जर्मनीतील शैक्षणिक वर्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक
जर्मन विद्यापीठांमधील शैक्षणिक वर्ष दोन सेमिस्टर्समध्ये सुरू होते. ते म्हणजे विंटर आणि समर सेमिस्टर. इंग्रजी माध्यमातील कोर्सेस हे प्रामुख्याने विंटर सेमिस्टरमध्ये सुरू होतात. सर्वसाधारणपणे युनिव्हर्सिटीसमध्ये विंटर सेमिस्टर १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत असते. या काळात लेक्चर्स साधारणतः १५ ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होऊन १४ आठवडे चालतात. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात २ आठवड्यांची सुट्टी असते. ही सुट्टी वगळून १४ आठवडे लेक्चर्स चालतात.

समर सेमिस्टर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात असते. १५ ते २० एप्रिलनंतर लेक्चर्स सुरू होतात आणि पुढील १२ आठवडे चालतात. लेक्चर्स संपल्यानंतर सेमिस्टर संपेपर्यंतचा काळ हा परीक्षा, इंटर्नशिप्स, लॅब वर्क यासाठी असतो. युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेसमध्ये सेमिस्टर एक महिना आधी म्हणजे विंटर सेमिस्टर १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी आणि समर सेमिस्टर १ मार्च ते ३० ऑगस्टपर्यंत असते.

शैक्षणिक कालावधी 
जर्मनीमध्ये ‘बॅचलर्स’ ही प्रथम पदवी मिळते. सर्वसाधारणपणे ६ सेमिस्टर्स किंवा ३ शैक्षणिक वर्षांमध्ये ही पदवी मिळते. युनिव्हर्सिटीज ऑफ अप्लाइड सायन्सेसमध्ये बॅचलर्स करण्यासाठी ६-७ सेमिस्टर्स इतका कालावधी लागतो. कारण त्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे १ सेमिस्टरही करावे लागते. कला आणि संगीताशी संबंधित कॉलेजेसमध्ये बॅचलर्स करण्यासाठी ८ सेमिस्टर्स म्हणजे ४ वर्षे लागतात. 

त्यानंतर उच्चशिक्षणातील ‘मास्टर्स’ ही दुसरी पदवी मिळते. यासाठी सर्वसाधारणपणे २-४ सेमिस्टर्स म्हणजे १-२ वर्षे लागतात.

युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कला आणि संगीताशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ४ सेमिस्टर्स म्हणजे २ वर्षे लागतात. युनिव्हर्सिटीज ऑफ अप्लाइड सायन्सेसमध्ये मात्र ३-४ सेमिस्टर्स म्हणजे दीड  ते दोन वर्षे इतका कालावधी लागतो.

बॅचलर्स किंवा मास्टर्स पदवी पूर्ण केल्यानंतर त्या त्या अभ्यासक्रमाशी संबंधित अशा बॅचलर ऑफ आर्टस् (B.A.), बॅचलर ऑफ सायन्स (B. Sc.), बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (B. Eng.) तसेच मास्टर्ससाठी मास्टर ऑफ आर्टस् (M. A.), मास्टर ऑफ सायन्स (M. Sc.), मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (M. Eng.) अशा डिग्रीज मिळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dilip Oak edu supplement sakal pune today