आईपण एन्जॉय केलं... (आदिती शारंगधर)

आदिती शारंगधर
मंगळवार, 30 एप्रिल 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण"या पुरवणीत...

कम बॅक मॉम
प्रेग्नंसी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म, हे वाक्‍य मी अनुभवलं आहे. आई होणं हे जगातील सर्वांत मोठं सुख आहे, असं मी म्हणेन. नवी जबाबदारी आपसूकच आपल्या हाती येते. मी माझ्या प्रेग्नंसीदरम्यान फारसं काम केलं नाही, मात्र घरीही बसून राहिले नाही.

नवनवीन गोष्टी मी शिकत राहिले. स्पॅनिश भाषा मी माझ्या प्रेग्नंसीदरम्यानच शिकले. आम्ही कलाक्षेत्रातील असल्यामुळं आमचं कामही तितकंच जबाबदारीचं. चित्रीकरणाच्या वेळा, घरची जबाबदारी, मुलाच संगोपन आणि या सगळ्यामधून स्वतःसाठी वेळ कसा द्यायचा, हा प्रश्‍न मला होताच. त्यातूनही मार्ग काढीत मी माझा मुलगा अरिन आठ महिन्यांचा झाल्यानंतर कामावर रुजू झाले. मी कॉमेडी शोमधून पुन्हा कामाला सुरवात केली, मात्र काही काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. अरिन अगदीच लहान असल्यानं त्याला माझ्याशिवाय करमेना. शिवाय मलाही त्याचा खूपच लळा लागला होता. एक ते दोन महिने मी कॉमेडी शोचं चित्रीकरण केलं. त्यानंतर पुन्हा मी सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. यादरम्यान मला बऱ्याच मालिकांसाठी ऑफर येत होत्या, मात्र तेव्हा मला माझ्या मुलाबरोबर एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं वाटलं. अरिन दीड वर्षाचा झाल्यावर पुन्हा एकदा मी कलाक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. जवळपास वर्षभरापूर्वी मला ‘ह. म. बने, तु. म. बने’ मालिकेसाठी विचारण्यात आलं.

सोनी मराठीसारखी वाहिनी आणि या मालिकेची कथाही उत्तम असल्यानं मी याच मालिकेमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. लहान मुलाची जबाबदारी अंगावर आली की, आपण त्यातच अडकून राहतो. काम, घर आणि मूल सांभाळणं प्रत्येक स्त्रीसाठी तारेवरची कसरत. मी माझंच उदाहरण सांगते. अरिनच्या जन्मापासून मी एकटीच त्याचा सांभाळ करते आहे. जोडीला माझे पती आणि आमच्या घरात काम करण्यासाठी काही स्त्रिया आहेत, मी त्यांना मावशी म्हणते. यांनी मला साथ दिली. जबाबदारी वाढली असली, तरी मी माझ्या आयुष्यामधील हा महत्त्वपूर्ण टप्पा फारच एन्जॉय केला. अभिनय क्षेत्रात टिकून राहायचं म्हटल्यावर तुमचा लुक, फिट शरीर यालाही फार महत्त्व असतं. प्रेग्नंसीनंतर मलाही कशाप्रकारच्या भूमिका आपल्या हाती येणार याबाबत भीती होतीच. अनेकदा एकाच प्रकारच्या भूमिका हाती येतात, असंही घडतं. मात्र, सुदैवानं माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. 

(क्रमशः) 
(शब्दांकन ः काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Aditi Sarangdhar come back mom maitrin sakal pune today