काहीही असो मी 'निष्ठावान' कार्यकर्ताच!

सय (सुवर्णा येनपुरे- कामठे) 
बुधवार, 3 एप्रिल 2019

निष्ठावान कार्यकर्ता पक्षासाठी काय करतो...पक्षातील नेतेमंडळींचा नुसता 'आव्वाज' जरी आला तरी त्याची मोठी धडपड होत असते...अशाच एका अनुभवाचे उदाहरण...

जसं चहामुळे कुणाचं काही चांगलं झालं नाही तसंच कुणाचं वाईटही झालं नाही. मी इतका अट्टल चहा पिणारा आहे, की कधीही मी विकतचा चहा पिलेला नाही. चहा हे फुकट प्यायचे पेय आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. पेशाने तसा मी पावसाळ्यात नियमीत कॉलेजमधील कुणालातरी भेटायला जाणारा प्रियकर असतो. हिवाळ्यात कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचा अध्यक्ष, वसंत ऋतूत मी प्रामाणिक विद्यार्थी होऊन सर्व परीक्षा देतो. त्यानंतर मी संपूर्ण उन्हाळा आपण अख्ख वर्ष कसं वाया घालवलं, यावर सावलीत बसून विचारमंथन करत असतो. यामध्ये बदल म्हणून दर चार वर्षांनी मी उन्हाळ्यात कार्यकर्ता बनतो.

त्याचं झालं असं, एका उन्हाळ्यात विचारमंथन सुरू असताना एकदम घोळक्‍याने 10-12 पोरं समोरच्या चहाच्या टपरीवर आली. त्यातला एकजण, "सर्व्या पोरांसाठी एकदम कडक स्पेशल च्या झाला पाहिजे, ब्र का. ज्ये काय असलं ते लिवून ठिवं' म्हणत होता. 

'फुकट ते पौष्टिक', या नियमाप्रमाणे माझे पाय कधी त्या घोळक्‍याकडे वळले ते कळलंच नाही. ते सगळे बिल देणाऱ्याचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. असला कडक स्पेशल चहा पाजणारा असेल तर कार्यकर्त्याने निष्ठावान राहिलेही पाहिजे, मी मनोमन विचार केला. 

घोळक्‍यात राहून त्या 'भाईं'ची ख्याती माझ्या लक्षात आली. नुसता चहा पिऊन मी त्या 10-12च्या घोळक्‍यात 10-13 कधी झालो कळलंच नाही. कुणीतरी हळूच एक पट्टी आणि टोपी माझ्याकडे सरकवली. मी पण ती पट्टी शालीसारखी गळ्यात टाकली आणि टोपी घातली. तेवढाच उन्हापासून थंडावा मिळाला.

'आता गल्ली नंबर 39', भाईने आदेश दिला. 
लागलीच आम्ही सगळे भाईच्या मागे त्या गल्लीत शिरलो. भाईचे हात फेविकॉलने चिकटवले की काय, अशी शंका यावी इतके दोन तास चिकटून होते. मागोमाग आम्हीही हात जोडले होते. एव्हाना सर्वांना भूका लागल्या होत्या. भाईने सर्वांसाठी खाईल एवढे वडापाव मागवले होते. वडापाव काय आवडेना, मग आलोच म्हणत मी समोरच पाव भाजी वाटत असलेल्या एका कार्यकर्त्यांच्या रांगेत गेलो. पाव भाजी भारी होती. तिथं एकानं पुन्हा वेगळी पट्टी आणि वेगळी टोपी दिली. आधीची टोपी मी खिशात ठेवलीच होती.

