काम परफेक्ट करा; प्रेक्षकांचे प्रेम मिळतेच!

काम परफेक्ट करा; प्रेक्षकांचे प्रेम मिळतेच!

सेलिब्रिटी टॉक
मी आजवर अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. काही मराठी चित्रपटांमध्येही मी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, मी मालिका की चित्रपट जास्त कुठे रमते, असं कोणी विचारल्यास माझं एकच उत्तर असतं, जिथं माझ्या अभिनयाला वाव मिळतो तिकडंच! मी एक कलाकार असल्यानं मालिका, चित्रपट असा मी भेदभाव करत नाही. मी माझं काम अगदी जीव ओतून करते. तेलुगूमध्येही मी तीन चित्रपट केले आहेत. मी हिंदी मालिका किंवा चित्रपट पहिल्यापासूनच करत आले असल्यानं हिंदीमध्ये माझं करिअर जास्त आहे. एका मराठी शोचं सूत्रसंचालनही केलं. ‘फु बाई फु’ या कॉमेडी शोची मी परीक्षक होते. मी माझ्या प्रत्येक भूमिकेत रमून गेले. त्यामुळं मी कोणत्या भाषेमध्ये काम करतेय किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करतेय याचा मला कधीच फरक पडला नाही. आता मी गुजराती भाषेमध्येही एक चित्रपट करणार आहे. 

मी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी एअर होस्टेस होते. मी क्‍लासिकल डान्सरही आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबरोबर मी कथक परफॉर्मन्स करायचे. मी जवळपास २२ ते २३ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर एक आवर्जून सांगावसं वाटतं, की आपलं काम परफेक्‍ट असल्यावर योग्य तो मान आणि प्रेम मिळतंच. त्याचबरोबर मी माझ्या संपूर्ण कुटुंबामुळंच आज उभी आहे. त्यांनी आजवर मला साथ दिल्यामुळंच मी मानाने सगळीकडं मिरवते! हिंदी चित्रपट करत असताना मी आता पुन्हा मराठीकडे वळली आहे. माझा डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मी एका स्त्री रोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळीच भूमिका मिळाली आहे. ही एक छान, सुंदर, क्‍यूट लव्ह स्टोरी आहे. सलिल कुलकर्णीच्या दिग्दर्शनाचं यासाठी विशेष कौतुक करावं लागेल. त्याने मला माझी भूमिका मला इतकी चांगली समजावून सांगितली की, मला यासाठी काही विशेष तयारी करावीच लागली नाही. मुक्ता बर्वे, अलका कुबल यांसारख्या कलाकारांबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. प्रेक्षकांना आता एक नवी आश्‍विनी पाहायला मिळणार आहे. 
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com