कामावरचे प्रेम सर्व ठीक करते! (अदिती शारंगधर)

कामावरचे प्रेम सर्व ठीक करते! (अदिती शारंगधर)

कम बॅक मॉम
माझ्या हाती नुकतीच ‘ह. म. बने तु. म. बने’सारखी कौटुंबिक मालिका आली. विशेष म्हणजे, या मालिकेचा उपयोग मला खऱ्या आयुष्यातही होत आहे. यातील माझी भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. ऑनस्क्रीन मुलांचा, कुटुंबाचा मी सांभाळ करते याचा माझ्या खऱ्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत आहे, तसेच या मालिकेत बच्चेकंपनी असल्याने अरिनलाही मी बऱ्याचदा शनिवार, रविवार सेटवर घेऊन जाते. तोही या मुलांमध्ये रमून जातो. प्रेग्नंसीनंतर माझ्यामध्ये सर्वांत मोठा बदल झाला, तो म्हणजे माझं वजन खूप वाढलं. अरिनचा सांभाळ करता-करता आपण स्वतःकडंही लक्ष दिलं पाहिजे, हे मला जाणवलं आणि मी वर्कआऊट करण्याकडं अधिक लक्ष दिलं. वर्षभरामध्ये जवळपास १५ किलो वजन कमी केलं. ‘तुम्ही एक अभिनेत्री आहात तर घर, मूल सांभाळून तुम्हाला काम करायला कसं जमतं?’ हा प्रश्‍न बरेच लोक मला विचारतात. यावर माझं एकच उत्तर आहे, दिवसभराचं नियोजन योग्य असलं की, आपोआप सगळं सुरळीत घडतं. मी दिवसभर चित्रीकरणामध्ये व्यस्त असली, तरी माझ्या दिवसाची सुरवात सकाळी ५ः३० वाजता होते. सकाळी वर्कआऊट करून घरात जेवणसुद्धा बनवते. हे सगळं करत असताना अरिनकडं लक्ष द्यावं लागतं, ते वेगळंच. दिवसभर चित्रीकरण केल्यानंतर रात्री दहा वाजता घरी येते. दिवसभर काम करूनही मी थकत नाही. अरिनबरोबर वेळ घालवायचा म्हणून मी त्याला रात्री बाहेर फिरायला घेऊन जाते. 

मला एका गोष्टीची जाणीव झाली आहे. प्रेग्नंसीआधी चित्रीकरण संपलं की मी काही वेळ सेटवरच टाइमपास करायचे. पण आता मी खूप बदलली आहे. चित्रीकरण संपवून घरी कधी पळते, असं मला होतं. अरिनमुळं घरी येण्याची ओढ लागली आहे. मी त्याच्यामध्ये इतकी रुळली आहे की, मला आता स्वतःमध्ये काही चांगले बदल जाणवतात. कामाचा ताण असतो, पण घरी परतल्यानंतर अरिनचा चेहरा पाहिल्यावर सगळा थकवा निघून जातो. म्हणजे प्रेग्नंसीच्या काळात किंवा प्रेग्नंसीनंतर मुलाला जन्म देणाऱ्या आईलाही सगळ्यांनी तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. कारण लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सगळेच असतात; पण त्याच वेळी त्या आईच्या आरोग्याकडंही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. आईदेखील शरीरानं आणि मनानं फिट असल्यास ती मुलाचा सांभाळ अधिक चांगल्यारीतीनं करू शकते. माझे सगळीकडूनच पुरेपूर लाड झाले. त्यामुळं याबाबतीत मी नशीबवान आहे. कामासाठी, चित्रीकरणासाठी बाहेर जाताना माझा मुलगा मला साथ देतो. आता अरिन अडीच वर्षांचा आहे. त्यामुळं त्याला बऱ्यापैकी कळतं. मी स्वतःला सेलिब्रिटी आई समजत नाही. इतर आई जशा असतात तशीच मी राहते. मी करीत असलेल्या कामामध्ये मी खूष असते. मला वाटतं, आपलं आपल्या कामावरचं प्रेम आणि जबाबदारीची झालेली जाणीव, सगळं काही ठीक करण्यास मदत  करतं. 
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com