"दादा' उठले तसे सगळे त्यांच्या मागोमाग चालायला लागले. "दादा' आधीच या मतदारसंघातून निवडून आले होते. मी त्यांना पाहिलेही नाही. जाता-जाता फस्‌कन गटारातून बाहेर आलेल्या पाण्यात त्यांचा पाय पडला. "कोणत्या ठेकेदारानं केलं रे याचं काम? असं करत असतात व्हय?' दादानं त्याच्या मागे उभा असलेल्या एका कार्यकर्त्याल विचारलं. त्यानं त्याच्या मागं उभा असलेल्या कार्यकर्त्याला विचारलं. असं करत-करत प्रश्‍न माझ्याकडं आला. मी मागे वळून बघितलं. मागे कुणीच नव्हतं. रॅलीतला मी शेवटचा कार्यकर्ता होतो. कायतरी सांगायचं म्हणून मी बोलायला गेलो, तोपर्यंत मी ही ते गटार ओलांडून पुढं आलो होतो. 

संध्याकाळच्या वेळेस, रॅली पुन्हा त्याच चहा टपरीवर थांबली. "सर्वांसाठी एक फक्कड च्या होऊदे, बीलाचं बघू नंतर' दादानं ऑर्डर सोडली. ऊन्हानं तापल्यानं मला चहा प्यायचा नव्हता. पण चहावरचं प्रेम मला थांबवता येईना, मी चहा घेऊन पुढे कोल्ड्रिंक देणाऱ्या रांगमध्ये घुसलो. पुन्हा एकदा नवीन पट्टी आणि नवीन टोपी! यावेळी माझ्याकडे कोणीतरी हातात धरायला बॅनरही सोपवला. कोल्ड्रींकनं जरा बरं वाटलं. 

साहेबांनी "चला रं पोरांनो' असा नारा दिला. तो उत्तरेकडून आला होता, मी साहेबांकडे पाहयची तसदी घेतली नाही. रॅली निघाली. संध्याकाळचा प्रचार खूप उशीरपर्यंत चालला. पोटातले कावळेसुद्धा आता पोटातचं जीव देतायत का, असं वाटू लागलं. साहेबांना पोरांसाठी बिर्याणीची सोय केली होतीचं! जेवल्यानंतर गुप्त भेटवस्तू वाटण्याचं काम साहेबांनी दिलं होतं. एकानं मला फूस लावत म्हणाला, "चलं तिकडं पलिकडल्या गल्लीत बिर्याणी आणि बीअरही वाटताहेत.' 

त्या पक्षाचं आहोत हे दाखवण्यासाठी त्यानं कुठूनतरी दोघांसाठी पट्टी व टोपी पैदा केली. आम्ही पण सराईत असल्यासारखं त्यांच्यासोबत बिर्याणी खाऊ लागलो. दिवसातली ही चौथी पट्टी आणि टोपी होती, झेंडाही मिळाला होता सोबत. मस्तपैकी घरी जाऊन ताणून द्यायचा विचार केला इतक्‍यात सकाळचे "भाई' आपल्याकडे पाहत असल्याचे कळलं. भाईंचा सोडला तर दिवसभर दुसऱ्या कोणत्याही नेत्याचा चेहरा मी पाहिला नव्हता, त्यामुळे भाई चांगला लक्षात राहिला होता.

मी तोंडातला बिअरचा घोट कसाबसा गिळला. "भाई' माझ्याजवळ आले, त्यांच्याही गळ्यात माझ्या गळ्यात होती तशीच पट्टी होती. पाठीवर थाप मारत म्हणाले, 'याला म्हणतात निष्ठावान कार्यकर्ता!' 

आता लक्षात आलं, सकाळी मी ज्या चार वेगवेगळ्या पक्षात होतो, तिथं भाई होतेचं. माझ्यासोबत भाईंचाही हा चौथा पक्ष होता. भाईंच्या कौतुकाच्या थापेमुळे माझाही ऊर भरून आला. 
घरी गेल्यावर आईकडं चार टोप्या, बॅनर देत म्हणालो, 'शेतावर जाताना घालत जा टोपी, लै ऊन असतं ना.' आई बॅनरवर जास्त खूष होती. दुसऱ्या दिवशी कुरडया त्याच्यावरचं तर वाळणार होत्या. 

Web Title: Article about Works of Political Party Workers