esakal | संदूक (ऐश्वर्य पाटेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwary-Patekar

जे संदुकीत होतं ते आलिशान घरात नाही. घरात जे आहे त्याला असा भावनेचा वास नाही. ज्याला भावनेचा वास नाही त्याला जिवंत तरी कसं समजायचं..! आजही मी कुठं कुठं शोधत असतो माझ्या संदुकीतल्या वस्तू. कुठं तरी मला त्या सापडतीलच. ती आस मी अजूनही सोडलेली नाही. ही आसच कदाचित जगण्याचं पान हिरवं ठेवू पाहतेय.

संदूक (ऐश्वर्य पाटेकर)

sakal_logo
By
ऐश्वर्य पाटेकर oviaishpate@gmail.com

जे संदुकीत होतं ते आलिशान घरात नाही. घरात जे आहे त्याला असा भावनेचा वास नाही. ज्याला भावनेचा वास नाही त्याला जिवंत तरी कसं समजायचं..! आजही मी कुठं कुठं शोधत असतो माझ्या संदुकीतल्या वस्तू. कुठं तरी मला त्या सापडतीलच. ती आस मी अजूनही सोडलेली नाही. ही आसच कदाचित जगण्याचं पान हिरवं ठेवू पाहतेय..

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या कित्येक वर्षांत जिला कधी हात लागला नाही अशी माझी संदूक, म्हणजे लाकडी पेटी, पडून होती अडगळीला. नको असलेलं सामान तिच्यावर टाकून घरच्यांनी ती अजूनच दडपूनच टाकली होती. गाव सोडून पोर शहरात निघून गेलं हा राग होताच त्यांच्या डोक्यात. त्यांचं म्हणणं असं की ‘असं काय धन पुरून ठिवलं व्हतं त्या संदुकीत म्हनून तिला असं मखरात घालून ठिवावं? मनचंद्या पोराचे रिकामे उद्येग! खाया-प्यायाचा लाड असावा, पर असा काई बी नाद घ्यावा का? हुकेल न्हाई तं काय?’

थोडक्यात संदुकीचा मालकच ठिकाण्यावर नाही म्हटल्यावर तिची हेळसांड ठरलेलीच!
त्यांच्या लेखी संदुकीचं तसं काहीच महत्त्व नव्हतं. ज्या वस्तूंचे पैसे मिळत नाहीत अशा गोष्टींना नाहीतरी जगात कुणीच विचारत नाही. ज्या वस्तूंचे पैसे होतील ती वस्तू महत्त्वाची. जिचे पैसेच होणार नाहीत ती महत्त्वाची नाही! तिचं काहीच अप्रूप नाही.

त्या वस्तूचे पैसे होत नाहीत हेही एका अर्थानं बरंच आहे म्हणा. नाहीतर घरच्यांनी त्या कधीच विकून टाकल्या असत्या अन् मी तुम्हाला आत्ता माझ्या संदुकीसंदर्भात काहीच सांगू शकलो नसतो. ती नुसतीच लाकडी पेटी होती असं नाही. ती रिकामी होती असंही नाही. माझे कितीतरी दिवस अजूनही त्या संदुकीनं जसेच्या तसे धरून ठेवलेत. म्हणजे, जादूची पेटी होती की काय ती? तर हां! जादूचीच पेटी होती ती. तिच्या जादूनं अजूनही सगळं काही शाबूत ठेवणारी. 

असं काय होतं त्या संदुकीत असं विचारण्यापेक्षा ‘काय नव्हतं’ असं विचारा वाटल्यास! तिनं एक मोठं जग सामावून ठेवलेलं होतं स्वत:त. तिच्यात होती आजीची खणाची चोळी अन् कमरेचा बटवा. ती हा बटवा फेकून देणार होती. खणाच्या चोळीची आठवण अशी की आजीनं ती तिच्या लग्नात घातली होती. त्यामुळे तिनं ती आजवर खूप जपली होती. एकदा तिची ही चोळी माझ्या धाकट्या बहिणीनं घातली तेव्हा आजीनं कोण कहर मांडला होता. घर डोक्यावर घेतलं होतं. तिचा संताप बहिणीच्या अंगावर उमटलाच. तरी आजीचं मन निवलं नव्हतं. आई आजीला म्हणाली : ‘‘ल्हान हाय लेकरू. त्याला काय कळतंय?’’

