांच्या दृष्टीने फार महत्व आहे. त्यांची विधाने महत्वाची आहेत. ती अभ्यासायला हवीत. नोटाबंदी हा मोदींनी घेतलेला सर्वात क्रांतीकारक, धक्‍कातंत्राचा परिचय देणारा निर्णय. तो अचानक घेतलेला नव्हता. तर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी सावध व्हावे, मुख्य प्रवाहात यावे असे आपण आधीपासून घोषित करत होतो, असे मोदी यांनी काल नमूद केले. भारतातील काळा पैसा, त्याचे स्त्रोत हा अर्थकारण्यांच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा. त्यावर उपाययोजना म्हणून धक्‍कातंत्र वापरले गेले असावे. मुददा आहे, तो अंमलबजावणीचा. एकतर कुणालाही विश्‍वासात न घेता मोदी शहा आणि केवळ दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाची कल्पना होती असे म्हणतात. निर्णयाची कल्पना आधी दिली असती तर काळा पैसा आधीच पांढरा केला गेला असता हा त्यामागचा युक्‍तिवाद. 

भारतासारख्या महाप्रचंड देशात असा निर्णय केवळ चार डोकी घेऊ शकतात काय आणि घेतला तर तो अंमलात आणण्याची क्षमता केवळ चार जणांत असू शकते काय? रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरलाही त्या विशिष्ट दिवशी असे काही होणार आहे, याची कल्पना नव्हती म्हणतात. हा निर्णय ज्या दिवशी झाला त्यादिवशी त्याक्षणी मोदी यांची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेली मंडळी देशभक्‍तीने प्रेरीत झाली होती. 'भारतमाता की जय' हे नारे तेवढे त्या रांगांनी दिले नाहीत. अंमलबजावणीत जेव्हा ढिसाळपणा आला. नव्या नोटा एटीएमच्या आकाराला योग्य नाहीत, अशा ढोबळ बिनडोक चुका समोर येऊ लागल्या. तेव्हा जनमानसात विरोधी सूर व्यक्‍त होऊ लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकात कोणत्याही पक्षाजवळची गंगाजळी कमी झाल्याचे दिसले नाही. काळापैसा भारतीय निवडणुकात प्राण फुंकतो, हे वास्तव बदलले नसल्याचे सिद्ध होऊ लागले. 

तवलीन सिंग या इंग्रजी भाषेत लिहिणाऱ्या लोकप्रिय स्तंभलेखिका. त्यांनी काही आठवडयांपूर्वी मोदी स्वत:ला 'मसीहा' मानतात. ते राजकारणी असते तर नोटबंदीचा निर्णय त्यांनी घेतला नसता. परिणामांचा सखोल विचार केला असता असे विधान केले आहे. परवा एका नोकरशहाने खाजगीत बोलताना बँक कर्मचारी असा युद्धपातळीवर राबवायचा निर्णय अंमलात आणू शकत नाहीत. त्यांना तसा अनुभव नाही. महसूल यंत्रणेला हाताशी धरले असते तर निवडणूक घेण्याचा अनुभव असलेली ही यंत्रणा नोटबंदीचे दुष्परिणाम टाळू शकली असती असे सांगत होता. या निर्णयामुळे लक्षावधी मंडळी कर भरू लागली हा दिलासा फार मोठा आहे. पण मी माझे अशा शब्दांत मोदी रमतात असा पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्यांना आक्षेप खरा ठरवत मोदींनी कालच्या मुलाखतीत अंमलबजावणी चुकली अशी कबुली दिलीच नाही. कायदे कडक झाल्यामुळे आर्थिक क्षेत्रातले गुन्हेगार पळून गेले हा दावा तर पूर्णत: अयोग्य. 

मेहूल चोक्‍सीसारखी वॉरंट असलेली मंडळी यंत्रणा ढिसाळ असल्यामुळे पळून गेली. त्यांना अडवण्यात अपयश तरी आले किंवा त्यांना बाहेर जाण्यास मदत केली गेली. कायदे कडक झाले हे तर मान्यच पण ते करताना त्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष पुरवण्यात प्रशासन काहीसे अपयशी तर ठरले नाही ना ? 'गब्बर सिंग टॅक्‍स' ही राहुल यांनी दिलेली प्रतिमा चूक होती. त्यामुळे मोदी याबाबतीत जे बोलले ते योग्य आहे. भारतासारख्या विशाल देशात कोणतीही अव्यवस्था निर्माण न होता नवी करप्रणाली राबवता आली हे कौतुकास्पद आहे. या कररचनेतील काही आकारण्या गरीबांवर अन्यायकारक होत्या. त्या बदलल्या जात आहेत हे बरे आहे. ते मतपेटीकडे लक्ष ठेवून होत असले तरी निवडणूकप्रधान लोकशाहीत सारेच या मार्गाचा अवलंब करतात हे लक्षात घ्यायला हवे. 

