मेरा 'भूत', सबसे 'मजबूत'

modi shah
modi shah

भाजपची सध्‍याची स्थिती 'सातवे आसमान पर' असल्‍यासारखी आहे. एक-एक मित्र लांब जात असतानाही भाजप पुढची 50 वर्षे सत्‍तेत राहणार असल्‍याचं सांगत सुटलीय. हळूहळू का होईना, एकवटू पाहणाऱ्या आणि आक्रमक होऊ घातलेल्‍या विरोधकांच्‍या वाढलेल्‍या आत्‍मविश्‍वासाला सुरुंग लावण्‍यासाठीच भाजपनं ही खेळी खेळायला सुरुवात केली आहे. यामुळेच भाजप अध्‍यक्ष अमित शहांनी 2019 ची निवडणूक जिंकलो, तर आपण पुढच्‍या 50 वर्षांपर्यंत सत्‍तेवरच राहू असा विश्‍वास व्‍यक्‍त करायला सुरुवात केली आहे. हा विश्‍वास सार्थ ठरवण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आतापासूनच कंबर कसलीय. त्‍यामुळेच त्‍यांनीही भाजप कार्यकर्त्‍यांचे प्रबोधन करायला सुरुवात केली आहे. हे करताना त्‍यांनी मतदार संघातील मतदान केंद्रनिहाय बूथवर लक्ष केंद्रीत केल आहे. 'मेरा बूथ, सबसे मजबूत' असा नारा देत त्‍यांनी कार्यकर्त्‍यांमध्‍ये ऊर्जा भरण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे.

विरोधकांच्‍या संभाव्‍य एकीमुळे ?
पंतप्रधांनापासून मंत्रिमंडळातल्‍या सदस्‍यांपर्यंत आणि भाजपच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षांपासून ते ब्‍लॉक अध्‍यक्षांपर्यंत सारेच प्रचाराच्‍या कामात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत, पण हीच मंडळी सर्वसामान्‍यांच्‍या जीवन-मरणाशी निगडित असलेल्‍या प्रश्‍नांवर तोंडाला कुलूप लावल्‍यासारखं वागत आहेत. कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखाली कोणीही एकत्र येणार नाही, असं समजणाऱ्या भाजपला परवाच्‍या इंधन दरवाढीविरोधातल्‍या बंदनं धक्‍का दिला आहे. कॉंग्रेसनं पुकारलेल्‍या भारत बंदला डाव्‍यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. नुसता पाठिंबाच नाही, तर सक्रीय सहभागही नोंदवला आणि बंद परिणामकारक करण्‍यात मोलाचा वाटा उचलला. यामुळं कॉंग्रेस एकाकी पडलीय, असा जो भ्रम भाजप नेतृत्‍वाला झाला होता, त्‍याला धक्‍का बसलाय, हे नक्‍की. त्‍यामुळंच भाजपनं आक्रमक प्रचार करायला आतापासूनच सुरुवात केली आहे.

इंधन दरवाढीवर उपाय सुचवणाऱ्यांच्‍या तोंडाला कुलूप का?
पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्‍या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ सर्वसामान्‍यांचा संताप शिगेला पोहोचवत असताना पंतप्रधानांपासून कोणीही यावर चकार शब्‍द काढताना दिसत नाहीत. नाही म्‍हणायला, बंदच्‍या दिवशी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तोंड उघडलं. पण सरकारची बाजू मांडण्‍यासाठी किंवा दर आटोक्‍यात आणण्‍यासाठी आम्‍ही काय आणि कसे प्रयत्‍न करतोय, हे सांगण्‍यासाठी नव्‍हतं, हे लागलीच स्‍पष्‍ट झालं. त्‍यांनी इंधनाचे वाढते दर आटोक्‍यात आणण्‍यातली हतबलता, अगतिकता व्‍यक्‍त करण्‍यासाठीच तोंड उघडलं होतं. हीच मंडळी मनमोहन सिंगांच्‍या कार्यकाळात इंधन दरवाढ कशी जीवघेणी ठरतेय, ती कमी करण्‍यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि तरीही सरकार काहीही करत नाही, असं बेंबीच्‍या देठापासून ओरडून सांगत होती. यात रवीशंकर प्रसादही होते, हे विशेष !