‘‘त्ये ल्हान लेकरू भाकरीला भाकरच म्हनून ऱ्हायलं का पानी म्हन्तंय? म्या म्हन्ते हातच का लावला माह्या चोळीला?’’
‘‘लावला आसंल हात. त्यानं यवढं काय बिघडलंय? झिजलीबिजली तं न्हाई ना तुमची चोळी?’’ आईही तणफणत म्हणाली.
‘‘हौ गं बाई, म्या दुस्मनचंय तिची. तू तेवढी मायेची. कैवार घिऊन ऱ्हायली लेकीचा!’’
माझा चुलता नाना तेवढ्यात तिथं आला. त्यानं हे भांडण थांबवलं.
‘‘बय, जाऊं दे नं, तू बी तं लई लाम्बन लावून ऱ्हायलीय.’’
‘‘आरं, म्या कुढं काय म्हनून ऱ्हायलेय?’’
‘‘तिला मारावं अशी तं फार मोठी चूक न्हाय ना झाली? नाहक पराचा कावळा करून ऱ्हायली.’’
आजी गप्प झाली.
आईनं आधीच माघार घेतली होती. मात्र, नाना निघून गेल्यावर आईनं बहिणीवर पुन्हा राग काढलाच.
‘‘काय गं केरसुने? तुला तेवंढी यकच चोळी सापडली व्हती व्हयं गं? तिला काय असं माणिक-मोती लागल्यात?’’

चोळीला माणिक-मोती लागलेले नव्हते हे खरं; पण त्याहीपेक्षा काही मोलाचं तिच्यात होतं अन्‌ ते आजीलाच ठाऊक होतं. बाकीच्यांच्या लेखी ती कापडाची चोळी होती; पण आजीसाठी आजोबाचं प्रेम होतं ते! आजोबांनी आजीची कुठलीच हौस पुरी केली नव्हती. मात्र, एकदा कुठल्याशा जत्रेला गेल्यावर आजीसाठी ते चोळीचा खण घेऊन आले होते. त्यामुळेच आजीनं ती चोळी जपली होती. आजोबा गेल्यानंतर तर तिनं कधी ती ल्यायली नाही. आणखीच जपून ठेवली. हे मला माहीत असण्याचं कारण म्हणजे, एका दुपारी आईनं शेजारच्या भामाईला ही हकीकत सांगितली, त्या वेळी मी तिथं असल्यानं मला ती ठाऊक झाली होती. प्रेमाच्या बाता आज आपण कितीही करत असलो तरी माझ्या आजीचं आजोबांवर होतं तसं प्रेम असेल का कुणाचं कुणावर? मग आजी का जपून ठेवणार नाही ती चोळी? आणि तिच्यानंतर मीही ती का जपू नये!
माझ्या आजोबांना मोठ्या भिंगकाचांचा चष्मा होता. या चष्म्यानं माझ्या बरोबरीच्या पोरांमध्ये माझी ऐट आणखीच वाढली होती.

म्हणजे मी करायचो काय, तर पोरांना कागद आणायला लावायचो. उन्हात चष्मा धरला की कागद पेटायचा. पोरांना खूप मजा वाटायची. ही जादू अर्थात नित्याकडे त्याच्या वडिलांचा असाच चष्मा येईपर्यंत टिकली अन्‌ माझा भाव उतरला; पण त्यानं काय होतंय म्हणा! कारण, त्या चष्म्याच्या आणखीही करामती होत्याच. तो घालून मी बहिणींना भेवडून सोडायचो. खरंतर त्याच्यातून मला दिसायचं काहीच नाही. बहिणींना माझे डोळे मात्र भोकराएवढे दिसायचे. 
आजी म्हणायची :‘‘फोडशील रे तो चष्मा.’’ 
मी म्हणायचो : ‘‘न्हाई तरी, आजी, आता तो घालायला आजोबा थोडेच हायेत?’’  
पण आजीनं तो चष्मा जपून ठेवला खरा. 
आणि मग मीही तो माझ्या संदुकीत जपून ठेवला.
त्या संदुकीत आणखी एक चीज होती. चुलत्याच्या लग्नाचा फेटा. 
चुलत्यानं मला तो सहजासहजी दिला नाहीच. मी तो रडून रडून त्याच्याकडून हट्टानं मिळवला होता. 

माझा हट्ट पाहून चुलती चुलत्याला म्हणाली : ‘‘त्यानं येवढा हट घेतलाय तं दिऊन टाका नं. तुमी बी काय ल्हान पोरागत वागून ऱ्हायले काई कळत न्हाई. काय करायचाय आता त्यो फेटा तुम्हाला? पुन्ना लगीन करनारंय का!’’ 
चुलतीनं असं म्हटल्यावर चुलत्याचा नाइलाज झाला अन्‌ फेटा माझ्या मालकीचा झाला.

त्या संदुकीत आजोबांची जीर्णशीर्ण झालेली ‘तुकोबांची गाथा’ होती. हयात असेपर्यंत आजोबांनी आम्हा बारक्या पोरांना तिला हात लावू दिला नव्हता. आजोबा वारल्यावर मी तिच्यावर हक्क सांगितला. 

तेव्हा काही मी ती वाचली नव्हती. त्या वयात ती वाचून तिचा अर्थ तेव्हाच कळला असता तर वर्तमानाचा जाळ असा आबगीच अंगावर आला नसता! लिगाडाच्या माशीगत आपण घोंघावत घोंघावत अडकून पडलोय जगण्याच्या अवघड पसाऱ्यात.
त्या संदुकीत होती आजीच्या बटव्यातून चोरलेली पाच रुपयांची चिल्लर. तेव्हाच्या दहा-पाच पैशांची. माझ्या चोरीनंतर आजीच्या तोंडाचा पट्टा पंधरा दिवस सुरू होता. सगळ्यांचा संशय माझ्यावरच होता, तरी मी साळसूदासारखा राहिलो न्‌ ताकास तूर लागू दिला नाही. धाकट्या बहिणीनं एक-दोनदा बोलण्याच्या ओघात बरोबर अंदाज घेतला होता तरी मी काही केल्या कबूल झालो नव्हतो. 

