
जेव्हा पहिल्या मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलं, तो व्हिडिओ-चित्र तेव्हाच्या जगात माध्यमांमधून पोहोचली, तेव्हा कुठल्या तरी सुपीक बुद्धीत अशी 'कॉन्स्परसी थिअरी' जन्मली, की हे सारं जे दाखवताहेत, ते साफ झुठ आहे.
भावा, पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर माणूस उतरलाच नव्हता. ते अपोलो 11 नावाचं चांद्रयान अमेरिकेतल्या एका स्टुडियोत केलेला खेळ होता. रशियानं उडवलेलं स्पुटनिक शीतयुद्धात अमेरिका पिछाडीवर पडत असल्याचं ओरडून ओरडून सांगत होतं. त्यामुळं, अमेरिकेनं हॉलीवूडच्या मदतीनं हा स्टंट घडवून आणला. माणूस कसला उतरतोय तेव्हा चंद्रावर...
-----------------
आपल्या गल्लीतल्या कट्ट्यावरच नव्हे; तर अमेरिकेतही अशा गप्पा करणारी जनता आहे. या गप्पांमधून पर्यायी सिद्धांत मांडले जातात. 'जे सांगितलं गेलं, ते साफ खोटं...खरी बाजू ही आहे...ती सरकार/बड्या शक्ती मुद्दाम आपल्यापासून लपवतं...', अशी या सिद्धांतांची रचना. यांना 'कॉन्स्परसी थिअरी' म्हणतात. फारच जडबोजड नाव वाटतं ना? व्हायरल म्हटलं तर...? समजायला सोपं जातं.
...तर जेव्हा पहिल्या मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलं, तो व्हिडिओ-चित्र तेव्हाच्या जगात माध्यमांमधून पोहोचली, तेव्हा कुठल्या तरी सुपीक बुद्धीत अशी 'कॉन्स्परसी थिअरी' जन्मली, की हे सारं जे दाखवताहेत, ते साफ झुठ आहे. 'कायच्या काय सांगताहेत...आपल्याकडं तसली काय टेक्नॉलॉजी नाहीय...हे उगाच आपलं सांगताहेत...लपवताहेत आपल्यापासून खरं खरं...' असं म्हणत म्हणत ही कॉन्स्परसी थिअरी पसरलायला लागली.
चंद्रावर माणूस गेलाच नव्हता, या थिअरीचा जनक बिल केसिंग. जन्मानं जर्मन-अमेरिकनं. तो नोकरी करायचा एका अवकाश तंत्रज्ञान कंपनीत. तिथं त्याचं काम टेक्निकल रायटरचं. म्हणजे लेखकाचं. 20 जुलै 1969 चे चंद्राचे, तिथं उतरलेल्या नील आर्मस्ट्राँगचे फोटो पाहून पाहून वैतागलेल्या केसिंगनं 1976 मध्ये थेट एक पुस्तक लिहिलं, 'We Never Went to the Moon.' कुठल्याही प्रसंगात शंका घेणारी माणसं जगातल्या प्रत्येक समुहात आहेतच. त्यांच्या मनात आधीच पाल चुकचुकली होती. त्यात केसिंगच्या पुस्तकानं भर घातली आणि माणूस चंद्रावर बिंद्रावर काय गेला नव्हता राव, अशी कॉन्स्परन्सी थिअरी आकाराला आली.
या आहेत कॉन्स्परसी थिअरी...
1. '2001: ए स्पेस ओडिसी' चित्रपटाचा दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिक याने अपोलो 11 मोहिमेचे स्टुडिओत चित्रीकरण केले.
2. अमेरिकेकडं चंद्रावर माणूस उतरविण्याइतकं सक्षम तंत्रज्ञान 1969 मध्ये नव्हतेच.
3. चंद्राच्या फोटोत तारे दिसायला हवे होते. ते दिसत नाहीत.