काल समोर आलेला अन्य एक महत्वाचा मुद्दा अर्थातच राम मंदिराच्या निर्माणाचा. मंदिराचा विषय ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित करणे हे खरे तर प्रभू रामचंद्राच्या भारतीयांच्या मनातील स्थानाला धक्‍का देणारे आहे. हिंदुंच्या धर्मस्थळांचा विद्धवंस झाला. इतिहासात आक्रमकांनी केलेली ही आगळीक कालांतराने अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनासाठी राज्यकर्त्यांनी तशीच ठेवण्यास प्राधान्य दिले हे वेदनादायक आहे. पण या बाबीचा उपयोग उलट्या राजकारणासाठी होत असेल तर तेही तितकेच आक्षेपार्ह नाही काय? दर निवडणुकीपूर्वी राममंदिराचा प्रश्‍न समोर आणणे भारतीय मतदार कसे सहन करेल. मोदींनी हा विषय न्यायालयाच्या कार्यकक्षेत सुटावा यावर भर देण्याचा पुनरूच्चार केला आहे. मुस्लिम समुदाय या विषयाबाबत पुरेसा उदार झालेला दिसतो. त्यामागे भयगंड आहे काय माहीत नाही. पण अयोध्येतील राममंदिराच्या जमिनीच्या मालकीबददल अल्पसंख्यांक काहीसे खुले झाले आहेत. पुरावेही हिंदू हिताला बळकटी देणारे आहेत. या विषयावर हिंदीभाषक पट्टा सोडून किती संवेदनशीलता आहे हा प्रश्‍न. वटहुकुम काढायचाच होता तर तो सरकारस्थापन होताच काढायला हवा होता. त्यावेळी मोदींचा भर विकासाच्या राजकारणावर होता. आता लोकप्रियता कमी झाली म्हणून मतांचे धृवीकरण करू नये. संघ परिवारानेही मोदींनी मुलाखतीत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले ते उत्तम झाले. 'मंदिर भव्य बनाएंगे', 'तारीख नही बनाएंगे'ची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका बोचरी असते खरी पण ही तजविज न्यायालयाने करणे योग्य ठरेल.

मोदी पुन्हा प्रचाराच्या केंद्रस्थानी येऊ बघताहेत. ते अपेक्षित आहे. गांधी परिवारावर जे खटले सुरू आहेत. त्याचे निकालही न्यायव्यवस्था देईल. काँग्रेसमुक्‍तीबाबत आता सारवासारव करणे पटणारे नाही. मोदी शहा यांना काँग्रेसची खुन्नस आहे. लोकसभेत या पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद न देऊन या दोघांनी काँग्रेसजनांच्या मनात प्रतिशोधाची भावना तीव्र केली. हा 'मौतके सौदागर' या शब्दांमुळे आलेला संताप असावा पण राजकारणात क्षमा करत पुढे जायचे असते. सत्तेत आल्यानंतर ही जबाबदारी अधिक होते. गांधी परिवारावर जनता कमालीची नाराज झाल्यानेच एकेकाळी भारताचा मुख्य राजकीय स्वर असलेला हा पक्ष आक्रसत गेला. तेव्हा आता आईमुलाच्या भ्रष्टाचाराच्या कथांना शिक्षा देण्याचे काम स्वत:कडे न घेता मोदींनी आपण केलेली कामे सांगावीत. ती पुरेशी चांगली आहेत. भारतीयांना झटपट 'अच्छे दिन' आणण्याचे जे स्वप्न दाखवले ते पाच वर्षांत प्रत्यक्षात आणणे शक्‍य नव्हतेच. 'चुनावी जुमल्यांची लंगडी' समर्थने देण्याऐवजी काय करता आले त्याचा लेखाजोखा मोदींनी मांडावा. काय करता आले नाही त्याची विवरणे, स्पष्टीकरणे देत पुन्हा कौल मागावा. जनता तो पुन्हा तेवढ्या आकड्यात नाही पण मोदींच्या दिशेने देईलही.

आजही मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. राफेलबाबतचे आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर मागे पडण्याची चिन्हे आहेत. आता सूडाचे राजकारण करत चौकीदाराला चोर ठरवणाऱ्यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता मोदींनी स्वत:चे बोलावे, सहकाऱ्यांना समवेत ठेवावे. 'मन की बात' छोटी करीत कृतीवर अधिक भर द्यावा. भारतासारख्या बहुविध समाजांच्या आणि समस्यांच्या देशात बदल करायला पाच वर्षे फार कमी असतात हे जनता जाणते. तिच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्‍वास ठेवावा. परिपक्‍वतेच्या वाटेवरच्या प्रवासी असणाऱ्या राहुल यांच्यापेक्षा विधीनिषेधशून्य सापनाथ नागनाथ आघाडयांपेक्षा मोदींना कौल देणे, न जाणो, जनता कदाचित अजूनही पसंत करेल. जागा कमी होतील, पण सहकाऱ्यांच्या सहकार्याने संख्येत माघारलेले मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्‍यता आजही हिंदीभाषक राज्यात माघार झाली तरीही सर्वत्र व्यक्‍त केली जाते आहे. भारतात बिगर काँग्रेसी राजकारणाची बाजू अधिक प्रखर, मुखर करायची असेल तर कित्येकांना सूर्य भासणाऱ्या मोदींनी पसायदानातील मार्तंड जे तापहीनकडे लक्ष द्यावे. नोटबंदीला विरोध नाही पण रांगेत उभे राहून प्राण जाणार नाहीत याची काळजी नेत्याने घ्यायची नाहीतर कुणी ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com