आईच्या काळ्या पोतीतले मणीही होते त्या संदुकीत. हे मी का सांभाळून ठेवले होते? काही कळत नाही! धाकट्या बहिणीच्या घुंगरांच्या तोरड्या होत्या. त्या तोरड्या मिळवण्यासाठी तिनं तेव्हा रान उठवलं होतं. रडून रडून आईला बेजार केलं होतं व नैताळ्याच्या जत्रेतून आईला त्या विकत घ्यायलाच लावल्या होत्या. 
तिचं लग्न झाल्यावर मी तिला म्हणालोही : ‘‘घेऊन जा आता तुझ्या तोरड्या’’ 
तेव्हा ती म्हणाली : ‘‘राहू दे तुझ्या बायकोला!’’ 

पण ती तसं म्हणाली म्हणून काही मी त्या बायकोसाठी जपून ठेवल्या नव्हत्या.  
आमच्या हौशा बैलाचं एक शिंगही होतं त्या संदुकीत. हौशा बैल मेल्यावर त्याला नदीकाठावर नेऊन टाकण्यात आलं, तेव्हा मी त्याचं शिंग घेऊन आलो घरी. तेव्हा वडिलांनी मारून मारून पाठ सोलून काढली होती माझी. तरी मी नाहीच फेकून दिलं ते शिंग. संदुकीत होता घोड्याचा नाल. पुंजा मोठ्याईचं घर पडलं तेव्हा तिथं सापडलेली हलकडी होती. त्या हलकडीवरून माझी अन्‌ कांबळेंच्या नित्याची जबर हाणामारी झाली होती. तरी त्या हलकडीवरचा हक्क मी सोडला नव्हता. मला काय करायचं होतं त्या हलकडीचं? तेही माहीत नव्हतं मला. मी ती फक्त जपून मात्र ठेवली. होता एक सोनकिडा. काडेपेटीत बंद. मात्र, तो मेला बिचारा नंतर. त्याला आम्ही ‘भिंग’ म्हणायचो. तो पकडणारा कंथईचा आर्ज्या. मागं एकदा भेटला तेव्हा त्याला विचारलं : ‘‘काय रे, पकडला का एखादा भिंग?’’ 

‘‘अरे, आता कुठं राहिलेत भिंग? सौंदडीचं झाड न्हाई अन्‌ भिंगाचा लोभ असणारी पोरंही कुठं आहेत आता? एक ‘पाणकवडी’ होती संदुकीत. मात्र, ती पाण्याशिवाय कशी राहील? पण तिलाही पकडून ठेवण्याचा हट्ट केलाच होता मी. खरंतर मह्याच्या अंगावर चेष्टेनं फेकली होती ती; पण तो रडायचा कुठं थांबतोय? त्याच्या बापानं येऊन असं काही पिदडलं त्याला की बास! मी मह्याला म्हटलं, ‘मैत्री तुटली.’ पण संध्याकाळी पुन्हा झालीच बट्टी. सागरगोटे...आंब्याच्या चार-दोन कोयी...वेगवेगळ्या रंगांचे ‘डोळे’ असलेल्या काचेच्या गोट्या... काडेपेटीत ठेवलेलं फुलपाखरू...भोवरा...पंधरा ऑगस्टच्या दिवशी पाच पैशांत मिळालेला तिरंगा...वाणीगुरुजींची टोपी...भिलाच्या सजण्यानं एक भाकरीवर दिलेला सुगरणीचा खोपा...असं बरंच काय काय सांभाळलं होतं मी त्या संदुकीत इतकी वर्षं. अधूनमधून गावी चक्कर झाला की मी ते सगळं चाचपून पाहायचो. मात्र, आता ते फेकून देण्यात आलं होतं. रिकामी केली गेली होती माझी संदूक. घरच्यांनी केलेली ही नकोशी ‘जादू’ माझ्या फार जिव्हारी लागली...!

आज बंगला आहे. गाडी आहे. चिक्कार पैसे आहेत. फक्त संदूक नाही. ती नाही तर हे सगळं काहीच नाही. जे संदुकीत होतं ते आलिशान घरात नाही. घरात जे आहे त्याला असा भावनेचा वास नाही. ज्याला भावनेचा वास नाही त्याला जिवंत तरी कसं समजायचं...!

आजही मी कुठं कुठं शोधत असतो माझ्या संदुकीतल्या वस्तू. कुठंतरी मला त्या सापडतीलच. ती आस मी अजूनही सोडलेली नाही. ही आसच कदाचित जगण्याचं पान हिरवं ठेवू पाहतेय..

loading image