महागाईची भीती आता हितचिंतकांनाही!
पंतप्रधान मोदी आणि भाजपची पाठराखण करण्‍याची एकही संधी न सोडणारे रामदेवबाबांसारखे हितचिंतकही आता मोदी सरकारला महागाईची भीती दाखवायला लागलेत. मोदी-शहांच्‍या आजूबाजूच्‍या लोकांना हा धोका लक्षात येतोय, तर मग मोदी-शहा इतके निर्धास्‍त कसे, याचं नक्‍कीच आश्‍चर्य वाटतं. उलट साडेचार वर्षानंतरही मोदी-शहा पुन्‍हा पुन्‍हा या सगळ्या गोष्‍टींचं खापर कॉंग्रेसवर फोडण्‍यातच धन्‍यता मानत असल्‍याचं पाहायला मिळतंय. महागाईवर तोडगा काढण्‍यापेक्षा कॉंग्रेसवर खापर फोडण्‍यातच भाजपचे सगळेच नेते आपली ताकद पणाला लावत आहेत. त्‍यामुळं सर्वसामान्‍यांच्‍या संतापात भरच पडत आहे. सर्वसामान्‍यांच्‍या संतापाची झळ आपल्‍याला बसू नये, याची काळजी एक- एक मित्र, एक एक हितचिंतक आतापासून घेऊ लागलाय. एवढंच नाही, तर निवडणुकीत याचा फटकाही बसू शकतो, असा इशारा देऊ लागलेत.

आभासी जगच तारणार?
वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळ्या विकास योजना, त्‍यामुळे काय फायदे होणार किंवा मिळणार, याचा प्रचारही आतापासूनच सुरु झालाय. हे करताना सरकारी यंत्रणेचाच जास्‍तीत जास्‍त उपयोग कसा करुन घेता येईल, यावर मोदींनी भर दिला जातोय, हेही लोकांच्‍या नजरेत येतंय. मग ते पेट्रोल पंपांवर मोदींची छबी असलेलं होर्डिंग असो, की सरकारी प्रकाशनं असो... प्रत्‍येक ठिकाणी मोदीच मोदी पाहायला मिळत आहेत. इतकंच काय, अटलबिहारी वाजपेयींच्‍या नावानं काढलेल्‍या अटल विकास यात्रेतही अटलजींचीच छबी गायब होती आणि तिथंही मोदी-शहांचंच दर्शन घडत होतं. एकंदर, जे काही करायचे, ते आभासी जगाच्‍या माध्‍यमातूनच करायचं, अशी शपथच मोदी-शहांनी घेतलेली दिसतेय. या आभासी जगाचा फायदा एक-दोनदा होईलही, पण वारंवार नाही, हे वास्‍तव मोदी-शहा स्‍वीकारणार आहेत की नाही? की प्रत्‍येक वेळी सव्‍वाशे कोटी जनतेला धाप लागेपर्यंत विकासाच्‍या 'मृगजळा'मागेच धावायला लावणार आहेत?

जुमल्‍यांच्‍या भूतावर इतका विश्‍वास कसा काय?
साडेचार वर्षांपूर्वी मोदींनी दाखवलेलं 'अच्‍छे दिन'चं स्‍वप्‍न सर्वसामान्‍यांसाठी अजून तरी स्‍वप्‍नच आहे. नोटबंदीचे फायदे दिसण्‍याऐवजी तोटेच जास्‍त दिसू लागलेत. इंधनाचे दर रावणाच्‍या लंकेत घुसलेल्‍या मारुतीच्‍या शेपटीप्रमाणं वाढतच चाललेत. हे सारं कमी होतं की काय, म्‍हणून देशातलं सौहार्दाचं, सलोख्‍याचं वातावरणही ढवळून निघू लागलंय. पदावर असलेले भाजप नेते दररोज उठून वाट्टेल ते बरळू लागलेत. एवढं सारं होत असतानाही अमित शहा 2019 च्‍या निवडणुका जिंकलो, तर पुढची 50 वर्षे आपल्‍याला सत्‍तेवरुन कोणी हटवू शकत नाही, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत आहेत. हे सारं कशाच्‍या जोरावर ? आभासी जगाच्‍या की आणखी कशाच्‍या ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com