esakal | सोरायसिस आणि पाळायची पथ्ये
sakal

बोलून बातमी शोधा

psoriasis

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

सोरायसिस आणि पाळायची पथ्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
कोणताही आजार नियंत्रणात राहण्यासाठी पथ्यपाणी आवश्यक ठरते. सोरायसिसचेही तसेच आहे. औषधोपचाराला पथ्याची जोड दिल्यास तो नियंत्रित राहतो. सोरायसिसच्या रुग्णांनी कोमट पाण्याने आंघोळ 
करून त्वचा टिपून घ्यावी. आंघोळीनंतर शरीराला तेल अथवा मॉईश्चरायझर वापरावे. साबण सौम्य प्रकारचा असावा. तो हलक्या हाताने लावावा. औषधी साबणाचा वापर टाळावा. त्वचा रूक्ष करणारे पदार्थ उदा. डाळीचे पीठ अथवा उटणे वापरणेही टाळावे. सैलसर व सुती कपडे वापरावेत. अन्यथा, शरीरावर घर्षण होऊन चट्टे वाढतात. त्यामुळे, टेबलावर कोपरे टेकवणे टाळावे.

त्याचप्रमाणे, पादत्राणेही घट्ट वापरू नयेत. त्यांची पकड अधिक घट्ट असल्यास तळपायाचे चट्टे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे, मऊ पादत्राणे वापरावीत. डोक्यात सोरायसिसचे चट्टे असणाऱ्या रुग्णांनी काळे कपडे परिधान करू नयेत. 

डोक्यातील कोंडा काळ्या कपड्यांवर पडून तो ठळकपणे दिसतो. त्यातून सार्वजनिक ठिकाणी वावरताना न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, घराबाहेर पडण्याआधी डोक्याच्या त्वचेला तेल लावावे. विशिष्ट प्रकारचे औषधी शाम्पू वैद्यकीय सल्ल्याने वापरण्यास हरकत नाही. ऋतुमानानुसार आजाराची तीव्रता कमी-जास्त होऊ शकते. रुग्णांनाही त्याचा अंदाज आलेला असतो. त्यामुळे, आजार तीव्र होणारा ऋतू सुरू होण्याआधीच आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करावेत. त्यामुळे, तो आटोक्यात राहतो. औषधांचा भडिमारही टळतो. प्रत्येकाने सोरायसिसकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. 

हा रक्तदाब, मधुमेहासारखाच आजार आहे. आपण रक्तदाब, मधुमेहावरील औषधे दीर्घकाळ घेण्याचे सहजपणे स्वीकारतो, त्याच सहजपणाने या त्वचारोगाकडे पाहायला हवे. त्यामुळे, दैनंदिन जीवनात निश्चितच रुग्णाला आत्मविश्वासाने कार्यरत राहता येईल.

loading image
go to top