4. चंद्रावर सावली पडत नाही. फोटोत तर चांद्रवीरांची सावली दिसतेय
5. चंद्रावर हवा नाही; मात्र अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडफडताना दिसतोय
या थिअरीच्या समर्थनासाठी स्टॅनले क्युब्रिक याचा जगप्रसिद्ध चित्रपट '2001: ए स्पेस ओडिसी'. हा चित्रपट वापरला गेला. हा चित्रपट 1968 चा. म्हणजे अपोलो चांद्रयानाने चंद्रावर उतरण्याच्या बरोबर एक वर्षे आधी आलेला. क्युब्रिकने हा चित्रपट बनविण्यापूर्वी अवकाश क्षेत्रातल्या तब्बल 70 उद्योगांशी, विद्यापीठांशी, अभ्यासकांशी वगैरे वगैरे चर्चा केलेली. चंद्रावरचं वातावरण स्टुडियोत तंतोतंत उभा केलेलं. चित्रपट तुफान चालत होता. त्याचा आधार केसिंगनंही घेतला. क्युब्रिकच्या मदतीनं अमेरिकी सरकारनं अपोलो 11 नावाची 'फेक' चांद्रमोहिम घडवली, असं त्यानं मांडलं. क्युब्रिकचा चित्रपट म्हणजे ASP (अपोलो स्टिम्युलेशन प्रोजेक्ट) होता आणि चित्रपट यशस्वी झाल्यावर चांद्रमोहिमेची व्हिज्युअल्स जगजाहीर केली गेली, असा दावा केसिंगनं केला.
केसिंगचं पुस्तक अपोलो 11 इतकंच तुफान गाजलं. इंटरनेट नसलेल्या जगात त्याची थिअरी व्हायरल झाली. 'चंद्राच्या फोटोत तारे कसे दिसत नाहीत...?', 'चांद्रवीरांची सावली कशी काय पडलीय...?', 'चांद्रवीरांचे जेवण पंचतारांकित कसे...?' वगैरे वगैरे प्रश्न विचारणारे फोटो त्यानं पुस्तकात प्रसिद्ध केले.
केसिंगचे वंशज कुठे ना कुठे होतेच. त्यातलाच एक राल्फ रेयान. त्यानंही पुस्तक लिहिलं, 'द लास्ट स्केप्टिक ऑफ सायन्स.' चांद्रवीर पृथ्वीवर परतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन त्यांना सर्वात आधी भेटायला गेलेले. तेव्हा, 'तिघेही अंतराळवीर अजिबात उत्साहात दिसत नव्हते...असं कसं काय...त्यांना कशाची लाज वाटत होती...?', असा नवाच प्रश्न रायननं मांडला.
कॉन्स्परसी थिअरी मानणाऱायंच्या बुद्धीलाही दाद द्यायला पाहिजे. त्यांनी काय काय शोधून काढलं...ते नील आर्मस्ट्राँगनं अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकवलेला फोटोत दिसतो. चंद्रावर हवा नाही, मग राष्ट्रध्वज फडकतोय कसा काय...?
इंटरनेटच्या युगात ही थिअरी आणखी प्रसिद्ध होत गेली. शंकासूरांच्या डोक्यात खिळा ठोकत गेली. गेल्या वीस वर्षांत अशा शंकासूरांची संख्या वाढलीय, असं SatelliteInternet ही वेबसाईट सांगतेय. जमाना फेकन्यूजचा आहे. 1999 मध्ये सहा टक्के अमेरिकी नागरीकांना चंद्रावर माणूस उतरला हे मान्य नव्हतं. ही संख्या 2019 पर्यंत दहा टक्क्यांपर्यंत पोहोचलीय ! विशेष म्हणजे अधिकाधिक अमेरिकी तरूणाईला ही 'फेक न्यूज' वाटतेय. कॉन्स्परसी थिअरीला आज डिजिटल खतपाणी मिळते आहे. त्यामुळं, चंद्रावर माणूस खराच उतरला होता का, ही शंका घेणारे आता व्हॉटस्अॅप विद्यापीठातही दिसायला लागले आहेत.